पोलीसदलात नोकरी करणारे प्रशांत पवार यांना शहरी व ग्रामीण विभागात काम करताना अनेक बरेवाईट अनुभव आले. त्यातून त्यांची जगाकडे पाहण्याची वैचारिक दृष्टी तयार झाली. ती जशी प्रगल्भ होत गेली तशी त्याला नकळत जीवनचिंतनाची बैठक लाभली. जीवनातील साध्या साध्या अनुभवातून खूप शिकायला मिळालं. ते व्यक्त करावंसं वाटू लागलं. त्यातूनच त्यांच्या ‘जसं सुचलं तसं’ या पुस्तकाचा जन्म झाला. त्यातील ‘पझेसिव्हनेस’ हे एक वेधक प्रकरण.
– – –
मनुष्याच्या संपूर्ण आयुष्यात प्रेम हे प्रत्येक टप्प्यात त्याला इतरांशी जोडून ठेवण्याचे काम करते; मग ते प्रेम आई आणि मुलांमधील ममत्व असेल, भाऊ आणि बहीण यांच्यामधील माया असेल, नवरा बायको यांच्यामधील नाजूक बंध असेल किंवा देव आणि भक्त यांच्यामधील भक्तिभाव असेल. या सर्वांमध्ये नाते कोणते आहे हे महत्त्वाचे नाही तर बंध असणे गरजेचे आहेत. प्रेम करणे म्हणजे नक्की कशाला म्हणायचे, हे ठरविणे फार अवघड आहे. कोणी स्पर्शातून तर कोणी हर्षातून प्रेम व्यक्त करतो, कोणी हसून तर कोणी आसवे पुसून प्रेम करतो, ज्याला जसे जमेल आणि उमजेल तसा तो प्रेम करतो. प्रेमाला शब्दात बांधता येत नाही, परंतु प्रेमाच्या शब्दाने माणूस कायमचा बंदी होऊ शकतो. म्हणून प्रेम समजून करायचे नसते, तर प्रेम हे व्यक्त होऊनच करता येते; मग ते शब्दरूपी बोल असतील तर कधी डोळ्यातील आसवे असतील तर कधी स्पर्शातील स्पंदने असतील. नाही तर मदतीचा हात असेल किंवा लढण्यासाठी साथ असेल; रूपे अनेक असतील, पण भाव एकच असला पाहिजे.
प्रेमाचे स्वरूप आणि भावनांचे रूप प्रत्येकाचे वेगवेगळे असते. ज्याप्रमाणे स्वभाव असतो त्याप्रमाणे त्याच्या लेखी काही शब्दांचे व भावनांचे अर्थ वेगवेगळे असतात. एखाद्या व्यक्तीचा प्रेमाचा अर्थ त्याग असू शकतो, तर दुसर्याच्या लेखी समर्पण असू शकतो. प्रत्येकाच्या भावनेमागील कृती जरी एकसारख्या वाटत असतील तरी त्याचा अर्थ प्रत्येक जण आपल्या स्वभावाप्रमाणे घेत असतो. एखाद्याची काळजीपोटी केलेली कृती ही विनाकारण ढवळाढवळ वाटू शकते तर कधी स्वायत्तता किंवा स्पेस देण्यासाठी ठेवलेले अंतर हे दुर्लक्ष वाटू शकते. कधी जबाबदारीच्या नावाने काही गोष्टी लादल्या जातात, तर काही रोखल्या जातात. यात भावना खरी आणि निर्मळ असते, परंतु व्यक्त करण्यासाठी अवलंबिलेला मार्ग चुकीच्या आधारावर असतो. यालाच आजकाल पझेसिव्हनेस या गोंडस नावाने संबोधले जाते. थोडक्यात सांगायचे झाले तर काही वेळा एखाद्याची प्रीत खरी असली तरी रीत चुकीची असते. अशा व्यक्तीचा कृतीमागील दृष्टिकोन चांगला असला तरी दिसणारे दृश्य आणि त्याचा अर्थ चुकीचा निघत असतो. हे थोडे विचित्र वाटत असले तरी काही प्रमाणात वास्तव आहे. अशी संतुलित व्यक्ती जरी प्रामाणिक असली तरी त्याची कृती बाधित असते.
