• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

बोलाचाच भात…

विलास कुमार खाणार्‍याने खात जावे

Marmik Team by Marmik Team
July 24, 2026
in खानपान, विशेष लेख
0
बोलाचाच भात…

फेसबुक कुणीतरी रिकामटेकड्या मित्रानं एका, उदा. ‘महाराष्ट्र किचन’ असे काहीसे नाव असलेल्या ग्रुपचा सभासद होण्याचं सुचवलं. काहीतरी वेगळ्या रुचकर पदार्थांच्या रेसिपी पहायला मिळतील आणि आपले ज्ञान वृद्धिंगत होईल ह्या उद्देशाने मी त्याच्या सूचनेला फारसा विचार न करता अनुमोदन देऊन टाकले. जी गोष्ट सहज आणि फुकट मिळते त्या गोष्टीबद्दल मनुष्य जास्त विचार कुठे करतो? पण लवकरच माझा अपेक्षाभंग झाला.

एवढे सभासद असूनसुद्धा बरेच दिवस तर तिथे एकही पोस्ट दिसली नाही. अचानक एक दिवस एका बाईने कटिंग बोर्ड म्हणजे भाजी कापायची फळी प्लास्टिकची स्टीलची की लाकडाची चांगली? हा प्रश्न केला. आता एवढ्या लोकांची मते पण वेगवेगळीच असणार ना? कुणी प्लास्टिकची चांगली आहे असं सांगितलं, कुणी खूप वर्षांपासून आम्ही लाकडी फळी वापरतो असं सांगितलं, तर काहींनी स्टीलची सगळ्यात चांगली असं सुचवून त्या आधीच गोंधळलेल्या बाईला अजूनच गोंधळात पाडले! तिने आता एकतर तिन्ही फळ्या घेतल्या असाव्या किंवा एकही फळी न घेता परस्पर किचनच्या ओट्यावरच भाजी चिरणे चालू केले असावे!
काही दिवसानंतर अजून एका बाईने ‘डिश वॉशर’ (म्हणजे भांडी धुण्याचे मशीन) कुठला घ्यावा याबद्दल सल्ला विचारला. लगेच बरेच झोपलेले सदस्य जागे झाले आणि त्यांनी ह्या प्रश्नावर उलट सुलट चर्चा सुरू केली. लगोलग काही जणींनी भारतात या मशीनचा शोध लागण्यापूर्वीपासून आम्ही कसे फॉरेनवरून मशीन आयात करून फार वर्षांपूर्वीपासून वापरत आहोत, अशी शेखी मिरवली. काहींनी काही विदेशी ब्रँड सुचवले म्हणून काही देशप्रेमी लोकांनी देशी ब्रँड सुचवले. डिश वॉशरमधून भांडी कशी अगदी नवी कोरी असल्यासारखी चकचकीत धुवून निघतात अशी त्या मशीनची स्तुती झाली. मग कोणीतरी हळूच डिश वॉशरची किंमत विचारली. किंमत ऐकल्यावर मात्र यापेक्षा भांडीवाली बाई आपल्याला परवडण्यासारखी आहे हे काहींच्या लक्षात आले. मग मात्र त्या यंत्राचे दोष एक एक करून आठवायला लागले. त्या यंत्रामध्ये भांडी धुण्याचे अर्धे काम आपल्यालाच करावे लागते. वीजही खूप लागते. जास्त वेळ लागतो आणि पाण्याचा पण सतत जोर असला पाहिजे,अशा त्रुटी कोणीतरी लक्षात आणून दिल्या. भांडीवाली बाई भांडी घासण्यासाठी ओटा पण आवरून घेते, तसे हे मशीन घेत नाही. त्या बदल्यात बाईला वर्षातून एक साडी दिली तरी पुरते. बाईसारख्या इतर चार घरातल्या गुप्त वार्ता मालकिणीला सांगू शकणारे यंत्र बनवणे ह्या एआयच्या जमान्यातही खूपच अवघड आहे! एका बाईने तर कसा तिच्या नणंदच्या मैत्रिणीच्या मावशीचा इंजिनिअर मुलगा, ज्याने एक तरुण मोलकरीण ठेवलेली तर तिच्याच प्रेमात पडून तिला घराची मालकीण कशी बनवली ही सुरस आणि चमत्कारिक कथा सांगायला सुरुवात केली!

