रोवानियमीमधली एक गोष्ट सांगायची राहून गेली. तिथं आम्ही भला मोठा ‘इग्लू’ पाहिला. शाळेत असताना टुंड्रा प्रदेश आणि तिथल्या लोकांची बर्फाची घरं म्हणजे ‘इग्लू’ याबद्दल शिकलो होतो. आमच्यापैकी काहींनी नारळाच्या करवंटीला बाहेरून कापसाचे तुकडे चिकटवून तो शाळेत बनवला देखील असेल. मात्र प्रत्यक्षात तो प्रथमच पाहिला होता रोवानियमीमध्ये.
त्यानंतर आमचा मुक्काम होता एॅबिस्को नावाच्या शहरात. शहर कसलं, फार तर टुमदार गाव शोभावं, इतकीच त्याची व्याप्ती. आता सांगायला हरकत नाही, की त्याआधी एॅबिस्को, किरूना, ट्रॉम्सो नावाची गावं जगाच्या पाठीवर आहेत याची आम्हाला पुसटशी देखील कल्पना नव्हती. नॉर्दर्न लाईट्सचा पाठलाग करताना जगाचा भूगोलही आमच्यापुढे उलगडू लागला. म्हणतात ना, प्रत्यक्ष जग पाहून जितका भूगोल कळतो, तितका तो पुस्तकातून कळत नाही; याचा चांगलाच अनुभव आम्हाला आला.
तर एॅबिस्को हे स्वीडनच्या उत्तरेला असलेलं एक थोडंसं मोठं सीमावर्ती गाव!
नॉर्वे या देशाची सीमा इथून जेमतेम ३५-४० किलोमीटर असेल. थंडीत बर्फातले खेळ खेळायला पर्यटक गर्दी करतात.
इथं एक भलं मोठं राष्ट्रीय उद्यान आहे म्हणे. म्हणे अशासाठी की आम्ही गेलो त्या काळात बर्फाशिवाय दुसरं काही दिसणं शक्य नव्हतं. पण उन्हाळ्यात रेनडियर्स, अगदी बर्फाच्या रंगाचे पांढरे कोल्हे दिसतात आणि खळखळणारे पाण्याचे प्रवाह वाहतात, असं वाचलं होतं… आणि क्वचित पांढरं अस्वल. तिथल्या एका फलकावर तिथं दिसणार्या प्राण्यांची यादी आणि काही प्राण्यांची छायाचित्रं होती. एखाद्या मध्यम आकाराच्या मांजरागत दिसणारा लिंक्स, बर्यापैकी हिंस्र असणारा वोल्वरीन, मार्टिन, स्टोअत ही नावंसुद्धा कधी ऐकली नव्हती. एक खारुताई ओळखीची वाटली. अर्थात आम्हाला यातलं काहीच दिसलं नाही.
या लोकांची कमाल वाटते. त्यांची सतत अभ्यास करण्याची वृत्ती आपण घेतली पाहिजे. एॅबिस्कोत असंच निसर्गाचा, तिथल्या प्राणी आणि जलसंपदेचा अभ्यास करणारं एक सायन्स सेंटर आहे. लॅपलॅन्ड प्रदेशातलं ते खूप महत्वाचं असं अभ्यास केंद्र मानलं जातं. प्रथम हे केंद्र एॅबिस्कोपासून बरंच लांब होतं, पण त्याला आग लागली आणि मग नवं केंद्र एॅबिस्को इथं बनलं.
एॅबिस्कोमध्ये एक स्काय टॉवर देखील आहे. या सगळ्या भागात नॉर्दर्न लाईट्स दिसतात. पर्यटकांना ते नीट पाहता यावेत म्हणून हा उंच मनोरा बांधला आहे. कारण शहरातल्या दिव्यांच्या प्रकाशामुळं नॉर्दर्न लाईट्स दिसण्यात अडचण होते. आम्ही त्या टॉवरपर्यंत गेलो नाही. थंडी कमालीची होती. त्यामुळं आणखी उंच चढणं जरा अवघड वाटत होतं. पण या मंडळींची पर्यटन सांभाळण्याची कळकळ पाहा. टॉवरपर्यंत जाण्याचा रस्ता लोकांना नीट दिसावा अशी सोय करायची आणि त्यासाठी लागणारी व्यवस्था म्हणजे दिवे वगैरे नॉर्दर्न लाईट्स पाहण्यात अडचण ठरणार नाहीत, याचीही काळजी घ्यायची हे काम कठीण होतं. त्यासाठी त्यांनी पॅराफीनचे दिवे निवडले.
टॉवरकडे नेणार्या रस्त्यावर हे दिवे आहेत. त्यांच्या प्रकाशाची तीव्रता अगदी नेमकी आहे. तुम्हाला रस्ता नीट दिसतो, पण हा प्रकाश मर्यादित जागाच व्यापत असल्यानं त्यांचे झोत आकाशात पसरत नाहीत.
