
निळूभाऊंना वाचनांचे प्रचंड वेड होते, पण निवांत जागा मिळत नव्हती. फर्गसन रस्त्यावर सेवादलाचे रंगा कांबळे यांची एका चाळीत खोली होती. रंगा कांबळे महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक होते. त्यावेळी ते एकटे होते. ते शाळेत गेले की निळूभाऊ त्यांच्या खोलीवर जाऊन वाचत बसायचा. वाचनाचे विषय वेगवेगळे असायचे.
याच सदरातील आधीच्या एका लेखात मी माझ्या आयुष्यातल्या या एका महत्त्वाच्या व्यक्तीशी झालेल्या ओळखीची कहाणी सांगितली आहे… आज ती पुन्हा सांगतो आहे… त्याचं कारण लेखात पुढे उलगडेलच… हा त्या लेखाचा, सिनेमाच्या भाषेतला टेक टू…
पुण्यातील टिळक रस्त्यावरील जीवन रेस्टॉरंट (सध्याची ग्राहक पेठ) समोरील ़फूटपाथवर राष्ट्रसेवादल कलापथकाचे प्रमुख शाहीर लीलाधर हेगडे यांनी एका व्यक्तीशी माझी ओळख करून दिली, हा राम रानडे- हा श्याम पटवर्धन यांच्या (राष्ट्र सेवादलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते) माहितीतला आहे, याला आपल्या कलापथकात काम करण्याची इच्छा आहे. सांगली-मिरजेकडला आहे. बोलण्यात थोडे कानडी हेल आहेत आणि हा निळू फुले! पुणे सेवादल कलापथकाचा प्रमुख.
उंचीनं ढगळ्या, पायजमा, आकाशी निळ्या रंगाचा नेहरू शर्ट, पायात रबरी चपला आणि खांद्यात थोडा वाकलेला हात मागे बांधलेल्या अशा या किरकोळ माणसाला पाहून प्रथमदर्शनी माझ्यावर काही म्हणजे काहीही प्रभाव पडला नाही. ‘अप्पा बळवंत चौकातील मुलांच्या प्राथमिक शाळेजवळ सेवादलाची कचेरी आहे. आम्ही कलापथकाची तालीम तिथेच करतो. रात्री नऊनंतर केव्हाही या,’ असे निळू फुले यांनी मला सांगितलं आणि ती भेट तिथेच संपली. ते स्वारगेटच्या दिशेने निघून गेले, मी माझ्या सदाशिव पेठेतील खोलीकडे परतलो.
मध्ये काही दिवस गेले. पुण्यातील एखाद्या नाट्यसंस्थेत प्रवेश मिळविण्याची माझी धडपड सुरूच होती, पण कुठेही डाळ शिजत नव्हती. एके दिवशी सहज विचार केला, बघूया तरी सेवादलाच्या कचेरीवर जाऊन, गाजराची पुंगी वाजली तर वाजली. धाडस करून पत्ता हुडकत हुडकत कचेरी गाठली. दाराशेजारीची एक टेबल खुर्ची आणि लांब बाकडं होतं. तालीम सुरू होती काहीही न बोलता त्या बाकड्यावर बसून तालीम बघू लागलो.
पु.ल. देशपांडे लिखित `पुढारी पाहिजे’ हे ते नाटक होतं आणि ज्यांच्या प्रथमदर्शनाचा माझ्यावर काहीच परिणाम झाला नव्हता, ते निळू फुले दिग्दर्शन करीत होते. रोग्याची भूमिकाही तेच करीत होते. समोर उभ्या हौशी कलावंत मुला-मुलींना कसं बोलायचं, कसं उभं राहायचं, कसे हातवारे करायचे हे छान समजावून सांगत होते. त्यांच्याकडून करवून घेत होते. कुठेही रागावले नाही, आरडा नाही, ओरडा नाही, अगदी रंगून गेलेली छान तालीम सुरू होती. निळू फुलेंचे ग्रामीण ढंगातले बोलणे, सहज हालचाली आणि मिस्किलपणा हे सगळंच अजब होते. पहिल्या भेटीतील फाटके निळू फुले आणि आता समोर रोग्याच्या भूमिकेत आणि दिग्दर्शक म्हणून असलेले निळू फुले यात विलक्षण म्हणजे विलक्षण तफावत होती.
