हृदयनाथ मंगेशकर अर्थात बाळची आणि माझी पहिली भेट मोठ्या गमतीदार रीतीने झाली. ही भेट मुंबईच्या ‘ईरॉस’ थिएटरमध्ये झाली. मी तेव्हा फिल्म सेन्सॉर बोर्डावर होते आणि मंगेशकरांच्या ‘सुरेल चित्र’ने काढलेला ‘माणसाला पंख असतात’ हा चित्रपट सेन्सॉर होण्यासाठी आमच्याकडे आला होता. चित्रपट बघून झाल्यावर ‘ईरॉस’ थिएटरच्या वरच्या मजल्यावर मध्यभागी असलेल्या वर्तुळाकार गॅलरीच्या कठड्याला रेलून मी आणि बाळ बोलत होतो. ती त्यांची आणि माझी पहिली ओळख. मी बहुधा चित्रपटातल्या गाण्यांबद्दल बोलत असेन. गाणी खांडेकरांनी लिहिली होती. त्यांच्या चाली मीनाताईंनी दिल्या होत्या. त्यातली ‘ये जवळी घे’ या गाण्याची चाल मला फार आवडली होती. बाळ तेव्हा फारसे बोलले नाहीत. माझ्या ध्यानात राहून गेला तो त्यांचा सावळा सडपातळ उंच बांधा, मोठाले डोळे, खास मंगेशकर वळणाची जिवणी आणि भोवती तळपत असलेले ‘मंगेशकर’ या नावाचे झगमगते वलय.
पुन्हा बरीच वर्षे गेली आणि एके दिवशी दादरच्या आमच्या बिर्हाडी बाळ अचानक आले. त्यांच्याबरोबर होते ग. रा. कामत. मंगेशकरांना ‘सूनबाई’ नामक चित्रपट काढायचा होता आणि त्याची गाणी मी लिहावीत अशी त्यांची इच्छा होती. त्या दिवशीही बाळ फारसे बोलले नाहीत. बोलण्याचे सर्व काम ग. रा. कामत यांनीच केले. दुसर्या दिवशी संध्याकाळी पेडर रोडवर असलेल्या ‘प्रभुकुंज’मधल्या मंगेशकरांच्या निवासस्थानी मी जावे असे ठरले आणि चहा घेऊन बाळ व कामत निघून गेले.
‘सूनबाई’चे संगीत सुप्रसिद्ध बंगाली संगीत दिग्दर्शक सलील चौधरी देणार होते. ते ऐकून मी मनातून घाबरून गेले. मूळ बंगाली गाणी सलीलदा मला समजावून सांगणार होते, त्यांच्या चाली ऐकवणार होते आणि त्या चालींवर मला मराठी गाणी लिहायची होती. बंगालीचा मला गंध नव्हता आणि चाली-बरहुकूम शब्द टाकत जाण्याचा तेव्हा मला इतका सरावही नव्हता. पण स्वतः लताबाई, सलीलदा आणि इतर मंगेशकर भावंडे यांनी मला प्रोत्साहन दिले. त्या वेळीच संगीत दिग्दर्शनात बाळना खूप रस आहे हे माझ्या ध्यानात आले. या चित्रपटाच्या काळात मंगेशकर कुटुंब मला अधिक जवळून बघायला मिळाले. त्यांच्या घरगुती अनौपचारिक वागण्याचा सुखद अनुभव आला. सुरुवातीला माझे काम संपले रे संपले की मी तिथून काढता पाय घ्यायची. पण पुढे तिथे थांबावेसे वाटू लागले. गप्पांत, कानांवर पडणार्या गाण्यांत मन रमत गेले. मुख्य म्हणजे ही माणसेच इतकी लोभसवाणी होती की त्यांच्या संगतीत वेळ घालवताना मला आनंद होऊ लागला होता. ती एका प्रदीर्घ अशा जिव्हाळ्याच्या स्नेहाची सुरुवात होती.
