• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

बदनामी

ऋषिराज शेलार अर्ध्या मुर्ध्या गोष्टी

marmik by marmik
July 17, 2026
in भाष्य, विनोदी लेख, विशेष लेख
0
बदनामी

पाऊस ओसरलाय. आता कुठे रस्त्यावरच्या नद्या आटायला लागल्या. पण बाजार गल्लीत गुडघाभर पाणी तुंबलं, गटार फुटून पाणी वेगवेगळ्या गल्ल्यातून वाहत बाजार गल्लीत आलेलं. त्यामुळे गावच्या लोकांना नाकाला रुमाल लावून फिरायची वेळ आलेली. अर्ध्या स्वतःच्या गल्लीपासून अख्ख्या गावाला फेरा मारत पायीच नम्यासोबत बाजार गल्लीत आला.
‘ये जेसीबी आणा. इथून खोदून पाणी पुढे काढू!’ गावचा होर्डिंग बॉय अर्थात गोटूराजे सफेद शर्ट काळा गॉगल लावून त्याच्या कार्यकर्त्यांना सल्ले देऊ लागला.
‘आरं येड्या, काढशील कुठं? अख्ख्या गावात उताराला ही गल्ली. पाणी चढ्याकडं जाईल व्हय?’ एक तिरसट म्हातारं त्याच्या घरच्या वट्ट्यावरून बोलतं झालं.
‘बाबा जेसीबीनं अशी पार नदीपर्यंत नघळी करू. म्हणजे अख्खं पाणी निघंल.’ गोटूराजे काचा पुसत समजावू लागला.
‘राजे, जरा चर खोल घ्यायला लागंल, म्हणजे ढाळ नदीकडं दिला की आपोआप पाणी बाहेर पडंल.’ एक कार्यकर्ता तज्ज्ञ झाला. हळूहळू बाजार गल्लीत बघ्यांची गर्दी जमायला लागलीय.
‘आता हा रस्ता आणि गटार एवढ्या भागापैकी चर खणणार कुठून?’ तिरसट म्हातार्‍यानं पुन्हा सवाल केला.
‘आता रस्ताच खोदावा लागंल.’ गोटूराजे डोकं खाजवत बोलला. तशी लोकं बटाबटा पाहायला लागली. कारण तसंच आहे ना? रस्ता शिमिटकांक्रिटचा सात आठ महिन्याआधी बनवला. अन् लगेच तो पहिल्या पावसात उकरायचा म्हणजे जरा विचार करायच्याच गोष्टी.
‘इथून तिथून रस्ता खोदून व्हईल का रे?’ अर्ध्या नम्याला विचारायला लागला.
‘हा आता रस्त्यांचे नाले करावाच लागंल, दुसरं पाणी काढायचं कुठून?’ नम्या दुसरं काय बोलणार?
‘तशे रस्ते फूटभर उच असते तर पाणी रस्त्यावर आलं नसतं.’ अर्ध्या डोकं वापरून काही बडबडला.
‘आता हाच बाजारगल्लीतला रस्ता दोन फूट उंच केला. पण तो जसा उंच झाला तशे बाजूच्या सार्‍या दुकानदारांनी आणि घरवाल्यांनी, दगड, वाळू, मुरूम, कच-खडी जे म्हणून मिळंल ते आणून, त्याच्या लेव्हलनी आपापल्या भागात भर घातली. मग झाला ना पुन्हा रस्ता खोल? त्याला आता कोण काय बोलणार?’ नम्यानं वास्तव सांगितलं.
‘गटार जरा मोठी रुंद पाहिजे यार! म्हणजे पाणी लवकर वाहून जाईल.’ अर्ध्यानं दुसरा उपाय सुचवला.
‘गटार रुंद-अरुंदपेक्षा वाहती पाहिजे. ज्यानं गटाराचं टेंडर घेतलं. त्यानं फक्त शिमिट चोपडलं. त्याला घंटा कळंना, उतार कुठं द्यावा, चढ कुठं ठेवा? याचा. त्यानं फक्त काम उरकलं न् गेला निघून!’ नम्यानं त्या उपायाची हवा काढली.
‘मग इथलं पाणी निघायचं कसं?’ अर्ध्याला प्रश्न पडला.
‘इथं आधी दोन नाले होते, गावातून वरल्या गल्लीतून वाहत ते डायरेक गावाखालच्या वहाळाला जाऊन भेटायचे. एक तिकडून जायचा, दुसरा इथून बाजार गल्लीतून जायचा. हे पहाय त्या घराजवळ जुने शिमिटचे पाईप गाडेल आहे, तिथून पाणी तिकडं वाहायचं. पण आता काय?’ नम्यानं विषय टाळला.
