कंपासमध्ये त्रिज्या निश्चित करून वर्तुळ काढले जाते… पृथ्वीचाही असाच गोल आहे. या गोलाकाराचा ७१ टक्के भाग पाण्यानं व्यापला आहे, पण तरीही उर्वरित २९ टक्के भूमीवर जगणार्या माणसांचं पृथ्वीतलावर वर्चस्व आहे. या माणसांच्या जन्म-मृत्यूच्या फेर्यात असेच असंख्य गोल जीवनाचं सार सांगतात. अर्थात प्रत्येकाच्या दृष्टिकोनाचा परीघसुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो. खेळाच्या अनुषंगानं विचार केल्यास युरोप, लॅटिन अमेरिका आणि आप्रिâका खंडात हाच गोल फुटबॉलचा असतो, भारतीयांसाठी हा क्रिकेटच्या चेंडूचा गोल असणं तसं स्वाभाविकच. ‘द ब्युटिफुल गेम’ म्हणजेच जगातील सर्वांगसुंदर खेळ असा लौकिक जपणार्या फुटबॉलचं बहुतेक सगळ्या जगावर गारूड आहे. स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात भारतीय संघानं काही वर्षे फुटबॉलमध्ये बरी प्रगती केली आहे, पण दुर्दैवानं ती विश्वचषक स्पर्धेत प्रवेश मिळवण्यापर्यंतही कधी उंचावली नाही. टीव्हीवर खेळ पाहणार्या भारतीयांमध्येही बराच काळ फुटबॉलची आवड निर्माण झाली नव्हती. नव्वदीच्या दशकात रंगीत टेलिव्हिजन घरोघरी पोहोचल्यावर दिएगो मॅराडोना हा भारतीयांना भावलेला पहिला ‘फुटबॉल नायक’. त्यानंतर रोनाल्डो, रिव्हाल्डो आणि आता डिजिटल क्रांतीच्या युगात लिओनेल मेसी, ख्रिस्तियानो रोनाल्डो, किलियन एम्बापे, करिम बेन्झेमा, रॉबर्ट लेवांडोवस्की अशा असंख्य तार्यांनी भारतीय तरुणाईवर छाप पाडली. तरीही हा परीघ तसा मर्यादित स्वरूपाचा. ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धा आली आपल्याकडची तरुणाई या जागतिक उत्सवात उत्साहाने सहभागी होते.
भारतात टेलीव्हिजन पोहोचण्याच्या एक दशक आधी, म्हणजेच घरोघरी रेडिओची आकाशवाणी पुजली जायची. त्या काळात एडसन आरांटेस डो नासिमेंटो नामक एका ब्राझिलियन युवकानं जगभरातली फुटबॉल मैदानं गाजवली. यातील एडसन हे त्याचं नाव त्याच्या आई-वडिलांनी अमेरिकेचा महान शास्त्रज्ञ थॉमस एडिसनपासून प्रेरणा घेत ठेवलं होतं. एडिसननं विजेच्या बल्बचा शोध लावला आणि जगाला कृत्रिम प्रकाशाची दृष्टी दिली. एडसनचा जन्म सकाळी झाला आणि नुकतीच गावात वीज पोहोचली होती, हेच त्यामागचं कारण. कुटुंबीय त्याला लाडानं ‘डिको’ म्हणत. पण जगासाठी तो पेले म्हणून दंतकथा झाला! शाळेत असताना स्थानिक वास्को द गामा क्लबचे गोलरक्षक बिले यांचा उल्लेख तो ‘पिले’ असा करायचा. त्यामुळेच त्याचे शाळकरी मित्र त्याला पेले नावानं हाक मारू लागले. पोर्तुगीज भाषेत पायानं चेंडूला लाथाडणं म्हणजे ‘पे’. यातूनच मिळालेलं हे नाव त्याला मुळीच रुचलं नव्हतं. हे त्यानं जाहीररीत्या सांगितलं होतं. उलटपक्षी एडसन त्याला आवडायचं. पण पेले हे नाव समाजातील लाथाडलेल्यांचा म्हणजेच वंचितांचा प्रतिनिधी असं होऊन बसलं आणि तीच त्याची जगप्रसिद्ध ओळख झाली.
