बाळासाहेबांच्या जादूई कुंचल्यातून उतरलेले हे मुखपृष्ठ चित्र आहे १९८० सालातले. त्यात बाळासाहेबांनी केलेली कल्पनाही मजेशीर आहे. त्यांनी कांदा, रॉकेल, साखर, तूप, पाव या जीवनावश्यक वस्तूंना मनुष्यरूप दिलेलं आहे. यांचे भाव हा एकेकाळी अतिशय संवेदनशील विषय असे. सर्वसामान्य माणसाचं उत्पन्न तेव्हाही फार कमी होतं आणि आजही फार कमी आहे. दर महिन्याच्या वाणसामानाचं आणि भाजीपाला, दूध, मच्छी-चिकन-मटण-अंडी यांचं एक बजेट असतं. ते काटेकोरपणे पाळावं लागतं. त्यामुळेच जीवनावश्यक वस्तूंपैकी कशाचीही भाववाढ झाली की हे बजेट कोसळतं आणि गांजलेले लोक त्याचा राग सरकारवर काढतात. कारण, आपल्याकडे जीवनावश्यक वस्तूंच्या दरांवर सरकारचं नियंत्रण असणं अपेक्षित आहे. या दरवाढीमुळे शेतकर्यांचाही फायदा होत नाही. फावतं ते दलालांचंच. देशात कांद्याच्या दरवाढीमुळे राज्याची सत्ता गमावावी लागण्याचे प्रकार घडले आहेत. म्हणून हे हमखास निवडणूक जिंकून देणारे उमेदवार असं बाळासाहेबांनी म्हटलं आहे… आजचा काळ पाहिला असता, तर त्यांना याच्या उलटं काहीतरी चित्रित करावं लागलं असतं. बस हो गयी महंगाई की मार म्हणत सत्तेवर आलेल्या मोदींनी गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेल यांचे भाव गगनाला नेऊन भिडवले, तरी जनता चिडीचुप्प आहे. पंतप्रधानांच्या अपयशाचा निर्देशांक असलेला (ही मोदींचीच मुक्ताफळे) रुपया कोसळला, टोमॅटोने शंभरी पार करून वर अर्धशतक गाठलं, तरी जनता पद्धतशीरपणे भिनवलेल्या विद्वेषानंदात मग्न आहे, हे पाहून शिवसेनाप्रमुखही चाट पडले असते!