• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

कायद्यापुढे हुशारी हरली!

इन्स्पेक्टर प्रधान (पंचनामा)

marmik by marmik
July 17, 2026
in पंचनामा
0
कायद्यापुढे हुशारी हरली!

पुराव्यांची साखळी पूर्ण झाली होती. इन्स्पेक्टर जाधवांनी सुधाकरला संशय न येऊ देता पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. सुधाकर नेहमीप्रमाणे अत्यंत शांत आणि आत्मविश्वासाने चेहर्‍यावर खोटे हसू घेऊन जाधवांच्या समोर खुर्चीत बसला. त्याला वाटत होते की आपला कट पुराव्याअभावी कधीच उघड होणार नाही. जाधवांनी डावा हात टेबलावर ठेवला. वातावरणात एक भीतीदायक शांतता पसरली होती.

रात्रीचे १० वाजले होते. कपाळावर आठ्या घालत पोलीस इन्स्पेक्टर मिलिंद जाधव पोलीस ठाण्यात केस डायरी लिहीत होते. तेवढ्यात पांढर्‍या शुभ्र साडीतील एक महिला अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत आत आली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि शरीर थरथरत होते. तिच्यासोबत चाळीशी ओलांडलेला, कॉर्पोरेट लुक असलेला एक शांत माणूस होता.

‘साहेब…माझ्या पतीचा खून झालाय! माझ्या राजेशला मारलं कोणीतरी…’ त्या महिलेने इन्स्पेक्टर जाधवांच्या टेबलावर थेट शवविच्छेदन अहवाल ठेवला. जाधवांनी नजर तीक्ष्ण करत विचारले, ‘शांत व्हा. आधी पूर्ण सांगा, नक्की काय झालंय? तुम्ही कोण आणि तुमच्यासोबत आलेले हे गृहस्थ कोण?’

त्या महिलेने डोळे पुसत सांगितले, ‘साहेब, मी सुमन शिंदे आणि हे आमचे कौटुंबिक मित्र, सुधाकर. मी पोलीस ठाण्यात एकटीच येत होते, म्हणून धीर देण्यासाठी हे माझ्यासोबत आले. माझे पती राजेश शिंदे यांचे दोन दिवसांपूर्वी तीव्र श्वसनविकारामुळे निधन झाले, असे आम्हाला वाटत होते. पण फॅमिली डॉक्टर कर्णिक यांना संशय आल्यामुळे त्यांनी पोस्टमार्टम करायला लावले. आणि आज हा रिपोर्ट आला…’

जाधवांनी फॉरेन्सिक रिपोर्ट उघडला. रिपोर्ट वाचताच त्यांच्या कपाळावर घाम फुटला. शरीरातील चिन्हांवरून स्पष्ट झाले होते की, राजेश यांचा मृत्यू नैसर्गिक नसून त्यांना गेल्या काही महिन्यांपासून संथ गतीने चालणारे ‘स्लो पॉयझन’ दिले जात होते!

सुमन रडत म्हणाली, ‘साहेब, राजेश यांना अस्थमाचा तीव्र त्रास होता. पण या रिपोर्टनुसार त्यांच्या शरीरात ‘अ‍ॅस्पिरिन’ आणि ‘इब्युप्रोफेन’ या औषधांचे अंश मोठ्या प्रमाणात सापडले आहेत. डॉक्टर म्हणतात, गंभीर अस्थमा असलेल्या रुग्णांसाठी ही नेहमीची वेदनाशामक औषधे म्हणजे ‘थेट विष’ असतात! कुणातरी अज्ञात खुन्याने माझ्या पतीला फसवून हे विष दिले आहे. मला न्याय हवा आहे, साहेब!’
जाधवांनी गुन्हा दाखल केला. सुमनच्या जाण्यानंतर सुधाकरकडे पाहत जाधवांनी विचारले, ‘सुधाकरजी, तुम्ही काय करता?’
सुधाकर अत्यंत नम्रपणे म्हणाला, ‘सर, मी एका ऑटोमोबाईल कंपनीत अकाउंटंट आहे. राजेश यांच्याच सोसायटीत राहतो. अनेकदा मीच त्यांना माझ्या गाडीतून डॉक्टरकडे घेऊन जायचो.’