‘सूनबाई’ चित्रपटानंतर हळूहळू आणखीही इतर चित्रपटांची गाणी मंगेशकरांबरोबर मी करत राहिले. तो फार आनंदाचा काळ होता. लताबाई चाली देत होत्या, पण मीना, उषा, बाळ सगळीच भावंडे त्या कामात रमलेली होती. त्या निमित्ताने अनेक गोड चाली लताबाई तयार करत होत्या. अत्यंत सुरेल गळ्यातून त्या तिथल्या तिथे गायल्या जाताना मला ऐकायला मिळत होत्या. एखादे गाणे कसे तयार होते ते मी प्रत्यक्ष बघत होते. सगळ्यांच्या हौसेने, आवडीने, सहकार्याने काम चालले होते. गाण्यात इतके रमलेले आणि त्यासाठी होणारो कष्टही आनंदरूप मानणारे असे दुसरे कुटुंब तोवर मी कधी पाहिलेच नव्हते. या वेळी बाळ सतत अवतीभोवती असायचे. तेही मधून मधून सूचना करायचे आणि फार चांगल्या सूचना करायचे. या चित्रपटातले शेवटचे गाणे ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हे असून ते बरेच लांब आहे. त्यामध्ये रामदासांचा एक श्लोक हवा होता. पण गाण्यातल्या आशयाला अनुरूप असा नेमका श्लोक मला आठवेना. बाळ मिष्किलपणे म्हणाले, ‘शांताबाई, तुम्हीच एक श्लोक लिहा आता.’
‘मी?’ मी चकित होऊन विचारले.
‘हो. भुजंगप्रयात वृत्तात लिहा. लोकांना तो रामदासांच्या रचनेसारखा साधारण वाटला म्हणजे झाले!’ बाळ म्हणाले.
आणि भुजंगप्रयात वृत्तात तो श्लोक मी लिहिला. याच चित्रपटात ‘शूर आम्ही सरदार’ असे एक गाणे आहे आणि ते गाणे बाळनी गाइले आहे. त्याची चाल चांगली आहे आणि घोड्यांच्या टापांच्या आवाजाचा त्यात सुरेख अंतर्भाव केलेला आहे. चाल अर्थात लताबाईंनी बांधली होती. पण बाळ रिहर्सल करत असताना त्यांच्या तोंडून गाणे अधिक चांगले वाटायचे. एकदा मी म्हटले, ‘बाळ, ही चाल किती चांगली वाटते नाही?’
‘होय, चांगलीच आहे. हा ‘हंसध्वनी’ राग आहे शांताबाई. आम्हाला तो फार आवडतो. तुम्ही दिदीचं ते गाणं ऐकलं नाही का? ‘जा तोसे नाही बोलू कन्हैया?’
‘हो. ऐकलं आहे ना! तेही फार सुंदर गाणं आहे.’
‘तो राग ‘हंसध्वनी’च,’ बाळ म्हणाले, ‘आणि ती चाल मूळ कोणत्या गाण्यावरून घेतली आहे, माहीत आहे का?’
मी शास्त्रीय संगीत या विषयात पूर्ण अडाणी. मला चाली, राग, ताल कशातलेच काही कळत नव्हते. मग बाळनी मला मूळ गाणेही ऐकवले. ‘वातापि गणपतीं भजेऽहं’ अशी ती संस्कृत रचना होती. बाळचे हे एक मोठे विलोभनीय स्वभाववैशिष्ट्य आहे. एका गाण्याच्या संदर्भात ते अनेक गाणी, शास्त्रीय चिजा ऐकवतील. त्यांचे राग, ताल समजावून सांगतील. त्यांतल्या रचनेच्या खुब्या दाखवतील.