विद्युल्लतेच्या वेगानं खेळत, चकवत प्रेक्षणीय गोल करण्याची पेलेची क्षमता प्रतिस्पर्ध्यांनाच नव्हे, तर पाहणार्यालाही अचंबित करायची. त्याचा मैदानावरील वावरच एखाद्या कलात्मक अदाकारीसारखाच असायचा. त्याची ‘बायसिकल किक’ डोळ्यांचं पारणं फेडायची. ब्राझील हा भौगोलिकतेचे निकष लावल्यास जगातील पाचव्या क्रमांकाचा आणि लोकसंख्येच्या यादीतील सातव्या क्रमांकाचा देश. पण ब्राझीलला फुटबॉलच्या परीघावरील महासत्ता बनवण्याचं श्रेय आणि या खेळाला जगातील सर्वोत्तम खेळ हे अग्रस्थान मिळवून देण्याचं कर्तृत्वसुद्धा पेलेमुळेच साध्य झालं. आतापर्यंतच्या २२ विश्वचषकांपैकी सर्वाधिक पाच विजेतेपदं ही ब्राझीलची. यापैकी तीन एकट्या पेलेनं जिंकून दिली, हेच त्याचं मोठेपण. विश्वचषकाच्या सुरुवातीच्या दशकांमध्ये इटली, उरुग्वे आणि पश्चिम जर्मनीचं वर्चस्व होतं. ते त्यानं मोडीत काढलं. ‘द ब्लॅक पर्ल’, ‘द किंग ऑफ फुटबॉल’, ‘द किंग पेले’ किंवा ‘द किंग’ अशी अनेक बिरूदं त्याला जोडली गेली. असा हा ‘फुटबॉलचा राजा’ या खेळातील पहिला जागतिक महानायक. ‘वुई ईट क्रिकेट, वुई स्लीप क्रिकेट’ ही क्रिकेटप्रेमाची संस्कृती भारतात रूढ करण्याचा मान सचिन तेंडुलकरला जातो. त्यानं क्रिकेटमध्ये १० क्रमांकाची जर्सी परिधान करून देशाला क्रिकेटवेडं बनवून टाकलं, त्याच १० क्रमांकाच्या जर्सीला फुटबॉलमध्ये पेलेनं जागतिक अधिष्ठान मिळवून दिलं. ‘‘पेलेनं या क्रमांकाला महत्त्व मिळवून देण्याआधी, तो फक्त एक आकडा होता,’’ असं नेमार म्हणतो, जो सध्या ब्राझीलची १० क्रमांकाची जर्सी घालून खेळतो. १९५८च्या विश्वचषकात सहभागी होण्यासाठी सर्व देशांचे संघ जेव्हा स्वीडनला पोहोचले, तेव्हा ‘फिफा’नं जर्सीवर क्रमांक बंधनकारक केले. खेळाडूंना क्रमांकही संघांनी नव्हे, तर ‘फिफा’नंच बहाल केले. १० क्रमांकाच्या जर्सीचा महिमा हा येथून सुरू झाला.
पेलेचं बालपण गरिबीत गेलं. मिनास गेराइस शहरातील ट्रेस काराकोईसच्या कच्च्या रस्त्यांवर पायमोज्यांमध्ये कागदी गोळे भरून तो सवंगड्यांसमवेत अनवाणी फुटबॉल खेळायचा. टेलीव्हिजनपूर्व काळात फुटबॉलचे स्टिकर्स जमवण्याचा छंद. पेले आणि त्याचे मित्र उदरनिर्वाहासाठी विमानतळ, रेल्वे फलाट, थिएटर, स्टेडियमवर खाद्यपदार्थांची विक्री करायचे. शेंगदाणे विकण्यासाठी बालपणी विमानतळावर गेला, तेव्हा वैमानिक व्हायच्या ध्येयानं तो पछाडला. पण एक विमान अपघात पाहिल्याचं निमित्त झालं आणि त्या रक्तरंजित वास्तवानं त्याच्या स्वप्नाचा चुराडा झाला. पेलेच्या आयुष्यात फुटबॉलची ठिणगी पेटण्यासाठी १९५० साल अवतरावं लागलं. माराकाना येथे उरुग्वेविरुद्धचा अंतिम सामना गमावल्यामुळे ब्राझीलचं विश्वविजेतेपद हुकलं. त्यावेळी पेलेचे वडील डोन्डिन्यो ढसाढसा रडू लागले. खचलेल्या बापाला पेलेनं ब्राझीलसाठी मी विश्वचषक जिंकून देईन, अशी महत्त्वाकांक्षा सांगितली. ११ वर्षांच्या त्या बालकानं फक्त ती वल्गना केली नाही, तर ती खरीही ठरवली.
