
पावसाळ्यात बदलापूरच्या आसपासचे ओढेनाले भरून व्हायचे. शाळा सुटल्यानंतर आम्ही मैत्रिणी काहीवेळा एकमेकांचे हात धरून साखळी करून या ओढ्यातून वाट काढत घरी यायचो. बाहेर पूर्ण अंधार, धुवाधार पाऊस. घरात विजेचा बर्याच वेळा पत्ता नसायचा. जिथे तिथे ओल्या कपड्यांच्या पताका. अशावेळी दमून आलेले असताना गरम गरम भात, त्यावर तूप आणि डाळमेथ्यांची उसळ, हा फक्कड बेत पोटाला आनंद देत असे. पण डोक्यात मेथीविषयी असलेली अढी चारचौघात दहा वेळा बोलून दाखवल्यामुळे ही भाजी खाताना मला आवडतच नाही असे फणकार्यात म्हणायची सवय लागली होती.
आमचं बदलापूर एक टुमदार गाव होतं. भरपूर टेकड्या, घनदाट झाडीने आणि डोंगरांनी वेढलेले गाव. छोटे -छोटे बंगले- त्यातले काही कौलारू, टुमदार तर काही पत्र्याचे. बोरं ,जांभळं, करवंदं हा रानमेवासुद्धा बदलापुरात खूप मिळत असे. त्यात बदलापूरची जांभळे तर फारच प्रसिद्ध. गराला भरपूर आणि बी लहान. प्रत्येकाच्या परसदारात तोंडल्यांचा मांडव असायचा. लोकवस्तीसुद्धा थोडीच होती. त्यामुळे प्रत्येक घर एकमेकांना ओळखीचे.
आम्ही सर्व मुली शाळेत सायकलने जात असू. शाळासुद्धा कौलारू आणि गुलमोहरात वसलेली. गावाला उल्हास नदीचे वरदान आहे. या नदीवरच बारवी डॅम बांधलेला आहे. त्यामुळे नदीच्या आसपास भरपूर सारे फळभाज्यांचे आणि फुलांचे मळे होते. त्यामुळे रेल्वे स्टेशनच्या शेजारी कातकरी बायका फुले व रानभाज्या घेऊन विकायला बसायच्या.सोनचाफ्याचे वाटे, मोगर्याच्या लडी, अनंताचा बहर, सोनटक्का… संपूर्ण वातावरण सुवासिक असायचं. या कातकरी बायका भाज्यांचे वाटे किती प्रेमाने देत असत. आईचा आणि या भाजीवाल्या बायकांचा संवाद फार ऐकण्यासारखा असायचा. पावसाळ्यात भेंडी, पडवळ, तोंडली, अळू अशा अनेक भाज्या त्या दारावर विकायला घेऊन येत असत.
या भाजीवाल्यांमध्ये एक आजी माझ्या अजूनही चांगली लक्षात राहिली आहे. ती कायम नथ घालून येत असे. घट्ट चापून चोपून नेसलेली नऊवारी साडी, वर डोक्यावरती मोठा हारा भाजीचा. गेटमधूनच आरोळी ठोकायची, ‘बायो, ये गं भाजी घ्यायला.’ आईला खरंतर काही वेळेला भाजी नको असायची. पण ही म्हातारी लांब डोंगरावरनं आलीये, असंच कसं तिला पाठवायचं, म्हणून ती दारात तिचा हारा धरायला, उतरवायला मदतीला जात असे. ‘परवल (पडवळ) घे, भेंड्या घे, नायतर तोंडला घे. तोंडला बघ की कसा करंगलीवानी नाजूक हाय. बी नाय हो त्यात आणि आतून तर लाल अजिबात निघायचा नाय.’ हे सर्व संवाद चालू असताना माझी नजर एकटक तिच्या नथीवर असायची. तेल लावून चोपून घातलेला घट्ट अंबाडा, त्यात डोकावणारे पांढरे केस, कानात मोठी कुडी, वयोमानानुसार कांती सुरकुतलेली. कानाचा वेज आणि नाकाचा वेज हे मोठे झालेले. घातलेले दागिने अक्षरश: लोंबकाळताना दिसायचे. आजी बोलायला लागली की नथीचा दांडा ओठावरती किंवा तोंडात सुद्धा येत असे. मला हे बघून हसू फुटत असे. तिचं ईरलंसुद्धा इतकं सुंदर शिवलेलं असायचं की पावसाच्या पाण्याचा एक थेंब तिच्या अंगी कधी दिसत नसे. घरची परिस्थिती चांगली होती तिची. पण, ‘परसदार रिकामं ठेवायचं नाही, काहीतरी त्यात बी पेरत राहायचं. आपण एक बी पेरलं तर झारं शंभर फल देतात नाय.’ सृष्टीचे केवढे मोठे रहस्य ती तिच्या साध्या शब्दात सांगत होती नाही का?
आता खरी मजा पुढच्या संवादात…
‘पडवल घेतेस ना?’
आई म्हणायची, ‘अगं आजच डाळिंब्यांची उसळ केली आहे.’
‘असू देत ना घाल की थोडे वाल भिजत परत. कोवल्या कोवल्या पडवलाला वालाची चव. दादाला आवडती ना भाजी. मग कर की परत एकदा.’
