
गेल्या रविवारचीच गोष्ट. मी भाज्या-फळं वगैरे घेऊन आलो तेव्हा दार उघडता उघडताच ओम म्हणाला, बाबा, आजच खायचेत का रे आंबे? अरे म्हटलं अजून पिशवीच्या बाहेरही नाही पडले, पण तरी ह्या फळांच्या राजाच्या आगमनाची वर्दी पोहोचली की. त्या सगळ्या संमिश्र ताज्या हिरव्या गंधात तो आंब्याचा गोड मधुर सुवास विशेष जाणवत होता आणि त्याने आपले काम चोख बजावले जणू!
आजकाल आंबा म्हटला की मुख्यत्वे हापूसच खाल्ला जातो, पण माझ्या बालपणाच्या पोतडीत हापूसच्या जोडीला पायरी आणि रायवळ आंब्यांच्या घमघमाटही दरवळतो, कायमच. आंबा कोणताही का असेना, पिकला की त्याचा सुंदर रंग आणि सुगंध ह्यांना तोडच नसते. सुगंधाची बेगमी हा फळांचा राजा वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर करत असतो जणू! मोहोराचा गंध, वैâरीचा आंबट चिंबट सुवास आणि नंतर पिकल्यावर तिचेच होणारे हे सुमधुर सुगंधी लेणे! हाताच्या बोटावर मोजता येणारी मंडळी सोडली तर आंबा न आवडणारी व्यक्ती विरळाच!
आंबा आणि त्याचा गंध हे अतूट नातं आहे. आंबा पिकलाय हे वेगळं सांगावंच लागत नाही. तो सांगावा दूरदूरपर्यंत पोहोचवण्याचे काम हा गोडमिट्ट गंध करतोच. आमच्या अलिबागच्या बाजारात तर मला अजूनही ह्या दिवसांत नुसता फेरफटका मारायला खूप आवडतं. केवळ ह्या वासांवरून आंब्याच्या निरनिराळ्या जाती सहज ओळखू येतात. मला खायला हापूस मनापासून आवडत असला तरी गंध मात्र पायरीचा जास्त भावतो! कधीतरी आंबट असेल माहीत असले तरी ती गंधकुपी घेताना मी मनोमन सुखावतो! आंबा उन्हाळ्यात उपलब्ध असला तरी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तो बाराही महिने मनामनांवर राज्य करतोच नाही का? अगदी गोळ्यांपासून मिठाई वा आईसक्रीम तसेच केक आदी सर्वच पदार्थांमध्ये हा आंब्याचा स्वाद आणि गंध आपली वरची जागा कायमच राखून असतोच की.
पुण्यात आल्यानंतर सुरुवातीला दोन गोष्टींनी केलेलं मनावरचं गारूड अजूनही कायम आहे, चितळे बंधूंची आंबा बर्फी आणि सुजाताची वा खत्री बंधूंची आंबा मस्तानी. ही आवड वंशपरंपरागत असल्यासारखी आता ओमने पण जोपासलीये. का रे, कोणता फ्लेवर हवा असं विचारलं की ऑब्हियसली मँगो रे बाबा, हे उत्तर ठरलेलंच! प्रâुटी वा तत्सम शीतपेयांद्वारे आपण वर्षभर आंब्याची तहान भागवत असतोच नाही का? आजकाल तर फळांच्या गंधाच्या उदबत्त्याही मिळू लागल्यात, त्यातही म्हणे आम्रफलाच्या गंधाचीच चलती जास्त आहे!
ह्या राजगंधांचे वैशिष्ट्य एव्हाना सर्वांच्या लक्षात आलंच असेल नं? कायम टिकणारा आणि आपलं मूळ रूप इतर कोणत्याही गोष्टीने न झाकोळू देणारा हा शाश्वत सुगंध! कशातही मिसळा- दुधापासून शिरा, भात वा अगदी केक बिस्किटांपर्यंत सगळीकडे बाकी घटकांना आपल्या गंधाने सुगंधित करणारा आणि आपले अस्तित्व अबाधित राखणारा हा सुमधुर सुगंध!
आयुष्याच्या नानाविध टप्प्यांवर आपल्यालाही असेच अनेक टप्पे पार करावेच लागतात, नाही का? आनंद-दुःखाचे हे चक्र अव्याहतपणे फिरतच असते. अर्थात ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच आपापल्या मनोवृत्तीवर अवलंबून असतात. एकाच परिस्थितीत एक व्यक्ती अत्यानंदात असेल तर दुसरी नसेल. संसारतापात कितीही होरपळलो तरी आपल्या मूळ स्वरूपाचा, आपण त्या परमात्म्याचेच एक प्रतिबिंब असल्याचा आणि आपल्या उद्दिष्टाचा विसर मात्र कदापी पडू देऊ नये, आपला मूळ सात्विक भाव कायम जागृत राखण्याचा प्रयत्नही कायम करतच राहावा. हे साधणे सोपे नसते, म्हणून ही एक साधनाच! ज्याला ही साधते नं त्याच्या आयुष्याचे सोने होते हे निश्चित!
कोणत्याही जागी वा प्रसंगी आपल्या मुळाशी बांधलेले राहता आले की आपोआपच तो मूळ हेतू अबाधित राहतो. स्वामी विवेकानंद पाश्चात्य देशांत असताना त्यांच्या आध्यात्मिक बुद्धीसामर्थ्यामुळे सगळी सुखं त्यांच्या पायाशी लोळण घेत होता,r तरी त्यांनी आपल्या सनातन धर्माच्या प्रसार-प्रचाराच्या कार्याला कधीच विराम दिला नाही वा कधी आपल्या देशबांधवांना स्मृतिपटलाआड होऊ दिले नाही. एखादा राजमहाल शोभावा अशा जागी गाद्यागिरद्या सोडून ते रात्र रात्र फरशीवर झोपत, कारण लाखो देशबांधवांची आठवण त्यांना चैन पडू देत नसे. कोणतेही महान कार्य ह्या तळमळीखेरीज अशक्यच असते, नाही का? श्री रामकृष्ण मठाचा आज झालेला विस्तार आणि जगभरात पसरलेले जाळे हे स्वामीजींच्या स्वप्नाचेच सत्यात झालेले रुपांतर आहे असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरू नये. हे साधले ते त्या अविचल, अक्षय व शाश्वत प्रयत्नांनी आणि त्यासाठी कायम जुळल्या राहिलेल्या मूळभावाने!
तुम्हा आम्हालाही त्या मधुर आंब्याच्या चवीबरोबरच त्याच्या सुगंधी गुणांचीही जाण राहो व ते अंगिकारायला मिळोत हीच सदिच्छा!