जगासमोर पेलेनाट्याचा पहिला यशस्वी प्रयोग स्वीडनमध्ये १९५८मध्ये रंगला. तेव्हा तो फक्त १७ वर्षांचा होता. दक्षिण आफ्रिकेबाहेरचा पेलेचा हा पहिलाच दौरा. ब्राझील त्यावेळी ‘सांबा सॉकर’ शैलीसाठी ओळखलं जायचं. स्टॉकहोमला झालेल्या अंतिम सामन्यात ब्राझीलनं स्वीडनला ५-२ अशी धूळ चारत पहिल्यांदाच विश्वविजेतेपदाची चव चाखली. अर्थात दोन गोल करणारा पेले या यशाचा शिल्पकार होता. यापैकी एक गोल विश्वचषकाच्या इतिहासातील संस्मरणीय गोल म्हणून आजही उल्लेखला जातो.
चार वर्षांनी १९६२मध्ये ब्राझीलनं विश्वविजेतेपदाची पुनरावृत्ती केली. पण यावेळी दुखापतीमुळे पेलेची विश्वविजेतेपदाच्या यशातील भूमिका मर्यादित होती. १९६६च्या विश्वचषकात असंख्य युरोपियन संघांनी पेलेला रोखण्यासाठी बचाव फळीमार्फत रणनीती आखल्या. त्यामुळे हा विश्वचषक पेलेसाठी आणि ब्राझीलसाठी अपयशी ठरला. ‘माय लाइफ अँड दि ब्युटिफुल गेम : दी ऑटोबायोग्राफी ऑफ पेले’ या आत्मचरित्रात पेलेनं याचं विस्तृत वर्णन केलं आहे. पेलेनं प्रतिस्पर्धी बचावांचं चक्रव्यूह भेदण्याचा पण करीत १९७०मध्ये ब्राझीलला विश्वविजेतेपदाची हॅट्ट्रिक साधून दिली. अंतिम सामन्यात एक लाख, सात हजार प्रेक्षकांच्या साक्षीनं ब्राझीलनं इटलीला ४-१ अशा फरकानं पराभूत केलं. यातील पहिला गोल आणि दोन गोलसहाय्य हे पेलेचं योगदान. स्पर्धेतील एकंदर संस्मरणीय कामगिरीमुळे ‘गोल्डन बॉल’चा किताबही त्यानं मिळवला. मग वर्षभरानं १८ जुलै १९७१ या दिवशी पेलेनं आंतरराष्ट्रीय फुटबॉलच्या रंगमंचावरील आपली भूमिका स्थगित केली.
मागे वळून पाहिलं, तर पेलेच्या कारकीर्दीत ब्राझीलनं ६७ सामन्यांत विजय मिळवला, १४ सामन्यांत बरोबरी केली आणि फक्त ११ सामने गमावले. त्याने एकूण कारकीर्दीतील १३६३ सामन्यांत १२७९ गोल केले, हा विक्रम ‘गिनीज बुक’मध्येही नोंदला गेला. यात ७७ आंतरराष्ट्रीय गोलचा (९२ सामन्यांत) समावेश आहे, तर ब्राझीलच्या सांतोस क्लबसाठी त्यानं सर्वाधिक ६४३ गोल (६५९ सामन्यांत) साकारले. फुटबॉलद्वारे मिळालेल्या पहिल्या मिळकतीतून पेलेनं आईसाठी गॅस स्टोव्ह खरेदी केला होता. पण कालांतरानं सत्तरीच्या दशकात जगातील सर्वाधिक उत्पन्न कमावणारा क्रीडापटू हा नावलौकिक पेलेनं मिळवला. पैशासाठी युरोपातील क्लबकडून तो खेळला नाही.
