• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

नाय, नो, नेव्हर…

- संतोष पवार

Nitin Phanse by Nitin Phanse
March 16, 2025
in भाष्य
0

शाळेतली जुनी प्रेयसी आता एखाद्या गेट टुगेदरला भेटली तर तुमच्याही काळजात हलकीशी कालवाकालव होते का हो?
– सफीना बिरादर, मिरज
आम्ही शाळेत असतानाच आमच्या काळजात कालवाकालव व्हायची, पण ती आपल्या शाळेत मुली का नाहीत म्हणून? पण ते बरं झालं असं मोठं होत गेलो तसं वाटू लागलं. कारण भूतकाळातल्या गोष्टींनी काळजात कालवाकालव झाली, तर वर्तमातल्या संसारात हलवाहलव होते, हे काही मित्रमंडळींच्या संसारांवरून कळू लागलं. त्यामुळे आम्ही जुन्या गोष्टींपेक्षा नावीन्याचा शोध घेऊ लागलो आहोत. तुम्हीही नावीन्याचा शोध घ्या… (आम्ही प्रियकर किंवा प्रेयसीबद्दल बोलत नाही हे आधी समजून घ्या… तेवढं सोडून सगळं नवीन शोधा…)

एखादा हिंदी कलाकार आयुष्य मुंबईत काढतो आणि त्याला मराठीचा एकही शब्द धड येत नसतो. पण, तो मराठी भाषिकांसमोर तोडकं मोडकं मराठी बोलतो तेव्हा मराठी माणसांच्या आनंदाला पारावार उरत नाही… कशाचं कौतुक वाटतं त्यांना एवढं?
– सुनेत्रा काळगावकर, फलटण
मग काय, मराठी येत नाही म्हणून त्या कलाकाराचा तिथेच ‘खळ्ळ खट्याक’ करायचा? हिंदी कलाकार नाही आला तर आपल्या कार्यक्रमाला ग्लॅमर कसं येणार? आणि ग्लॅमर नाही आलं तर मराठी प्रेक्षक कसा येणार? त्यामुळे कोणी हिंदी कलाकार मोडकं तोडकं का होईना मराठी बोलला की आपला मराठीचा राहिला साहिला अभिमान सुखावतो आणि आपल्या भाषेला कोणी, ‘आपल्या कार्यक्रमात तरी’ पूर्णपणे फाट्यावर मारत नाही म्हणून आपण त्यातच आनंद मानतो. (उत्तर टोचलं असेल, तर प्रश्न किती टोचला असेल हे समजून घ्या.)

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी असं काही मराठी माणसं मराठी भाषादिनाला म्हणतात… महाराष्ट्रात मराठीची जी अवस्था आहे ती पाहता मराठी भाषेला आपल्या लेकरांचा अभिमान वाटत असेल का हो?
– श्रीनिवास हेगडे, सोलापूर
मराठी माणसाने ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ असं रोज बोलायचं का? मग मराठी भाषा दिनाला काय बोलणार? मग फेटे कधी घालणार? नऊवारी कधी नेसणार? विस्मृतीत गेलेल्या कवींच्या कविता सेलिब्रिटींच्या तोडून कधी ऐकणार?… आयुष्यात मराठी न बोललेल्या, अमराठी लोकांच्या तोंडून मराठीचं कौतुक कधी ऐकणार? हे केल्यावरच मराठीचा गर्व आणि अभिमान दिसतो ना? त्यामुळे या दिवशी तरी मराठी भाषेला आपल्या लेकरांचा अभिमान नक्की वाटत असेल. (बाकीचे दिवस आम्ही हिंदी इंग्रजी बोलण्यात, वाचण्यात हिंदी इंग्रजी साउथच्या कलाकारांचं कौतुक करण्यात, अमराठी नेत्यांसमोर झुकण्यात व्यस्त असतो. त्यामुळे मराठीला आमचं कौतुक वाटतं की नाही, एवढा गहन विचार करायला वेळ आहे कोणाला?)

इंग्लिश ही समृद्ध भाषा नाही, महाराष्ट्रात इंग्लिश माध्यमाच्या शाळाच असता कामा नयेत, असं मत प्रसिद्ध साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केलं आहे. तुमचं काय मत यावर?
– पराग जोशी, आळंदी
‘मराठी भाषा ही ‘जगण्याची अडगळ’ आहे असं मराठी माणसाला वाटतं,’ असं भालचंद्र नेमाडे यांना वाटत असेल. म्हणून त्यांनी तसं मत व्यक्त केलं असेल. त्यावर आम्ही आमचं मत व्यक्त केलं तर लगेच तुम्ही दुसर्‍या कोणाकडे जाऊन अमक्यातमक्यांचं असं मत आहे, त्यावर तुमचं काय मत आहे म्हणून विचारायला मोकळे… (कुठल्या न्यूज चॅनलचे पत्रकार आहात का? प्रश्न विचारण्याच्या पॅटर्नवरून आमचं असं मत झालं, यावर तुमचं काय मत आहे?)

लग्नात वधूवराला सात फेरे का घ्यावे लागतात?
– अशोक परशुराम परब, सावरकर नगर, ठाणे
त्या दिवशी वधू-वरांनी आणि लग्नाला आलेल्या मंडळींनी सुट्टी घेतलेली असते. भरपूर वेळ असतो त्यांना… कोणालाच घाई नसते… मग त्या वेळेत एक-दोन फेर्‍या घेऊन नंतर काय टाईमपास करायचा? म्हणून घेतात ते सात फेरे… अशोकराव, आपल्या परंपरांबद्दल आणि धार्मिक गोष्टीबद्दल प्रश्न विचारायचे नसतात, हे या अमृतकाळातही तुमच्या लक्षात येत नाही म्हणजे तुम्ही कोणत्या काळात वावरत आहात? सात फेर्‍यांबद्दल प्रश्न विचारून साडेसाती मागे लावून घ्यायचीय का?

पवारानुं, यंदा होळयेत काय गाराना घालतलासे?
– गजानन परब, लांजा
सरकार, पोलीस, न्यायपालिका वगैरे ठिकाणी कार्यरत असणार्‍या लोकांका, सामान्य लोकांची गार्‍हाणी ऐकण्याची बुद्धी दे रे देवा महाराजा… असा गार्‍हाणा घालुचा हा… मगे बघू… त्या लोकांका तशी बुद्धी मिळते की ‘देव पण सामान्य लोकांचा गाराना ऐकना नाय’ अशी आमची बुद्धी होते!

Previous Post

किंग ऑफ गद्दार!

Next Post

या थडग्याखाली दडलंय काय?

Next Post

या थडग्याखाली दडलंय काय?

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.