कधीकधी काळजी वाटते म्हणून वाजवीपेक्षा जास्त बंधनात ठेवणे, हक्क हा अट्टहास वाटावा इतपत आक्रमकता दाखविणे यामुळे नात्याचा जीव गुदमरून जाऊ शकतो. शेवटी शरीराला श्वास आणि नात्याला विश्वासच जिवंत ठेवतो हे समजून घेतले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीस आपले स्वातंत्र्य, आपले विचार महत्त्वाचे वाटतात. एक वेळ त्याच्या बाह्य अंगावर इतर कोणाचे नियंत्रण त्याला चालेल, परंतु त्याच्या मनावर, त्याच्या विचारांवर आणि स्वातंत्र्यावर नियंत्रण ठेवलेले चालत नाही; यालाच आजकाल स्पेस म्हणतात. व्यक्तिमत्त्वाच्या अस्तित्वाला धक्का न देता वैचारिक आणि मतांचे स्वातंत्र्य देऊन देखील एक अनामिक ओढीने बांधून ठेवणे म्हणजे निस्सीम भक्ती, प्रेम असते. फक्त ओढीच्या नादात भावनांची ओढाताण होणार नाही याची काळजी घेता आली पाहिजे.
पझेसिव्ह असणे म्हणजे नक्की काय आहे? ते चांगले की वाईट आहे, असे प्रश्न नेहमी पडतात. या प्रश्नांचा मागोवा घेतला तर समजून येते की या शब्दाचा डिक्शनरीमधील अर्थ स्वामित्वदर्शक, मालकीविषयक हव्यास असा नमूद असून तो बरेच काही सांगून जातो. यात हक्क आणि स्वामित्व तसेच अधिकार आणि गृहीत धरणे याचा समन्वय साधणारी जी पुसटशी रेषा आहे, ती ओळखून वागता आले पाहिजे. त्यातही कृती करताना आक्रमकता आणि शब्दांची दाहकता याचे तारतम्य ठेवले पाहिजे. ते ठेवले नाही तर दाखविलेला हक्क हा अहंकार होतो आणि गाजविलेला अधिकार द्वेषास कारणीभूत होतो. जो पझेसिव्ह असतो त्याच्यासाठी दुसरी व्यक्ती गरज झालेली असते, म्हणून तो तसा वागतो. परंतु ज्याच्याबाबतीत पझेसिव्ह आहे किंवा निर्णय घेतला त्याला आपल्या स्वातंत्र्यावर आलेली गदा वाटते. बर्याच वेळा पझेसिव्ह असण्यामध्ये भावना चांगली असते, परंतु कधीकधी अंमलबजावणीची पद्धत चुकीची असते आणि त्यामुळे त्याचा परिणाम विपरीत होऊन दाखविलेले प्रेम द्वेषभावना निर्माण करते. मुळात यामागील मानसिकतेचा विचार केला तर समजून येते की पझेसिव्ह असलेल्या व्यक्तीवर वेगवेगळ्या परिस्थितीत होणारे परिणाम वेगवेगळे असून त्याची कारणे देखील वेगवेगळी असतात. मनुष्याचा कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा त्या गोष्टीचे त्याच्यासाठी असलेले महत्त्व व तत्कालीन गरज काय आहे यावर असून ती वस्तू मिळविणे आणि गमावण्याची भीती हा त्यावर परिणाम करणारा घटक आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्रयस्थ नसून तो बाधित असतो, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ज्याला कोणतेही बाधा झाली आहे त्याच्या मूळ स्वरूपावर बाधा परिणाम करून त्यावर आपला प्रभाव ठेवते याचे भान ठेवले पाहिजे.
काही वेळा लग्नापूर्वी पझेसिव्ह असणे हे जर प्रेम वाटत असेल, तर हाच पझेसिव्ह गुण लग्नानंतर त्रास का वाटत असतो, याचा नीट विचार केला तर समजून येते की लग्नाआधी हक्क दाखविण्यामध्ये लडिवाळपणा, प्रेम दिसत असते, तर लग्नानंतर हक्क दाखविल्यामुळे कधी त्रास तर कधी ढवळाढवळ वाटते. अशावेळी व्यक्ती त्याच असतात, कृती त्याच असतात, फक्त परिणाम अनपेक्षित असतो. लग्नाआधी आणि नंतर घटना एकच आहे तरी परिणाम वेगळा का आहे? याचा विचार केला असता समजून येते की, त्यावेळी असलेली गरज, असलेली सुरक्षितता आणि समाधान हे महत्त्व ठरवत असतात. मनुष्याला जे पदरी नसते त्याची आस असते आणि जे पदरी असते त्याचे महत्त्व नसते. जोपर्यंत पुरुष किंवा स्त्री हे प्रियकर-प्रेयसी असतात तोपर्यंत त्यांना एकमेकांची आस असते, कारण ते समोर असते पण पदरी पडलेले नसते. जेव्हा ते पती-पत्नी होतात, तेव्हा आस संपलेली असते आणि पदरी पडलेले असते; त्यामुळे महत्व कमी झालेले असते.
प्रेमात अधिकारवाणी तसेच हक्क दाखविणे असते. मुळात पझेसिव्ह असणे म्हणजे ढवळाढवळ किंवा अधिकारांची गळचेपी नसून त्यामागे आपुलकी, आस्था, जिव्हाळा आणि काळजी देखील असते. आपल्या मनाच्या सर्वात जवळ असलेला माणूस- मग तो पती असेल, मुलगा असेल, भाऊ-बहीण असतील किंवा इतर रक्ताचे अगर मनाचे नाते असेल- त्यांच्यावर निस्सीम प्रेम असते. त्यांच्याकडे आपण कायम आपुलकीने आणि मायेने पहात असल्यामुळे ते आपल्याला कायम निरागस दिसत असतात. त्यामुळे कधी काळजीपोटी, चांगल्या भावनेतून वाजवीपेक्षा जास्त बंधनात बांधत असतो. त्यावेळी काळजीची भावना कधी मालकी हक्कात रूपांतरित होते हे कळत नाही. प्रेम कधी अहंकार होतो आणि अधिकारवाणी कधी मालकी हक्क होतो हे कळतच नाही. आपण हक्क दाखविण्याच्या नादात आपल्या माणसाने कोणाशी बोलावे, कोणाशी बोलू नये इथपासून ते काय करावे आणि काय करू नये इतपत आचारसंहिता कधी ठरवू लागतो हे कळत नाही. कोणतीही सवय मोडणे सहज सोपे नसते त्यामुळे दुसर्याला बदलविण्याच्या नादात आपण कधी ताठर झालो हेच कळत नाही अशावेळी आपल्याला वाकता येत नाही आणि आपण लवचिकतेचे धडे दुसर्याला देत असतो.
खरे तर, पझेसिव्ह असण्याने कवचकुंडलाचे काम केले पाहिजे. आपल्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याला अबाधित ठेवून बाह्य गोष्टींच्या आक्रमणापासून बचाव करण्यासाठी त्याच्याभोवतालच्या सुरक्षेसाठीच्या कक्षा रुंदावता आल्या पाहिजेत. हे करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, पिंजरा सोन्याचा असला तरी तो पारतंत्र्याचीच आठवण करून देत असतो. त्यामुळे कवचकुंडलांनी बाहेरच्या आक्रमणापासून संरक्षण केले पाहिजे आणि त्याचा दरवाजा आतून उघडता येणारा असावा. त्याचे नियंत्रण स्वतःकडे असले पाहिजे. यासाठी दोघांमध्ये वैचारिक मतभेद असले तरी अहंकार नसावा. विचार आणि भावना स्पष्ट असली पाहिजे आणि वादाच्या मुद्द्यांवर का होईना, पण संवाद असला पाहिजे. आपल्याला हे करता आले नाही तर पझेसिव्ह असणे हे त्याला पायातील बेड्या वाटून कायमच्या द्वेषास कारणीभूत होते. खरे तर माणसे चुकतात आणि त्याची शिक्षा नाते भोगते. जेव्हा ‘मी’मध्ये साधेपणा आणि तुझ्यामध्ये आपलेपणा असतो तेव्हा नात्यात सहजता असते.