केस हातात आल्यावर इन्स्पेक्टर जाधवांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान समोर आलेली कहाणी आणि धागेदोरे थक्क करणारे होते. सुरुवातीला जाधवांचा संशय राजेश यांच्या मृत भावाच्या मुलांवर— गणेश आणि सतीश यांच्यावर होता. दोघेही अट्टल दारुडे होते आणि त्यांचा डोळा मालमत्तेवर होता. पण त्यांच्या सीडीआरवरून (कॉल डिटेल रेकॉर्ड्स) आणि त्यांच्यावर पाळत ठेवल्यानंतर स्पष्ट झाले की, ते फक्त पैशांसाठी राजेश यांच्याशी भांडायचे, औषधोपचाराशी त्यांचा काहीही संबंध नव्हता. शिवाय जबाब नोंदवताना सुमन म्हणाली होती, ‘गेल्या सहा महिन्यांत पुतण्यांचा आणि मिस्टरांचा जवळचा संबंध कधी आलाच नाही. औषधं तर मी स्वतःच माझ्या हाताने द्यायचे.’ या एका वाक्याने जाधवांचे कान टवकारले. जर औषधं फक्त सुमन देत होती, तर विष आत गेले कसे?
जाधवांनी गुपचूप सुमन आणि सुधाकर दोघांचेही सीडीआर बारकाईने तपासले. सायबर सेलच्या रिपोर्टने जाधवांचे डोके भणभणले. सुधाकर हा स्वतःला राजेशचा मित्र म्हणवत होता, पण त्याच्या मोबाईलवरून राजेशला नाही, तर सुमनला शेकडो कॉल्स झाले होते! जेव्हा जेव्हा राजेश घरी नसायचे, तेव्हा सुधाकर आणि सुमन यांच्यात तासन्तास बोलणे व्हायचे. तपासात आणखी एक भयंकर माहिती समोर आली—सुधाकरने सायबर कॅफेमध्ये जाऊन ‘अस्थमाच्या रुग्णांसाठी कोणती औषधे घातक ठरू शकतात’, याबद्दल गुगलवर शोध घेतला होता.

कथा आता स्पष्ट होत होती. सुधाकरचे सुमनवर एकतर्फी प्रेम होते. राजेशचा काटा काढल्याशिवाय ती आपल्याला मिळणार नाही, हे त्याने ओळखले होते. सुमन दर चतुर्थीला आणि एकादशीला कडक उपवास करायची. सुधाकर मुद्दाम अशाच दिवशी संध्याकाळी राजेशसाठी आवडीचे पदार्थ घेऊन जायचा. सुमनचा उपवास असल्याने ती ते पदार्थ खात नसे. सुधाकर त्या पदार्थांमध्ये आधीच अ‍ॅस्पिरिन आणि इब्युप्रोफेनच्या गोळ्यांची पावडर मिसळायचा आणि ती राजेशला भरवायचा!

जाधवांनी आपले सहकारी इन्स्पेक्टर भोसले यांना सोसायटीजवळील मेडिकल स्टोअरमध्ये पाठवले. तिथल्या दुकानदाराने मोठा खुलासा केला, ‘सुधाकर सर आमच्याकडून नेहमी ‘अ‍ॅस्पिरिन आणि इब्युप्रोफेन’च्या गोळ्या घेऊन जायचे.’ आणि सर्वात मोठी चूक खुन्याने केली होती— त्याने प्रत्येक वेळी गोळ्या घेताना ‘ऑनलाईन पेमेंट’ केले होते आणि स्वतःचा मोबाईल नंबर दिला होता.

पुराव्यांची साखळी पूर्ण झाली होती. इन्स्पेक्टर जाधवांनी सुधाकरला संशय न येऊ देता पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. सुधाकर नेहमीप्रमाणे अत्यंत शांत आणि आत्मविश्वासाने चेहर्‍यावर खोटे हसू घेऊन जाधवांच्या समोर खुर्चीत बसला. त्याला वाटत होते की आपला कट पुराव्याअभावी कधीच उघड होणार नाही. जाधवांनी डावा हात टेबलावर ठेवला. वातावरणात एक भीतीदायक शांतता पसरली होती. जाधवांनी अत्यंत थंड आणि कुत्सित स्वरात संवाद सुरू केला, ‘या सुधाकरराव, बसा. काय मग, तब्येत कशी आहे? वय काय तुमचं?’
सुधाकर हसून म्हणाला, ‘वय काय साहेब, ४५ चालू आहे. पण अजूनही फिट आहे.’

‘ते तर दिसतंच आहे. ४५ चे असूनही तुम्ही अगदी २५-३० वर्षांचे तरुण दिसता! स्वतःला खूप छान मेंटेन केलंय तुम्ही. काय सिक्रेट आहे?’ जाधवांनी कौतुकाने विचारले, पण त्यांचे डोळे मात्र वाघासारखे रोखलेले होते. सुधाकरची छाती अभिमानाने फुगली, ‘सर, मी रोज योगा करतो, सकाळी वॉकिंग करतो आणि कडक डायट फॉलो करतो. आजतागायत मी कधी आजारी पडलो नाही. देवाच्या कृपेने अजून एकही गोळी खाण्याची वेळ माझ्यावर आलेली नाही.’