या निळू फुलेनं माझ्यावर गारुड केले.
हळू-हळू मी सेवादल कलापथकात रुळू लागलो. `बिनबियांचे झाड’, `कुणाचा कुणाला मेळ नाही’, `पुढारी पाहिजे’ ही लोकनाट्ये, शिवाय समरगीते, राष्ट्रभक्तीपर गीते, पोवाडे, लोकगीते, लोकनृत्ये यामध्येही छोटी छोटी कामे करू लागलो. पोवाड्यातून समरगीतामधून कोरसमध्ये माझाही आवाज मिसळू लागला. पण निळूभाऊ आणि माझा संबंध तालमीपुरताच मर्यादित राहिला नाही. त्याचा खडकमाळ आळीतील बोराटे वाड्यातील बिर्हाडीही माझे जाणे येणे सुरू झाले. खडकमाळ आणि पंचहौद मिशन, बोराटे वाडा आणि आजूबाजूचा परिसर म्हणजे पुणे पूर्व आणि पुणे पश्चिम यांची जणू सीमारेषाच. अठरापगड जातीची वस्ती. निळूभाऊंमुळे त्यांच्या अनेक मित्रांशी माझी ओळख वाढली.

त्यावेळचे निळू भाऊंचे घर म्हणजे मोठ्या दरवाज्यातून आत गेल्यावर मोठं अंगण, अंगणाला लागूनच एक फूट उंचीवर दारासमोर मोकळी जागा, दोन-तीन बायका फुलांचे हार गुंफीत बसलेल्या त्यात निळूभाऊंची आई, अंगाने थोडी स्थूल, भिंतीला टेकून निळूभाऊंचे वडील बसलेले धोतर, शर्ट, टोपी आणि गडद निळ्या रंगाचा लष्करी कोट घातलेला, पायाला हाताची मिठी घालून बसलेले, त्यांना पाहिलं की मला व्यंकटेश माडगुळकरांचा `माणदेशी माणसं’ची आठवण यायची. भिंतीजवळचा खिडकीतील गजाला पारा उडालेला आरसा टेकवून निळूभाऊ दाढी करीत असलेला आणि तोंडाने गुणगुणणारा `अभी दखन द्वार खोला है…’ ऋतुजा, ऋतुजा… हे एक बंगाली लोकगीत त्याला फार प्रिय. आतल्या खोलीतून भावंडांची येणी-जाणी! मला पाहताच निळूभाऊ म्हणायचा, `राम आलाय! चहा आणा. मग एका कानफुटक्या कपामधून कमी दूध असलेला काळसर रंगाचा चहा यायचा. मला त्याची गोडी अमृतासमान लागायची.
एका होळीपौर्णिमेला निळूभाऊंनी मला आग्रहाने घरी जेवायला बोलावले होते. स्वयंपाकघर आणि कोपर्यात मोरी. पण त्या मोरीवर छप्परच नव्हते. पण या परिस्थितीतही निळूभाऊंची घरची मंडळी आगत स्वागत प्रेमाने करायची. शेजारीच चंद्रकांत बोराटे यांचे सायकलचे दुकान. तिथे गप्पांचा अड्डा जमायचा. निळूभाऊंच्या सहवासामुळे माझा व्यक्तिगत फायदा असा झाला की माझा मित्रपरिवार जात, पात, धर्म, भाषा यापलिकडे जाऊन निखळ मैत्रीमध्ये विस्तारला.