पुढे ओळख वाढली तसतसे हळूहळू बाळच्या संगीतशिक्षणाचे इतर तपशील मला कळू लागले. वडील गेले त्या वेळी बाळचे वय जेमतेम चार वर्षांचे असेल. पण त्या काळी दीनानाथांच्या तोंडून ऐकलेल्या चाली, चिजा त्यांना लख्ख आठवतात. अमीरखां साहेबांसारख्या श्रेष्ठ शास्त्रीय गायकाचा गंडा बांधून बाळनी त्यांच्याकडे अनेक वर्षे शास्त्रीय संगीताचे अध्ययन केलेले आहे. अमीरखां साहेबांविषयी त्यांच्या मनात निरतिशय प्रेमादर आहे. याखेरीज श्रवणभक्तीने तर त्यांनी किती अन् कोणकोणत्या प्रकारची गाणी ऐकलेली असतील याचा अंदाज करणे अवघड आहे. घरात दिदीच्या गाण्यांच्या रिहर्सलच्या निमित्ताने चित्रपटसृष्टीतलेही अनेक थोर संगीत दिग्दर्शक त्यांनी जवळून पाहिलेले ऐकलेले असणार. वडिलांकडून नाट्यसंगीत जसे परंपरेनेच रक्तात भिनले तसे उर्दू गझलसारखे ढंगदार संगीतप्रकारही अवगत झाले. गझल हा काव्यप्रकार बाळना उत्तम माहीत आहे इतकेच नाही तर मीर, दाग, गालिब, जौक यांसारखे थोर गझलकार त्यांनी मुळातून वाचून त्यांचा अर्थ समजावून घेतला आहे. त्यांचा अभ्यास केला आहे. याखेरीज पंजाबी, कानडी, गुजराती या भाषांतल्या चिजाही त्यांनी कितीदा तरी मला ऐकवल्या आहेत. हे सर्व तपशील अर्थात मला एकदम कळले असे नाही, पण बाळबरोबर गप्पा मारताना, त्यांच्या तोंडून गाणी ऐकताना या गोष्टींचा मला हळूहळू प्रत्यय येऊ लागला.
आणि अशातच कधी तरी ‘जिवलगा’ हे गाणे झाले. त्या आधी बाळनी हिज मास्टर्स व्हॉइससाठी गाणी केली होती. ‘चांदणे शिंपीत जासी’ हे त्यांचे गाणे आशाताईने गाइले होते, तर ‘तिन्ही सांजा सखे मिळाल्या’ हे गाणे दिदीने गाइले होते. त्यांच्या या दोन्ही चाली लोकांना खूप आवडल्या होत्या. ‘जिवलगा’ हे, मला वाटते, मी बाळबरोबर केलेले पहिले गाणे. ‘हूं तो गयी’ अशी दीनानाथांच्या तोंडून ऐकलेली एक मारवाडी चीज बाळच्या ध्यानात होती आणि त्या चिजेवर त्यांना गाणे करून हवे होते. एकदा त्यांनी ती चीज मला ऐकवली आणि ‘या चिजेवर गाणे जमेल का?’ म्हणून विचारले. खरे तर त्या चिजेवर बाळनी दुसर्या एका गीतकाराकडून आधी गाणे लिहून घेतले होते पण त्यांना ते विशेष आवडले नव्हते. म्हणून त्यांनी मला पुन्हा गाणे लिहिण्याची सूचना केली. मला मोठे अवघड वाटले. मी बाळना म्हटले, ‘त्या पहिल्या गीतकारांना राग नाही का यायचा?’
‘त्यांची परवानगी घेऊनच मी तुम्हाला हे काम करायला सांगतो आहे,’ बाळ हसून म्हणाले, ‘ते रागावणार नाहीत, त्यांना तुमचं नावही मी सांगितलंय!’
आणि मी गाणे लिहिले. ‘जिवलगा राहिले रे दूर घर माझे’. गीताची अस्ताई आणि अंतरे चालीच्या हिशेबाने रचनेला तसे कठीण नव्हते. ते लिहून झाले. पण ‘हूं तो गयी’ या सुरुवातीच्या वजनालाच मला शब्द सुचेना. काम अडले. अडले म्हणजे चांगलेच अडले. शेवटी बाळ म्हणाले- ‘शांताबाई, एक सुचवू का? इथं ‘जिवलगा’ हा शब्द कसा वाटेल?’
