कधी नव्हे तो माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या गेल्या आठवड्यात पोट धरून हसत हसत माझ्या घरात आला. तेव्हा मला कितीतरी रिश्टर स्केलचा जोरदार धक्का बसला. अलीकडे मी त्याचं असं हसरं रूप कधीच पाहिलं नव्हतं. एवढं हसायला काय झालं, असं विचारताच तो म्हणाला, टोक्या, मानलं पाहिजे या शाळेतल्या चिमुकल्या पोरांना. देवाने कुठून एवढी अक्कल त्यांच्या टाळक्यात कोंबली हे देवच जाणे! एकीकडे आपले माननीय पंतप्रधान निवडणुका जिंकण्यासाठी ‘गारंटी’ची घंटी वाजवून अख्ख्या देशाला वेठीस धरतायत, तर दुसरीकडे आपले सन्माननीय मुख्यमंत्री शाळेतल्या पोरांना आपल्याला पत्र लिहायला सांगून निवडणुकीच्या मोक्यावर प्रसिद्धीच्या प्रकाशझोतात राहण्याची टामटूम करतायत. आवाहन कसलं तर म्हणे ‘माझी शाळा-सुंदर शाळा’ या विषयावर मला पत्र लिहून पाठवा आणि स्वत:चा सेल्फीही पाठवा. एक तर अभ्यासाचं, क्लासेसचं आणि पाठीवरल्या दफ्तराचं ओझं वाहून ही मुलं आधीच थकली आहेत. त्यातून त्यांच्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला जुंपण्याच्या सरकारी फतव्यामुळे त्यांचीही घाबरगुंडी उडालीय. अशा परिस्थितीत ‘आमचे सरकार-एक विनोदी चाळा’ यासारख्या विषयावर मुलांना निबंध लिहायला सांगितला असता तर त्यांच्या विनोदबुद्धीला आणि कल्पनाशक्तीलाही चालना मिळाली असती. तरी त्यातही चंद्रपूरमधील एका शाळेतील चौथीच्या वर्गात शिकणार्या चिमुरडीने ‘अभ्यास सोडून तुम्हाला पत्रच लिहीत राहायचं का?’ असे सणसणीत खडे बोल सुनावल्याची बातमी वाचून तिने खरोखरच राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांची प्रातिनिधिक चपराक तोंडावर मारली म्हणून तिचं कौतुक वाटतं. तुम्ही दिलेलं पाठ्यपुस्तकही आपल्याला आवडलं नसल्याचं सांगून त्यातील एका विषयासाठी चार-चार पुस्तकं धुंडाळावी लागतात. त्यापेक्षा आमचं जुनं पुस्तकच छान होतं, असं सांगून चांगलीच थप्पडही लगावलीय. अशाच काही स्वतंत्र विचाराच्या छोट्या विद्यार्थ्यांची पत्रं माझ्या हाती लागलीयत. नमुन्यादाखल त्यातील काही पत्रं…
माननीय मुख्यमंत्री (ठाणे),
पत्रास कारण की आपले पत्र मिळाले. खुशाली समजली. माझी शाळा कशीही असली तरी मला ती सुंदरच वाटते. आमच्या बाई, गुरुजी, सगळे सुंदरच आहेत. हेडमास्तरीण बाईही सुंदर आहेत. आमची वह्या-पुस्तकेही सुंदर आहेत. आम्ही त्यांना कव्हरे घालून ती अधिक सुंदर करतो. वर्गातील माझ्या मित्रमैत्रिणीही सुंदर आहेत. माझा मधल्या सुटीत खाण्याचा डबाही सुंदर आहे. माझी आई त्यात रोज सकाळी सुंदर बिस्कीटे भरून देते आणि ऑफिसात जाते. आम्ही पीटीच्या तासाला लंगडी, खो खो, कबड्डी असे सुंदर खेळ खेळतो. शाळा सुटल्यावर शाळेच्या सुंदर स्कूलबसमधून मी घरी येते. अशी आहे माझी सुंदर शाळा… आता हे दुसरं पत्र पाहा. हा वात्रट मुलगा दिलेला विषय सोडून उलट मुख्यमंत्र्यांनाच काही वाह्यात प्रश्न विचारतोय.
