शेअरचे भाव वाढतात किंवा कमी होतात ते त्या कंपनीला मिळणारे उत्पन्न वाढत आहे की कमी होत आहे, कंपनीची वाढ किती होत आहे, त्यानुसार. लार्ज कॅप कंपन्यांच्या बाबतीत ही वाढ दुप्पट, चारपट अशी संभवत नाही, कारण या कंपन्या आधीच खूप मोठ्या असतात. उलट स्मॉल कॅप कंपन्यांच्या बाबतीत त्यांची वाढ अनेक पटीने होऊ शकते, त्यामुळे त्यांचे भावही अनेक पटीने वाढतात. मात्र त्यात जोखीमही खूप जास्त असते.
– – –
शेअर निवडण्याचे काही निकष आपण बघत आहोत. मार्केट कॅपिटलायझेशनवरून शेअर निवडणे हा एक निकष आहे. मार्केट कॅपिटलायझेशनची व्याख्या आहे, त्या कंपनीच्या एकूण शेअरची संख्या गुणिले त्या शेअरचा मार्केटमधील भाव.
मार्केट कॅपिटलायझेशन = शेअरची संर्ख्या X शेअरचा मार्केटमधील भाव.
स्टील अॅथॅरिटी ऑफ इंडिया म्हणजे सेल या कंपनीच्या शेअरची एकूण संख्या आहे साधारण ४१३ कोटी ५ लाख शेअर्स कंपनीच्या शेअरचा भाव ७-१२-२०२१ला १०७.७५ रुपये होता. म्हणून सेलचे मार्केट कॅपिटलायझेशन:
४१३ कोटी ५ लाख X १०७.७५ ४४५०६ कोटी रुपये
शेअरचा भाव नेहमी बदलत असतो. त्यामुळे मार्केट कॅपिटलायझेशनसुद्धा बदलत असते.
कॅप हे मार्केट कॅपिटलायझेशन संक्षिप्त रूप. या मार्केट कॅपवरून म्हणजे कंपनीच्या आकारावरून मुख्यत: तीन प्रकारात कंपन्यांचे वर्गीकरण केले जाते. मोठ्या कंपन्या, मध्यम आकाराच्या कंपन्या व छोट्या कंपन्या. यालाच लार्ज कॅप, मिड कॅप व स्मॉल कॅप म्हटले जाते व हे शब्द बिझनेस चॅनेलवर नेहमी ऐकायला मिळतात. एचडीएफसी बँक, टीसीएस, टाटा मोटर्स, रिलायन्स इंडस्ट्रीज ही काही लार्ज कॅप कंपन्यांची नावे.
सेबीच्या नियमांनुसार सर्वात जास्त मार्वेâट कॅपिटलायझेशन असलेल्या पहिल्या १०० कंपन्यांना लार्ज कॅप म्हटले जाते व त्यांचे मार्केट कॅपिटलायझेशन साधारणत: २०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त असते. मार्केट कॅपिटलायझेशनच्या हिशेबात पुढील १०१ ते २५० कंपन्यांना मिड कॅप म्हटले जाते व त्यांचे मार्केट कॅपिटलायझेशन साधारण ५००० कोटी ते २०,००० कोटी असते. मार्केट कॅपिटलायझेशनच्या हिशेबात २५१च्या पुढील कंपन्यांना स्मॉल कॅप म्हटले जाते. त्यांचे मार्केट कॅप ५००० कोटीपेक्षा कमी असते. सहसा लार्ज कॅप कंपनीतील गुंतवणुकीत कमी जोखीम असते व स्मॉल कॅप कंपनीतील गुंतवणुकीत जास्त जोखीम असते, पण स्मॉल कॅप कंपनीतील गुंतवणुकीतून जास्त फायदा मिळण्याची आशा असते, तसेच संख्येने जास्त शेअर विकत घेता येतात, त्यामुळे छोटे गुंतवणूकदार स्मॉल कॅप कंपन्यांचे शेअर घेतात. मात्र नवीन सुरुवात करताना लार्ज कॅप कंपनीची निवड करावी. तसेच लार्ज कॅप कंपनीचा शेअर घेऊनही तोटा होऊ शकतो. उदा : टाटा स्टीलच्या शेअरचा भाव ०८ नोव्हेंबर २०२१ला १३४३ रुपये होता, तर ०७ डिसेंबर २०२१ला तो ११५२ रुपये झाला, म्हणजे तोटा झाला.