निळूभाऊंनी `येरागबाळ्याचे काम नोहे’ हे नवे कोरे लोकनाट्य लिहिले. निवडणुका जिंकणे ही साधी गोष्ट नाही. ज्ञानेश्वर, तुकाराम यांना पराभूत करून `मंबाजी’ प्रचंड बहुमताने निवडून येतो, असा त्याचा गाभा होता. पुणे शहर कलापथकामार्फत आम्ही ते पुण्यातील लक्ष्मी रोडवरील गोखले हॉलमध्ये सादर केले. या लोकनाट्याच्या उभारणीमध्ये लिखाणापासून ते प्रयोगापर्यंत मी सावलीसारखा निळूभाऊंच्या सोबत होतो. संघटक, लेखक, दिग्दर्शक आणि प्रमुख भूमिका आणि प्रयोगाचे सादरीकरण निळूभाऊंनी ज्या कल्पकतेने पेश केले हे बघून त्याच्यातील या सर्व गुणांनी मी प्रभावित झालो.
एकच उदाहरण सांगतो. सातारा रोडवर एका कलाकाराला लोकनाट्यात काम करणार का, अशी विचारणा करण्यासाठी सायकल दामटत निळूभाऊ निघाले होते. बरोबर मी होतोच. जाताना रस्त्यात सायकलच्या चेनमध्ये निळूभाऊंचा पायजमा अडकला आणि हातभर फाटला. आता काय करणार? निळूभाऊ शांतपणे सायकलवरून उतरले. फाटलेल्या लेंग्याची योग्य ठिकाणी गाठ मारली आणि सायलवर टांग टाकून पुढचा प्रवास! गाड्याबरोबर नळ्याची यात्रा या न्यायाने निळू भाऊंच्या मागे मी! इतके सायास करून रात्री तालमीला येतो असे आश्वासन देणारा कलावंत आलाच नाही. माझा संताप संताप झाला, पण हे नीलकंठेश्वर शांतच!
हिंदी चिनी भाई भाई असा नारा विसरून चीनने भारतावर आक्रमण केले आणि भारताला दारुण पराभव स्वीकारावा लागला. चीनच्या या नीच कारवाईचा निषेध करण्यासाठी भारताने कंबर कसली. वस्तुस्थिती काय आहे ग्रामीण जनतेसह सर्वांना समजावून सांगण्यासाठी दादा कोंडके यांनी `चिनी आक्रमणाचा फार्स’ हा फर्मास वग लिहीला आणि त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. हा फार्स सर्व ठिकाणी पोहचविण्यासाठी पुणे शहर कलापथकाकडे सोपवण्यात आला. पण मूळ संचातले शाहीर दादा कोंडके, राम नगरकर आणि इतर कलाकार उपलब्ध होणे शक्य नव्हते. निळूभाऊंनी पुण्यातीलच कलाकार निवडले आणि हा चिनी आक्रमणाचा फार्स खेड्यापाड्यात पोहचवला. हडपसर, मांजरी भागात सुरेश शिपूरकर म्हणून एक उत्साही सेवादल कार्यकर्ता होता. त्याने या भागात कार्यक्रम मिळविले.
मी पुणे कॅन्टोनमेंट वॉटर वर्क्समध्ये फिल्टर विभागात नोकरी करीत होतो. सकाळी ८ ते ४, संध्याकाळी ४ ते १० आणि रात्री १० ते सकाळी ८ अशा तीन शिफ्टमध्ये काम चालायचे. नेमकी नाइट ड्युटी असताना कार्यक्रमाचे निमंत्रण असायचे. एका जीपमध्ये दहा-बारा कलाकार कोंबून निळूभाऊ हडपसर रस्त्यावरील वॉटर वर्क्सचा भिंतीपाशी यायचे. कुणीतरी रस्त्यावरून आरोळी ठोकायचे- आम्ही आलो आहे रे! मी हाळी कधी येते याची वाटच बघत असायचो. काही तरी सबब सांगून मी सटकायचो. भिंतीवरून उडी मारून या टोळक्यात सामील व्हायचो. कार्यक्रम संपवून परत येताना भिंतीवरून उड्या मारून पुन्हा नाईट ड्युटीवर हजर! अळीमिळी गुपचिळी! एवढे झपाटलेपण आम्हा प्रत्येकात संचारले होते. हा कार्यक्रम यशस्वी झाला असा शिक्का मारलेले सरपंचाच्या स्वाक्षरीचे सर्टिफिकेट घ्यावे लागे. ते सर्टिफिकेट मिळाल्यावरच रुपये शंभर मानधनापोटी मिळायचे. आम्ही त्याला नंतर नंतर ‘शिक्क्याचा कार्यक्रम’ असेच म्हणू लागलो.