एका काकांनी तर एकदा ग्रूपवर भलताच प्रश्न विचारला. ते म्हणे रोज दुधावरची साय काढून फ्रिजमध्ये गोळा करायचे. मग ते कधीतरी विसरले. आता त्यावर मस्त बुरशी चढली होती. ते फेकून द्यायचं त्यांच्या जिवावर आले होते. ती साय खायची की नाही, हा तो प्रश्न होता! नेहमीप्रमाणे काहींनी ‘अजिबात खाऊ नका’ आणि उरलेल्यांनी ‘काही होणार नाही, बिनधास्त खा!’ असे परस्परविरुद्ध सल्ले दिले.
काका अविवाहित असावेत. रोज साय काढणारा मनुष्य लग्न कशाला करेल? इतके कंजूष लोक लग्नकार्यात पैसे वाया घालवत नसतात. एकाने ती साय गरम केल्यावर बुरशी तुपात विलीन होते असे भाकीत केले. काकांचा बरेच दिवस काही मेसेज आला नाही. त्यांनी बहुदा ते खाऊन पंचतत्वात विलीन होण्याचा निर्णय घेतला असावा!

आता कुणी काही रेसिपी टाकत नाही तर आपणच का ते काम करू नये असा विचार करून मी नारायण धारपांच्या एका उत्कंठावर्धक कादंबरीचे (द्विरुक्ती झाली का?) वाचन थांबवून एक रेसिपी लिहायला घेतली. जिज्ञासू वाचकांसाठी ती येथे देत आहे. स्वत:च्या जबाबदारीवर त्यांनी हा पदार्थ तयार करण्यास माझी काहीच हरकत नाही.

रेसिपीचे नाव :- शिराळयाची भाजी (तुम्हाला हवी असली तर दोडक्याची भाजी म्हटले तरी चालेल. नाव बदलले तरी चवीत काहीच फरक पडत नाही!)

साहित्य :- चार-पाच सापासारखी हातभर लांब शिराळी, मूठभर मानवी कवटीच्या रंगासारखे पांढरे फटक काजू, कातळडोहासारखी खोलगट कढई, मांत्रिक मंतरवून टाकतात तसे दोन पिवळे लिंबू, काळ्या बाहुलीच्या पंजाएवढे आले, साडेसात हिरव्या मिरच्या, साडे पंचवीस ग्रॅम गरम मसाला, अघोरी साधूच्या कपाळाला लागते तेवढी हळद, साडे-पाच ग्रॅम मीठ, साडे नऊ मिली गोडेतेल, साडे अकरा लसणाच्या पाकळ्या, अडीच चमचे साखर, एक चमचा, एक झारा, एक वाडगा, एक पेला, कापण्यासाठी वापरतात ती लाकडी फळी, एक आतून कल्हई केलेला पितळी तांब्या, साल काढण्याचे यंत्र, एक धारदार सुरी आणि इतर सामान!

सर्वप्रथम शिराळ्याच्या शिरा साल काढण्याच्या यंत्राने काढून शिराळी नुकत्याच कात टाकलेल्या सापासारखी गुळगुळीत करून घ्यावीत. त्यांचे आपल्या बोटाएवढे (पायाच्या नव्हे, हाताच्या) तुकडे करावेत. हे करताना आपल्या बोटाचे तुकडे पडू नयेत याची खबरदारी घ्यावी. त्यानंतर प्रत्येक बोटाएवढ्या तुकड्याचे अजून बारीक म्हणजे नखाएवढे तुकडे करावेत. मग वाडग्यात काजू घेऊन एकेक तोंडात टाकावा! (मला ही भाजी करायला आवडते ते ह्याचमुळे!) कढईत तेल ओतावे व शेगडी चालू करावी. त्यात कांदा परतून घ्यावा. मिरची लसूण ठेचून टाकावा. मीठ मसाला टाकून शिराळ्याचे तुकडे परतून घ्यावे. त्यावर झाकण ठेवावे. तांब्यात पाणी घेऊन त्यात लिंबू पिळून, साखर मीठ घालून सरबत करावे. ते घोट घोट आरामात पीत बसावे. ते संपले की भाजी तयार!
माझ्या रेसिपीला ग्रुप अ‍ॅडमिनने का कोण जाणे, रिजेक्ट केले! आता ह्या ग्रूपवर राहू की सोडू- तुम्हीच सांगा!

Previous Post

नावडतीची आवडती डाळमेथ्याची उसळ

Next Post

अरनॉल्ड श्वारझेनेगरच्या चरित्रातला ‘रिकॉल’!

Next Post
अरनॉल्ड श्वारझेनेगरच्या चरित्रातला ‘रिकॉल’!

अरनॉल्ड श्वारझेनेगरच्या चरित्रातला ‘रिकॉल’!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.