शेअरचे भाव वाढतात किंवा कमी होतात ते त्या कंपनीला मिळणारे उत्पन्न वाढत आहे की कमी होत आहे, कंपनीची वाढ किती होत आहे, त्यानुसार. लार्ज कॅप कंपन्यांच्या बाबतीत ही वाढ दुप्पट, चारपट अशी संभवत नाही, कारण या कंपन्या आधीच खूप मोठ्या असतात. साधारण वार्षिक वीस टक्के या दराने त्यांचे उत्पन्न वाढत असते आणि त्यांच्या शेअरचे भावही त्या प्रमाणात वाढतात. उलट स्मॉल कॅप कंपन्यांच्या बाबतीत त्यांची वाढ अनेक पटीने होऊ शकते, त्यामुळे त्यांचे भावही अनेक पटीने वाढतात. मात्र त्यात जोखीमही खूप जास्त असते. स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यानंतर खूप तोटा सहन करावा लागला अशी अनेक उदाहरणे आहेत. क्रिधन इन्फ्रा, इरा इन्फ्रास्ट्रचर, मेटॅलिस्ट फोर्जिंग ही काही उदाहरणे, ज्यात गुंतवणूकदारांचे पैसे कवडीमोल झालेले आहेत व अशा अनेक कंपन्या आहेत.
आता शेअरची निवड करण्याचे काही आर्थिक निकष बघू. ईपीएस, पीई रेशिओ, बुक व्हॅल्यू हे तीन निकष सर्वसाधारणपणे वापरले जातात. यांची ओळख करून घेऊ.
ईपीएसचा अर्थ ‘अर्निंग पर शेअर’ म्हणजे प्रति शेअर मिळकत.
याचा फॉर्म्युला आहे; ईपीएस = करोत्तर नफा भागिले इश्यू केलेले शेअर.
एका कंपनीला वार्षिक ५००० कोटी रुपये नफा झाला व दुसर्यास कंपनीला १०००० कोटी रुपये नफा झाला तर दुसरी कंपनी चांगली वाटेल, पण तिने इश्यू केलेल्या शेअरची संख्या ५०० कोटी असेल तर तिचा ईपीएस २० होईल. पहिल्या कंपनीने इश्यू केलेले शेअर १०० कोटी असतील तर तिचा ईपीएस ५० होईल. याचा अर्थ पहिल्या कंपनीची प्रति शेअर मिळकत जास्त चांगली आहे. प्रत्येक शेअरमागे कंपनीला किती नफा होत आहे ते ईपीएसमुळे चटकन कळते.
पीई रेशिओ म्हणजे काय ते बघू.
पीई रेशिओ म्हणजे प्राइस टू अर्निंग रेशिओ म्हणजे शेअरची किंमत भागिले ईपीएस.
पीई रेशिओ दर्शवितो ईपीएसच्या कितीपट किंमत मार्केट त्या शेअरसाठी देत आहे.
०७-१२-२०२१ला टाटा पॉवर या कंपनीच्या शेअरचा भाव २२६.४५ व ईपीएस ४.५५ आहे, म्हणून पीई रेशिओ होईल २२६.४५/४.५५ = ४९.७२
प्रत्येक सेक्टरसाठी पीई रेशिओ किती असावा त्याचे प्रमाण वेगवेगळे असते. खाजगी बँकांचा पीई रेशिओ जास्त असतो तर सरकारी बँकांचा कमी, कारण खाजगी बँका जास्त वेगाने वाढतील, त्यांचे उत्पन्न जास्त वाढेल असे अनुमान असते. पीई रेशिओच्या आधारावर कंपन्यांची तुलना करताना एकाच सेक्टरमधील कंपन्या घ्याव्यात. उदा: टाटा पॉवर कंपनीचा पीई रेशिओ ४९.७२ आहे, तर याच क्षेत्रातील टोरेंट पॉवर कंपनीचा पीई रेशिओ २१.८१ आहे, सीईएससी कंपनीचा ८.५२ आहे. याचा अर्थ मार्केट टाटा पॉवर कंपनीचा शेअरला इतरांच्या तुलनेत जास्त भाव देत आहे. आपण निवडलेल्या कंपनीचा पीई रेशिओ किती आहे व त्या सेक्टरचा किती आहे अवश्य बघावे. खूप जास्त असेल तर शेअरचे भाव आधीच वाढलेले आहेत. आता घेऊन कदाचित आपल्याला फायदा मिळणार नाही. काही विशेष कारण असेल तर भाव वाढतही जाईल, ती माहिती हवी. डीमार्ट चालवणारी कंपनी अॅव्हेन्यू सुपरमार्ट हिचा पीई रेशिओ चक्क २१६ इतका जास्त आहे. किरकोळ विक्री-रिटेल सेक्टर यातील कंपन्यांचे पीई रेशिओ जास्त असतात, पण या कंपनीचा त्या तुलनेतही खूपच जास्त आहे कारण हिची वाढ तशी होईल अशी अपेक्षा आहे.
आता बुक व्हॅल्यू म्हणजे काय ते जाणण्यासाठी आधी भाग भांडवल म्हणजेच शेअर कॅपिटल व राखीव निधी म्हणजे काय ते बघू.
कंपनीच्या शेअरचे दर्शनी मूल्य– फेस व्हॅल्यू असते, ते १ रुपया, २ रुपये, ५ रुपये, १० रुपये असे सर्वसाधारणपणे असते. कंपनी जेव्हा हे शेअर विकायला काढते- इश्यू करते– आयपीओ आणते तेव्हा भाव जास्त लावते ते बघितले. परंतु शेअर कॅपिटल म्हणजे इश्यू केलेले शेअर गुणिले त्याची फेस व्हॅल्यू.
