• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

तेजस्वी सूर्यपुत्री राजश्री!

विकास झाडे (गुणगौरव)

Marmik Team by Marmik Team
July 24, 2026
in विशेष लेख
0
तेजस्वी सूर्यपुत्री राजश्री!

‘स्त्री सक्षमीकरण’ हे केवळ घोषणेपुरते मर्यादित न ठेवता, ते स्वतःच्या जगण्यातून सिद्ध करणारी एक मुलगी जेव्हा जगातील सात खंडांतील सात सर्वोच्च शिखरे पादाक्रांत करण्याचे ध्येय उराशी बाळगते, तेव्हा एका सर्वसामान्य कुटुंबातील असामान्य प्रवासाची सुरुवात होते. ते तिच्या असीम जिद्दीची आणि अढळ आत्मविश्वासाची साक्ष देते. महाराष्ट्र सरकारमध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून उत्तम कर्तबगारी बजावत असतानाच सूर्यनमस्कारात विश्वविक्रम करणारी, महिलांनी आरोग्य सांभाळावे म्हणून जिद्दीने त्यांना योगाचे धडे देणारी, ग्रामीण भागातील कष्टकर्‍यांच्या मुलांनी शिकावे म्हणून आपल्या वेतनातून त्यांना पुस्तके, गणवेश उपलब्ध करून देणारी, एक उत्तम लेखिका, कवयित्री म्हणून वाचकांमध्ये आगळीवेगळी छाप सोडणारी, गिर्यारोहक म्हणून महाराष्ट्राचे नाव देशात उंचावणारी ही तरुणी आहे राजश्री शिवाजीराव जाधव-पाटील!

राजश्रीचे कर्तृत्व, चारित्र्य, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रसेवेच्या अखंड ध्यासाने उजळलेला हा संपूर्ण जीवनप्रवास आजच्या आणि उद्याच्या समाजासाठी प्रेरणेचा एक प्रकाशमान दीपस्तंभ आहे. तिच्या याच अतुलनीय जिद्दीचा, अत्यंत संवेदनशील व समाजाभिमुख व्यक्तिमत्त्वाचा यथोचित गौरव व्हावा, याच प्रेरणेतून त्यांना नुकतेच नागपूरमध्ये जागतिक कीर्तीचे न्यूरोलॉजिस्ट आणि वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरॉलॉजीचे विश्वस्त पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांच्या हस्ते ‘डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय ख्यातकीर्त महाकवी सुधाकर गायधनी, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव, सुविख्यात मानसशास्त्रज्ञ डॉ. स्वाती धर्माधिकारी हे अतिथी म्हणून उपस्थित होते. व्यसनमुक्तीसाठी प्रभावी काम करणार्‍या सी. मो. झाडे फाउंडेशनतर्पेâ २०१३ पासून हा पुरस्कार देण्यात येतो. एक लाख रुपये आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असते. याआधी हा पुरस्कार दिल्लीचे ज्येष्ठ गांधीवादी डॉ. एस. एन. सुब्बाराव, नुकतेच दिवंगत झालेले ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी, दिल्लीचे कर्मयोगी रवी कालरा, धारणी मेळघाटचे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवी कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे, गुवाहाटीच्या अर्थतज्ज्ञ डॉ. अलका सरमा, सरहदचे संस्थापक संजय नहार, गडचिरोलीतील कुरखेडा येथे आदिवासींसाठी काम करणारे डॉ. सतीश गोगुलवार आणि शुभदा देशमुख, किनवटच्या आदिवासी भागात काम करणारे डॉ. अशोक बेलखोडे, जोधपूरचे ऑस्टियोपॅथ डॉ. गोवर्धनलाल पाराशर, प्रा. श्याम मानव यांची अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कोल्हापूरचे ज्येष्ठ साहित्यिक, लेखक, संपादक डॉ. श्रीराम पवार, एकल महिला, दारुबंदी, बालविवाह अशा अनेक विषयावर काम करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांना देण्यात आला आहे.
आपल्या मुलींना स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे करण्याचे स्वप्न राजश्रीच्या माता-पित्याने त्या काळात पाहिले, ज्या काळात वंशाच्या दिव्यासाठी ‘नकोशा’ असणार्‍या मुलींना गर्भातच संपवून टाकण्याची अघोरी आणि अमानुष मानसिकता समाजात सर्रास पाहायला मिळत होती. राजश्री अत्यंत भावुक होत सांगते की तिचा जन्म झाला, तेव्हा घराण्यात सलग दुसरी मुलगी झाली म्हणून आई आणि वडील या दोघांच्याही बाजूचे कोणतेही नातेवाईक तिला साधे बघायला देखील आले नव्हते. तिच्या वडिलांनी मात्र तिचे नाव ‘राजश्री’ ठेवले आणि तिला केवळ ‘राजा’ म्हणून संबोधले नाही, तर राजासारखी म्हणजे अगदी मुलांसारखीच मानाची वागणूक दिली.

सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर येथे नीतीमूल्यांची जोपासना, कष्ट आणि प्रामाणिकपणाची समृद्ध परंपरा लाभलेल्या एका आदर्श कुटुंबात राजश्रीचा जन्म झाला. सेवानिवृत्त मुकादम असलेल्या वडिलांचे श्रममूल्य आणि आईचे सुजाण संस्कार हेच तिच्या व्यक्तिमत्त्वाचे सर्वात भक्कम अधिष्ठान ठरले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) सारख्या उपक्रमांमध्ये तिने घेतलेला हिरीरीने भाग तिच्यातील नेतृत्वगुणांची आणि सामाजिक कार्याची बीजे रोवणारा ठरला. शिक्षण क्षेत्रातील तिची वाटचालही थक्क करणारी आहे. अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी प्रत्येक वर्षी वर्गात प्रथम क्रमांकाने पूर्ण केल्यानंतर, तिने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून २००९मध्ये पोलीस उपनिरीक्षकपदी यश मिळवले. परंतु, तिथेच न थांबता २०१०मध्ये महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (वर्ग-१) मध्ये अधिकारी म्हणून तिची निवड झाली. एकूण चौदा वर्षांच्या शासकीय नोकरीच्या कालखंडात तिने महानगरपालिका, विद्यापीठे, जिल्हा परिषद अशा शासनाच्या विविध आस्थापनांमध्ये वरिष्ठ लेखा अधिकारी, उपकुलसचिव, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी, नियंत्रक आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी अशा अत्यंत जबाबदारीच्या व सर्वोच्च पदांवर काम केले. ती सांभाळताना तिने प्रशासनात पारदर्शकता, कडक आर्थिक शिस्त, कार्यक्षमता आणि लोकाभिमुखता यांचा एक वस्तुपाठ निर्माण केला.

आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी या अत्यंत महत्त्वाच्या पदावर कार्यरत असताना तिने शरीर, मन आणि आत्मशक्ती यांचा अद्भूत समन्वय साधणार्‍या ‘सूर्यनमस्कार’ साधना विधीला जीवनाचे अंतिम ध्येय बनवले. यामागील पार्श्वभूमी अत्यंत थरारक आणि हृदयद्रावक आहे. एका भीषण अपघातामध्ये ती थेट मृत्यूच्या दारातून सुखरूप परत आली खरी, परंतु या अपघातात तिच्या उजव्या कानाला कायमचे अपंगत्व आले, तो जायबंदी झाला. अनुमस्तिष्काला गंभीर मार लागल्यामुळे तिच्या सरळ चालण्यावर, शरीराच्या संतुलनावर मर्यादा आल्या. डॉक्टरांनी तर तिला स्पष्ट बजावले होते की, तू आता कधीही उंचीवर जाऊ शकणार नाहीस. साहजिकच, सह्याद्रीचे गडकिल्ले भटकण्याची तिची आवड आता इतिहासजमा होणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु, राजश्रीने केवळ उंचीवर जाण्याचेच ठरवले नाही, तर जगातील सर्वोच्च शिखरांवर तिरंगा फडकवण्याचे स्वप्न पाहिले. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या स्वतःला पुन्हा सक्षम करण्यासाठी तिने योगाची कास धरली आणि यातूनच एका भावी ‘सूर्यपुत्री’चा जन्म झाला.
राजश्रीने सूर्यनमस्काराच्या क्षेत्रात एकापाठोपाठ एक अशा दैदिप्यमान कामगिरीची शिखरे सर करत नवा इतिहास रचला. पुणे येथे आयोजित केलेल्या अखंड चोवीस तासांच्या ‘सूर्याथॉन’मध्ये तिने सलग तब्बल २,४२४ सूर्यनमस्कार पूर्ण करून उपस्थित सर्वांना थक्क केले. यानंतर राष्ट्रीय योग स्पर्धांमध्ये सलग तीन वर्षे ‘सूर्यपुत्री’ हा अत्यंत मानाचा बहुमान पटकावत तिने योगसाधनेतील सातत्य, कठोर शिस्त आणि दुर्दम्य आत्मविश्वासाचे नवे मापदंड प्रस्थापित केले. विशेष म्हणजे, स्वतःपुरते हे यश मर्यादित न ठेवता तिने हजारो नागरिकांना सूर्यनमस्काराची दीक्षा दिली, त्यांना प्रेरित केले आणि बघता बघता याचे रूपांतर एका मोठ्या आरोग्य चळवळीत केले. आजच्या डिजिटल मीडियाच्या युगातही तिच्या ‘स सूर्यनमस्काराचा’ या पुस्तक कृतीला कमालीची मागणी असून, अत्यंत अल्पावधीतच या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली आहे.

