
इंग्रजी सिनेमाच्या चाहत्याला आणि बॉडीबिल्डिंगचे वेड असणार्याला अरनॉल्ड श्वारझेनेगर माहिती नाही असे होऊ शकत नाही! एक अभिनेता, एक भक्कम शरीरयष्टीचा बॉडी बिल्डर, एक कुटुंब प्रमुख आणि एक राजनेता अशी बहुविध रूपे असलेला हा माणूस अंतर्बाह्य कसा होता हे जाणून घ्यायचे असेल तर, ‘टोटल रिकॉल – माय अनबिलिव्हेबल ट्रू लाईफ स्टोरी’ हे अरनॉल्डने लिहिलेले पुस्तक आवर्जून वाचले पाहिजे. त्यातले साधेपण आणि सरळ मनाने सच्चाई सांगण्याची सुलभ मांडणी वाखाणण्याजोगे आहे. यात स्वतःची स्तुती त्यांनी बर्यापैकी टाळलीय, अर्थातच त्यांच्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडल्या आहेत की, नकळत कुणीही त्यांची स्तुती करेल! स्वतःविषयी सांगताना त्यांनी हातचे काही राखून ठेवलेले नाही, आपल्यातल्या उणिवा आणि आपली कमजोरी देखील त्यांनी खुलेपणाने मांडली आहे. जगात काही आत्मचरित्रे एखाद्या व्यक्तीचा जीवनप्रवास सांगतात; तर काही आत्मचरित्रे माणसाच्या इच्छाशक्तीची व्याख्या बदलून टाकतात.
हॉलिवूडचा सुपरस्टार, सात वेळा मिस्टर ऑलिम्पिया किताबाचा मानकरी, कॅलिफोर्नियाचा गव्हर्नर आणि जगभरातील तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरलेला अरनॉल्ड श्वार्झनेगर यांचे आत्मचरित्र विलक्षण आहे.
पुस्तकाची सुरुवात ऑस्ट्रियातील एका छोट्याशा खेड्यातील मुलापासून होते. दुसर्या महायुद्धानंतरच्या गरिबीने आणि कठोर शिस्तीने वेढलेल्या वातावरणात वाढलेला अरनॉल्ड लहानपणीच एक वेगळे स्वप्न पाहतो- ते म्हणजे, जगातील सर्वात बलाढ्य शरीरसौष्ठवपटू होण्याचे! त्या काळी हे स्वप्न अशक्य वाटण्यासारखे होते. पण अरनॉल्डसाठी स्वप्ने ही केवळ झोपेत पाहण्याची गोष्ट नव्हती; त्याच्यासाठी स्वप्न म्हणजे जागृत अवस्थेत पूर्णत्वात आणण्याची प्रतिज्ञा होती. पुस्तकाचा पहिला भाग शरीरसौष्ठवाच्या जगातील त्याच्या अविश्वसनीय प्रवासाचा आहे. त्याने केलेला सराव, जिमच्या निमित्ताने पोलादासोबतची मैत्री, देहयष्टी घडवण्यासाठी शरीराला दिलेली कठोर शिक्षा आणि प्रत्येक स्पर्धेकडे पाहण्याचा त्याचा विजिगीषू दृष्टिकोन वाचकाला थक्क करून सोडतो. त्याच्या मते, स्नायू आधी शरीरात नव्हे, तर मनात घडतात. शरीर हे केवळ त्या विचारांचे प्रतिबिंब असते.
हे आत्मचरित्र केवळ शरीरसौष्ठवापुरते मर्यादित राहत नाही. हॉलीवूडमध्ये इंग्रजी नीट न बोलणार्या, उच्चारांवरून हसल्या जाणार्या एका परदेशी तरुणाने कॉनन द बार्बेरियनपासून द टर्मिनेटरपर्यंतचा प्रवास कसा केला, याची कहाणीही तितकीच रोमहर्षक आहे. अनेकांनी त्याला नाकारले, त्याच्या नावाची खिल्ली उडवली, त्याचा आवाज चित्रपटांसाठी अयोग्य असल्याचे सांगितले; पण त्याने प्रत्येक नकाराला पुढच्या यशाची पायरी बनवले. याहूनही आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सिनेकारकीर्दीच्या सर्वोच्च शिखरावर असताना त्याने राजकारणात प्रवेश केला आणि कॅलिफोर्नियासारख्या अमेरिकेतील सर्वांत प्रभावशाली राज्याचा गव्हर्नर बनला. जीवनातील प्रत्येक टप्प्यावर त्याने स्वतःला नव्याने घडविले, ही या आत्मचरित्राची सर्वांत मोठी प्रेरणा आहे.