अशा तर्हेने दोन लांब सडक पडवळ आईच्या हातात पडायची. त्यासोबत एक वाटा तोंडल्याचा, एक तुकडा लाल भोपळ्याचा, हिरवीगार भेंडी अशी सर्व भाजी घरात यायची. आजी पाच मिनिटे विसावायची. ‘बायो गुलाचा चहा पाज बाई पाव कप.’असा सुखद संवाद दर चाराठ दिवसांनी घडत असे.
भाजी घरात आली की ठरलेले काही भाजीचे प्रकार व्हायचे. एक म्हणजे डाळ, मेथी घालून तोंडल्याची चिंचगुळाची पळीवाढी भाजी. इतर प्रकारात पावटे, डाळिंब्या, लाल भोपळ्याची मेथी घालून केलेली भाजी. ज्यात त्यात मेथी. त्यामुळे मला मेथीचा थोडा रागच येत असे. मेथीविषयीचा हा माझा कडू पूर्वग्रहच म्हणा ना.
पण आईच्या हातचे डाळ मेथीचे वरण हे अप्रतिमच होत असे. तोंडल्याची डाळ मेथी घालून केलेली भाजीही तेवढीच चविष्ट. पावसाळ्यात बदलापूरच्या आसपासचे ओढेनाले भरून व्हायचे. शाळा सुटल्यानंतर आम्ही मैत्रिणी काहीवेळा एकमेकांचे हात धरून साखळी करून या ओढ्यातून वाट काढत घरी यायचो. बाहेर पूर्ण अंधार, धुवाधार पाऊस. घरात विजेचा बर्याच वेळा पत्ता नसायचा. जिथे तिथे ओल्या कपड्यांच्या पताका. अशावेळी दमून आलेले असताना गरम गरम भात, त्यावर तूप आणि डाळमेथ्यांची उसळ, हा फक्कड बेत पोटाला आनंद देत असे. पण डोक्यात मेथीविषयी असलेली अढी चारचौघात दहा वेळा बोलून दाखवल्यामुळे ही भाजी खाताना मला आवडतच नाही असे फणकार्यात म्हणायची सवय लागली होती. हळूहळू ‘तुला आता भाजी जमायला लागलीये, त्यामुळे मी आता आवडीने खातीये’ हे वाक्य आईला उद्देशून तोंडात रुळू लागले होते. स्व्ातःचा अहंकार जपण्यासाठी काही काळ या भाज्यांचं पानातील स्थान दुय्यम केलं होतं.
कालांतराने आमच्या परसदारात मी स्वतः तोंडल्याचा वेल लावला. काही महिन्यांनी रग्गड तोंडली वेलीला लागली. मग आईच्या मागे लागून आई भाजी शिकव म्हणू लागले आणि तिच्याकडनं तोंडल्याची डाळ मेथ्याची भाजी शिकले. कधीतरी कानावर पडलेलं मेथी ही कडूच असते, ती अजिबात चांगली लागत नाही, हे डोक्यात धरून तिचा मी कायम तिटकारा करत होते की काय? आज माझी वहिनी, रागिणी थत्ते हिने डाळमेथ्यांच्या उसळीची कृती पाठवली आणि बदलापुरातील भूतकाळ डोळ्यासमोर पटकन सरकून गेला. एक प्रकारे मेथीच्या केलेल्या दुस्वासाचे आज मी प्रायश्चित्त करते आहे असेच समजा ना.
चला तर मग डाळ मेथ्यांच्या उसळीच्या कृतीकडे वळूया.
साहित्य : तुरीची डाळ एक वाटी, मेथ्या दीड ते दोन चमचे, आमसुले तीन दहा ते बारा पाकळ्या लसूण, गूळ एक चमचा, उसळ गोड हवी असेल तर दोन चमचे, पाव वाटी ओले खोबरे खोवलेले, लाल सुक्या मिरच्या सात ते आठ, कोथिंबीर पाव वाटी चिरलेली, चवीनुसार मीठ आणि कढीलिंब, हिंग अर्धा चमचा, फोडणीचे साहित्य तेल तीन चमचे.
कृती : मेथ्या व डाळ रात्रभर भिजत घाला. सकाळी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुऊन घ्या. निथळत ठेवा. पातेल्यात दोन चमचे तेल घेऊन तेल तापल्यावर क्रमश: त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद, कढीलिंब घाला. आपण घेतलेल्या लसूणाचा अर्धा भाग ठेचून फोडणीत घाला. आता डाळ आणि मेथ्या फोडणीत घाला. थोडे मीठ घाला. शिजण्यासाठी चूळुकभर पाणी घाला. शिजण्यासाठी वर पाण्याचे एक झाकण ठेवा.
उसळीला एक वाफ आली की त्यात चवीनुसार मीठ, गूळ, ओले खोबरे, कोथिंबीर हे सर्व घालून परत एकदा पातेल्यातील उसळ अवसडून घ्या. या उसळीतील डाळ खूप गरगट्टा शिजवायची नाही तर ती दाणेदार व बोटचेपी राहील इतपतच शिजवायची आहे.
आता उसळ तयार झाल्यावर एक चमचा तेलात उरलेल्या लसणाचा ठेचा व मिरची यांचा वापर करून फोडणी तयार करा व ती उसळीत वरून घाला. या वरून घालायच्या फोडणीतील लसूण चांगली परतून घ्यायची आहे.
टीप : ही डाळमेथ्यांची उसळ अजिबात कडू लागत नाही.
Khamang.blog, khamangbyShubhangi YouTube Channel