आदरणीय मुख्यमंत्री,
माझी शाळा सगळ्या बाजूने सुंदरच आहे. मी सातवीत आहे. मी ठाण्यातच राहातो. त्यामुळे मला तुमच्याविषयी फार आदर वाटतो. म्हणून मला तुमच्या शाळेतील जीवनाविषयी प्रश्न विचारायला आवडेल. कारण माझा मित्र शाम्या मला तुमच्याविषयी नको नको ते सांगतो. मी त्यावर विश्वास ठेवत नाही. तुम्ही शाळेत स्कॉलर होतात की माझ्यासारखे ढ होतात? तुम्ही माझ्यासारखी कॉपी करून पास व्हायचात की प्रमोट व्हायचात? मी गणित तसेच पैशाच्या हिशोबात ढ आहे. पण तुम्ही त्यात नक्की हुशार असणार असे मला शाम्या सांगतो. मी वर्गात खूप दादागिरी करतो. आतापर्यंत खूप मुलांना चोप दिलाय. मला दादागिरी करायला आवडते. शाळेत असताना तुम्हीही माझ्यासारखे होता का? परवा शाम्या सांगत होता की जो आडवा येईल किंवा जास्त आगाऊपणा करील त्याचा तुम्ही करेक्ट कार्यक्रम करता. हा कार्यक्रम करण्याचे प्रकार आणि त्याची योग्य माहिती मलाही द्याल का? कारण मलाही आतापासून असे कार्यक्रम करायचेत. तुमच्यावर जळणारे तुम्हाला मिंधे, गद्दार, मोदींचे भाट असे म्हणतात. मलाही ते आवडत नाही. पण शाम्या काय भलतेच सांगतो. माझा त्याच्यावर विश्वास नाही. तरीही ते असं का म्हणतात त्याचे संदर्भासह स्पष्टीकरण द्याल का? तुम्ही दाढी वाढवण्यामागचं गुपित काय आहे? तेही सांगा. तुम्ही यंदा ठाण्यातून उभे राहिलात तरी पडाल, असं भविष्य शाम्या सांगतो. ते खरं आहे की खोटं?… असे बरेच प्रश्न त्या विद्यार्थ्याने विचारले होते.
आता आणखी एका विद्यार्थ्याचा निबंध.
प्रिय मुख्यमंत्री शिंदे साहेब,
मी मागासलेल्या खेड्यातील सहावीत शिकणारा गरीब विद्यार्थी आहे. आमच्या शाळेची कौले पावसाळ्यात आणि अवकाळी पावसात उडतात. आमचे गाव दुष्काळी आहे. गावच्या नदीत पाणी नाही. आमच्या गावात वीज आली तरी लाईट पेटत नाही. दिवसातून दहावेळा वीज जाते. तसेच लोडशेडिंग असते. माझ्याकडे छोटा मोबाइल आहे. त्याला चार्जिंग करताना लाईट जाते. बाबा शेतात काम करतात. आमच्या गावात कसलीच सुधारणा नाही. रस्ते नाहीत. शाळा लांब आहे. एसटीसाठी दुसर्या गावात जावे लागते. आमच्याकडे जुना टीव्ही आहे. अँटेना वादळात तुटली. तेव्हापासून त्याला दिसत नाही. गावात दवाखाना नाही. आई आजारी होती तेव्हा तिला कापडाची डोली करून बाजूच्या गावात डॉक्टरकडे नेली. जुना ट्रान्झिस्टर आहे. त्याच्यावर कार्यक्रम्ा, गाणी ऐकतो. पंतप्रधान मोदींची गारंटी ऐकतो आणि पोट धरून हसतो. आम्हाला कसलेच फायदे मिळत नाहीत. निवडणुकीला गावात पुढारी येतात. नोटा देऊन जातात. वादळात घराचे मोठे नुकसान झाले. सरकारकडून फक्त पाचशे रुपये मिळाले. मला बाकी कोण व्हावेसे वाटत नाही. फक्त मुख्यमंत्री व्हावे असे वाटते. त्यासाठी काय काय करायला लागते ते तुम्ही सांगा. सरपंच झालो तरी चालेल. दुधाची तहान ताकावर भागेल. पण आमचा गाव सुधारणे हेच माझे स्वप्न आहे. ते सुधारण्याची गारंटी तुम्ही माननीय मोदींच्यातर्फे देऊ शकाल का?