१९८१ सालातल्या या रविवारच्या जत्रेची पार्श्वभूमी चित्रातच विशद केलेली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांचं एक शिष्टमंडळ रशियाच्या दौर्यावर रवाना झालं, तेव्हा बाळासाहेबांनी त्या शिष्टमंडळाला मार्मिकच्या वतीने काही मार्मिक सल्ले दिले आहेत. अशा प्रकारची शिष्टमंडळं नेमका काय अभ्यास करायला जातात आणि तिथून काय शिकून येतात, हा प्रश्नच असतो. जनतेला महानगरपालिकेच्या कामात किंवा नगरसेवकांच्या वर्तनात काहीही फरक दिसून येत नाही. त्यामुळे हे अभ्यासाला गेले होते की सरकारी खर्चाने हवापालट करून, पिकनिकचा आनंद लुटून आले, असाच प्रश्न लोकांना पडत असतो. म्हणूनच बाळासाहेबांनी शिष्टमंडळातल्या विविध पक्षीय नगरसेवकांना खोचक सल्ले दिले आहेत. सुखद आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्याच पक्षाच्या, म्हणजे शिवसेनेच्या नगरसेवकांचेही कान उपटले आहेत. तिकडच्या नगरसेवकांची हजेरी किती असते, ते पाहायला त्यांनी सांगितलं आहे. वेगवेगळ्या पक्षीयांना सल्ले देता देता, बाळासाहेबांच्या नाट्यमय पद्धतीनुसार हे चित्र एकदम नाट्यमय टप्प्याला येते. अर्स काँग्रेस तर खड्ड्यातच आहे आणि त्यांना ते रशियातल्या रस्त्यांना खड्डे कसे पडत नाहीत, याची कारणं विचारायला सांगतात. सरतेशेवटी त्यांचा खास टोला येतो… आपल्याकडचे कचर्यांचे ढिगारे पाहायला त्यांनाही बोलावा, असा त्यांचा असूड कडाडतो… हेच चित्र इतक्या वर्षांनी आताच्या मुंबई महापालिकेच्या कारभारालाही लागू होतं, आपण त्यांना दर पावसाळ्यात तुंबलेली मुंबई दाखवायलाही बोलावू शकतो.

