• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

रॉयल बेकरी

सुधीर साबळे पुणे तिथे खाणे...

marmik by marmik
April 16, 2026
in खानपान, विशेष लेख
0
रॉयल बेकरी

तसं पाहिलं तर शंभर वर्षांपूर्वी रॉयल बेकरी होतीच… ती ११२ वर्षांपूर्वी सुरू झालेली आहे, पण तेव्हा एखाद्या वर्तमानपत्रात ‘पुणे तिथे खाणे’ असा कॉलम असता, तर त्यात या बेकरीचा समावेश नक्कीच झाला नसता… कारण, ती कॅम्पात आहे… पुणेकरांसाठी कॅम्प हा जणू परग्रहावरचा प्रांत होता. तिथे जाऊन चहा, भिस्कुट आणि आमलेटं खाल्ली म्हणजे धर्म बुडवला, असं मानलं जात होतं त्या काळात. अस्सल पेठीय पुणेकर एकवेळ बुधवारात उजळ माथ्याने जाईल, पण कॅम्पात मात्र चोरूनच जावं लागायचं.

कॅम्प म्हणजे कॅन्टोन्मेंटचा परिसर. लष्करी भाग. इथे त्या काळात गोरे-काळे सोजीर खूप. शिवाय हा परिसर बहुधर्मीय, बहुभाषिक. पारशांचा मोठा भरणा होता तिथे. सामिष पदार्थांची तिथे रेलचेल होती. त्यामुळे तरुणपणी पाय किंवा सायकलीची चाकं तिकडे वळायची, पण चोरून. तिथलं खाणं कितीही भावलं तरी ते आपण खाल्लं हे सांगायचीच चोरी, तर त्याची कौतुकं कोण सांगणार?
कॅम्पाचं तेव्हापासून आतापर्यंत कायम राहिलेलं वैशिष्ट्य म्हणजे ताज्या बेकरी पदार्थांचा सुगंध. काळाच्या ओघात पुणे कितीही बदललेले असले तरी कॅम्पात काही भागांत आणि काही दुकानांमध्ये काळ गोठून राहिला आहे. गंमत म्हणजे आज ८०च्या घरात असलेल्यांपासून ते अगदी चाळिशीत असलेल्यांपर्यंत सगळ्यांना या जागांवर गेल्यावर आपल्या बालपणात किंवा तारुण्यात गेल्याची भावना होते. त्यातलीच एक जागा म्हणजे ११२ वर्ष जुनी रॉयल बेकरी. या बेकरीतल्या बटरच्या सुगंधाने आणि श्रुजबेरी बिस्किटांच्या गोडव्याने आपली ओळख कायम ठेवली. कॅम्पातल्या मेन स्ट्रीटवर उभी असलेली ही ११२ वर्ष जुनी बेकरी म्हणजे फक्त एक दुकान नाही, तर पुण्याच्या खाद्यसंस्कृतीचा जिवंत वारसा आहे. बटर श्रुजबेरी, मिल्क ब्रेड, मावा केक, रिच प्लम केक, वॉलनट केक, नट बिस्किट, ग्लास केक, असा इथला एकेक पदार्थ म्हणजे चवीचा एक वेगळाच अध्यायच म्हणावा लागेल.

ब्रिटिश राजवट पाहिलेल्या, पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धाच्या साक्षीदार राहिलेल्या या रॉयल बेकारीला या महिन्यात ११२ वर्ष पूर्ण होत आहेत. १८७०मध्ये बांधण्यात आलेल्या इमारतीतच ही बेकरी चालू आहे. रॉयल बेकरीचा इतिहास म्हणजे संघर्ष, जिद्द आणि स्वप्नांची गोष्ट आहे.
सुलुमन इराणी हा इराणमधून भारतात आलेला एक तरुण. ते वर्ष असेल साधारण १९०५ ते १९०८च्या दरम्यानचे. तेव्हा मुंबईच्या बंदरावर उतरलेल्या सुलुमनला ना इथली कोणती भाषा माहित होती, ना कुणाचा आधार होता. लहानसहान कामं करत करत ते पुण्यात आले. इंग्रजांची खाण्यापिण्याची सवय वेगळी. ब्रेड, केक, बिस्किटे यांची त्यांना प्रचंड आवड. पुण्यात त्या वेळी या पदार्थांचा पुरवठा करणार्‍या बेकर्‍या फारशा नव्हत्या. सुलूमन इराणी यांना ती सुरू करण्याची कल्पना सुचली आणि १९१४मध्ये रॉयल बेकरी सुरू झाली. आज तिसर्‍या पिढीचे प्रमुख शेरियार इराणी यांच्याकडे हा वारसा आलेला आहे. त्यांचे आजोबा सुलूमन यांनी बेकारीची सुरुवात केल्यानंतर वडील रुस्तम इराणी यांनी बेकरीचा कारभार पहिला. सध्या शेरियार आणि त्यांचा मुलगा योहान हे या व्यवसायाची धुरा सांभाळत आहेत.