जाधवांनी चेहर्‍यावरचे भाव अचानक बदलले. आवाजातील नरमाई गायब झाली. डोळे तीक्ष्ण करत ते पुढे सरकले, ‘अरे वा! मग घरात मिसेस किंवा मुलांपैकी कोणी आजारी असतं का? त्यांच्यासाठी औषधं लागतात?’

‘नाही साहेब, माझी मिसेस पण योगा करते. आमच्या घरात कोणीही आजारी पडत नाही आणि औषधांचा तर आमच्याशी काही संबंधच नाही.’ सुधाकरने उत्तर दिले.

जाधवांच्या ओठांवर एक क्रूर हसू आले. त्यांनी अचानक टेबलाखालून एक जाड फाईल काढली आणि सुधाकरच्या चेहर्‍यासमोर आदळली! ‘धडाम!’ त्या आवाजाने सुधाकर दचकला.

‘ग्रेट! मग सुधाकरराव… हा मेडिकल स्टोअरचा रिपोर्ट, तुमच्या मोबाईल नंबरवरून झालेली औषधांची खरेदी आणि ऑनलाईन पेमेंटची हिस्ट्री… ही काय तुमच्या बापाचं श्राद्ध घालायला काढली होती?’ जाधवांचा आवाज अचानक विजेसारखा कडकडला. अख्खं पोलीस स्टेशन शांत झालं.

प्रिस्क्रिप्शन आणि स्वतःच्या ऑनलाईन पेमेंटची हिस्ट्री पाहताच सुधाकरच्या चेहर्‍याचा रंग उडाला. त्याच्या कपाळावर घामाच्या धारा वाहू लागल्या. त्याचे ओठ थरथरू लागले. तो खुर्चीत मागे सरकला.

तो अडखळत म्हणाला, ‘नाही… सर… ते… ते मला कधीकधी डोकेदुखी व्हायची… म्हणून आणल्या होत्या.’
जाधव खुर्चीतून ताडकन उठले. त्यांनी सुधाकरच्या शर्टची कॉलर पकडली आणि त्याला टेबलवर खेचले. जाधवांचा चेहरा सुधाकरच्या चेहर्‍यापासून अवघ्या काही इंचावर होता.

‘सुधाकर! नाटक बंद कर! अजूनही वेळ गेलेली नाही, सरळ शब्दात तोंड उघड! तुझा तो योगा आणि डायट इथेच विसरशील. जर मी माझ्या डीबी (डिटेक्टिव्ह) पथकाला बोलावले ना, तर टायरमध्ये कोंबून बर्फाच्या लादीवर झोपवतील. मग शरीराचा एक एक सांधा ढिला होईल आणि आपोआप पोपटासारखा बोलायला लागशील! बोल, राजेश शिंदेला का आणि कसं मारलंस?’ जाधवांनी टेबलवर जोरात बुक्की मारली.

जाधवांचा तो रुद्र अवतार, कायद्याचा फास आणि समोर असलेला डिजिटल बँक पेमेंटचा पुरावा पाहून सुधाकरची उरलीसुरली हिंमतही खचली. त्याला समजले की आपला खेळ संपला आहे, आता सुटकेचा कोणताही मार्ग नाही. तो दोन्ही हातांनी डोके धरून टेबलवर कोसळला आणि जोराने रडू लागला… ‘साहेब, चूक झाली… मला माफ करा! मीच राजेशला मारलं… माझं सुमनवर एकतर्फी प्रेम होतं, पण ती राजेशशिवाय कोणाचा विचारच करत नव्हती. राजेश जिवंत असेपर्यंत ती मला मिळणार नाही, म्हणून मी गुगलवर सर्च करून त्याच्या उपवासाच्या दिवशी जेवणात गोळ्यांची पावडर मिसळून त्याला संथ गतीने संपवलं… मला वाटलं होतं की पोलिसांना वाटेल हा अस्थमाचा अ‍ॅटॅक आहे… साहेब, मला वाचवा!’

जाधवांनी घृणेने त्याची कॉलर सोडली आणि मागे वळून वायरलेसवर हुकूम सोडला, ‘हवालदार, लॉकअप उघडा आणि घ्या याला ताब्यात! गुन्हा कबूल केलाय शहाण्याने!’

एका हुशार आणि थंड डोक्याच्या खुन्याचा अहंकार इन्स्पेक्टर मिलिंद जाधव यांच्या चाणाक्ष बुद्धी आणि फॉरेन्सिक सायन्सच्या ताकदीपुढे चक्काचूर झाला होता. न्याय अखेर जिंकला होता!

Previous Post

राशीभविष्य १७ ते २४ जुलै २०२६

Next Post

सुशील पोहे

Next Post
सुशील पोहे

सुशील पोहे

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.