
नॉर्वेचा हा जेमतेम चौथाच विश्वचषक. पण त्यांचा पराक्रम जागतिक फुटबॉलच्या नकाशावर त्यांचे पाय घट्ट रोवणारा. एर्लिंग हालँड लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. नॉर्वेची विजयशैलीही लक्ष वेधतेय. उपांत्यपूर्व फेरीत नॉर्वेचं स्पर्धेबाहेर जाणं ही शोकांतिका की इथवर मजल मारणं ही सुखांतिका?
ढूम… रो!… ढूम… रो!!… ढूम… रो!!!… हा नाद शनिवारी पहाटे शांत झाला. कारण नॉर्वेची नौका अनपेक्षितरीत्या बुडाली. त्यांचा म्होरक्या म्हणजे फुटबॉलजगताचा दर्यावर्दी एर्लिंग हालँडच्या अश्रूंचा बांध फुटला होता. पण संघातील अन्य खेळाडूंचीही भावनिक अवस्था काहीशी तशीच होती. तळहातांच्या फोडाप्रमाणे जपलेलं स्वप्न भंगलं होतं. नॉर्वेची पृथ्वीतलावर ओळख म्हणजे ‘उगवत्या सूर्याचा देश’. पण उष:काल होता होता, काळरात्र झाली, हे त्यांनी अनुभवलं.
त्यांच्या शोकांतिकेकडे वळण्यापूर्वी हे ‘ढूम… रो’ म्हणजे काय रे भाऊ? हे समजून घेणं इष्ट ठरेल. या प्रक्रियेचं नाव ‘व्हायकिंग रो’. नॉर्वेची जल्लोष करण्याची एक ताजी आचरणपद्धती, जी आता नॉर्वेपुरती मर्यादित
न राहता फिफा विश्वचषक फुटबॉलच्या यजमान देशांमधील रास्तोरस्ती आणि समाजमाध्यमांवर गाजून वैश्विक झालीय. ब्राझीलविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर हालँडनं स्वत: ड्रम वाजवला. या ‘ढूम…’च्या ठेक्यावर दिलेल्या सादेला समोरच्या काही रांगांमध्ये नौकानयनच्या पद्धतीनं बसलेल्या खेळाडू आणि मार्गदर्शक पथकानं ‘रो…’ असं म्हणत दोन्ही हातांनी वल्हवत प्रतिसाद दिला. स्टेडियममधील नॉर्वेच्या चाहत्यांनीही त्याचं अनुकरण केलं. हा साद-प्रतिसाद ७-८ वेळा झाला. दुसर्या दिवशी नॉर्वेच्या संसदेतही ही विजयलाट दिसून आली.
नॉर्वे हा जगातील सर्वात आनंद निर्देशांकाच्या ताज्या क्रमवारीत सातव्या क्रमांकाचा देश. हालँड हा त्यांचा जागतिक फुटबॉलमधील गाजलेला खेळाडू. क्लब फुटबॉलमध्ये आपलं नाणं खणखणीत वाजवणारा हा अवलिया; पण नॉर्वे गेली काही वर्षं फिफा विश्वचषक फुटबॉलच्या पटलावर नसल्यानं त्याची मर्दुमकी बलाढ्य संघांविरुद्ध दिसली नव्हती. ती जेव्हा दिसली, तेव्हा सारेच अवाक् झाले. त्यानं नॉर्वेच्या संघाला एक सुवर्णस्वप्न दाखवलं आणि ते पूर्ण करण्यासाठी हा संघ लढला, झुंजला. त्यामुळेच तो जेव्हा स्पर्धेबाहेर गेला, तेव्हा त्याने नॉर्वेचं नाव मोठं केलं होतं. त्यामुळे पुढील वर्षीच्या आनंदी देशांच्या क्रमवारीत ह्या नॉर्वेनं फुटबॉलच्या बळावर आगेकूच केली, तर मुळीच आश्चर्य वाटू नये. म्हणूनच नॉर्वेचं स्पर्धेबाहेर जाणं ही शोकांतिका की इथवर मजल मारणं ही सुखांतिका?
