या भवनातील गीत पुराणे…
मवाळ हळवे सूर…
जाऊ द्या आज येथूनी दूर…
काल परवा मी फेसबुकवर एक वचन टाकले होते. काही गायक सुरात गातात, तर काही सूर गातात. सुरात गाताना पायवाट असते, सूर गातांना तेच अनोळखी, वाट शोधत पुढे होतात. २०वे शतक म्हणजे संगीताची लयलूट. हेच इतिहास्य लिहावे वाटले. राजवाड्यांतील… उंची हवेल्यांतील गाणे… दरबारातील गाणे चक्क या काळात रसिकांच्या मैफिलींतून, गणिकांच्या बैठकीतून ऐकू येऊ लागले. गाण्यांची अनेक घराणी गाणारे गवय्ये नवनव्या रागदारीचा वर्षाव करू लागले. आणि बोलपट सुरू झाले तेव्हा सहा सहा तासांचे गाणे चार मिनिटांचे होऊन ग्रामोफोनच्या तबकडीवर फेर धरून नाचू लागले.
भारताच्या स्वातंत्र्याआधी अनेक गायक होतेच, पण बडे गुलाम अली खां साहेबांसारख्या उस्तादांचे गाणे त्या काळात खूप खूप गाजले. एक आठवण सांगायची तर स्वातंत्र्यानंतर एका सभेत गांधीजींना जनतेला संबोधित करायचे होते. तत्पूर्वी एखादे भजन व्हावे असे त्यांना वाटत होते. संयोजकांनी बडे गुलाम अली खान साहेबांना निमंत्रित केले होते, परंतु सभेत पोहोचायला त्यांना थोडा वेळ झाला. भले थोरल्या मिशा, पैलवानासारखी भरभक्कम देहयष्टी असलेले खान साहेब थोडे खजील झाले होते. गांधीजी म्हणाले, खान साहेब तुम्ही असे देहयष्टी असलेले, मी पडलो हा असा काटकुळा, तुमच्याशी मी लढू शकत नाही. साहेबांची कळी खुलली. त्यांनी छानशी पहाडी रागातील बंदिश सुनावली. बोल होते, ‘हरी ओम तित सत जपा कर जपा.. कर… खान साहेब समरसून गात होते. कडकडून टाळ्या पडल्या. हे भजन गांधीजींना खूप आवडले. गांधीजींनी उस्ताद जिंकले अशी बोटाची खूण केली आणि म्हणाले, ‘उस्तादजी, मानवतेच्या भलाईसाठी गायलेले हे भजन तुम्ही आपल्या आवाजाने अमर केले आहे. गांधीजी खान साहेबांचे उत्तम प्रशंसक होते. त्यांनी खान साहेबांना एक पत्र पाठवले, उस्तादजी गाण्यातलं, संगीतातलं मला फार काही समजत नाही. पण येथे येऊन आपण गायलेले परमेश्वराविषयीचे भजन मला खूप भावलं. मी आपला अत्यत ऋणी आहे!
त्या काळातच गोहर जान ह्या पहिल्या गायिका होत्या. त्यांच्या गाण्याची पहिली रेकॉर्ड निघाली होती. जो गायक गाणे रेकॉर्ड करेल तो मरून जातो अशी आवई सुरुवातीस उठलेली होती. पण नंतर खाँ साहेबांच्या अनेक रेकॉर्ड्स निघाल्या. खान साहेबांनी त्यावेळी गायलेल्या ठुमरी अद्यापही रसिकप्रिय आहेत. ‘क्या करु सजनी… आये ना बालम’, ‘याद पिया की आये…’ इ. त्यांना लता मंगेशकरांची गाणी फार आवडायची. गमती गमतीत ते म्हणायचे, ‘लता के कितने गाने सुने, लेकिन कंबख्त कभी बेसुरी नहीं होती…’
पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर हे हिंदुस्तानी संगीतातले महान तपस्वी गायक म्हणून उदयास आले. त्यांनी संगीतप्रेमी शिष्यांसाठी संगीतातल्या प्रशाला निर्माण केल्या. स्वरलिपी शब्दबद्ध करायचे महान कार्य केले, असे ऐकून आहे. त्याआधी गुरु गायचे… शिष्य फक्त लक्षात ठेवायचे.