मला तो शब्द एकदम आवडला. त्या एका शब्दाने पुढच्या सगळ्या गाण्याला एक वेगळे अर्थपरिमाण, एक वेगळा उठाव मिळाला. गाणे आशाताईने गाइले. बाळबरोबर केलेली माझी ती पहिलीच गीतरचना. ती लोकांना फार आवडली. या गाण्याचा राग ‘श्रीगौरी’ असल्याचे बाळनी मला सांगितले. गाण्यात त्यांनी थोडी सरगम टाकली आहे तीही सर्वांच्या पसंतीला उतरली. हे गाणे बसत होते तेव्हा एक गोष्ट मला जाणवली. बाळच्या चाली अवघड असतात. तशा काही अगदी सोप्या आणि गोड चालीही त्यांनी बांधल्या आहेत. नाही असे नाही. पण एकूण स्वररचना अवघड, चटकन आकलन न होणारी आणि अतिशय रससिद्ध व समर्थ गळ्यांनाच पेलणारी.
या संदर्भात खूप नंतरच्या काळातली एक गोष्ट मला आठवते. आरती प्रभू यांच्या ‘गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे’ या गाण्याचे ध्वनिमुद्रण हिज मास्टर्स व्हॉइसच्या स्टुडिओत चालले होते. संगीत दिग्दर्शन बाळचे होते आणि गायिका होत्या आशाताई. मी त्या वेळी स्टुडिओत होते. आरती प्रभूंच्या गाण्यात एक ओळ होती, ‘आलो होतो तुझ्याकडे काही श्वासांसाठी फक्त’ त्या ओळीची रिहर्सल करताना आशाताई विनोदाने म्हणाल्या, ‘आमच्या बाळच्या चाली गळ्यातून काढताना हीच ओळ त्याला सांगावीशी वाटते. अशा अवघड चाली करतो की गाणारांना म्हणायची वेळ येते, ‘आले होते तुझ्याकडे दोन श्वासांसाठी फक्त’. बाबा, जरा श्वास घ्यायला थोडा अवकाश ठेव!’
बाळच्या संगीत दिग्दर्शनाखाली मी एका चित्रपटाची गाणी लिहिली. चित्रपटाचे नाव ‘पवना-काठचा धोंडी’. एव्हाना बाळची काम करण्याची पद्धत मला थोडीफार माहीत झाली होती. ‘प्रभुकुंज’मधल्या त्यांच्या घरी जेवणाच्या खोलीला लागून आणखी एक लहानशी खोली आहे. ती संगीताची, स्वररचनेची, रिहर्सलची, रियाज करण्याची, तालीम देण्याची, थोडयात ती बाळची खोली. तिथे बसून दिदी, उषाताई अनेकदा रिहर्सल करतात. बाळ पेटीवर चाल वाजवून दाखवत आहेत, आणि दिदी गात आहेत किंवा उषाताई गात आहेत असे दृश्य कितीदा तरी पाहिलेले डोळ्यांसमोर येते. माझी बाळबरोबरची बहुतेक गाणी मी त्याच खोलीत बसून केली. चित्रपटांची गाणी, ध्वनिमुद्रिकांसाठी केलेली गाणी, कोळीगीते, गणपतीची गाणी तिथेच झाली. माई, मीनाताई, उषाताई, मुले अधूनमधून डोकावत आहेत, बाळचे कुणी शिष्य तिथे तालीम घेत आहेत, तासातासाने चहा येत आहे; मध्येच कुणी मित्रमंडळी आली तर काम बाजूला राहून गप्पा आणि हास्यविनोद चालत आहे असे त्या खोलीत घालवलेले आनंदाचे तासन्तास आठवतात.
कधी लहर आली तर हातचे काम बाजूला ठेवून बाळ म्हणायचे, ‘थांबा. एक वेगळी सुरेख चीज आठवली आहे. गावीशी वाटते. ऐका.’ आणि मग ते ती चीज गाऊन दाखवत. भोवताली जमलेली मंडळी तल्लीन होऊन गाणे ऐकत राहात. त्या खोलीतल्या वातावरणातील अणूअणूने अशी किती गाणी ऐकली असतील. स्वतःमध्ये सामावून घेतली असतील. खोलीतले वातावरण फार छान आहे. दारातून आत पाऊल टाकताच समोर भिंतीवर विवेकानंदांचा फोटो दिसतो. मीरेचा छोटा पुतळा नजरेत भरतो. डाव्या हाताच्या भिंतीला टेकून ठेवलेले बाबांचे-दीनानाथांचे-तंबोरे, उजवीकडे भिंतीला लावलेल्या छोट्या अलमारीत बाळच्या आवडीच्या निवडक काव्यग्रंथांचा छोटा संग्रह, त्याच भिंतीवर बाबांचा सुंदर फोटो आणि तिथे गालिच्यावर पुढ्यात पेटी घेऊन बसलेले बाळ. साथीला त्यांचे अनेक वर्षांचे तबल्यावरील सहकारी आणि जिवलग मित्र रमाकांत नायडू. चहा मधून मधून हवाच.