‘हां आठवतं मला. हे असं पावसाळ्यात पाणी वाहायचं ते! पण ह्या पट्ट्यात तीनचार घरं ऐन त्या नाल्यात भर घालूनच बांधली. तवा तुंबंलंच पाणी! बरोबर आहे!’ अर्ध्याला उकल झाली.
तवर गोटूराजेनं फोन केला अन् जेसीबी हजर झालं.
‘मग करायचं का सुरू?’ गोटूराजेनं पब्लिकला मोठ्यानं ओरडून विचारलं. तशे त्याचे कार्यकर्ते मंडळी मागून मोठमोठ्यानं ‘जय श्रीराम, जय श्रीराम’चा घोष करू लागली.
‘करा राजे! करा! रस्ता काय पुन्हा बांधायला लावू. पण तुंबलेलं गटार मोकळं होणं गरजेचं आहे.’ एकजण तंबाखू ओठाखाली ठेवत पाठिंबा द्यायला सरसावला.
‘पण हे बघा, जेसीबी आपलं असलं तरी त्याचे जे काही होतील, ते पैसे वर्गणी करून आपण भरू. चालंल ना?’ गोटूराजेनं जेसीबीला आळंगत विचारलं.
त्याच्या बोलण्यासरशी अर्धे बघे मागल्या पावली हळूच पसार झाले.
‘किती लागतील?’ त्यात एकानं धीर करून विचारलंच.
‘घरटी हजार द्या. हे अख्खं शिमिटचं काम फोडावा लागंल. त्याच्यामुळं जास्त पैशे लागणारेच ना?’ गोटूराजेनं अवघड कारण दिलं.
त्याच्या बोलण्यासरशी आणखी काहीजणांनी काढता पाय घेतला. ‘त्रास कोणाला, ह्या गल्लीतल्या लोकांना आहे ना? मग बघतील ते! आपल्याला काय करायचं?’ म्हणत लोकं निघू निघू चालले.
‘राजे लोकं परत जायला लागली. आता ह्या जेशीबीचे पैशे देईल कोण?’ दुसर्‍या कार्यकर्त्याला प्रश्न पडला. जो स्वाभाविक आहेच.
‘पैशे लोकांकून काहून घेतो? ग्रामपंचायतला म्हणा द्या तुम्ही पैसं! त्याहीचा भोंगळा कारभार. त्यांना काम जमाना नीट! पैशे सरपंचांनं अन् मेंबर लोकाइनी द्यावे ना? ते नुसते खायला बसले का?’ ते तिरसट म्हातारं उखडलं.
त्याच्या बोलण्यासरशी लोकांना बोलायला पॉईंट गावला. लोकं सरपंचांच्या नावानं शिमगा करू लागली. ‘हे अख्खं गाव तुंबलं! सरपंच पाहायला बी आला नाही. गेला कुठं?’ म्हणत लोकं गलका करू लागली. जेसीबीवाल्याला कळलं इथं विषय दुसरीकडं गेलाय. आता आपलं याच्यात काही काम नाही. त्यानं जेसीबी माघारी घेतलं.
गोटूराजेची होर्डिंगबाहेर येत पहिलं समाजकार्य करायची संधी ऐनवेळी हातून निघून चालली. त्याच्या इज्जतीचा लिज्जत पापड झाला. पण आता ह्या येळी लोकांशी भांडून उपेग नाही. त्यापेक्षा त्यांच्यासाठी भांडलं तर काही भरभक्कम फायदा होईल. हे त्याला कळालं असावं.
‘पैशे ग्रामपंचायतनी द्यायला पाहिजे. हे मला पटलं. चला सगळे मिळून सरपंचाकडं जाऊ. त्याच्याकडून पैशे घेऊ. नाहीतर ह्या पाण्याचा इथंच वास सुटंल. त्याच्यात उद्या बाजार आहे. तो भरवायचा कुठं?’ गोटूराजेनं वेळेला केळं न् उपासाला सीताफळ दिलं.
‘चला, चला सरपंच घरीच असंल.’ गोटूचा पतलू कार्यकर्ता बोलला. तशे गोटू पुढं आणि अर्ध्या, नम्यासहित पब्लिकमागं असा मोर्चा सरपंचाच्या घराकडं निघाला. वाटेत समाज मंदिराचा पिलर पडल्यानं जखमी झालेले एकदोनजण गावकर्‍यांना दिसले. तशे लोकं आणखी भडकले. दोन महिन्याच्या आत समाज मंदिर पडतं म्हणजे काय? गोटूच्या कार्यकर्त्यांनी त्या दोघांना मोटारसायकलवर बसवून दवाखान्यात धाडलं. मोर्चा पुढं निघाला, रस्त्यावरचे खड्डे चुकवत लोकं गोटूच्या मागं घोषणा देत जाऊ लागली. सरपंचाचं घर आलं. त्यानं गावभर रस्त्याचे कामं काढून त्याच्यात शिमिट खाल्लं अन् घराला जाड कंपाउंड भिंती बांधल्या. गावापासून घरापर्यंतचा कच्चा रस्ता पक्का केला. समाज मंदिर, स्मशानभूमीचं काम करून पत्रे ढापले, त्याच्यातून घरापुढं शेड ठोकलं. असं एक ना अनेक!