त्याच दरम्यान राम नगरकरांचे वंदन हेअर कटिंग सलून (एअरकंडिशन) पुण्यातील टिळक रस्त्यावरील एस.पी.कॉलेजच्या जवळ सुरू झाले. रामचे दुकान उभे करण्यात निळूभाऊंचा सिंहाचा वाटा होता. आता आमच्या भेटण्याचे ठिकाण वंदनाचा फुटपाथ हे झाले. त्यानंतर एकत्र जमून समोरच्या उदय विहारध्ये चहा पिता पिता अनेक विषयांवर गप्पा रंगू लागल्या. भाई वैद्य, बाबा आढाव, मधुकर निरफराके ही राष्ट्रसेवादल आणि समाजवादी विचारांची मंडळीही उदय विहारमध्ये गप्पात सामील होत असत. एका भेटीत निळूभाऊ येण्यापूर्वी भाई वैद्य म्हणाले- हा निळू फार मोठा कलाकार होणार आहे. या त्यांच्या बोलण्याचा अर्थ मला फार उशिरा म्हणजे निळूभाऊ गेल्यानंतर त्यांच्या श्रद्धांजलीच्या सभेत उलगडला.

निळूभाऊंना वाचनांचे प्रचंड वेड होते, पण निवांत जागा मिळत नव्हती. फर्गसन रस्त्यावर सेवादलाचे रंगा कांबळे यांची एका चाळीत खोली होती. रंगा कांबळे महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक होते. त्यावेळी ते एकटे होते. ते शाळेत गेले की निळूभाऊ त्यांच्या खोलीवर जाऊन वाचत बसायचा. वाचनाचे विषय वेगवेगळे असायचे. त्याच्याप्रमाणे रविवारी सकाळी कॅम्प एरियामध्ये इंग्रजी-बंगाली चित्रपट ते आणि त्यांचे मित्र आवर्जून पहात असत. त्यांच्यामुळेच मलाही ते चित्रपट बघण्याची आवड निर्माण झाली, निळूभाऊंच्यामुळेच `आर्यभूषण’ या तमाशा थिएटरमध्ये जाऊन मी तमाशाच्या संगीत वार्या बघितल्या. किसन कुसगावकर, दत्तोबा तांबे, शिरोलीकर, नागू भागू माळी जगताप, पाटील पिंपळेकर ही नावे आर्यभूषण थिएटरच्या बाहेर लटकविलेल्या तमाशाच्या पाट्यांमुळेच ओळखीची झाली.
प्रसिद्ध साहित्यिक व्यंकटेश माडगुळकर आकाशवाणी पुणे केंद्रावर ग्रामीण विभागाचे प्रमुख. होळीची पोळी हा खास कार्यक्रम त्यांनी एका होळीच्या निमित्ताने सादर केला. त्यांनी अगदी आवर्जून या कार्यक्रमात निळूभाऊंना सहभागी करून घेतले. मानधनाची रुपये पंधराचा चेकही निळूभाऊंना मिळाला. हा चेक कलेक्टर कचेरीच्या आवारातील ट्रेझरीमध्ये जमा केल्यावर रक्कम अदा होणार होती. एके दिवशी सकाळी निळूभाऊ आणि त्यांच्या संगतीने मी ट्रेझरीमध्ये गेलो. पण कोणाची तरी ओळख असल्याशिवाय पैसे द्यायला तेथील कोणीही भाऊसाहेब तयार नव्हता. तीन-चार काऊंटरवर चौकशी केली- विनवणी केली पण सगळीकडे नकारघंटा. निळूभाऊ भडकला. शेवटच्या काऊंटरवरील भाऊसाहेबांना त्याने दरडावून सांगितले, आता तुम्ही मला पैसे द्या, नाही तर हा चेक मी तुमच्यासमोर फाडतो. काय योगायोग बघा, हा सर्व संवाद तिथे उभे असलेले काळा कोट घातलेले वकील ऐकत होते. ते पुढे आले, आणि म्हणाले- द्या त्यांना पैसे. मी यांना ओळखतो. त्यांचे नाव पटवर्धन होते. हे गृहस्थ माझ्या आजही स्मरणात आहेत, याचे कारण म्हणजे त्यांचे दोन्ही हात शरीराच्या अवयवाच्या प्रमाणात आखूड (शॉर्ट हँड) होते. निळूभाऊंना रोख रुपये पंधरा अदा झाले. आम्ही बाहेर पडलो आणि समोरच्याच हॉटेलमध्ये शिरलो. मिसळपाव आणि चहावर ताव मारला आणि अशा रीतीने होळीची पोळी साजरी केली.