लहर लागली, कामात मन छान रंगले तर ती रंगत वाढवण्यासाठी पान. अशा त्या ठिकाणी बसून ऐकलेली किती गाणी, मारलेल्या गप्पा आणि केलेले काम मला आठवते. ते सूर, तो हास्यविनोद मनात जागा होतो आणि आता ते दिवस गेले म्हणून हुरहूरही वाटते.
‘पवनाकाठचा धोंडी’ या चित्रपटासाठी बाळनी एक सुंदर चाल काढून ती मला दिली. मीराबाईच्या एका गाण्याची ती चाल होती. गाण्याचे शब्द होते, ‘सावरे मैं तो जागी सारे सारे सोये’ चाल फार गोड होती. चित्रपटातल्या एका भूपाळीसाठी त्या चालीवर गाणे लिहायचे होते. खरे तर आता चालीवर गाणी लिहिण्याचा थोडाबहुत सराव मला झाला होता. पण काय असेल ते असो, या विशिष्ट चालीवर चांगले शब्द मला टाकताच येईनात. चार पाच दिवस मी त्या चालीशी खूप झटापट केली आणि शेवटी हे काम आपल्या हातून होणार नाही या निर्णयावर आले. बाळना मी तसे सांगितले. ते हसले आणि म्हणाले, ‘ठीक आहे. तुम्हाला सुचेल तसं गाणं तुम्ही लिहा. मी चाल देईन.’
‘पण बाळ,’ मी म्हटले, ‘चाल फार गोड आहे हो. तिचा मोह सुटत नाही.’
बाळ पुन्हा हसू लागले. मग ते म्हणाले, ‘आपण असं करू. तुम्ही पाहिजे त्या वजनाचं गाणं लिहा. मी ती मूळची चाल त्या गाण्यात जरा फेरफार करून बरोबर वापरीन. ठीक आहे?’ मी गाणे केले. ‘पावनेर ग मायेला करू। ओटी आईची मोत्यानं भरू’ अशी त्या गीताची सुरुवात होती आणि बाळनी मूळच्या हिंदी चालीत आवश्यक ते फेरफार करून तिचा माझ्या गीतासाठी चपखल वापर केला. मराठी गाणेही चांगले वाटू लागले. गाणे लताबाईंनी गाइले. त्या चालीसाठी बाळना त्या वर्षीचे सूर सिंगार संसदचे हरिदास परितोषिक मिळाले. शास्त्रीय संगीताचा चित्रपट-गीतात उत्कृष्ट वापर करणार्या संगीत दिग्दर्शकाला हे पारितोषिक देण्यात येते.