ब्रिटिशांच्या आवडीचे पदार्थ…
ब्रिटिशांचा आवडता एक पदार्थ म्हणजे श्रुजबेरी बिस्किटं. त्यांची कहाणी मोठी मजेदार आहे. इंग्लंडमधल्या श्रुजबेरी काउंटीमधल्या गायी एक विशिष्ट प्रकारचं गवत खायच्या. त्यांच्या दुधाला एक खास चव, खास गंध होता. त्या दुधाचा वापर करून जे बटर तयार व्हायचं, ते वापरून तयार केलेली लुसलुशीत, गोड आणि किंचित खारी बिस्किटं म्हणजे ही फेमस श्रुजबेरी बिस्किटं. सुलुमन इराणी यांनी भारतात मिळणार्‍या बटरचा वापर करून इंडियन वर्जनची श्रुजबेरी बिस्किटे तयार केली. त्यामध्ये बटर, अंडे, साखर, आणि मैदा असायचा. आणखीन एक विशेष म्हणजे तेव्हा ही बिस्किटे हाताने तयार करण्यात येत असत, त्यामुळे त्याची मजा काही वेगळीच असे. तेव्हा बेकरीमध्ये बिस्किटे बरणीमध्ये ठेवली जात. सुलुमन इथे येणार्‍या प्रत्येक ग्राहकाला एक बिस्कीट देखील देत असत. शेरियार सांगतात की एकेकाळी ग्राहक आम्हाला कच्चा माल आणून देत आणि आम्ही त्याचा ब्रेड किंवा बिस्कीटं करून देत असू. पण, ग्राहकांनी दिलेला कच्चा माल त्यांच्या अपेक्षित दर्जाचा नसेल तर आम्ही ग्राहकांना तो पदार्थ बनवायला नकार देत असू.

५० पैसे ब्रेड…
रॉयल बेकरीचा ब्रेड प्रसिद्ध आहे. इथे मिळणार्‍या, खास दुधापासून तयार केलेल्या मिल्कोविटा या ब्रेडची चव दीर्घकाळ जिभेवर रेंगाळते. आश्चर्याची खास गोष्ट म्हणजे १९३०पासून बाजारात असणार्‍या या ब्रेडचे पेटंट घेण्यात आलेले आहे. १९७३-७४च्या दरम्यान, ब्रेडची किंमत ५० पैसे होती. तेव्हा ब्रेड कापून म्हणजे स्लाइस करून हवा असेल, तर त्यासाठी ५ पैसे अधिकचे घेतले जायचे. रॉयल बेकरीमध्ये ब्रेड कापण्याचे मशीन होते. तेव्हा आतासारखी मशिनरी नसल्याने ब्रेडचे पीठ हाताने मळले जायचे. बिस्किटे, ब्रेड यांची पिठे हातांनी मळली गेल्याने त्या पदार्थांमध्ये चव चांगली येत असे. काळ बदलत गेला तरी रॉयल बेकरीच्या श्रुजबेरी बिस्किटांच्या चवीमध्ये आजतागायत कोणताही फरक पडलेला नाही. आजही हे बिस्किट तोंडात टाकले की एका क्षणात ते विरघळते. बटरचा स्वाद दीर्घकाळ राहतो. शाकाहारी ग्राहक वाढल्याने इतर अनेक पदार्थांप्रमाणे श्रुजबेरी बिस्किटांमध्ये आता अंडे वापरले जात नाही, ही बिस्किटे आता एगलेस श्रुजबेरी म्हणून प्रसिद्ध आहेत. १९६०मध्ये तयार करण्यात आलेल्या काजू बिस्किटांचीही लोकप्रियता कमी नाही. नव्या काळाशी सुसंगत असा सिनेमन रोलही तरुण ग्राहकांना इथे खेचून आणतो.

‘बटासा’ची गोष्ट…..
इलायची आणि बटरचा वापर तयार केलेला पदार्थ म्हणून इथला ‘बटासा’ फेमस आहे. शेरियार सांगतात, सुरुवातीला आजोबा हा पदार्थ तयार करायचे आणि त्याची चव बरोबर आहे का, याची तपासणी करण्यासाठी ते तो घरी घेऊन यायचे. माझी आजी त्याची चव टेस्ट करायची, त्यामधून ‘बटासा’चा लौकिक वाढत गेला आणि लोकांना त्याची चव आवडू लागली. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हा पदार्थ भारी आवडीचा होता.

राज कपूर, डेव्हिड, रती अग्निहोत्री…
प्रसिद्ध अभिनेते राज कपूर हे लोणीमध्ये शूटिंगसाठी येत असत तेव्हा कधी-कधी ते रॉयल बेकरीकडे येत असत. इथल्या पदार्थांवर त्यांचे विशेष प्रेम होते. माझ्या आजोबांचा आणि त्यांचा वेगळा स्नेह देखील होता. या खेरीज डेव्हिड, अभिनेत्री रती अग्निहोत्री, गायिका पिनाझ मसानी अशी अनेक प्रसिद्ध ग्लॅमरस मंडळी इथे कायम येत असत, असे शेरियार इराणी सांगतात.

स्वत: मेल्याखेरीज स्वर्ग दिसत नाही…
आपण बेकरीमध्ये जे पदार्थ तयार करतो त्याला पर्सनल टच हवाच. तो असेल तर हा पदार्थ उत्तम बनतो. माझे आजोबा, वडील आणि आता मी व माझा मुलगा आमच्या सगळ्यांचे इथल्या प्रत्येक पदार्थांच्या निर्मितीवर बारीक लक्ष असते. ग्राहक हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, त्यामुळे त्याला फसवायचे नाही, हे तत्त्व आम्ही पहिल्यापासून पाळत आलो, त्यामुळेच आजही ग्राहकांची चौथी पिढी आमच्याकडे खरेदी करण्यासाठी येतात, असे शेरियार सांगतात. काही दिवसांपूर्वी कॅनडात स्थायिक असणारे एक ग्राहक २५ वर्षांनी पुण्यात आले होते. एकदा सकाळी ते बेकरीमध्ये आले. पुणे किती बदलत चालले आहे, पण तुमच्या बेकरीमध्ये मिळणार्‍या पदार्थांची चव, बेकरीची ठेवण यामध्ये काहीच बदल झालेला नाही, त्याबद्दल खरंच तुमचे कौतुक करावे तेवढे थोडे असे म्हणत, त्यांनी शेरियार यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली. शेरियार यांच्या मित्रांची मुलगी जलतरणपटू होती. कुठे स्पर्धा असली की ती त्यांच्याकडून श्रुजबेरीची बिस्किटे घेऊन जात असे. सरावाला जाण्याअगोदर, स्पर्धेच्या आधी ती पाच बिस्किटे खात असे, त्यामधून आपल्याला चांगली एनर्जी मिळते असे ती नेहमी म्हणत असे.

या कारणामुळे पॅटीस नाही…
पन्नासेक वर्षांपूर्वी रॉयल बेकरीत मटण पफ (मटण पॅटीस) संध्याकाळच्या वेळी मिळत असत. संध्याकाळी चार वाजता त्यासाठी बेकरीच्या बाहेर लाईन लागायची. पॅटिस दररोज तयार होत आणि ते लगेच संपत असत. पॅटिससाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असे, त्यामुळे पॅटिस संपल्यामुळे काही जणांना नाराज होऊन परत जावे लागत असे. केवळ काही ग्राहक नाराज होऊन परत जातात म्हणून शेरियार यांनी पॅटीस विकणे बंद केले, अशी त्यांची ग्राहकनिष्ठा. ती आहे म्हणूनच आजच्या स्पर्धेच्या युगातही नवे ग्राहक या बेकरीचा पत्ता शोधत येतात आणि श्रुजबेरी बिस्कीट तोंडात टाकताच त्यांचा चेहरा उजळतो, हे इराणी कुटुंबियांनी केलेल्या ११२ वर्षांच्या तपश्चर्येचे फळच म्हणावे लागेल.

Previous Post

अजबाच्या देशात

Next Post

अखेर दागिनेचोर सापडलाच…

Next Post
अखेर दागिनेचोर सापडलाच…

अखेर दागिनेचोर सापडलाच...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.