खरे पाहिले तर आपण सगळे जुने लोक मोठमोठ्या वाडे, चाळी, गल्ली बोळातल्या घरात जन्मलेले. पुणे म्हटले की पेशव्यांचे लांबरुंद दुमजली, देखणे नक्षीकाम केलेले शिसवी वाडे, आमच्या जुन्या नाशकातही अनेक मोठे नक्षीकाम केलेले वाडे आम्ही पाहात आलो. येवल्याला सुद्धा असेच मोठमोठे नक्षीकाम, कोरीव काम केलेले वाडे, चांदवडला अहिल्याबाई होळकरांचा रंगमहाल अद्यापही इतिहासाची आठवण सांगण्यासाठी अस्तित्व टिकवून आहेत. त्यातले काही वय झाल्यामुळे टेकीस आलेत, टेकूंच्या आधाराने उभे राहून थकलेत. काही जमीनदोस्त झालेत, तर काही बिल्डरांनी अनेक मजली इमारती बांधण्यासाठी पाडले. पण मुंबईची कथाच वेगळी. लाखो लोक पोटात सामावून घेण्यासाठी मोठ-मोठ्या इमारती उभ्या राहिल्या. किती उंच जायचं याची परिसीमा राहिली नाही.
अशा हजारो इमारती होऊनही तिथे अनेक लोकांना अद्यापही राहायला घरे नाहीत. ही गमतीचीच गोष्ट. ३०-४० वर्षांपूर्वी मी चित्र काढले होते, इमारतीस आग लागल्याची अफवा ऐकून तेथे रहाणारे इमारती खाली जमा झालेत. त्यातला एकजण म्हणतोय, बापरे! आपण सगळे सात आठशेजण येथे रहातोय?
रहायला फ्लॅट वा घर मिळत नाही म्हणून एक मनुष्य बिल्डरकडे रिकामा प्लॉट, अगदी समुद्रातलाही चालेल असे सांगायला गेला. बिल्डरने मोठमोठे नकाशे पाहायला सुरुवात केली, समुद्रही चेक केले. नंतर नम्रपणे त्या माणसाला म्हणाला, ‘साहेब अरबी समुद्राचे बुकिंग पूर्ण संपलेलं आहे… पॅसिफिक महासागरात दीडशे वाराचे दोन प्लॉट फक्त शिल्लक आहेत. निराश न होता तो सामान्य माणूस म्हणाला, ‘ठीक आहे मला चंद्रावरसुद्धा प्लॉट चालेल!’ ‘अहो पण, चंद्रावर मोकळी हवा आणि पाणी अजिबात नाहीय!’ त्यावर तो माणूस म्हणाला, ‘इथे तरी कुठे हवा वा पाणी आहे? प्लॉट विकणारा म्हणाला, ‘महत्त्वाचे सांगायचे राहिले, चंद्रावरची लाखो एकर जमीन एका मराठी नेत्याने खूप वर्षांपूर्वीच बुक करून ठेवली आहे!’
८०च्या दशकात टीव्ही महाराष्ट्रात आला तो डोक्यावर अँटेना घेऊनच. प्रत्येक इमारतीवर, घरावर अँटेनाचे जाळे दूरवर समुद्रासारखे विशाल पसरले. लागूनच इमारती असल्याने जणू अँटेनांची पायवाटच तयार झाली. त्यावर मी चित्र काढले. त्या पायवाटेवरून अनेक फळे विकणारे, मुलांना शाळेत सोडणारे आईबाप, ऑफिसला निघालेले लोक जाता येताना दिसू लागले. तर एका मॉड महिलेने हेअर डू मध्ये अँटेना लावलीय आणि गळ्यात लॉकेट एवढा छोटासा टीव्ही लावलेला. हीच व्यंगचित्रकाराची फोरसाईट. आताशा मोबाईल गळ्यात लावून लोक फिरतातच की नाही. घरावरची अँटेना कधीच अँगलमध्ये नसायची. परिणामी टीव्हीच्या इमेजवर आडव्या रेषा यायच्या किंवा केवळ बुंदके दिसायचे. त्यावरही दिवाळी अंकासाठी मी रोमँटिक कव्हर केले होते.
