पूर्वसुत्र- रोशनसेठच्या दागिन्यांच्या दुकानावर दिवाळीच्या सुटीत दरोडा पडला आणि सगळे दागिने आणि हातखर्चाचे दोन लाख रुपये गायब झाले. इन्स्पेक्टर साबळे यांच्या लक्षात आलं की दागिनेचोर सीसीटीव्हीमधून आपल्याला वाकुल्या दाखवून गेला, त्याने जणू पोलिसांना आव्हानच दिलं. त्याचा माग काढताना त्याने दिलेले चकवे ओळखून त्यांतून बाहेर पडता पडता इन्स्पेक्टर साबळे यांच्या डोक्याचा भुगा झाला. त्याने एका व्यवहारात वापरलेल्या कार्ड आणि मोबाइल नंबरवरून त्याचा माग लागलाच असं वाटत असताना त्यांना कळलं की हे कार्ड त्याने एका मृत व्यक्तीच्या, एका भिकार्याच्या पत्नीकडून खरेदी केलं आहे…इथून पुढे तपास करायचा तरी कसा?
इ न्स्पेक्टर साबळे सुन्न झाले होते. काय करावे हे त्यांना सुचत नव्हते. त्यांनी दिवंगत चौबे याच्या पत्नीला विचारले की ज्याने कार्ड खरेदी केले, तो तुला डायरेक्ट भेटला की अजून कोणी त्याच्यासोबत होते? तुझी त्याच्याशी ओळख कशी झाली? ती म्हणाली, नाक्यावर मी जिथे भीक मागते तिथे चंदन नावाची मुलगी भंगार गोळा करते, कधी गांजा विकते. ती होती त्या माणसासोबत. साबळे आणि टीमने लगेच आपला मोर्चा नाक्यावर नेला. तेथील जागेची रेकी करून खासगी वेशात गस्त चालू केली. त्यांनी सर्वांना सूचना दिली की चंदन दिसली तरी तिच्यावर फक्त लक्ष ठेवायचे, तिला हटकायचे नाही. तिच्या नकळत तिचा फोटो काढून साबळे यांना पाठवायचा. साबळे पोलीस स्टेशनमध्ये चंदनला ओळखणार्या भंगारवेचक खबर्याला घेऊन थांबले होते. तिला सर्वांसमक्ष तिला उचलले तर त्या एरियात सगळ्यांना कळेल आणि चोरापर्यंत बातमी जाईल आणि तो फरार होईल, हे ते ओळखून होते. शिवाय चंदनला काही माहिती असो नसो, पोलीस तिच्यापर्यंत येऊन गेले हे चोराला कळले की तो अलर्ट होईल. त्यापेक्षा आपण पोलिसांना गुंगारा दिला आहे, याच भ्रमात त्याला गाफील ठेवणे बरे होते. त्या भ्रमात तो एखादी चूक करील आणि तीच चूक आपल्याला त्याच्यापर्यंत घेऊन जाईल हा विश्वास साबळेंना होता.
सकाळपासून सगळे पथक दबा धरून बसले होते. संध्याकाळी सात वाजता चंदनच्या वर्णनाची एक मुलगी भडक मेकअप करून नाक्यावर आली. दबा धरलेल्या पथकाने तिचा गुपचूप फोटो काढून साबळे यांना पाठविला. साबळे यांनी खबर्याकडून हीच चंदन असल्याची खातरजमा करायला सांगितली. मग साबळे यांच्या प्लॅनप्रमाणे पोलिसांनी पैसे देऊन पढवलेल्या स्थानिक गर्दुल्ल्याला तिच्याकडे पाठवले गेले. त्याने पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे चंदनला सांगितले की रेल्वे पटरीच्या बाजूला काल काम झाले आहे, तिथे खूप भंगार पडले आहे. बाकीच्या भंगारवाल्या बायका घेऊन जाण्याच्या आत तू ते उचल. कमीत कमी तीन हजाराचं भंगार असेल. मला फक्त २०० रुपये पुडीसाठी दे. रात्रभर फिरल्यावर हजार रुपयाच्या आसपास भंगार मिळते, त्याच्या तिप्पट एका झटक्यात मिळणार म्हटल्यावर चंदन तयार होईल, याची पोलिसांना खात्री होती. तसंच झालं. चंदन रेल्वे रुळांजवळ येताच पोलिसांनी तिला पकडले आणि खासगी गाडीत घालून कोणालाही कळायच्या आत त्यांनी पोलीस स्टेशन गाठले.