चौथ्या प्रयत्नात यश
नॉर्वेची आकडेवारी पाहिल्यास यावेळी चौथ्यांदा ते फिफा विश्वचषकात सहभागी झाले, तेही तब्बल २८ वर्षांनी. १९३६च्या
ऑलिम्पिकमध्ये नॉर्वेनं तिसरा क्रमांक गाठला होता. म्हणजे त्यांच्याकडे भारताप्रमाणे फुटबॉलचा प्रेरणादायी इतिहास होता. त्या स्पर्धेत त्यांनी यजमान जर्मनीलाही धूळ चारली होती. १९३८मध्ये नॉर्वे प्रथमच विश्वचषकासाठी पात्र झाला. १६ देशांच्या बाद फेरीच्या स्पर्धेत त्यांनी इटलीला अतिरिक्त वेळेपर्यंत उत्तम लढत दिली; पण इटलीनं २-१ सरशी साधली. दुसर्या महायुद्धानंतर नॉर्वे विश्वचषकासाठी पात्र ठरण्यात अपयशी ठरला. त्या एकमेव सामन्यानंतर तब्बल ५८ वर्षांनी थेट १९९४मध्ये त्यांना दुसरी संधी मिळाली. १९९० ते १९९८ हे हे नॉर्वेच्या फुटबॉलचं पहिलं सुवर्णयुग. एगिल ओल्सेन ऊर्फ ड्रिलो यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या संघानं सर्वांचं लक्ष वेधलं. नॉर्वेनं गटसाखळीत मेक्सिकोला हरवलं, आयर्लंडला बरोबरीत रोखलं, तर इटलीकडून पराभव पत्करला. पण साखळीचा टप्पा त्यांना ओलांडता आला नाही. १९९८च्या पुढच्या विश्वचषकासाठी नॉर्वे पुन्हा पात्र ठरले. यावेळी त्यांनी चक्क ब्राझीलला हरवण्याचा पराक्रम दाखवला. याशिवाय मोरोक्को आणि स्कॉटलंडशी बरोबरी साधली. या बळावर त्यांनी प्रथमच साखळीचा अडथळा पार करून बाद फेरी गाठली. सलग तिसर्यांदा इटलीनंच त्यांची मोहीम १-० अशा फरकानं थांबवली.

यावेळी नॉर्वेच्या चौथ्या विश्वचषकाच्या प्रयत्नात पात्रता स्पर्धेतच त्यांनी इटलीवर ४-१ असा मोठा विजय मिळवला. पात्रता स्पर्धेत हालँडनं एकूण १६ गोल केले. मग साखळीत इराकवर ४-१ असा विजय मिळवत विश्वचषकाला प्रारंभ केला आणि सेनगेलला ३-२ असं नामोहरम केलं; पण फ्रान्सविरुद्ध त्यांनी सपाटून मार खाल्ला. ३२ संघांच्या बाद फेरीत रुबाबात स्थान मिळवल्यानंतर नॉर्वेला आयव्हरी कोस्टाला हरवणं जड गेलं नाही. मग ब्राझीलवरील २-१ असा विजय हा दखलपात्र ठरला. नॉर्वेनं ब्राझीलविरुद्धच्या पाच सामन्यांपैकी कधीही हार पत्करली नाही, हे विशेष. त्यांचा हा विजयरथ इंग्लंडनं उपांत्यपूर्व सामन्यात रोखला.
लोकप्रियतेच्या शिखरावर हालँड
नॉर्वेला एखाद्या महासत्तेप्रमाणे मोठेपण मिळवून सिंहाचा वाटा आहे, तो हालँडचा.‘नॉर्वेचं गोलमशीन’ म्हणून ओळखल्या जाणार्या हालँडच्या खात्यावर सरतेशेवटी ७ गोल जमा होते. सहा फूट पाच इंच ऊंची आणि लांबसडक सोनेरी केसांचा बो बांधणार्या या राजबिंड्या युवकानं मैदानावर तर कर्तृत्व दाखवलंच; पण मैदानाबाहेरही त्यानं छाप पाडलीय. समाजमाध्यमांवर त्याच्या पोस्ट आणि मीम्स सर्वाधिक लोकप्रियतेची शिखरं गाठतायत. शिंगं लावलेला हालँड कधी लढाऊ ग्लॅडिएटर तर कधी प्रिन्सेस आणि बेबीगर्ल रूपातही लोकांना भावतोय. ब्राझीलविरुद्धच्या यशात दोन गोल करणार्या हालँडनं ‘इन्स्टाग्राम’वर ‘वेल वेल वेल’ या शब्दांसह सेल्फी पोस्ट केला. ‘गुगल’वर त्याचं नाव पूण& टाइप केलं, तरी ‘व्हायकिंग रो’ची अनुभूती आपल्याला स्क्रीनवर घेता येते. हालँडनं ‘एक्स’वर ‘आज एक कृती करा… माझं नाव गुगलवर शोधा’ हेही आवाहन चाहत्यांना करीत धुरळा उडवून दिला होता.