समाजवादी पक्षाचे अधिवेशन १९६५ मध्ये वारणसी येथे झाले आणि त्या ठिकाणी समाजवादी पक्ष फुटला. प्रजा समाजवादी आणि संयुक्त समाजवादी असे दोन गट निर्माण झाले. दोन्ही पक्षाचे अध्यक्ष पुण्यातीलच. प्रजासमाजवादी पक्षाचे ना.ग. ऊर्फ नानासाहेब गोरे आणि संयुक्त समाजवादी पक्षाचे एस.एम. म्हणजे अण्णा जोशी. निळूभाऊंनी संयुक्त समाजवादी पक्ष स्वीकारला आणि त्यासाठी राष्ट्रसेवादल कलापथक पुणे शहर प्रमुखपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. तो दिवस आजही माझ्या चांगलाच स्मरणात आहे. सकाळी दहा-साडेदहा वाजता शाहीर लीलाधर हेगडे, राम नगरकर, निळूभाऊ आणि योगायोगाने मी संभाजी पार्कमध्ये जमलो. या तिघांत भरपूर चर्चा झाली नी फक्त ऐकण्याचे काम करीत होतो. निळूभाऊ प्रचंड दुखावला होता आणि संतापलाही होता त्यांच्या मनात आजवर साठलेलं तो भडाभडा बोलत होता. आजपासून मी कलापथक सोडलं, असे रागारागाने म्हणून तो तिथून निघून गेला. नंतर त्यानं आंदोलन या नावाने `संसोपा’ पक्षाचे स्वतंत्र कलापथक उभं करण्याचा प्रयत्न केला, पण तो काही यशस्वी होऊ शकला नाही.

त्यानंतरचा काळ निळूभाऊच्या खरोखरच कसोटीचा होता. आता त्यांनी व्यावसायिक लोकनाट्यामधून काम करायला सुरुवात केली. `भलताच बैदा झाला’, `शिंगरू मेलं हेलपाट्याने,’ `दोन बायकांचा दादला’ अशी वगनाट्ये त्यांनी केली, पण त्यांनाही फारसे यश लाभले नाही. बाबुराव गोखले यांच्या श्रीस्टार्स कंपनीतर्पेâ `मास्तर एके मास्तर’ हे नाटक रंगभूमीवर आले, पण तेही काही यश मिळवू शकले नाही. अमृत गोरे यांच्या कथाकल्पनेवर आधारलेले शंकर पाटील लिखित आणि निळू फुले दिग्दर्शित `कथा अकलेच्या कांद्याची’ या वगनाट्याने मात्र निळूभाऊंना यशाचा मार्ग खुला केला, असे म्हणायला हरकत नाही. त्यातील तमासगीर सोंगाड्या, मास्तर, बिटनिक आणि रांगडा गावठी पुढारी अशा विविध ढंगाच्या भूमिका निळूभाऊ अशा मस्त रंगवायचे की प्रेक्षकांनी त्यांच्या अभिनयाला भरभरून दाद दिली. हा कोणीतरी विलक्षण अवलिया कलाकार लोकरंगभूमीवर अवतरला आहे अशीच रसिकांची खात्री झाली. विशेषत: त्यातील गावठी पुढारी तर हमखास हशा आणि टाळ्याची दाद घेत असे.