गेल्या ४० वर्षांत टीव्हीने किती रुप व रंग बदललेत. मोबाईलसारखे अपत्य जन्माला घातले. ‘पुत्र व्हावा ऐसा गुंडा.. त्याचा तिन्ही लोकी झेंडा!’ खरे की खोटे तुम्हीच सांगा! या उंचच उंच इमारती बांधल्या गेल्या खर्या, परंतु त्याच्यातल्या अडचणीसुद्धा तितक्याच तीव्र होत्या. या विषयावरही मी चांगली चित्रं रेखाटली होती. अशा उंच इमारतीतील जवळपास हजार ते बाराशे लोक राहतात. मात्र कुणाचाच कुणाला परिचय नसतो. प्रत्येक फ्लॅटचे दार बंद. आला गेला फक्त दाराच्या भोकातून पाहायचा. गल्लीबोळातली भावकी, शेजार पाजार, मदत भावना, सणवार गणेशोत्सव, गोविंदाची गर्दी, सैराट पसरलेला माणसांचा अथांग सागर, त्यांची सुख-दुःखे या फ्लॅटच्या भोकांना कधीच कळालेली नाही. त्याचे कारण त्यांचा अॅटिट्यूड. कोटी कोटी रुपयांच्या घरात राहणारी ही माणसं. मात्र सरकारी कोटातून वन रूम किचनचं घर मिळावं म्हणून दहा दहा वर्षे ताटकळलेली सर्वसामान्य माणसं.
पूर्वी अशा इमारतीतील लिफ्टस् सतत बंद पडायच्या. अपघात व्हायचे. ‘अमर भूपाळी’, ‘दो आखें बारह हाथ’, ‘झनक झनक पायल बाजे’ या चित्रपटांना संगीत देणारे थोर संगीतकार वसंत देसाई अशाच अपघाताचे बळी झालेले आहेत. लिफ्टवर मी एक चित्र काढलं होतं. २५व्या मजल्यावरील सासूबाई ९ महिन्याच्या गरोदर सुनेला म्हणतेय, ‘बाई गं… लिफ्टचं काही खरं नाही. आपण आताच जिन्याने उतरायला सुरुवात करू.’
वॉचमनकडे एक अभ्यागत बिल्डिंगमधल्या एका कुलकर्णींची चौकशी करतो. वॉचमन तीन जाड्या फाईली त्याचे पुढे टाकतो व म्हणतो, या कुलकर्णी, जोशी देशपांडे यांच्या फाईली. हवी ती चाळत बसा.
भर पावसाळ्यात दोन दिवस नळाला पाणी येणार नाही अशी नोटीस निघते. समस्या तर बायकांना सोडवावी लागते. काही बायकांनी ढगांमध्येच पाईप खोचून ठेवलेत, हे हास्यास्पद वाटले तरी आपण नाही का पावसाळ्यात पावसाचे पाणी बादल्यात भरून ठेवत.
७०व्या मजल्यावरील एक म्हातारा मरणाच्या शंकेने अस्वस्थ झालाय. लिफ्ट बंद पडली तर काय, म्हातार्याचा धोशा. कावलेली म्हातारी म्हणते, ‘पडू द्या लिफ्ट बंद!’ स्वर्ग इथून चार हातावरच आहे, काळजी नका करू?’
आज जगात दुबईतली बुर्ज खलिफा ही सर्वात उंच इमारत मानली जाते. त्यापेक्षाही जास्त उंच इमारती भविष्यकाळात होणार आहेत.
काल परवा तुर्कीला भूकंपाचा भला मोठा हादरा बसला. अत्यंत दुर्दैवी घटना. महाराष्ट्रात सुद्धा विसेक वर्षांपूर्वी असाच मोठा भूकंप झाला होता. अशा घटनांचे पडसाद मनावर कायम कोरून जातात. कधीतरी भूकंपावर चित्र काढले. एका नागरिकाच्या नागरिकत्वाचा प्रश्न आला. त्यावर तो म्हणाला, ‘मी खरा तर इंडोनेशियाचा. वीस वर्षांपूर्वी आलेल्या भूकंपात आमची उंचच उंच इमारत कोसळली व मी या देशात फेकला गेलो. तेव्हापासून येथेच राहतोय!’
आताशा एव्हढ्या उंच इमारतींवर आणखी उंच टीव्ही टॉवर्स उभारले जाताहेत, त्यांची टोकं उद्या मंगळात घुसली तर आश्चर्य वाटायला नको!