छत्रपती शाहू महाराजांच्या सहवासाने प्रबोधनकारांना प्रेरणा तर मिळालीच, पण त्याबरोबरच अधिक त्वेषाने लढण्यासाठी आधार मिळाला. बहुजन समाजाच्या न्यूनगंडांचं निर्दालन करण्याचं शाहू महाराजांनी दिलेलं व्रत त्यांनी आयुष्यवर निभावल्याचं आपल्याला दिसतं.
– – –
`माझी जीवनगाथा`मध्ये प्रबोधनकारांनी छत्रपती शाहू महाराजांच्या विषयी सविस्तर लिहिलं आहे. इतकं दुसर्या कोणत्याही एका व्यक्तीविषयी आत्मचरित्रात लिहिलेलं नाही. स्वतःच्या आजी आजोबांविषयी त्यांनी सविस्तर लिहिलंय; पण तेही महाराजांवर लिहिलंय इतकं नाहीच. शाहू महाराजांचा प्रबोधनकारांवर इतका प्रभाव होता, की हे लिखाण स्वाभाविकच म्हणायला हवं. त्यांनी महाराजांविषयी स्वतःच्या आठवणी लिहिल्याच आहेत. शिवाय त्यांच्या कार्याचा गौरवही केला आहे. शाहू महाराजांच्या अभ्यासकांना या लिखाणाचे संदर्भ आवर्जून घ्यावे लागतात, इतकी महत्त्वाची माहिती आणि दृष्टिकोन त्यातून पुढे आला आहे.
`न्यूनगंडाचे निर्दाळण प्रथम केले पाहिजे, मागासलेल्या सर्व समाजांच्या उद्धाराचा हाच एक मार्ग आणि त्याचा श्रीगणेशा शिक्षणप्रसाराने काढला पाहिजे, या एकाच धोरणाने छत्रपती शाहू महाराजांनी ब्राह्मणेतर चळवळीचे नेतृत्व पत्करले.` महाराजांच्या चळवळींचं उद्दिष्ट आणि मार्ग नेमका काय होता, हे प्रबोधनकारांनी या दोन ओळींत सांगितलं आहे. पण शिक्षणप्रसाराचा मार्ग वेळ घेणारा होता. पुणे, बडोदा, कोल्हापूर, सातारा येथील काही वर्तमानपत्रांनाही शाहू महाराजांनी बळ दिलं होतं. पण बहुजन समाजात साक्षरताच नसल्यामुळे त्याचाही फार प्रभाव पडत नव्हता. त्यामुळे `न्यूनगंडाचं निर्दाळण` करण्यासाठी शाहू महाराजांनी सत्यशोधक जलशांची नवी कल्पना शोधून काढली आणि ती यशस्वी होऊन त्यामुळे मोठ्या प्रमाणात जनजागृतीही झाली.
तमाशातला शृंगारिक भाग कमी करून त्याऐवजी लोकप्रबोधनाची प्रहसनं सादर करून सत्यशोधक जलसे तयार झाले होते. त्यात अस्पृश्यता निवारणावर भर असे. शिवाय शिक्षणाची गरज आणि फायदे, सामाजिक धार्मिक रूढींचा फोलपणा, त्याच्या जिवावर भिक्षुक करत असलेली लूटमार, लग्नातला अनावश्यक खर्च, शेतकर्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांची मालमत्ता गिळंकृत करणारी सावकारी, असे विषय घेऊन बहुजन समाजात जागृती करण्याचा धडाका या जलशांनी लावला होता. त्यामुळे झालेला परिणाम प्रबोधनकार असा नोंदवतात, `या आंदोलनाचा परिणाम शहरी विचारवंत बामणांवर जबरदस्त होऊ लागल्यामुळे, जातीजातींत वैमनस्य फैलावण्याच्या १५३-अ कलमावर बोट ठेवून, त्या चळवळ्यांचा बंदोबस्त करण्याविषयी, सरकारला वृत्तपत्री चिथावण्या देण्याच्या खटपटी त्यांनी बर्याच केल्या. अर्थात या चिथावण्यांना रोखठोक जाब द्यायला मराठ्यांची वृत्तपत्रे कलम सरसावून सज्ज तयारच असत.`