तब्बल साडेसहाशे पानांच्या या पुस्तकातील काही महत्वाच्या नोंदीची दखल नक्कीच घेतली पाहिजे. हॉलीवूडचा हिट नायक म्हटल्यावर त्याच्या आयुष्यात रोमान्स आणि प्रेम यांची बरसात असते ह्या गृहितकाची अरनॉल्डनी मोडतोड केलीय. कुटुंबाच्या गदारोळात अरनॉल्डचं प्रेम फुलू शकले नाही. १९६९ ते १९७४ या काळात बार्बरा आऊटलँड या इंग्लिश शिक्षिकेसोबत तो राहिला. ते अगदी दांपत्यासारखे एकाच छताखाली राहिले! आयुष्याचा जोडीदार म्हणून तिला हवाहवासा असणारा पुरुष हा सामान्य आयुष्य जगणारा प्रेमळ नवरा असला पाहिजे असं तिचं मत होतं आणि अरनॉल्डच्या वाट्याला सामान्य माणसाचे आयुष्य आले नव्हते आणि त्याला तसे जगायचेही नव्हते. अखेर ते विभक्त झाले. मात्र त्यांच्यातले संबंध चांगले राहिले. त्यानंतर १९७७–७८ या दोन वर्षाच्या छोट्याशा काळात बेव्हर्ले हिल्समधील एका हेअरड्रेसरची असिस्टंट असलेल्या स्यू मरे हिच्याशी त्याचे सूत जमले. दरम्यान ऑगस्ट १९७७मध्ये अमेरिकन प्रेसिडेंट जॉन एफ. केनेडी यांची भाची असलेल्या आणि पेशाने दूरचित्रवाणी पत्रकारिता करणार्या मारिया श्रायव्हरशी त्याची भेट झाली. ते दोघे प्रेमात पडले आणि स्यू मरेने त्याच्या आयुष्यातून पाय काढता घेतला. एप्रिल १९८६मध्ये मारियाशी त्याचा विवाह झाला. या दांपत्यास चार अपत्ये झाली.
दरम्यान सत्तरच्या दशकापासूनच त्याचा चित्रपट प्रवास सुरू झाला होता. मात्र हा प्रवासही सुलभ नव्हता. अभिनय करणे हे सुरुवातीला त्याच्यासाठी खूप अवघड झाले होते, त्याच्या एजंटद्वारा त्याला सांगण्यात आले की त्याचा चेहरा खूपच कसनुसा आहे आणि जबडा खूप मोठा आहे. शिवाय त्याचे शरीरही थोडेसे विचित्र आहे, तो एक अजब तर्हेचे उच्चारण करतो, आणि भरीस भर म्हणजे त्याचे नाव खूप मोठे आहे.’ चित्रपटात टिकायचे असेल तर त्याला नाव बदलावे लागेल, असंही सांगितलं गेलं. शिवाय त्याच्यासारख्या आडमाप ठोंब्या माणसासाठी इथे वारंवार संधी नाहीत असंही सुनवलं गेलं.

१९८२ साली प्रदर्शित झालेल्या ‘कॉनन द बार्बेरियन’नंतर त्याने बॉक्स ऑफिसवर अनेक धमाके केले. ‘कॉनन द डिस्ट्रॉयर’ मात्र मोठं अपयश ठरला होता. ‘कमांडो’, ‘प्रिडेटर’, ‘टोटल रिकॉल’,’ ट्रू लाईज’, ‘एक्सपेन्डिबल्स’ यांनी अफाट कमाई केली. त्याच्या ‘टर्मिनेटर’ सिरीजने तर इतिहास रचला. अरनॉल्डने साठ दशलक्ष डॉलर्सच्या मोबदल्यात ‘टर्मिनेटर’मध्ये केवळ काही मोजके शब्द उच्चारले होते. नव्वदच्या दशकातली अखेरची ही पाच वर्षे त्याला खरं सुख देऊन गेली.