चंदनकडे चौकशी करून आणि माहिती घेऊन तिला सोडून देऊ, असा विचार इन्स्पेक्टर साबळे करीत होते, तेवढ्यात त्यांची टीम चंदनला घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली. साबळे डीबीच्या रूममध्ये पोहोचले आणि चंदनचा भडक मेकअप पाहताच त्यांना तिच्या पेशाची कल्पना आली. त्यांच्या नजरेने एक गोष्ट लगेच पकडली, तिच्या डाव्या हाताच्या बोटात एक हिरेजडित सोन्याची अंगठी होती. त्यांनी ती काढून घेतली आणि तिचा फोटो काढून रोशन सेठ यांना पाठवला. त्यांनी ती चोरीला गेलेल्या सोनाच्या दागिन्यांपैकीच एक असल्याचे सांगितले. हे ऐकताच साबळेंचा चेहरा खुलला.
पोलिसांना सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणारी चंदन हिला पोलिसी खाक्या दाखवताच तिने खरे बोलायला सुरुवात केली. राकेश कावरा हा चंदनचा प्रियकर होता. त्यानेच ही अंगठी तिला दिली होती. उद्या सकाळी आम्ही राकेशच्या गावी जाणार आहोत आणि तिथे लग्न करणार आहोत, असं चंदनने सांगितलं. शिवाय पुढे काही दिवसांनी दिल्लीला जाऊन छोटामोठा धंदा करणार आहोत, पुन्हा इकडे येणार नाही, असंही तिने सांगितलं. राकेश चंदनला नेहमीच असं सांगायचा, पण पुढे काही व्हायचं नाही. त्यामुळे चंदनने त्याच्याशी भांडण करून त्याला यानंतर भेटणारच नाही असं सांगितलं. तेव्हा त्याने प्रेमाचं प्रतीक म्हणून तिला ही अंगठी दिली होती. त्याने तिला बजावलं होतं की आपला प्लॅन कोणाला सांगू नको आणि ही अंगठी पण लगेच घालू नकोस, गावी गेल्यावर घाल. अर्थात, चंदनच्या बायकी उत्साहाने या इशार्याकडे दुर्लक्ष केलं होतं.
साबळेंनी विचारलं की राकेशने हे दागिने कुठून आणले, हे तू त्याला विचारलंस का? त्यावर चंदन म्हणाली, त्याला मटका लागला. त्याच पैशातून त्याने अंगठी आणली आहे. त्याचा ठावठिकाणा सांगायला ती तयार होईना तेव्हा साबळे म्हणाले, चंदन, तू एक तर त्याला पकडायला आम्हाला मदत कर, आम्ही तुला साक्षीदार बनवू. नाही तर चोरीचा माल तुझ्याकडे सापडलेला आहे, म्हणून तुला पण आरोपी बनवावं लागेल. काय करायचं ते तू ठरव. ही गोळी लागू प्ाडली. चंदनने घाबरून सांगितलं की आज आम्ही रॉयल मॉल इथे रात्री सिनेमा पाहायला जाणार आहोत. तो मला साडेआठ वाजता मॉलसमोरच्या बस स्टॉपजवळ भेटणार आहे.
साडेसात वाजले होते. दोन महिला पोलीस आणि काही डीबीचे कर्मचारी साध्या वेशात घेऊन साबळे बस स्टॉपवर दबा धरू बसले. राकेश जवळ येईल त्यावेळी केसांतून हात फिरव, हा आमच्यासाठी इशारा असेल, हे त्यांनी चंदनला सांगितले होते. जवळजवळ पाऊणे नऊ झाले तरी तो आला नाही, त्यामुळे सर्वांनाच काळजी वाटू लागली. आपली खबर तर लागली नाही ना? आपलं प्लॅनिंग तर बरोबर आहे ना? चंदन सगळं खरंच सांगत आहे ना? असे प्रश्न सर्वांच्या काळजाचे ठोके चुकवत होते.