एक गाव बारा भानगडी या चित्रपटाने निळूभाऊंना चित्रपटाची दारे सताड उघडी करून दिली. त्यातील कानडी ढंगानं मराठी बोलणारा `झेले अण्णा’ घराघरात पोहोचला. कोल्हापूरमध्ये `झेले अण्णा’ अशी पाटी असलेल्या रिक्षा फिरू लागल्या. पाठोपाठ निळूभाऊंकडे मराठी लोकनाट्ये नाटके आणि चित्रपट यांची रीघ लागली.
सखाराम बाईंडरने निळूभाऊंना आधुनिक रंगभूमीवर मानाचे पान मिळवून दिले. त्यानंतर `बेबी,’ `सूर्यास्त’ अशी शहरी प्रेक्षकांसाठी आणि `सूनबाई घर तुझेच आहे’, `राजकारण गेलं चुलीत’ अशी शहरी आणि ग्रामीण भागातील प्रेक्षकांसाठी चालणारी नाटके यांचे धडाक्याने प्रयोग होऊ लागले. महिन्याचे तीसही दिवस निळूभाऊ बिझी असायचे. १ ते १०, ११ ते २० आणि २१ ते ३० अशा तारखा वेगवेगळ्या तीन नाटकांसाठी निळूभाऊंच्या तीन संस्थांना दिलेल्या असायच्या. एक दहा दिवसाचा दौरा संपला की लगेच पुढचा दौरा. त्यातही चित्रपटाचे शूटिंग. `जैत रे जैत’ चित्रपटात निळूभाऊंच्या सोबत मी काम करीत होतो. पनवेलजवळील डोंगरावर शूटिंग होतं. दिवसभर शूटिंग करून निळूभाऊ नाटकाच्या प्रयोगासाठी जायचे. नाटक करून पुन्हा प्रवास करून रात्री बेरात्री परत शूटिंगच्या लोकेशनवर यायचे. थोडीशी विश्रांती घेतली की महाराज शूटिंगसाठी हजर! खरोखरच कमाल होती निळूभाऊंची.
निळूभाऊच्या या अतिशय व्यग्र दिनक्रमामुळे त्यांची भेट मिळणं दुरापास्त झालं. चाहत्यांचा त्यांच्याभोवती गराडा असायचा, त्यातूनही वेळ काढून निळूभाऊंची समाजसेवा सुरूच असायची. विविध सामाजिक क्षेत्रांत निस्वार्थीपणे कार्य करणार्या समाजसेवी संघटनांसाठी, पूर्णवेळ कार्य करणार्यांसाठी आर्थिक निधी उभा करण्यासाठी त्यांनी आणि त्यांच्या समविचारी कलाकारांनी कार्यकर्त्यांनी `लग्नाची बेडी’ या नाटकाचे गावोगावी प्रयोग केले. निळूभाऊ त्यात आघाडीवर होते.
याच काळात मी राहतो त्या कोथरुड भागात निळूभाऊंनी स्वत:ची `सोनाई’ नावाची वास्तू उभारली. कधी कधी तिथे भेट व्हायची. त्याच प्रेमाने, आपुलकीने चौकशी करायचा, चहा यायचा तो सुंदरशा कपबशीतून, सोबत साखरेची वाटी आणि चमचा! वयपरत्वे शुगरचा प्रॉब्लेम म्हणून! बोराटे वाड्यातील बिर्हाडातील कानतुटक्या कपातल्या कमी दुधाचा चहाची हमखास आठवण यायची. पण प्रेम, आपुलकी जिव्हाळा आणि मैत्री यात चिमूटभरही फरक नाही.

एका भेटीत मी सहजपणे निळूभाऊंना विचारलं- निळूभाऊ ही शाळेतली मास्तरकीची नोकरी सोडून मी कायमस्वरूपी नाटक-चित्रपट व्यवसायात येऊ का? माझा प्रश्न संपायच्या आत निळूभाऊ डाफरला- `गाढव आहेस! तुझं लग्न झालं आहे. तुला दोन मुली आहेत. संसार व्यवस्थित सुरू आहे. हा नाटक सिनेमाचा धंदा बेभरवशाचा! अजिबात येऊ नकोस. हौस म्हणूनच काय करायचे असेल ते कर. मी निमूटपणे निळूभाऊंचे म्हणणे ऐकले. नोकरी सोडण्याचा विचार रद्द केला आणि नोकरी सांभाळून जितकी जमेल तितकी कला, वाड्:मय, समाजसेवा शिक्षण क्षेत्रात मुशाफिरी केली.