त्यानंतरच्या काळात एकामागून एक आपत्ती येत राहिल्या, त्याला विचलित करत राहिल्या. अनेक वर्षापासून कॅन्सरशी लढा देत असलेली त्याची भावजय एरिका हिचे १९९३मध्ये निधन झाले तर त्यानंतर पाचच वर्षांनी त्याची आई ऑरेलिया हिचं हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या शहात्तराव्या वर्षी निधन झालं. अरनॉल्डने पित्याच्या कबरीशेजारीच तिचं दफन केलं. यावेळी त्याच्या मनात कोणत्या भावना असतील हे शब्दांत व्यक्त करणं अवघड आहे. त्याच्या आत्मचरित्रात याचे संवेदनशील उल्लेख आहेत.
अरनॉल्डनं बालपणातल्या प्रतिकूलतेवर मात करत त्याचे रूपांतर संधीत केले हाच गुण त्याच्या राजकीय जीवनात कामी आला. खेरीज पडेल ते काम मनापासून करण्याची त्याची तयारी होती ज्याची चुणूक त्याने १९६५मध्ये ऑस्ट्रियन तरुणांना अनिवार्य असलेल्या लष्करी सेवेत दाखवली होती. त्याचा सच्चेपणा वाखाणण्याजोगा होता. त्याचे आणखी एक पुस्तक ‘अरनॉल्ड अँड स्टिरॉइडस : ट्रूथ रिव्हिल्ड’, ह्यामध्ये तो स्टिरॉइडसेवनाची कबुली देतो, पण त्याची मात्रा आणि त्याचा उपयोग, दुरुपयोग यावरही कटाक्ष टाकतो. त्याने केलेला स्टिरॉइडचा वापर हा स्नायू बिल्ड करण्यासाठीचा नसून स्नायू बळकट ठेवण्यासाठीचा होता हेही त्याने त्यात स्पष्ट केले. त्याच्या या स्पष्टोक्तीमुळे त्याला मनस्ताप सहन करावा लागला. डॉ. विली हेप या जर्मन डॉक्टरने लवकरच अरनॉल्डचा हृदयविकाराने मृत्यू होईल असे सांगितलं तर ‘ग्लोब’ या अमेरिकन टॅब्लॉइड वृत्तपत्राने त्याच्या मृत्यूचीभविष्यवाणी केली. या दोहोंवर त्याने दावे ठोकले आणि त्यांना नमवले.
चित्रपट, राजकारण आणि समाजकारण या तिन्ही प्रांतांत तो यशस्वी झाला. २००३ ते २०११ अशी सलग दहा वर्षे तो कॅलिफोर्निया प्रांताचा गव्हर्नर होता. सार्वजनिक जीवनातले त्याचे वर्तन चांगले असूनही त्याच्यावर महिलांच्या शोषणापासून ते आरोपींना पाठीशी घालण्यापर्यंतचे विविध आरोप झाले. यातून त्याचे ऑस्ट्रियाचे दुहेरी नागरिकत्व धोक्यात आले होते. हॉटेल्स, मॉल्ससह, फिटनेस इंडस्ट्रीच्या विविध उद्योगात त्याने पैसे गुंतवले. मात्र त्याची एक इच्छा अपुरीच राहिली, त्याला त्याच्या मुलांना त्याच्यासारखे बलदंड करायचे होते, ते या गदारोळात राहून गेले. त्याला क्रिस्टिना आणि कॅथरीन या दोन मुली झाल्या. तर पॅट्रिक आणि ख्रिस्तोफर ही दोन मुले झाली. विवाहपूर्व ओळखीच्या सलगीने त्याची हाऊसकीपर मॉड्रिड बेना हिच्याशी पुढील काळात झालेल्या संबंधातून त्याचा तिसरा मुलगा जोसेफ बेना हा जन्मास आला. ही बाब अरनॉल्डनं सार्वजनिकरित्या स्वीकारली आणि त्याच्या पंचवीस वर्षाच्या वैवाहिक जीवनात खळबळ उडाली. त्यातच २०११मध्ये पत्नी मारियाने त्याच्यापासून घटस्फोट मिळण्यासाठी अर्ज केला.