सूर्यनमस्काराच्या या अखंड अभ्यासाने आणि सातत्याने तिचे मन, मेंदू आणि मनगट इतके मजबूत झाले आहे की आता ती थेट अजस्र पर्वतांशी दोन हात करू लागली. महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर असलेल्या ‘कळसूबाई’वर तिने तब्बल सात वेळा यशस्वी चढाई केली. यात सर्वात अभिमानास्पद म्हणजे, यातल्या एका मोहिमेत तिने आपल्या वयोवृद्ध आई-वडिलांनाही सहभागी करून घेतले आणि ‘वय हा केवळ एक आकडा असतो, इच्छाशक्ती महत्त्वाची’ हे संपूर्ण जगाला दाखवून दिले. एवढ्यावरच न थांबता, महाराष्ट्र प्रशासनात वेगवेगळ्या पदांवर कार्यरत असणार्‍या जवळपास २५० महिला अधिकार्‍यांना संघटित करून, त्यांना ‘रणरागिणी’ बनवून तिने कळसूबाई शिखर मोहिमेचे यशस्वी नेतृत्व केले. तिचा हा साहसी प्रवास सह्याद्रीतील दुर्गम गडकिल्ले, सुळके सर करत थेट सिक्कीम, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील माउंट पतास्लू, हनुमान तिब्बा, माउंट क्षितिधार अनेक खडतर पर्वतांपर्यंत पोहोचला. तोच पुढे युरोप खंडातील सर्वोच्च शिखर ‘माऊंट एल्ब्रस’ आणि दक्षिण आप्रिâका खंडातील सर्वोच्च शिखर ‘माऊंट किलीमांजारो’ या जागतिक शिखरांच्या माथ्यापर्यंत गेला. या मोहिमांच्या माध्यमातून तिने जगाला धैर्य, अचूक नियोजन आणि अद्वितीय मानसिक सामर्थ्याचा विलक्षण प्रत्यय दिला. २०२४ आणि २०२६ या दोन्ही वर्षी तिने एव्हरेस्ट बेस कॅम्पची चढाई यशस्वीपणे पूर्ण केली आहे.

राजश्रीने क्रीडाक्षेत्रातही अत्यंत उल्लेखनीय आणि नेत्रदीपक यश संपादन केले आहे. राष्ट्रीय स्तरावरील ५००० मीटर चालण्याच्या स्पर्धेत सलग तीन वर्षे मुंबई, गोवा आणि हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक स्पर्धांमध्ये तिने सुवर्णपदके पटकावून तिने राज्याचा गौरव वाढवला. २१ किलोमीटर तसेच ४२ किलोमीटर अंतराच्या ४०हून अधिक मॅरेथॉन स्पर्धांमध्ये तिने सहभाग घेतला असून, अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि खडतर अशा ‘कास अल्ट्रा मॅरेथॉन’ स्पर्धेत तसेच कराड येथील मॅरेथॉन स्पर्धेत तिने द्वितीय क्रमांक मिळवला आहे.
साहित्य हे संवेदनशील मनाचे अभिव्यक्ती माध्यम मानले जाते. प्रशासकीय आणि क्रीडा क्षेत्रातील व्यस्ततेतही राजश्रीने आपली लेखणी जिवंत ठेवली आहे. ललित लेखन, आरोग्यविषयक साहित्य, विनोदी संवादलेखन, कविता, प्रवासवर्णने आणि चरित्रलेखन अशा विविध साहित्यप्रकारांत तिची लेखणी चालते आहे. ‘श्री ची लेखणी’ हे ललित पुस्तक, ‘स सूर्यनमस्काराचा’ हे आरोग्यविषयक पुस्तक, ‘मम्मी ओर राज की बात’ हे विनोदी संवाद लेखन आणि ‘शून्य शोध’ नावाचा तिचा कवितासंग्रह आजपर्यंत प्रकाशित झाला आहे. नवी दिल्ली येथील ‘महाराष्ट्र सदना’त भरलेल्या महिला शासकीय अधिकार्‍यांच्या पहिल्या ऐतिहासिक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात तिची निमंत्रित कवयित्री म्हणून निवड झाली होती.