इतक्यात एक रिक्षा बस स्टॉपजवळ येऊन थांबली. त्यातून एक तरुण उतरून चंदनजवळ गेला. तिची देहबोली आणि चुळबुळ पाहून साबळे यांची खात्री झाली की हाच राकेश आहे. त्यांनी कोणालाही काही कळायच्या आत त्याच्यावर झडप घालून त्याला पकडले. दोघांना पोलीस ठाण्यात घेऊन आल्यावर साबळे यांनी डेंटिस्टला बोलावून त्यांच्याकडे येणारा पेशंट हाच होता, याची खात्री करून घेतली. अखेर चकवे देणारा चोर तर सापडला! आता चोरीचा माल हस्तगत करायचा होता आणि चोरीचा प्लॅन कसा शिजला, यात कोणकोण सामील आहे हे शोधायचं होते. साबळेंनी पोलिसी खाक्या दाखवताच चंदनने गुन्हा कबूल केला. चंदनकडे उद्या गावी जाण्यासाठी बॅग ठेवली आहे, तिच्यात चोरीचा माल असून बॅगेची चावी पाकिटात असल्याचे सांगितले. साबळे यांनी लगेच त्याला सोबत नेऊन सांगितल्यानुसार सर्व सोने रिकव्हर केले.
आता साबळेंपुढे प्रश्न होता की एवढी मोठी चोरी एकटा माणूस करू शकत नाही. याने कोणाची मदत घेतली, दुकानातील कोणी याला सामील होते का? राकेशला अटक करून पंचनामा वगैरे सोपस्कार झाल्यावर घरी न जाता ते पोलीस स्टेशनला थांबून राहिले आणि त्यांनी राकेशला लॉक अपमधून बाहेर काढून इंटरॉगेशन सुरू केलं. सुरुवातीला उडवाउडवी करणारा राकेश पोलिसांसमोर टिकू शकला नाही. मात्र, शेवटी त्याने जे संगितले ते ऐकून साबळे आणि पथक अचंबित झाले.
राकेश दहा दिवसांपूर्वी मित्रासोबत वेदांत डेंटिस्टमध्ये त्याच्या ट्रीटमेंटसाठी गेलो होतो. मित्राच्या ट्रीटमेंटला वेळ लागणार म्हणून तो समोर चहाच्या टपरीवर थांबला होता. दुपारचे चार वाजले होते. तिथे तीन जण चहा पीत राकेशच्या शेजारी बसले होते. त्यांच्यातला एक जण दुसर्याला सांगत होता की मालकाला दिवाळीत मुलीकडे शनिवार आणि रविवारी जायचं आहे. मालक मला म्हणतोय की नेहमीप्रमाणे दुकान बंद झाल्यावर सर्व दागिने घरी घेऊन जाऊ शकत नाही. कारण घराला वॉचमन नाही आणि बँकेला सलग सुट्ट्या असल्यामुळे दागिने लॉकरमध्ये ठेवू शकत नाही, तर तू शुक्रवार आणि शनिवार रात्री दुकानात थांब. कमीत कमी अर्धा किलो सोने असणार आहे, अरे, आम्हाला काय फॅमिली नाही का? दिवाळीच्या सणाला बायकापोरं सोडून यांच्या दुकानात त्या वॉचमनबरोबर झोपू काय? तो वॉचमन रात्री दारू पिऊन असतो. कधी पण पहावे तर झोपलेला असतो. मी सरळ नाही सांगितलं. मालकांनी सगळ्यांना विचारलं, पण कोणीही त्याला हो म्हणाले नाही. शेवटी असे ठरले होते की सोने दुकानातच राहील. शनिवारी आणि रविवारी रात्री आणखी एक वॉचमन ठेवायचा आणि त्याला दोन दिवसांचा पगार द्यायचा. म्हणजे एक तर बोनस नाही, उलट सणाच्या दिवशी वॉचमन म्हणून काम करायचा वैताग आला आहे.
राकेशच्या डोक्यात बत्ती पेटली… तेवढ्यात त्या तिघांपैकी दुसर्याने वेगळाच विषय काढला. तो म्हणाला, अरे, तुला भावाला स्नॅक सेंटर टाकून द्यायचे होते ना? मग आपल्या दुकानाच्या बाजूचा, मध्ये एकच भिंत असलेला तो गाळा बंद आहे. तो भाड्याने घेऊन दे की त्याला. तुलाही त्याला मदत करता येईल. त्यावर दुसरा म्हणाला, अरे त्याला पोलिसांनी सील लावले आहे. पतपेढी होती तिथे, काही तरी प्रâॉड झाला होता तिथे. निकाल लागेपर्यंत तो काही उघडणार नाही. तिसरा माणूस म्हणाला, अरे, त्या गाळ्याच्या मागे नाला आहे घाणेरडा. कोण तिथे खायला येईल? किती झाडी आहे तिथे. किती घाण वास येतो, इमारतही फार जुनी आहे. सगळं प्लास्टर निघालंय. दुसर्या ठिकाणी बघू.