हा वेळपावेतो मंगेशकर मंडळींशी माझे चांगले स्नेहाचे, घरगुती संबंध निर्माण झाले होते. त्यामुळेच त्यांच्याकडचे काम मला कधी काम वाटले नाही, किंवा त्याचे कधी माझ्यावर दडपणही आले नाही. उलट तिथले काम हा एक मन उल्लसित करणारा असा अनुभव वाटायचा. माझा संकोच हलके हलके मावळला. मी गप्पांत, हसण्याबोलण्यात, थट्टाविनोदात सामील होऊ लागले आणि मग या घराची आपल्याला अधिक जवळून ओळख होत आहे, घराचे आणि अर्थात घरातल्या मंडळींचेही स्वभावविशेष, त्यांचे आदर्श आपल्याला जाणवत आहेत असे माझ्या निदर्शनाला येऊ लागले. या सार्यांत साहित्यप्रेम हे बाळच्या आणि माझ्या स्नेहाला एक विशेष कारण ठरले. बाळची अभिरुची नव्याकडे अधिक झुकणारी आणि स्वागतशील आहे असा मला प्रत्यय येऊ लागला. वाचनाची आवड घरात तशी सार्यांनाच होती. पण त्याबद्दलची निश्चित मते, आग्रह, त्याबद्दल चर्चा करण्याचे औत्सुक्य बाळमध्ये अधिक प्रमाणात होते. मराठी साहित्यातले नवे समर्थ लेखक, नवे प्रवाह, त्यात होणारे नवनवे प्रयोग याविषयी एक निकोप आणि सुजाण कुतूहल त्यांच्या ठायी आढळून येई. काव्याची बाळना विलक्षण ओढ होती. हिंदी आणि उर्दू कवी त्यांनी बरेच आणि सूक्ष्म जाणकारीने वाचलेले असावेत असे त्यांच्या बोलण्यावरून वाटायचे. मराठीच्या संदर्भात सांगायचे तर केशवसुत, गोविंदाग्रज, बालकवींपासून तो समकालीन करंदीकर, सुर्वे, ग्रेस, महानोर, आरती प्रभूंपर्यंत त्यांचे काव्याचे वाचन चौफेर होते. एकूण मराठी साहित्यातले नवे चैतन्यप्रवाह ते उत्कट कुतूहलाने न्याहाळत होते. बाळचे वाचनही खूप असे. ‘मौज’, ‘मॅजेस्टिक’ यांच्या गिरगावातल्या ऑफिसात ते अधूनमधून फेरी मारत आणि अनेक नवी पुस्तके खरेदी करून घेऊन येत. जी. ए. कुलकर्णी, तेंडुलकर, दळवी, पानवलकर हे त्या काळातले गाजत असलेले लेखक. त्यांचे साहित्य बाळ प्रयत्नपूर्वक मिळवून वाचत. आरती प्रभू हे त्यांना कवी म्हणून फार प्रिय होते, तसा चिं. त्र्यं. खानोलकर हा नाटककार, कादंबरीकार म्हणून कुतूहलाचा आणि चिंतनाचा विषय होता. यामुळे बाळबरोबर होणार्या गप्पा जास्तीत जास्त साहित्याविषयीच असत. काही नवे, चांगले वाचनात आले, तर त्याबद्दल भरभरून बोलायची मला आवड आहे. बाळनाही ती हौस होती. तेव्हा मी घरी गेले आणि बाळ भेटले तर लगेच आपण नवे काय वाचले ते ते सांगत. त्यावर चर्चा करत. आवडीनिवडी, अनुकूल प्रतिकूल मते आग्रहाने व्यक्त करत.
असे वाङ्मयीन संदर्भांनी रंजक झालेले बाळबरोबरचे किती तरी संवाद मला आठवतात. गडकरी हे आमचे दोघांचेही दैवत. ‘राजसंन्यास’मधली दीनानाथांनी गाइलेली गीते माझ्या आग्रहावरून बाळनी मला गाऊन दाखवावीत. गडकर्यांचे अनेक विनोद एकमेकांना सांगत आम्ही त्यातली गंमत पुन्हा पुन्हा अनुभवत असू. गो. नी. दांडेकर यांची शिवशाहीवरील कादंबरीमाला त्या सुमाराला प्रकाशित होत होती. बाळना त्यातली ‘झुंजारमाची’ कादंबरी फार आवडली. मी ती वाचलेली नव्हती. बाळनी मला ती दिली. आवर्जून वाचायला सांगितली. ‘अजगर’ ही खानोलकरांची कादंबरी प्रसिद्ध झाली. तिच्यात असलेल्या विशिष्ट प्रसंगांबद्दल, वर्णनांबद्दल तिच्यावर टीकेची झोड उठली. त्या टीकेने बाळ अस्वस्थ झाले. एकदा त्या कादंबरीविषयी ते माझ्याशी खूप वेळ बोलले. मग म्हणाले, ‘ही कादंबरी अश्लील कशी? मला तर ती विलक्षण करुण वाटते. त्यातलं हे वाक्य बघा. ‘माझं लेकरू पुरुष जातीचं आहे.’ मन अगदी विषण्ण करणारा हा सगळा प्रसंग लेखकानं फार ताकदीनं रंगवला आहे.’