शाहू महाराजांनी शाहीर विठ्ठल डोणे, शाहीर रामचंद्र माळी, शाहीर लहरी हैदर, शाहीर ईश्वरा माळी अशा नावाजलेल्या शाहिरांना उदार आश्रय दिला होता. त्यात कलगीवाले आणि तुरेवाले यांचे अनेक फड प्रसिद्ध झाले. आध्यात्मिक सवाल जवाबांबरोबरच हे शाहीर सामाजिक विचारही समाजापर्यंत नेत. या शाहिरांमधलं लहरी हैदर हे सर्वात गाजलेलं नाव. त्यांनी शाहू महाराजांवरच्या प्रसिद्ध पोवाड्याची सुरवात अशी केली आहे,
जो निद्रिस्त महाराष्ट्राला।
जागे करण्याला। ज्ञानरवी झाला।।
शाहू छत्रपती सत्य आधार।
मानवी जाणविले अधिकार।।
म्हणून शाहू प्रभू देत अवतार।।
देव आणि माणूस यात दलाल नको, हे महात्मा जोतीराव फुले यांनी सांगितलेलं सत्यशोधक समाजाचं तत्त्व समाजापर्यंत पोचवण्यासाठी शाहू महाराज जलशांना प्रोत्साहन देत होते. त्यामुळे धार्मिक कार्यक्रमांसाठी पुरोहित नाकारण्याचा निर्णय अनेक गावं घेऊ लागली. गावोगाव ब्राह्मण पुरोहितांच्या मध्यस्थीशिवाय साधे हार अर्पण करून गावकरी लग्नं साजरी होऊ लागली. लग्नाच्या विषयी महात्मा फुलेंच्या आयुष्यातला एक प्रसंग लोकांपर्यंत पोचला होता. तो प्रबोधनकार असा सांगतात, `वैवाहिक बाबतीत म. फुलेंनी भिक्षुक बहिष्काराचा जो यत्न केला, त्यात त्यांना एका फिर्यादीला तोंड द्यावे लागले होते. तुमच्या जमातीत लग्न कोण लावतो, या प्रश्नाला `नवरा नवरीशी लग्न लावतो` असा जबाब त्यांनी दिलेला होता. तुमची जात कोणती, या प्रश्नाला, माझी जात माणूस असे उत्तर दिले होते.`
सत्यशोधक जलशांमुळे झालेल्या जागृतीमुळे पोटार्थी भटभिक्षुकांमध्ये खळबळ उडाली. ठिकठिकाणी जोशी वतनांच्या हक्काचं कारण सांगून सत्यशोधकी लग्नं करणार्यांवर खटले दाखल होऊ लागले. त्याच्या बातम्या वर्तमानपत्रांत येऊ लागल्या. त्यानुसार शाहू महाराजांनी संबंधित ठिकाणच्या ब्राह्मणेतर वकिलांना ते खटले लढवण्याची फी पाठवायला सुरवात केली. ते शक्य नसेल तिथे भास्करराव जाधवांना खटले लढवायला पाठवलं. जलसेवाल्यांवर होणारे खटलेही त्यांनी चालवले. यामुळे आणखी चर्चा झाली आणि बहुजन समाज प्रश्न विचारू लागला. खेड्यापाड्यांतले अडाणी शेतकरीही आता सावकार, कुळकर्णी, पुरोहितांशी सडेतोड सवालजवाब करू लागले. हे सगळं केवळ छत्रपती शाहू महाराजांमुळे घडतंय, हे गणित शहरांतल्या पंडितांनी डोक्यात पक्कं केलं. त्यामुळे शाहू महाराजांचा द्वेष करून त्यांच्यावर टीका करण्याचा शिरस्ता अधिक वेगाने सुरू ठेवला.
महाराजांवर टीकेमुळे कोणताही परिणाम होत नसल्यामुळे पुण्यातली वृत्तपत्रं एक नवा युक्तिवाद करू लागली होती. महाराजांनी त्यांच्या संस्थानात काय हवी ती चळवळ करावी, पण इंग्रजांचं राज्य असलेल्या संस्थानाबाहेरच्या भागात चळवळ करण्याचा त्यांना कोणता अधिकार आहे? सर ली वॉर्नर या इंग्रज अधिकार्याने हाच प्रश्न महाराजांना विचारला, तेव्हा त्याला दिलेलं उत्तर प्रबोधनकारांनी आवर्जून दिलंय.