त्यावेळी स्वरलिपी नव्हती. ‘रघुपती राघव…’ ‘पायोजी मैंने राम रतन धन पायो…’ ही अजरामर भजने त्यांचीच. भारतीय शास्त्रोक्त संगीतातले महान गायक दिगंबर विष्णू पलुस्कर हे त्यांचेच पुत्र. अनारकली या सिनेमातील शेवटची अजरामर जुगलबंदी बडे गुलाम अली खान साहेब व दिगंबरजी यांचीच आहे. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात मोठमोठे दिग्गज निर्माण झाले. कुमार गंधर्व, पं. भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, पं. जितेंद्र अभिषेकी, शोभा गुर्टू, गानसरस्वती किशोरी आमोणकर, दीनानाथ मंगेशकर, गंगुबाई हनगल, पं. मल्लिकार्जुन मन्सूर आदी; तर मराठी नाटकातून पं. राम मराठे, प्रसाद सावकार, भालचंद्र पेंढारकर, ही रत्नांची खाण आहे. किती शोधणार?…
माझे मोठे भाऊ बाबूराव हे संगीतप्रेमी होते. रागदारीचे त्यांना उत्तम ज्ञान होते. त्यांचा आवाजही खूप चांगला होता. बासरी तर अत्यंत सुंदर वाजवीत. बासरीचेचे सूर ऐकून कित्येकदा रस्त्यावरून जाणारा क्षणभर अडखळे… त्यांच्यामुळे मला गाण्यातली गोडी, गायक आणि गायकी थोडीफार समजू लागली. मोठमोठ्या गायकांच्या मैफिली ऐकायचा योगही अनेकदा आला. पं. कुमार गंधर्व, पं. भीमसेन जोशी, पं. वसंतराव देशपांडे, पं. जितेंद्र अभिषेकी, पं.हृदयनाथ मंगेशकर, गायिका मंगला खाडिलकर, सुलोचना चव्हाण आदी… नाटकातूनही अनेक गायक ऐकायला मिळाले. पं. राम मराठे, भालचंद्र पेंढारकर, वसंतराव देशपांडे, रामदास कामत, इ. हिंदी सिनेमातून ज्येष्ठ गायक के. एल. सैगल, रफी, मुकेश, मन्ना डे, सुधीर फडके आणि अलीकडच्या अरुण दातेंपर्यंत… महेंद्र कपूर, लता मंगेशकर, नूरजहां, सुरय्या, गीता दत्त, आशा भोसले, सुमन कल्याणपूर आणि कितीतरी रत्नांनी भरलेली ही अलीबाबाची सुरीली सोन्याची खाण… केवळ विस्मयकारक!
या सुंदर वारशाला हात न लावता अनेक व्यंगचित्रे वेळोवेळी काढायचा प्रसंग आला ‘आवाज’मधील एक चित्रमाला येथे देत आहे. काही जादूच्या खिडक्याही या विषयावर काढलेल्या आहेत. आपल्या पिढीला स्वर्गीय संगीताचा हा आनंद यथेच्छ मिळाला हे भाग्य वेगळेच. २१व्या शतकात या सुरावटीचा आणि गायक सूरश्रींचा सूर्यास्त होताना पाहत आहोत. जवळपास ७०-८० वर्षे वार्याबरोबर अहोरात्र अवकाशात गुंजणारा लताबाईंचा आवाजही विरून गेलाय… उरलाय फक्त अराजकीय गोंगाट, आक्रस्ताळी आरडोरडा… मीडियाचे अवतीभवती घोंगावणारे, प्रत्येकाला दंश करणारे माईक्स. पूर्वीचे हळवे, कौटुंबिक कथांनी, उत्कट अभिनयाने हरवून टाकणारे सिनेमे, सुंदर संगीत, मनमोही गाणी, बालपणीच्या आठवणी जपणारी जुनी थिएटर्स, गुरुदत्तांच्या ‘कागज के फूल’ सिनेमातील दृश्यासारखी अंधारात लोप पावलीत… मनासारखे काहीच राहिले नसल्याने म्हणावे वाटले, ‘या भवनातील गीत पुराने… मवाळ हळवे सूर… जाऊ द्या येथूनी दूर दूर…
काल पहाटे पहाटे एक स्वप्न पडलं. देव दिसला. मी म्हणालो, ‘देवा हा टीव्हीवरचा गोंगाट, लबाडांची राष्ट्रहितासाठीची मगरमच्छी भाषणं, भोळसट कार्यकर्त्यांच्या घोषणा, बावळट जनतेने केलेली गर्दी, रोज रोज पाहवत नाही रे काहीतरी उ:शाप सुचव…
…देव म्हणाला, टीव्हीचा रिमोट अजूनही ऐकतो. तो वापर आणि मोकळ्या हवेत फिरून ये बस्स!