‘पेले’ या दोन अक्षरात फुटबॉलचं विश्व सामावल्याची कीर्ती इतकी पसरली की पेले खेळणार म्हणून नायजेरियातील यादवी युद्ध स्थगित करावं लागल्याचा उल्लेख १९९९मध्ये ‘टाइम’ मासिकानं केला होता. १९६७मध्ये पेले लॅगोस येथे तो प्रदर्शनीय सामना खेळणार म्हणून नायजेरियातील यादवी युद्धात ४८ तासांचा युद्धविराम घोषित करण्यात आला. लष्करप्रमुख सॅम्युएल ओगबेमुडिया यांनी पेलेचा सामना नागरिकांना पाहता यावा, म्हणून सुटी जाहीर केली आणि युद्धामुळे बंद करण्यात आलेले पूल दोन्ही बाजूंनी खुले करण्यात आले. ‘सांतोसनं युद्ध थांबवलं’ म्हणून त्याची जगभरात चर्चा झाली. हे युद्ध पुढे आणखी एक वर्ष चाललं, पण ‘जगाला युद्ध नको, बुद्ध हवा’, हा संदेश पेलेच्या खेळामुळे या घटनेनं दिला. पेलेचं युद्धविरोधी धोरण अगदी युक्रेनवर रशियानं केलेल्या हल्ल्याप्रसंगीही दिसून आलं. या शांतीदूतानं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांना समाजमाध्यमांवर खुलं पत्र लिहून युद्ध थांबवण्याचं आवाहन केलं होतं.
दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि कृष्णवर्णीयांचे कैवारी नेल्सन मंडेला यांच्या साथीनं पेले यांनी बरंच समाजकार्य केलं. पुढे पेले फाऊंडेशनची स्थापन करीत रंजल्यागांजल्या मुलांच्या भवितव्यासाठी कारकीर्दीतील जवळपास सोळाशे वस्तूंचा लिलाव त्यांनी केला. १९९४मध्ये ‘युनेस्को’नं पेले यांची सदिच्छादूत म्हणून नियुक्ती केली, तर पुढच्याच वर्षी ते देशाचे क्रीडामंत्री झाले. ब्राझीलच्या फुटबॉलमधील भ्रष्टाचाराचा नायनाट करण्यासाठी त्यांनी एक विधेयकही संसदेत संमत करून घेतले, जे ‘पेले लॉ’ म्हणून ओळखलं जातं.
१९७७मध्ये पेले प्रथमच भारतात आले, ते अर्थात देशातील फुटबॉलची राजधानी म्हटल्या जाणार्या कोलकातामध्ये. मोहन बागानविरुद्धच्या सामन्यात कॉसमॉसकडून ते खेळले. त्यानंतर २०१५मध्ये नवी दिल्लीत सुब्रतो चषकाच्या पारितोषिक वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आणि २०१८मध्ये कॉर्पोरेट लीडरशिप समिटसाठी वक्ते म्हणून ते भारतात आले. या तिन्ही दौर्यांमध्ये पेले यांच्या दर्शनासाठी भारतीयांनी मोठी गर्दी केली होती. पेले यांचा जिवंत खेळ पाहण्याचं भाग्य सध्याच्या पिढीला लाभणं शक्य नसलं, तरी त्यांचं महात्म्य ‘गुगली’करणामुळे त्यांनी जाणलं होतं.
जी स्थिती भारताची, तीच जगाची. ज्या बिंदूपासून वर्तुळाला सुरुवात होते, तिथेच येऊन तो पुन्हा थांबतो. विश्वातील सर्वात तेजस्वी गोल म्हटल्या जाणार्या सूर्यबिंबाप्रमाणे लखलखती कारकीर्द आणि फुटबॉलवर निस्सीम प्रेम पेले यांनी अखेरच्या श्वासापर्यंत जपलं. ते फुटबॉलच्या दुनियेतील सम्राट अलेक्झांडर होते. देशोदेशीच्या समर्थ बचावफळी भेदणार्या पेले यांना कर्करोगाने चकवलं. एक यशोगाथा सफल संपूर्ण झाली. एक वर्तुळ पूर्ण झालं. ते फुटबॉलचंच होतं. आपल्या नेत्रदीपक खेळानं पृथ्वीगोलाचं बरंचसं क्षेत्रफळ पेले यांनी व्यापलं होतं, ते व्यापलेलंच राहील!