शिवसेनाप्रमुखांच्या कुंचल्यातून उतरलेलं हे व्यंगचित्र आहे १९८० सालातील एका अंकाच्या मुखपृष्ठावरचं. इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीविरोधात एकवटलेल्या जनता पक्षावर जनतेने १९७७ साली भरभरून विश्वास टाकला होता. पण, त्या विश्वासाला ते जागले नाहीत. लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात शिरून आपली राजकीय स्पेस निर्माण करण्याचा जनसंघाचा उद्देश साध्य झाला होता. दुहेरी सदस्यत्वाच्या मुद्द्यावरून पणतीने जनता पक्षालाच चूड लावली आणि जनतेने यांच्या भोंगळ कारभारावर संतापून पुन्हा इंदिरा गांधी यांच्याच पदरात मतांचे दान टाकले… या काळात निवडणुका जिंकण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचे भाव हा एक मोठा घटक असायचा. सत्तेत नसू तेव्हा भाववाढीविरोधात बोंब ठोकायची, सत्तेत असू तेव्हा निवडणुकांच्या हिशोबाने दर वाढवायचे किंवा कमी करायचे, हा निवडणुका जिंकण्याचा हमखास यशस्वी मार्ग होता… पण, या वस्तू खरोखरीच जीवनावश्यक तरी होत्या… आता पेट्रोल, गॅस यांची दुपटीहून अधिक दरवाढ झाली आहे, सामान्य माणसाचे जगणे मुश्कील झाले आहे, तरी लोक कोणाला तरी धडा शिकवतो आहोत, विश्वगुरू बनतो आहोत, अशा धादांत खोट्या कल्पनांनी इतके आंधळे झाले आहेत की आता सरकारने यांच्या कमरेचे फेडून घेतले तरी तो निवडणुकीतला मुद्दा होणार नाही.