१९९० मध्ये मला भारत सरकारचा आदर्श शिक्षकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. विद्या महामंडळ संस्थेने माझा सत्कार समारंभ आयोजित केला. प्रमुख अतिथी होते निळूभाऊ फुले आणि डॉ. जब्बार पटेल. १९९३ साली माझ्या मनात पुन्हा एकवार स्वेच्छानिवृत्तीचे विचार सुरू झाले. निर्णय घेण्यापूर्वी वेळ ठरवून निळूभाऊंची भेट घेतली. मनातला विचार स्पष्टपणे बोलून दाखविला. निळूभाऊंनी प्रश्न केला– पेन्शन मिळणार आहे का?
मी उत्तरलो- `पेन्शन मिळणार आहे. पत्नीची नोकरी सुरू आहे. मुलींची शिक्षणं सुरू आहेत, पण त्या स्वत:च्या बळावर शिक्षण पूर्ण करीत आहेत.
`नोकरी सोडून पुढं काय करणार आहेस?’ पुन्हा निळूभाऊंचा सवाल.
‘कुठेही नोकरी करणार नाही. नाटक-सिनेमा-तमाशा-साहित्य-कला-समाजसेवा या माझ्या आवडीच्या क्षेत्रात स्वच्छंदपणे संचार करणार.’
`विचार बदलायच्या आत निर्णय घे’- निळूभाऊंनी एका वाक्यात उत्तर दिले.
आज मी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारून ३३ वर्षे झाली. माझा एकही दिवस वाया गेला नाही. प्रचंड धो धो यश मला कुठेही मिळाले नाही, पण मुक्त आयुष्य जगण्याचं समाधान मला मिळालं आणि विशेष म्हणजे ज्या विद्या महामंडळ, पुणे या संस्थेत मी एक साधा शिक्षक म्हणून कार्यास आरंभ केला त्याच संस्थेचा अध्यक्ष या पदावर मी बिनाविरोध तीन वर्षे काम केले.
एक कलाकार म्हणून निळूभाऊंची किती उंची होती हे सांगण्यासाठी माझ्या लेखणीची गरज नाही. त्यांच्याबरोबर सामना, सिंहासन, जैत रे जैत, एक होता विदूषक अशा काही चित्रपटात काम करण्याची मला संधी मिळाली. `शापित, चोरीचा मामला, सिंहासन, सामना अशा चित्रपटांमधील निळूभाऊंचा अभिनय ही वेगळीच प्रतिमा होती आणि पुढारी सरपंच म्हणून निळूभाऊंनी साकारलेले रोल शेकड्यांनी आहेत. निळूभाऊंनी त्यावरही आपली मुद्रा उमटवली. माझ्या विचाराप्रमाणे `लोकरंगभूमी’ आणि नागर रंगभूमी, ग्रामीण चित्रपट आणि वास्तववादी चित्रपट यांना जोडण्याचं, त्यांच्यातील अंतर कमी करण्याचं, सेतू-जोडण्याचं अत्यंत मोलाचं कार्य निळूभाऊंनी केलं आहे. सर्व वर्गातील रसिक प्रेक्षकांना आवडणारा आणि खलनायकी भूमिकांमुळे बायाबापड्यांचे शिव्याशाप खाणारा निळूभाऊंसारखा अस्सल कलाकार दुर्मिळच!