त्याच्या मुलांमध्ये पॅट्रिकला चित्रपटात जेमतेम यश मिळाले, पण त्याची देहयष्टी मध्यमच राहिली. तर जोसेफने थोडीफार शरीरयष्टी कमावलीय पण अरनॉल्डच्या तुलनेत ती नगण्यच म्हणावी लागेल. अरनॉल्डला मात्र खात्री वाटते की भविष्यात जोसेफ उत्कृष्ट बॉडी बिल्डर होईल, कारण त्याचा कोच हाच त्याचा पिता आहे! त्याचा धाकटा मुलगा ख्रिस्तोफर हा तर लठ्ठ वर्गात मोडावा इतका जाड झाला आहे. आपल्या आत्मचरित्रात तो आशा व्यक्त करतो की, ‘मारियाशी अजून कायदेशीर काडीमोड झालेला नाही आणि ती कधी न कधी त्याला समजून घेईल आणि त्याच्या आयुष्यात परत येईल.’ घटस्फोटाच्या दाव्यानंतर त्याने मुलांची संपूर्ण जबाबदारी घेतली. तथापि, त्याचा असा दावा होता की, ते उभयता अजूनही रीतसर विभक्त झालेले नव्हते. कारण मारियाने सात वर्षांपूर्वी दाखल केलेल्या घटस्फोट कागदपत्रांवर स्वाक्षरी केलेली नव्हती. आयुष्यभर एका ठराविक अंतराने माणसं गमावलेल्या अरनॉल्डला उतारवयात आयुष्याचा जोडीदार परतण्याची तीव्र प्रतीक्षा आहे.
अरनॉल्डच्या आयुष्यात अपघातही पुष्कळ घडलेत. अरनॉल्ड हा जन्मतः बायस्क्युपिड एओर्टिक व्हॉल्व्हच्या हृदयविकाराने ग्रस्त आहे. यात हृदयाच्या मुख्य रक्तवाहिनीचे (आर्टरी) दोन टप्पे एकमेकांशी संयोग पावतात आणि तीन अर्टेरिक कप्प्यांऐवजी दोन कप्पे राहतात. १९९७मध्ये हार्ट व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट सर्जरीत त्याच्याच बॉडी टिश्यूपासून बनवल्या गेलेल्या कप्प्याचे रोपण करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांचे आयुष्य आठ वर्षांचेच असणार, असे सांगितले. यातून सुटका करण्यासाठी ओपन हार्ट सर्जरीद्वारा यांत्रिक व्हॉल्व्ह बसवणे अपरिहार्य होते. ते त्याने दीर्घकाळ टाळले. परंतु मार्च २०१८मध्ये त्याची ओपन हार्ट सर्जरी यशस्वीरित्या पार पडल्याचे त्यानेच ट्विट करून सांगितले. तत्पूर्वी ९ डिसेंबर २००१ रोजी झालेल्या मोटर सायकल अपघातात त्याच्या सहा बरगड्या तुटल्या होत्या. तर ८ जानेवारी २००६ रोजी कारमध्ये जाणार्या पॅट्रिकसोबत अरनॉल्डची हार्ले डेव्हिडसनवरून सफारी सुरू होती, पण समोरून आलेल्या वाहनाशी टक्कर टाळण्याच्या नादात बापलेकच एकमेकाला धडकले, अर्थात पॅट्रिकला काही इजा झाली नाही, पण अरनॉल्डच्या ओठाला मार बसला, त्याला तब्बल पंधरा टाके घालावे लागले. ब्लेन प्रांतातील सन व्हॅली येथे स्कीइंग करताना घसरून झालेल्या अपघातात २३ डिसेंबर २००६ रोजी त्याच्या मांडीचे फीमर हे मुख्य हाड मोडले होते. जून २००९मध्ये त्याच्या विमानाचा अपघात टळला. अपघाताच्या अशा अनेक घटनांना त्याने दणकट शरीराच्या जोरावर लीलया तोंड दिलं.