स्टील ऑथॅरिटी ऑफ इंडिया म्हणजे सेल या कंपनीच्या शेअरची फेस व्हॅल्यू १० रुपये आहे. तिने इश्यू केलेल्या शेअरची एकूण संख्या आहे साधारण ४१३ कोटी ५ लाख शेअर्स त्यामुळे तिचे भागभांडवल अर्थात शेअर कॅपिटल होईल : १० रुपर्ये X ४१३ कोटी ५ लाख = ४१३० कोटी रुपये.
कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये शेअर कॅपिटल किती ते दिलेले असते. तसेच हे ढोबळमानाने दिलेले आहे, प्रीफरन्स शेअर इत्यादी बारकावे विचारात घेतलेले नाहीत. कंपनी ओएफएस/एफपीओ आणून नवे शेअर इश्यू करते तेव्हा तिचे शेअर कॅपिटल वाढते. कंपनी शेअर बायबॅक करते म्हणजे तिच्या शेअरची संख्या कमी करते म्हणून शेअर कॅपिटल कमी होते.
आता राखीव निधी म्हणजे काय बघू. कंपनीला नफा होतो तेव्हा ती सगळा नफा लाभांशाच्या रूपाने देऊन टाकत नाही. व्यवसाय-विस्तारासाठी ती निधी राखून ठेवते आणि दर वर्षी तो असा राखता आला तर तो वाढत जातो. याला राखीव निधी किंवा रिझर्व अॅन्ड सरप्लस म्हणतात. हा खूप जास्त जमा झाला तर यातूनच कंपनी कधी बोनस शेअर्स देते. हासुद्धा बॅलन्स शीटमध्ये दाखवलेला असतो. सेल या कंपनीचा राखीव निधी ४१,२७५ कोटी रुपये आहे. खूप जास्त राखीव निधी आहे म्हणजे शेअरधारकांना बोनस किंवा जास्त लाभांश मिळण्याची आशा वाटते, पण कंपनी तो निधी वापरून व्यवसायविस्ताराची संधी साधत नाही असाही आक्षेप असतो.
शेअर कॅपिटल व राखीव निधी या दोन्हीचा उपयोग करून बुक व्हॅल्यू काढली जाते. बुक व्हॅल्यू म्हणजे कंपनीचे शेअर
कॅपिटल (भाग भांडवल) अधिक राखीव निधी भागिले शेअरची संख्या. बुक व्हॅल्यू हा प्रति शेअर असतो.
सेलचे उदाहरण बघू.
शेअर कॅपिटल ४१३० कोटी रुपये + राखीव निधी ४१,२७५ कोटी रुपये = ४५४०५ कोटी रुपये.
शेअरची संख्या ४१३ कोटी ५ लाख
म्हणून सेलची प्रति शेअर बुक व्हॅल्यू = ४५४०५ / ४१३.०५ १०९.९२
कंपनीच्या शेअरचा मार्केटमधील भाव भागिले प्रति शेअर बुक व्हॅल्यू यावरून प्राईस टू बुक व्हॅल्यू मिळते. कमीतकमी बुक
व्हॅल्यूइतका भाव त्या शेअरचा हवाच, नाहीतर शेअर बुक व्हॅल्यूपेक्षा स्वस्तात मिळत आहे असा अर्थ होतो. सेलचा बुक व्हॅल्यू १०९.९२ आहे व शेअरचा भाव १०७.७५ आहे म्हणून त्याचा प्राईस टू बुक व्हॅल्यू रेशिओ होईल १०७.७५ / १०९.९२ = ०.९८. इथे शेअरचा भाव वाढण्यसाठी वाव आहे, मात्र इतर बाबी लक्षात घ्याव्या लागतील. अॅव्हेन्यू सुपरमार्टचा प्राईस टू बुक व्हॅल्यू रेशिओ २३.७८ आहे म्हणजे कंपनीच्या बुक व्हॅल्यूपेक्षा २३पट जास्त किंमत मार्केट देत आहे. ही नवी कंपनी पण एचडीएफसी बँकचा प्राईस टू बुक व्हॅल्यू रेशिओ ३.७५ आहे आणि साधारणपणे तो योग्य आहे.
हे तीन महत्वाचे व सोपे निकष आहेत. हे अतिशय ढोबळ निकष आहेत. कंपनीवर असलेले कर्ज, व्यवसाय, मार्केटची स्थिती अशा अनेक इतर बाबी विचारात घ्याव्या लागतात. पण गुंतवणुकीला सुरुवात करताना यांचा नक्कीच उपयोग करावा.
टीप : कंपन्यांची नावे केवळ उदाहरणादाखल दिलेली आहेत, त्या शिफारसी नाहीत.
(टिप : ‘शेअर मार्केट – अभ्यास आणि अनुभव’ हे प्रस्तुत लेखकाचे पुस्तक २०१५मध्ये प्रकाशित झालेले असून त्याचा उपयोग इथे केलेला आहे.)
क्रमश: