□ मिंध्यांनी अजित पवारांपुढे गुडघे टेकले.
■ गुडघे टेकायला ते उभे आहेत का मुळात? वर्षभर रांगतच आहेत…
□ ज्याने घडवलंय तो शिल्पकारच पळवून नेला जातोय! – उद्धव ठाकरे यांचा मिंध्यांसह अजित पवारांवर शरसंधान.
■ आपण आपल्या जीवनाचा शिल्पकार बनण्यासाठी कुवत लागते, ती नसल्यावर पळवापळवीशिवाय काय करणार उद्धवजी!
□ वय ८२ असो की ९२… पॉवर माझीच – शरद पवारांचा अजितदादांवर पलटवार.
■ त्याच बॅटरीवर हे बाहुले चालत होते, आता दिल्लीचा डायरेक्ट करंट घ्यायला गेले आहेत, कायमची अद्दल घडवणारा शॉक बसला नाही म्हणजे मिळवली.
□ राष्ट्रवादीमुळे भाजपात धुसफूस; भाजप आमदारांना मंत्रीपदे कधी?
■ मंत्रिपदं विसरा, सतरंज्या उचला आयुष्यभर. नाहीतर फुटून इतरत्र जा. तरच तुमची किंमत कळेल आणि सन्मान होईल.
□ अजितदादांच्या निकटवर्तीयांनी कवडीमोल दराने संपत्ती खरेदी केली – पीएमएलए कोर्टाचे निरीक्षण.
■ आता सध्या ते गुंडाळून ठेवा निरीक्षण! आता त्यांच्या आश्रयदात्यांनी कवडीमोल दराने लाजच विकली आहे.
□ मंत्रीपदाची संधी मिळत नाही म्हणून अनेकजण दु:खी – नितीन गडकरी यांचा टोला.
■ जनसेवेचा केवढा हा ध्यास, केवढा हा कळवळा! कौतुक करा नितीनजी, टोले कसले मारताय!
□ गद्दारांनी आमच्या नावाचा वापर करू नये – पंढरपुरात श्रीविठ्ठलाचे बडवे संतप्त.
■ त्यांना असंच ऐकू येणारं एक दुसरं नाव आहे खरं तर, पण ते चारचौघांत उच्चारण्यालायक नाही, त्यामुळे सध्या अॅडजस्ट करून घ्या.
□ आमचा ‘सह्याद्री’ प्रत्येक संकटावर मात करेल – रोहित पवार यांनी व्यक्त केला विश्वास.
■ तो भक्कम कातळाचा आहे, नव्याने बनलेला हिमालय नाही, जराशा धक्क्याने ढासळायला!
□ काँग्रेस एकसंध… कुणीही फुटणार नाही.
■ कोणी फोडणार आहे का, हाही एक प्रश्न आहे म्हणा!
□ मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील घराजवळचा रस्ता खड्ड्यात.
■ भविष्यसूचकच आहे म्हणायची ही घडामोड.
□ ईडीला पोलिसांचे अधिकार नाहीत – मद्रास उच्च न्यायालयाने फटकारले.
■ अरे देवा, म्हणजे सगळीकडे इतके दिवस चालली ती फुकट फौजदारकीच होती की काय?
□ फुटीर प्रताप सरनाईक म्हणतात, माझ्या मतदारसंघातील कामे आताही होईनात…
■ तुमची कामं करायला थोडंच घेतलंय तुम्हाला? त्यांच्या कामासाठी घेतलंय, ते पूर्ण झालं की विषय कट् होणार!
□ पंतप्रधानांनी पत्नीबरोबरच राहायला हवे – लालूंची फटकेबाजी.
■ कोणाच्या, ते पण सांगायला नको का लालूंनी… उगाच नसते किडे वळवळतात वाह्यात लोकांच्या डोक्यात!
□ मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी आदिवासीचे धुतले पाय; भाजपला दोषमुक्त करण्यासाठी नाटक केल्याची चर्चा.
■ निवडणूक आली की हे त्यांच्याकडून मस्तकावर ‘अभिषेक’ही करून घेतील… कसला ते कळलं ना?
□ डॉ. नीलम गोर्हे यांना मिंधे गटात मिळाला मोक्ष.
■ त्यांच्यावर अन्यायच तेवढा भयंकर झाला होता… आता जलसमाधी झाली की मोक्ष कितीसा दूर!
□ अपात्रतेचा निर्णय १० ऑगस्टपूर्वी घ्यावाच लागेल – नाना पटोले.
■ जनतेने तो आधीच घेतलाय… किती पळतील निवडणुकांपासून?
□ सुमीत बाबामुळे ‘ठाण्याची दिशा’ भरकटली.
■ अख्ख्या देशाची दिशा भरकटली असले भोंदू बाबा, सद्गुरू, बापू वगैरे भोंदू व्यापारी साधुसंत म्हणून सरकारने डोक्यावर घेऊन नाचवल्यामुळे.
□ ओरिजिनल गद्दारांवर हसू येतंय! त्यांना त्यांची किंमत कळली! -आदित्य ठाकरे यांचा मिंधे गटाला टोला.
■ त्यांना ती आधीपासूनच माहिती आहे, म्हणूनच तर ते त्या वळचणीला जाऊन बसले भिऊन.
□ गृहिणींना मसाल्याच्या दरवाढीचा ठसका.
■ विनामसाल्याचा स्वयंपाक करा, आम्पपित्तवृद्धी टाळा, असा सल्ला अजून दिला नाही का निर्मलाक्कांनी?
□ पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुकांमधील हिंसाचारामुळे देशाची प्रतिमा ढासळली – भाजपची टीका.
■ आणि मणिपुरातल्या हिंसाचाराने देशाची कॉलर ताठ होते आहे का जगात? थोडी ‘मन की लाज’ तरी बाळगा रे!