दशकभरापूर्वी अरनॉल्डसंबंधीची एक पोस्ट सोशल मीडियावर खास करून व्हॉट्सअॅपवर खूप व्हायरल झाली होती. अरनॉल्डने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर १६ जानेवारी २०१६ रोजी स्वतःच्या पुतळ्याखाली रस्त्यावर झोपलेला एक फोटो पोस्ट करत त्याखाली चार शब्द लिहिले होते – ‘how times have changed!’ (काळ कसा बदलतो) खरे तर यातून अरनॉल्डला सूचित करायचे होते की, एके काळी त्याचे पुतळे उभारले जायचे, इतका मोठा फिटनेस जायंट आणि फेमस होता तो! आता तो रस्त्यावरही निवांत झोपी जाऊ शकतो! अरनॉल्डने पोस्ट केली एका अर्थाने आणि नेटिझन्सनी तो वेगळ्याच अर्थाने घेऊन त्याची पार चव घालवली. तथाकथित दयनीय, केविलवाण्या अवस्थेत येऊन पोहोचलेल्या अरनॉल्डबद्दल सहानुभूतीची खरडेघाशी त्यांनी केली होती. त्यात ‘how times have changed !’ (काळ कसा बदलतो) हेच शीर्षक देत म्हटलं होतं की, ‘अरनॉल्डने हे वाक्य लिहिलेय कारण तो फक्त वृद्ध झालाय! लोकांनी त्याच्यावर तोंडसुख घेतले! काहींनी आणखी कुतर्क मांडले. त्यांच्या मते त्या फोटोचे आणि त्याने दिलेल्या कॅप्शनचे वास्तव वेगळेच होते! तो कॅलिफोर्नियाचा गव्हर्नर असताना त्याने या स्वतःच्या शिल्पाचे अनावरण केले होते. ज्या हॉटेल प्रशासनाला त्याने आपले शिल्प ठेवण्याची परवानगी दिली होती त्यांनी अरनॉल्डला सांगितले होते की, ‘कोणत्याही वेळी आपण येऊन आपल्या नावावर एक खोली आरक्षित करू शकता’. पण अरनॉल्ड जेव्हा त्या हॉटेलमध्ये रूम बुक करण्यास गेला तेव्हा हॉटेल प्रशासनाने त्याला हॉटेल पूर्णपणे बुक असल्याचे तसेच या घडीला आपणास कोणतीही रूम मिळू शकणार नाही’, असे सांगितले. मग अरनॉल्डने एक कव्हर आणले आणि स्वतःच्या पुतळ्याखालीच तो रस्त्यावर झोपला आणि त्याने लोकांना विचारले की मी असा का पुतळ्याशेजारी झोपलो आहे? तो म्हणे त्यातून असे सांगत होता की जेव्हा माझ्याकडे पद होते तेव्हा लोक माझी स्तुती करत होते आणि जेव्हा मी पद गमविले, तेव्हा हॉटेल प्रशासन ते वचन विसरले, त्यांनी ते पूर्ण केले नाही… होय, काळ बदलला आहे. ‘Yes times have changed!’ आपल्या स्थितीवर किंवा आपल्या शक्तीवर किंवा आपल्या बुद्धिमत्तावर कधी अतिविश्वास ठेवू नका. हे सर्व टिकणार नाही.. कधीही गर्व करू नका.. मृत्यू नंतर कोणतेही जीवन नाही… वगैरे वगैरे. हा सर्व फेक इमोशनल फालुदा होता. प्रत्यक्षात सत्य वेगळंच होतं. ही सर्व माहिती आणि मजकूर निव्वळ फेक होता. त्या फोटोतील अरनॉल्डचा आठ फूट उंचीचा पुतळा अशा कुठल्या हॉटेलपुढचा नसून ओहिओ येथील ग्रेटर कोलंबस कन्व्हेन्शन सेंटरसमोरचा आहे. या घटनेआधी काही महिन्यापूर्वी सायमन व्हेसिन्थेयल सेंटरला अरनॉल्डने एक लाख डॉलर्सची देणगी दिली होती. अशा अनेक देणग्या त्याने आजवर दिल्या आहेत. त्याच्या टॅक्स रिटर्ननुसार त्याची मालमत्ता आठशे ते बाराशे दशलक्ष डॉलर्सची आहे. इतकी गडगंज संपत्ती असलेल्या आणि इतक्या फेमस सेलिब्रिटीला कोणते अमेरिकन हॉटेल आपले दरवाजे कधी बंद करेल का, याचादेखील नेटिझन्सनी विचार केला नाही आणि अरनॉल्डबाबत अफवांचे काहूर माजवले.

अशाच बिनडोक पद्धतीने त्याच्या खाजगी आयुष्यात डोकावून बघणार्यांची संख्याही काही कमी नाही आणि त्याची बदनामी करू इच्छिणार्यांची संख्याही पुष्कळ आहे. प्रसिद्धी हा कधी कधी शाप ठरतो तो असा!