साहित्यात तेव्हा नव्याने आलेल्या ‘यंग अँग्री ग्रुप’च्या लेखकांविषयीही बाळना आपुलकी वाटे. एकदा मी त्यांच्या घरी गेले असता ते मला म्हणाले, ‘चंद्रकांत खोतांचा ‘मर्तिक’ कवितासंग्रह वाचलात का?’
मी तो वाचलेला नव्हता. बाळ म्हणाले, ‘वाचा. मी पुस्तक देतो. काही कविता फार चांगल्या आहेत.’ लगेच त्यांनी एका कवितेतल्या दोन ओळी ऐकवल्या –
देवळातल्या पणतीत वात ठेवतत तशी
गावातल्या गुरवानं माज्या आईक ठेवली!
ओळी सांगून बाळ म्हणाले, ‘किती कारुण्य आहे या ओळीत!’
असे आपण वाचलेल्या साहित्याबद्दल, पुस्तकांबद्दल बाळ सतत बोलत. ती त्यांची फार मोठी मानसिक गरज व भूक असे. जी. एं.च्या कथा त्यांनी अगदी सुरुवातीपासून वाचल्या होत्या. त्यावर ते मार्मिक भाष्य करत. जुने कवी, लेखक त्यांच्या आवडीचे होते; पण नवे लेखक. कवी, नाटककार, साहित्यातले नवीन आविष्कार याविषयी त्यांना फार जिव्हाळा वाटे. तसाच वाङ्मयातील नवनव्या घटनांबद्दलही त्यांना उमाळा असे. मुख्य म्हणजे श्लीलअश्लीलतेच्या सांकेतिक कल्पना, पारंपरिक कर्मठ नैतिकता यांना सहज बाजूला सारून, अतिशय निर्मळ, सहानुभूतिपूर्ण दृष्टिकोन बाळगून नव्या साहित्याशी ते सहज समरस होत.
यानंतरच्या काळात बाळबरोबर मी खूपच काम केले. आम्ही सगळेच तेव्हा नव्या कल्पनांनी, नव्या ओढीने, नव्या उत्साहाने भारावून गेलो होतो. त्या वेळी मी जी गाणी केली त्यात त्या सार्यांचे प्रतिबिंब उमटले आहे असे मला वाटते. या काळात ‘ही वाट दूर जाते’, ‘जाईन विचारित रानफुला’, ‘हे श्यामसुंदर मनमोहना’ ही माझी गाणी स्वरबद्ध केली. त्यांपैकी पहिली दोन गीते तर कविता म्हणूनच ‘सत्यकथे’त आली होती. बाळनी त्या कविता वाचल्या होत्या. ते मला म्हणाले, ‘शांताबाई, ही गीतेच आहेत. मी त्यांना चाली लावतो.’ ‘ही वाट दूर जाते’ ही गझलच्या वजनात लिहिलेली कविता आहे. बाळनी तिला चाल लावली आणि ती मला ऐकवली. मी बुचकळ्यात पडले. खरे म्हणजे ती चाल मला आवडलीच नाही. कळली नाही असे म्हणावे हवे तर. मी चाचरत बाळना तसे सांगितलेही. पण आपल्या स्वररचनेबद्दल ते मात्र निःशंक होते. जरा हसून ते मला म्हणाले, ‘चाल चांगली आहे. लोकांना आवडेल. तुम्ही बघा.’