निळूभाऊंच्या या कलासेवेबद्दल अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले गेले. अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवावे अशी आमची तीव्र इच्छा होती. ती विनंती करण्यासाठी मराठी नाट्य परिषदेचे त्यावेळचे अध्यक्ष आणि माझे अत्यंत जवळचे मित्र मोहन जोशी, आमचा दुसरा मित्र (कै.) जयंत बेंद्रे आणि मी एका सकाळी निळूभाऊंना भेटायला गेलो. निवडणूक बिनविरोधच होणार होती. पण नियमाप्रमाणे निळूभाऊंनी अर्ज भरणे आवश्यक होते. पण या गोष्टीला निळूभाऊंचा ठाम नकार. आम्ही दोन तास हुज्जत घालत होतो आणि निळूभाऊ आपल्या नकारावर ठाम होता. मी अखेर निळूभाऊंना निक्षून सांगितलं- निळूभाऊ, तुमच्यासाठी नाही तर आमच्यासारख्या छोट्या कलाकारांसाठी आपण हे मानाचं पद भूषवावे त्यात तुमचा नाही- आमचा गौरव आहे. तुमचं बोट धरूनच आम्ही पावलं टाकली आहेत. आपण जर या फॉर्मवर सही केली नाही तर उद्यापासून आम्ही सगळे तुमचे चाहते तुमच्या दारासोर उपोषणाला बसू!
निळूभाऊ शांतपणे एकच वाक्य बोलले- मीही तुमच्याबरोबर उपोषणाला बसतो.
आम्ही हताश झालो निराश झालो आणि मुकाट्याने तिथून काढता पाय घेतला. आग्रही निग्रही आणि लोकहितवादी निळूभाऊंचे ते दर्शन अपूर्व होते.

एका गावच्या कुठल्याशा कार्यक्रमाला मी निळूभाऊंच्या बरोबर होतो. राम नगरकरही होते. आमचे दोघांचे काहीही काम नव्हते. आम्ही केवळ निळूभाऊंच्या बरोबर गेलो होतो. कार्यक्रम संपला आणि आम्ही सारेजण जेवणासाठी एका घरात गेलो. भिंतीला टेकून आणि समोर सतरंज्या अंथरून बसण्याची सोय केली होती. समोर जेवणाची ताटे आणि जेवण साधेच होते. आम्ही जेवायला सुरुवात करणार, तेवढ्यात आमच्या कोणाच्याच परिचयाचा नसलेला एक माणूस निळूभाऊंच्या रांगेत ताटावर येऊन बसला. वाढणार्या कार्यकर्त्याच्या लक्षात हा आगांतुक पाहुणा आल्याचे लक्षात आले, तो त्याला जेवणाच्या पानावरुन उठवू लागला. राम नगरकर आणि मला ही गोष्ट खटकली, पण आम्ही मूग गिळन गप्प बसलो. तोच निळूभाऊ कडाडला- `त्याला उठवू नका, त्याला शांतपणे जेवू द्या, बाबा शांतपणे जेव. तुला कुणीही उठवणार नाही. आमची जेवणे झाली, निळूभाऊ शांतपणे त्या माणसाच्या पाठीवर हात ठेवून बाहेर पडला. त्यांनी त्या माणसाला काय समजावले याचा आम्हाला काहीच अंदाज नाही, पण त्या क्षणी माझ्या मनात विचार दाटून आला – निळू आभाळाएवढा!
`मी यांचा सांगाती’ या सदरासाठी हा लेख लिहित असतानाच माझा मोबाईल वाजला. सर, मी दीपक रेगे बोलतो आहे. या वर्षीचा निळू फुले स्मृति पुरस्कार तुम्हाला द्यायचा निर्णय कालच्या सभेत झाला आहे. १३ जुलैला सायंकाळी ५ वाजता साने गुरुजी स्मारकावर बै. नाथ पै सभागृहात हा कार्यक्रम आहे. शेजारीच माझी मोठी मुलगी रुपाली बसली होती. ती नुकतीच काही दिवसासाठी पुण्यात आली होती. ती झूमवर माझ्या धाकट्या मुलीशी डॉ. आरती रानडे हिच्याशी बोलत होती. स्वयंपाकगृहातून पत्नी सौ. संजीवनी आली आणि आम्ही आई-बाबा आणि दोन्हीही परदेशी लेकींनी ही आनंदवार्ता अत्यंत आनंदाने, समाधानाने आणि कंठ दाटल्या स्वराने अनुभवली. निळू फुले यांचा स्मरणार्थ पुरस्कार श्रीराम रानडे यांना!
मी धन्य धन्य जाहलो.