त्याचे हे पुस्तक केवळ त्याच्या विजयाचा जयघोष करत नाही. अरनॉल्ड ह्यात स्वतःच्या चुका लपवत नाही. वैवाहिक आयुष्यातील घडामोडी, विवाहबाह्य संबंधामुळे उभे राहिलेले वादळ, कुटुंबातील तणाव आणि त्यातून झालेली स्वतःची प्रतिमा मलीन होणे, या वेदनादायक घटनांचाही तो प्रामाणिकपणे स्वीकार करतो. त्यामुळे हे आत्मचरित्र एका अजेय नायकाची प्रतिमा रंगवत नाही; उलट असामान्य यश मिळवूनही मानवी दुर्बलतांपासून कोणी मुक्त नसते, याची जाणीव करून देते. ‘टोटल रिकॉल – माय अनबिलिव्हेबल ट्रू लाईफ स्टोरी’ ह्या पुस्तकाची सर्वांत मोठी ताकद म्हणजे त्याची स्पष्ट, आत्मविश्वासपूर्ण आणि प्रांजळ भाषा. अरनॉल्ड स्वतःचे गुण सांगताना संकोच करत नाही; पण अपयश आणि चुका स्वीकारतानाही मागे हटत नाही. त्यामुळे वाचकाला एका दंतकथेचा नव्हे तर हाडामांसाच्या, सच्च्या मनाच्या व्यक्तीचा परिचय होतो.
हे केवळ एका अभिनेत्याचे किंवा राजकारण्याचे आत्मचरित्र नाही. हा महत्त्वाकांक्षा, प्रचंड परिश्रम, आत्मविश्वास, पुनर्जन्माची क्षमता आणि स्वतःच्या जीवनाची जबाबदारी स्वीकारण्याच्या वृत्तीचा दस्तऐवज आहे. हे पुस्तक सांगते की, परिस्थिती माणसाचे भविष्य ठरवत नाही; त्याच्या ध्येयावर असलेली श्रद्धा आणि त्यासाठी अखंड झटण्याची तयारी त्याचे भविष्य घडवते. अरनॉल्ड श्वार्झनेगर यांच्या आयुष्याचा हा प्रवास वाचून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, जग जिंकणारे लोक जन्मतः असामान्य नसतात; ते आपल्या स्वप्नांवर असामान्य विश्वास ठेवणारे असतात. आणि म्हणूनच टोटल रिकॉल हे आत्मचरित्र केवळ यशोगाथा न राहता, स्वप्न पाहणार्या प्रत्येक माणसासाठी प्रेरणेचा अखंड झरा बनते. अरनॉल्ड श्वारझेनेगरच्या चरित्रातला रिकॉल नेमका कळला तर आपणही आपल्या आयुष्यात काही प्रेरणादायी गोष्टी घडवू शकतो, हाच तो रिकॉल!

अरनॉल्डच्या एकंदर आयुष्याकडे पाहिलं तर असं लक्षात येतं की नियतीने त्याच्याशी नेहमीच खेळ खेळला आहे. त्याचं बरंच काही हिरावून घेऊन नियतीने त्याच्या हाती काही दिलं तेंव्हाही एका पावलावर तृप्ती तर एका पावलावर वियोग, भ्रमनिरास आणि हिरमोड यांचा मिलाफ दिला. वरवर भक्कम पोलादी देहयष्टीचा हा अफाट माणूस मनस्वी हळव्या मनाचा का आहे हे त्याच्या आयुष्याकडे पाहताच लक्षात येते. ‘अरनॉल्ड श्वार्झनेगर’ व्हावं वाटणं खूप सोपं आहे पण या माणसाच्या जीवनाचा सतत वरखाली होणारा आलेख पहिला की लक्षात येतं की अरनॉल्ड श्वार्झनेगर बनून जगणं वाटतं तितकं सोपं नाही. त्यासाठी पोलादी देहासोबत काळीजही पोलादीच हवं!
१९७४ सालची अरनॉल्डची तुलनात्मक शारिरीक मोजमापे
उंची : ६’२’ (१८८ सेमी)
प्रतिस्पर्धेत भाग घेते वेळेसचे वजन : २३५ lb (१०७ किलोग्राम)
स्पर्धेखेरीजचे सामान्य वेळचे वजन : २६० lb (१२० किलोग्राम)
दंड (Arms) : २२ ग्ह ( ५६ सेमी)
छाती (Chest) : ५७ ग्ह (१४० सेमी)
कंबर (Waist) : ३४ ग्ह (८६ सेमी)
मांड्या (Thighs) : २८.५ ग्ह (७२ सेमी)
पिंडर्या (Calves) : २० ग्ह (५१ सेमी)
मोजमापांचा संदर्भ – Arnold Schwarzenegger Pro Bodybuilding Profile