हालँड मँचेस्टर सिटीकडून खेळतो. यंदा त्यानं प्रीमियर लीगमध्ये सवा&धिक २७ गोल नोंदवून विश्वचषकासाठी सवां&ना सावध केलं. वेग, क्षमता, योग्य स्थानी उपलब्ध असणं आणि प्रतिस्पर्धी खेळाडूंचं चक्रव्यूह भेदत उत्तम गोल साकारण्यासाठी ओळखला जातो. क्लब फुटबॉलमध्ये २९२ सामन्यांत २२५ तर नॉर्वेकडून खेळताना आठ वषां&त ५५ सामन्यांत ६२ गोल त्यानं नोंदवले आहेत. हालँड गोल साकारल्यावर ध्यानधारणेच्या शैलीत तो साजरा करण्यासाठी ओळखला जातो, ज्यात तो कमळाच्या मुद्रेत बसतो. या त्याच्या खास शैलीचा ‘फिफा’ व्हिडिओ गेम सीरिजमध्येही समावेश करण्यात आला आहे. हालँड नित्यनेमानं समाजमाध्यमावर पडीक असतो. अगदी टेक्सासला खरेदी केलेली काऊबॉय हॅटही त्यानं पोस्ट केली होती.
हालँडचे वडील अल्फी हे माजी फुटबॉलपटू, तर आई ग्राय मरिटा ब्राऊट ही अॅथलेटिक्सपटू. हालँडच्या क्रीडाप्रवासाला प्रारंभ झाला, तो घरातूनच. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना त्याच्या जर्सीवर ‘ब्राऊट हालँड’ अशी आई-वडिलांची आडनावं सहज लक्ष वेधतात. पण नॉर्वेच्या लोकसंस्कृतीत हे अजिबात नवं नाही.

‘एनटीएस’ची किमया
नॉर्वेची लोकसंख्या ५६ लाखांच्या जवळपास. हालँड हा त्यांचा ‘पोस्टर बॉय’. तसंच मार्टिन ओडेगार्डही त्यांचा चर्चेतला खेळाडू. कारण राष्ट्रीय संघ आणि अर्सेनलचा तो संघनायक. पण नॉर्वेची यशस्वी कामगिरी ह्या एकट्या-दुकट्या खेळाडूंच्या बळावर झालेली नाही. त्यांच्या विश्वचषक संघातील २६पैकी १७ खेळाडू हे प्रीमियर लीग, बुंडेसलिगा, ला लिगा आणि सिरी ए ह्या युरोपमधील अव्वल चार लीगसमध्ये खेळतात. २०१३मध्ये स्थापन झालेल्या ‘नॅशनल टीम स्कूल’ (एनटीएस) या युवा फुटबॉल प्रशिक्षण योजनेची ही फलश्रुती. येथे फक्त खेळाडू घडवत नाहीत, तर कोणताही खेळाडू हा संघापेक्षा मोठा नाही, हेही रुजवलं जातं. नॉर्वे फुटबॉल महासंघाच्या खेळाडू विकास विभागाचे प्रमुख हॅकन ग्रॉटलँड हे गेली दोन दशकं ही महत्त्वाकांक्षी योजना राबवतायत. कृत्रिम मैदानांची निर्मिती आणि मार्गदर्शन योजना हे दोन घटक नॉर्वेच्या वाटचालीत महत्त्वाचे ठरले. २०००पासून नॉर्वेनं कृत्रिम मैदानांसाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू केली. गेल्या १० वर्षांत ५३९ नवीन मैदानं तयार केली गेली, तर ५८६ मैदानांचे नूतनीकरण करण्यात आलं. नॉर्वेमध्ये अशा रीतीनं
फुटबॉल संस्कृती रुजली आणि त्याची रसाळ गोमटी फळं आजच्या पिढीला चाखता येतायत.

