अजबाच्या देशात
सगळेच एकाच गणवेषात
नारे देत आवेशात
चालले नव्या अभिनिवेषात
विविधतेच्या भूमीत
एकरंगाची बीजे
ह्यांचा टाळही वाजे
कर्णकर्कश्श सुरात
बात देशाची
पुस्तकं द्वेषाची
गाणी दुहीची
फाडत पाने
संविधानाच्या वहीची
रिळं पहा, प्रोपोगंडा पहा
जाहिराती पहा, बॅनर पहा
इव्हेंट पहा
सर्व निर्मित सत्य मोफत पहा
मेंदू तेवढा बासनात बांधून ठेवा
अजबाच्या देशात
दुहीची दरी
सबसे बरी
मेरे धरमकी बातही खरी
चढू सत्तेचं सोपान
बोलू `मेरा भारत महान’!
अजबाच्या देशात फक्त ऐका
पण बोलू नका
तर्काला तिलांजली
बना केवळ पालखीचे भोई
ह्या मुलखात
मीच ब्रह्म
मीच इंद्र
मीच विष्णू
राजाला प्रश्न विचारु नका
अजबाच्या देशात