`मी ब्राह्मणांच्या विरुद्ध भाषणे केलेली नाहीत. अगर दुसरे काहीही केलेले नाही. पण आपल्या स्वभावास अनुसरून ते माझ्यावर सूड उगवीत आहेत. त्यांच्या पेशवाई बर्वेशाही किंवा परशुरामशाही कारस्थानांना परमेश्वर यश देवो! मी तुमचा उपदेश ऐकेन, पण क्षत्रियाला अनुचित रीतीने मला वागता येणार नाही. मला कैद केले तरी माझा देह कोणत्या तरी सत्कारणी खर्चण्याचा मी प्रयत्न करीन. ज्या रणभूमीवर मी उभा राहिलो आहे, तेथून पाय मागे घेणे माझ्या शीलास डाग लावण्यासारखे आहे. मी तुमचा उपदेश स्वीकारीन पण त्याप्रमाणे वागणे मला अशक्य आहे. खुद्द ब्रह्मदेवाने अथवा यमाने मला धमकी घातली, तरी त्याची मला पर्वा नाही. माझा स्वभाव तुम्हाला बदलता येणार नाही. भित्र्या भागूबाईप्रमाणे मी माझी मते सोडणार नाही. किंवा जीव बचावण्यासाठी देखील शरण जाणार नाही. मी तुटेन पण वाकणार नाही. जपमाळ ओढीत बसून भटजीप्रमाणे मी कालक्षेप करणार नाही. सरकार रागावेल असे तुम्ही म्हणता, रागावो बिचारे! मला त्रास होईल यात संशय नाही. परंतु गरजवंताना मदत केल्याबद्दल, अस्पृश्यांना हात दिल्याबद्दल आणि मराठ्यांचा उद्धार करण्याकरिता माझी शक्ती खर्च केल्याबद्दल परमेश्वराकडून खचित मला न्याय मिळेल. माझ्या पूर्वजांचे स्मरण करून मी तुम्हास सांगतो की क्षत्रियाला अयोग्य असे काहीही मी करणार नाही. माझ्या आईच्या नावाला मी काळिमा लावणार नाही. तुमचे धोरण मला मान्य नाही.`
शाहू महाराजांनी दिलेल्या उत्तरावर आजच्या विवेकवादी कार्यकर्त्यांनी आवर्जून विचार करावा, असंही प्रबोधनकारांनी सुचवलंय. महाराजांनी पत्रात निर्वाणीचा सूर लावल्यामुळे महाराजांना काहीही करून पदच्युत करण्याचं कारस्थान बोंबललं. या प्रकरणासाठी शाहू महाराजांनी प्रबोधकारांना मुंबईतल्या त्यांच्या दौर्यादरम्यान भेटायला बोलावलं होतं. त्या बैठकीत त्यांच्या पदच्युतीचा विषय निघाला, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की महाराज गादी सोडायला घाबरत नव्हते.
महाराजांनी प्रबोधनकारांना सांगितलं, `प्रिन्सेस चेम्बरामध्ये मीच ते बिल पास करून घेतले आहे की कोणताही राजा मरण पावला अगर पदच्युत झाला, तर सरकारच्या परवानगीची जरूरत न लागता, त्याचा औरस राजपुत्र तात्काळ गादीवर बसण्याचा अधिकारी असणार. मला पदच्युत केले तर काय ब्रह्मांड कोसळणार? युवराज बसेल गादीवर आणि मी सर्वस्वी वाहून घेईन बहुजन समाजाच्या उद्धारकार्याला. आज छत्रपती म्हणून काही बंधने तरी आहेत मला. मोकळा झाल्यावर मग हो काय? जनता नि मी. जीवात जीव मिसळून उद्धाराचा रस्ता नेटाने काटता येईल.`
सत्तेची कोणतीही अभिलाषा नसणारे छत्रपती शाहू महाराज प्रबोधनकारांनी जवळून अनुभवले होते. महात्मा फुलेंच्या विचारांचा वारसा छत्रपती शाहू मोठ्या ताकदीने पुढे नेत होते. त्यांचा प्रभाव प्रबोधनकारांवर कायम राहिला. `ग्रामण्याचा इतिहास आणि भिक्षुकशाहीचे बंड` या पुस्तकांच्या निर्मिती प्रक्रियेत महाराजांची मदत झाली होती. त्याची परिणती `प्रबोधन` हे नियतकालिक सुरू करण्यात झाली. शाहू महाराज तर `प्रबोधन`च्या पाठीशी ठाम उभे राहिले होते. पण महाराजांच्या अचानक मृत्यूने `प्रबोधन`चा आणि पर्यायाने प्रबोधनकारांचा पुढचा मार्ग परीक्षा बघणारा ठरला.
आता दिवाळीनंतर आपण त्या खडतर प्रवासाचा माग या लेखमालेतून काढणार आहोत.