‘सरपंच, सरपंच बाहेर या!’ लोकांनी गेटवर कल्ला केला.
मधूनच गोटूचे कार्यकर्ते ‘गोटूराजे आगे बढो!’चा घोष करू लागले. मधूनच पब्लिक ‘सरपंच चोर है!’ म्हणू लागली. एवढ्या गडबडीनं पेंगत असलेला सरपंच नुसत्या लुंगीवर बाहेर आला.
‘काय झालं?’ त्यानं बाहेर येताच पहिला सवाल केला.
‘बाजार गल्लीत पाणी तुंबलं, गटार फुटून तिथं घाण साचली…’ लोकं चौमुखाने बोलू लागली. ‘तिथं समाज मंदिर पडलं,’ ‘रस्त्याच्या खड्यात पडून बरगड्या मोडल्या.’ कोण काय तर कोण काय, प्रत्येकजण बोलत सुटला. एकदोन कॅमेर्‍यावाले तिथं बातमी करायला आले. त्याच्यात सरपंचाचे दोन चमचे गर्दीतून वाट काढत सरपंचाच्या कानाला लागले.
‘गोट्या, ह्या गणपतीला ये तू माझ्याकडं! हां! मेंबर व्हायचंय ना तुला?’ सरपंचानं गोटूकडे कटाक्ष टाकला, तसा गोटूराजेचा बोका झाला आणि तो सरपंचाच्या पायाशी बिलगला.
‘ओ, सरपंच! काय भंगार कामं केली तुम्ही? गटारं तुंबली, रस्ते उखडले, बांधकामं पडले! एवढे पैशे खात असत्या का?’ गर्दीतून कुणी एक बोललं. ‘आवो, बाजार गल्ली पार तुंबली हो!’ अर्ध्याच्या शेजारचा एकजण कळकळीने बोलला.
‘तुम्ही ऐकणार आहे ना? बरं का अर्ध्या!’ सरपंचानं पहिलंच अर्ध्याचं नाव घेतलं, तसा अर्ध्याला घाम फुटला. ‘इथं मी सरपंच होईपर्यंत धड रस्ते नव्हते, आता किमान खड्डे पडायला तरी रस्ते झाले, साध्या कुणी भिंती बांधत नव्हतं, आम्ही पडण्याजोग्या का होईना त्या बांधल्या. आधी थेंबभर पाणी अडवायची कुणाला अक्कल नव्हती. आम्ही गटारी सुद्धा अडवल्या. एवढा आमच्या काळात विकास तुंबला तरी तुम्ही बोंब माझ्याच नावानं मारत्या का? बरं, ऐक हं अर्ध्या! तुम्ही माझी बदनामी केली तर समजू शकतो. तुम्ही गावाची बदनामी करत्या? बाजार गल्ली तुंबली म्हणून व्हिडीओ व्हायरल करत्या. त्याच्यानं उद्या बाजार भरंल का? नाही? का? तुम्ही आपल्या गावाला, तिथल्या रस्त्यांना, तिथल्या गटारींना नावं ठेवत्या आहे. लक्षात ठेवा तुम्ही लोकं गावाच्या विरोधात बोलू राहिले. अर्ध्या नीट ऐक, भत्र्व्या! एकवेळ मला शिव्या द्या! पण गावाला शिव्या देता? लाज वाटली पाहिजे तुम्हाला!’ सरपंचानं वेगळीच बोंब मारली. गावकरी अवाक झाले. काय बोलावं ब्वॉ?
‘मग याला जबाबदार कोण? जाब विचारायचा कुणाला?’ कुणाला तरी प्रश्न पडला.
‘त्या नेहरूला विचार ग्रामपंचायत स्थापन का केली? निघ!’ सरपंचानं शेवटचा रामबाण बाहेर काढला, आणि उत्तर देऊन लुंगी उचलून आत निघाला. तिकडं अर्ध्याला टेन्शन- हा खुनशी माणूस आता काही सोडत नाही आपल्याला!

Previous Post

निळू आभाळाएवढा!

Next Post

‘ढूम रो’ची धूम धमाल!

Next Post
‘ढूम रो’ची धूम धमाल!

‘ढूम रो’ची धूम धमाल!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.