‘समाजकारण’ हा तर तिच्या जगण्याचा मुख्य प्राण आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत महापुराचे अस्मानी संकट आले, तेव्हा तिने ‘राजर्षी फाऊंडेशन, इस्लामपूर’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून धावून जात लाखो रुपयांची मदत आणि निधी गोळा केला. स्वतः पुरात उतरून हजारो पूरग्रस्त कुटुंबांपर्यंत अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तू पोहोचवल्या. कोकणातील निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना तिने दिलेला मानसिक व आर्थिक आधार असो, वा ‘बेबीस्टेप फाऊंडेशन’तर्पेâ इस्लामपूर येथे आयोजित केलेली पहिली वहिली भव्य
मॅरेथॉन स्पर्धा असो, तिने प्रत्येक ठिकाणी आपल्या कार्यातून जिवंतपणा आणला. या मॅरेथॉन स्पर्धेत जवळपास १२०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता आणि या माध्यमातून जमा झालेल्या सर्व निधीतून तिने गरजू व होतकरू ग्रामीण मुलींना सायकलींचे वाटप केले, जेणेकरून त्यांचे शिक्षण थांबणार नाही. गरिबांना व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि स्पर्धा परीक्षांसाठी पुस्तके उपलब्ध करून देणे, ऊसतोड कामगारांच्या वंचित मुलांना दिवाळीची हक्काची आनंदभेट देणे, कोल्हापूर येथील उपेक्षित तृतीयपंथी समाजाला सन्मानाने मदतीचा हात देणे, समाजाकडून तिरस्कृत असणार्‍या एका अनाथ महिलेचे जटानिर्मूलन करून तिच्या स्त्रीत्वाच्या सन्मानाची पुनर्रचना करणे, पर्यावरणासाठी व्यापक वृक्षारोपण करणे, ऐतिहासिक गड-किल्ल्यांची स्वच्छता मोहीम राबवणे, तसेच ग्रामीण भागातील युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी मोफत मार्गदर्शन करणे अशा विविध सामाजिक कार्यातून तिच्या व्यक्तिमत्त्वातील लखलखते तेज समाजमनाला प्रकाशित करत आहे.

आजच्या भौतिकवादी काळात अनेक जण केवळ वैयक्तिक यशाच्या आणि पदाच्या उंचीचा आंधळा पाठलाग करत असतात; मात्र राजश्रीने या सर्वांच्या पलीकडे जाऊन ‘माणुसकीच्या उंचीचा’ ध्यास घेतला आहे, आपल्या शासकीय पदाला एक वेगळी प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. भारतीय स्त्रीशक्तीच्या अमर्याद सामर्थ्याचे, तिच्या धैर्याचे आणि कर्तृत्वाचे एक विराट दर्शन तिने आपल्या कार्यातून घडवले आहे.

भविष्यात जगातील सातही खंडांतील सातही सर्वोच्च शिखरे सर करण्याचा तिचा उदात्त संकल्प आणि बालपणापासून लाभलेल्या सूर्योपासनेच्या पवित्र संस्कारातून समाजात एक जगप्रसिद्ध ‘सूर्यमंदिर’ उभारण्याचे तिचे भव्य स्वप्न तिच्या दूरदृष्टीची साक्ष देते. तिची जिद्द पाहता हे स्वप्नही ती नजीकच्या भविष्यात नक्कीच साकार करेल. तिच्या या अखंड संघर्षाला आणि ध्येयाला सलाम करताना एक शायरी आठवते, ‘खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले, खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या है!’ राजश्रीने देखील स्वतःच्या कष्टाने आणि आत्मबळाने स्वतःचे नशीब स्वतः लिहिले आहे.

Previous Post

अरनॉल्ड श्वारझेनेगरच्या चरित्रातला ‘रिकॉल’!

Next Post

फटकारे बाळासाहेबांचे

Next Post
फटकारे बाळासाहेबांचे

फटकारे बाळासाहेबांचे

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.