आणि तीन चार दिवस ती चाल माझ्या मनात सारखी घोळत राहिली. एके दिवशी अचानक मला साक्षात्कार झाला. चाल खरोखर चांगली आहे. बाळच्या अनेक चालींबद्दलचा हा माझा अनुभव आहे. सुरुवातीला त्या ऐकणार्याला जरा विचकवतात. आपण नेहमी जे ऐकतो त्यापेक्षा हे काही वेगळेच आहे असे वाटते. अनेकदा तर त्या चाली आधी आवडतच नाहीत. पण मग त्या हलके हलके मनात मुरायला लागतात. गुप्त लिपीतली अक्षरे प्रकट व्हावीत तशा अंतरंगात उमटतात आणि मग आपली इतकी पकड घेतात की सोडतच नाहीत. बाळनी केलेल्या स्वररचना अवघड असतात, असे बर्याच जणांचे मत आहे. पण मला वाटते, अवघडपणापेक्षा त्या चालीत आणखी काहीतरी असते. या स्वररचनांना आपणही सामोरे जावे लागते. पूर्वग्रहरहित दृष्टीने त्यांच्याकडे बघावे लागते. त्या रचना आपल्याकडून काही प्रतिसाद मागत असतात, आणि तो प्रतिसाद आपण देऊ शकलो नाही तर त्या आपल्याला भिडत नाहीत. आपल्याशी जवळीक साधत नाहीत. मला वाटते हे बाळच्या प्रतिमेचे वैशिष्ट्य आहे. मन दचकवून सोडणारी अनपेक्षितता, साहसी प्रयोगशीलता, नव्या वाटावळणांनी जाणे, पूर्वी कधी न गेलेल्या ठिकाणी आपणाला नेऊन सोडणे आणि तिथले अदृष्टपूर्व सौंदर्य दाखवणे हे बाळच्या स्वररचनांचे वेगळेपण आहे, तेच त्यांचे सामर्थ्यही आहे. म्हणूनच बाळच्या चालींबद्दल तीव्र प्रतिक्रिया होताना दिसतात. त्यांच्या काही चालींना अपरंपार लोकप्रियता लाभली, तर काही चाली लोकांना अजिबात आवडल्या नाहीत. बाळच्या काही स्वररचना सुरुवातीला लोकांपर्यंत पोहोचल्या नाहीत. पण कालांतराने लोकांना त्या उमगल्या. सांकेतिकता, परंपरेने मळलेल्या वाटा सोडून जो कलावंत काही नवे, वेगळे करू बघत असतो, त्याच्या वाट्याला हे येतच असते. ठरीव वाटेने जाणार्या कलाकाराला यश मिळते. पण ते माफक, कोंबट, मचूळ असते. नवे साहस करणाराला, स्वतःला बेधडक झोकून देणार्याला नेहमीच धोके पत्करावे लागतात. मग कधी मोठे यश लाभते तर कधी मोठे अपयशही पदरात पडते. बाळना स्वतःला हे कळत नसेल असे थोडेच आहे! त्यांच्या काही चाली बिघडल्या आहेत, काही फसल्या आहेत हे ते स्वतःही मान्य करतील. पण अशी अपयशे ध्यानात घेऊनही बाळ हा गांभीर्याने, उत्कटतेने स्वररचन्ोकडे बघणारा एक कलावंत आहे याबद्दल कुणाचे दुमत होऊ नये. बाळच्या चालींमागे शास्त्रोपासना, सखोल सांगीतिक ज्ञान आहे, व्यासंग, परिश्रमशीलता आहे तशी विचारांची ठाम आणि पक्की बैठकही आहे. कुणी मनःपूर्वक ऐकणारा असेल तर त्याच्याशी मोकळेपणाने चर्चा करण्याची, आपली भूमिका त्याला समजावून सांगण्याची बाळची सिद्धता असते. पाडगावकरांची ‘जिप्सी’ ही कविता बाळना फार आवडते. त्याचप्रमाणे केशवसुतांच्या ‘झपूर्झा’ या कवितेच्या पुढील ओळीही ते वारंवार म्हणून दाखवतात –
नांगरल्याविण भुई बरी
असे कितीतरि
पण शेतकरी
सनदी तेथे कोण वदा
हजारांतुनी एखादा…
मला वाटते, बाळची ही आवड सूचक आहे. त्यातून त्यांची कलाविषयक भूमिका स्पष्ट होते. बाळमध्ये जो संगीतकार आहे तो असा ‘आपणच घडलेले आपणच मोडू बघणारा’ भटक्या जिप्सी आहे आणि न नांगरलेली भुई नांगरणारा, तिथून नवनवी समृद्ध पिके काढू बघणारा ‘हजारांतला एखादा’ सनदी शेतकरीही आहे.
(संपादित लेख)