चल बाबा, उशीर झाला तर मालक परत बोंबलत बसेल, म्हणत ते निघून गेले आणि राकेश मात्र एका जागी खिळून राहिला. त्याला तर आयुष्यात मोठा हात मारण्याची संधी चालून आली असेच वाटले. लघवीच्या बहाण्याने त्याने गाळ्याच्या पाठीमागे जाऊन पाहिले, सगळं त्या ज्वेलरच्या दुकानातल्या कर्मचार्यांनी वर्णन केल्यासारखंच होतं. त्याच्या डोक्यात प्लॅन शिजला. एक छन्नी, छोटी हातोडी आणि एक स्क्रू ड्रायव्हर घेऊन, सोबत दोन दिवस पुरेल एवढे खायला घेऊन तो गुरुवारी रात्री दुकान बंद झाल्यावर गाळ्याच्या मागे पोहोचला आणि झुडपात बसून स्क्रू ड्रायव्हरने हळूहळू घासून एक एक वीट काढून त्याने भगदाड पाडले. या कामाला सकाळ झाली. भगदाडातून तो आत गेला आणि परत एकवर एक वीट ठेवून त्याने ते भगदाड बंद केले. त्यानंतर सोनाराच्या दुकानाची एक एक वीट त्याने स्क्रू ड्रायव्हरने कोरून काढली. या १२ विटा काढून भगदाड पाडायला त्याला शुक्रवार पहाटेपासून शनिवारी रात्रीच्या दीड वाजेपर्यंत वेळ लागला होता. आत गेल्यावर कागद जाळून उजेड करून स्क्रू ड्रायव्हरने ड्रॉवर उघडून सोनं, पैसे घेऊन तो गेल्या मार्गाने बाहेर आला.
राकेश साबळेंना सांगत होता, मला माहित होते की मी सीसी कॅमेर्यात दिसलो तर त्याप्रमाणे तपास होणार, मी मोबाईलमध्ये बोलताना दिसलो की नंबर शोधायचा प्रयत्न होणार. म्हणून मी सीमकार्ड नसलेला मोबाईल उगाच कानाला लावून फिरत होतो. पोलिसांना फसवण्यासाठीच मी रेल्वेत बसलो, मला वाटलं होतं की कॅमेर्यात पाहून तपासासाठी वाराणसीला पोलीस जातील. तिथून ते परत येईपर्यंत मी चंदनला घेऊन गावी गेलेलो असेन. मग त्याने उत्सुकतेने विचारलं, साहेब, तुम्ही कसे माझ्यापर्यंत पोहोचलात, हेच मला कळत नाही. सांगा ना साहेब?
इन्स्पेक्टर साबळेंनी त्याला उलट विचारले, तुला पोलिसांच्या तपासाबद्दल कसं माहिती?
राकेश म्हणाला, मागच्या महिन्यात पत्ते खेळताना भांडणातून मारामारी झाली. पोलिसांनी तीन दिवस लॉकअपमध्ये ठेवले होते. तिथे बाकीच्या आरोपींकडून ही माहिती मिळाली. सांगा ना माझ्यापर्यंत कसे पोहोचलात?
हसून इन्स्पेक्टर साबळे म्हणाले, तुला तुझ्याच बुटाने मारले पाहिजे.
राकेश आधी गोंधळात पडला… मग त्याचे डोळे विस्फारले… बुरख्यात दडूनही आपल्या बुटांनी आपल्याला पकडून दिलं, हे लक्षात आल्यावर त्याने स्वत:ला कोसायला सुरुवात केली…
घरी जाताना साबळे स्वत:शी बोलत होते, रोशनसेठने चिंगूसपणा न करता कामगारांना दुकानात चहा देण्याची व्यवस्था केली असती, तरी ही चोरी टळू शकली असती. आपण सार्वजनिक ठिकाणी किती बेजबाबदारपणे वागत असतो… तेवढ्यात फोन वाजला, त्यांनी फोन उचलला आणि ते उत्साहाने बोलू लागले, हो पोहचतोच आहे, पाने वाढायला घ्या…