एॅबिस्कोमध्ये एका टेकडीवर आमचं हॉटेल होतं. हॉटेलमध्ये चांगलीच गर्दी होती. सुरुवातीला त्यांनी आम्हाला एक रूम कमी देऊ केली. आमच्याकडे खोल्या शिल्लक नाहीत असं सांगितलं. पण आमच्यातल्या एकाकडे कॉर्पोरेट जगताचा चांगलाच अनुभव होता. त्याने हॉटेल व्यवस्थापनाचा कांगावा हाणून पाडला आणि एकदाची तीही रूम आमच्या ताब्यात मिळाली. आम्ही एकंदर लांबचा प्रवास करून आलेलो त्यामुळं बरेच थकलो होतो. कॉफी पिऊन जरा आराम करावा अशा मनःस्थितीत होतो. पण त्यासाठी खोलीत आलो. खिडकीतून बाहेर डोकावलो तेव्हा समोरची दरी आणि तिथलं विहंगम दृश्य पाहून थक्क होऊन गेलो. ज्यांच्या खोल्या दरीच्या दिशेला नव्हत्या, त्यांना बोलावणं गेलं आणि उजेड असेपर्यंत एॅबिस्कोच्या त्या निसर्ग सौंदर्याचा ज्याने त्याने आनंद लुटला. तिथला सूर्यास्त देखील पाहिला. तो अनुभव खरंच डोळ्यांचं पारणं फेडणारा होता.
पण एॅबिस्को खरं लक्षात राहिलं ते वेगळ्याच कारणासाठी. तिथं आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा पुसटशा नॉर्दर्न लाइट्स दिसल्या. त्या अर्धवट दर्शनानेही आम्ही हरखून गेलो होतो. बराच वेळ आशाळभूतासारखे आकाशाकडे डोळे लावून उभे होतो. उजेडापासून थोडं दूर गेल्यावर नॉर्दर्न लाइट्स चांगले दिसतात, हे माहित होतं. म्हणून आम्ही आमच्या हॉटेलच्या प्रकाशाला बगल देण्याचा प्रयत्न केला. काही जण तर चांगलेच लांबवर फेरफटका मारून आले. हॉटेलमधल्या पाहुण्यांपैकी काही उत्साही मंडळी डोंगरावर चढून देखील आली. पण सगळ्यांच्या वाट्याला नॉर्दर्न लाइट्सचा अल्पसा ‘प्रसाद’ काय तो आला होता.
आमच्या प्रवासाचा पुढचा टप्पा होता किरूना. हेही तसं थोडंसं मोठं पण टुमदार गाव. दोन नद्यांच्या बेळक्यात वसलेलं. जरा श्रीमंत. कारण इथं त्या देशातली सगळ्यात मोठी लोखंडाच्या खनिजाची खाण आहे. किरूना आम्ही फिरून पाहिलं तेव्हा ही खाण देखील पाहिली. किरूना ही स्वीडनच्या उत्तरेकडची सर्वात मोठी महानगरपालिका आहे, असं कुठंतरी वाचलं होतं. पण प्रत्यक्षात तिथं गेल्यावर थोडं हसू आलं कारण आपल्याला मुंबई, पुणं, नागपूर अशा ‘महा’नगरपालिका माहिती. किरूना महापालिका मिरज, संगमनेरपेक्षाही छोटी वाटली.
तिथं एक पुरातन चर्च आहे. तेही पाहायला आम्ही गेलो. फक्त आम्हाला पोचायला जरा उशीर झाला होता. त्यामुळं चर्च बंद झालं होतं. ते आतून काही पाहता आलं नाही. मग बंद दरवाज्याच्या बाहेर घोळका करून आम्ही आपले फोटो तेव्हढे काढून घेतले. इथे वेळा पाळाव्या लागतात, हा धडा मात्र शिकलो.
किरूनाची आणखी एक आठवण आहे. तिथल्या कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये पैसे घेत नाहीत. म्हणजे चलनी नोटा किंवा नाणी घेत नाहीत. फक्त क्रेडिट कार्डनेच बिल भरता येतं. त्यामुळं ज्यांनी प्रत्यक्ष चलन नेलं होतं त्यांची कुचंबणा झाली. सुदैवानं ग्रुप असल्यानं निभावून नेलं गेलं.
किरूनाच्या जवळच जुक्कस्जर्वी असं जिभेची दमछाक होईल, असलं नाव असलेलं एक स्थळ आहे. संपूर्ण बर्फात बनलेल्या
हॉटेलसाठी ते प्रसिद्ध आहे. म्हणजे एकदा तुम्ही आत गेलात की सगळीकडे फक्त आणि फक्त बर्फ. खोल्या, भिंती, खुर्च्या, पलंग सगळं काही बर्फाचं. झोपायला म्हणून बिछाना तेव्हढा रेनडिअरच्या कातडीचा. विशेष म्हणजे प्रत्येक खोली वेगळी, तिथलं दृश्य निराळं. सगळ्या बर्फातल्या कलाकृती. सुंदर प्रकाशयोजना करून त्या कलाकृतींची शोभा आणखी वाढवलेली. एके ठिकाणी तर चक्क वाचनाची खोली होती. त्यात पुस्तकं, पुस्तकाच्या कपाटासकट बसून वाचायची आरामखुर्ची देखील बर्फातून शाकारलेली. इतकंच कशाला, पाणी प्यायचा पेला, खायच्या बश्या… सर्वच बर्फाचं. मात्र थंडीत कुडकुडायच्या तयारीनं गेलं पाहिजे. हा अनुभव खूपच मस्त होता.