• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

‘अजब’ लग्नाची ‘गजब’ गोष्ट!

संजय डहाळे (तिसरी घंटा)

Marmik Team by Marmik Team
July 24, 2026
in तिसरी घंटा
0
‘अजब’ लग्नाची ‘गजब’ गोष्ट!

‘समलैंगिकता या विषयावरलं देशातील पहिले नाटक’ म्हणून ज्याची ओळख आहे, ते आहे विजय तेंडुलकर यांचे ’मित्राची गोष्ट’, जे १९८०च्या सुमारास व्यावसायिक रंगभूमीवर आले. विनय आपटे यांनी ते दिग्दर्शित केले होते. त्या काळी ‘बोल्ड’ विषयामुळे ते चर्चेत होते, वादळी ठरले. आजच्या पुढारलेल्या काळात समलिंगी आकर्षण हा आजारही नाही आणि विकृतीही नाही. तरीही दोन पुरुष किंवा दोन स्त्रिया एकत्र राहणे हे आपल्या संस्कृतीत अपवादात्मकच होते. तेंडुलकरांची गोष्ट त्यामुळे एका वळणावरली ठरली होती. याची आठवण ‘जोडीचा मामला’ या नाटकातून आली, कारण यातही तशाच मैत्रिणींची गोष्ट मांडली आहे. चैतन्य कुलकर्णी याचे लेखन, संगीत असलेले आणि श्रेयस इंदापूरकर यांच्या दिग्दर्शनातला हा गंभीर विषयावरला विनोदी शैलीतला नवा नाट्यविष्कार!

पडदा उघडतो. एखाद्या थरारनाट्याप्रमाणे अंधारात काही आकृत्यांची लपाछपी सुरू असते. ‘ओम फट स्वाहा…’ असेही बोल ऐकू येतात. काही मंत्रोच्चारही. एक तरुण तिथून पळ काढतो. प्रकाश पडतो तेव्हा घोंगडीत याच वाड्यातले दोघेजण दिसतात. घरातल्या तरुण मुलींबद्दल त्यांना काळजी सतावतेय. म्हणूनच ही शोधमोहीम!

दुसर्‍याच प्रसंगात खिडकीत एक तरुणी. गायत्री तिचं नाव. फोनवर बोलतेय. दोन वर्षे वाट आपण बघितली, आता काही झालं तरी उद्याच लग्न करायचंय. जगदाळे साहेबांना जरा वेगळाच आहेर द्यायचा! त्यांच्या समक्ष सारं काही बेस्ट होईल… आय लव्ह यू… डार्लिंग, वगैरे प्रेमसंवाद ती करतेय. त्यात रंगून गेलीय.

कुण्या पिसोळे तालुक्यातील एक गाव. सरपंच अण्णासाहेब वाघचौरे यांचा भला मोठा वाडा. त्यांच्यासोबत पत्नी विमलाबाई, मुलगी गायत्री आणि सरपंचांची बहीण वासंती आत्या, असं हे कुटुंब. गावातलं प्रतिष्ठित घराणं. मुलगी गायत्री शिक्षणाच्या निमित्ताने दोन वर्षे शहरात राहून आलेली. दुसरं कुटुंब, त्र्यंबक वाढे आणि त्यांची कन्या तन्वी. बालपणीच तन्वीच्या आईच निधन झालेलं. वडिलांनी आईची माया दिलेली. सरपंच अण्णा हे श्रीमंत, सज्जन तर त्र्यंबक हा गावातील हरकाम्या. गरीब आणि कष्टाळू. पण दोघेही चांगले मित्र. त्यांच्या मुली गायत्री आणि तन्वी यादेखील घट्ट मैत्रिणी. शहरात दोघी सोबतच शिकलेल्या. पवन गणपुळे या गावातील तरुणाचं गायत्रीवर जिवापाड प्रेम. त्याच्या लग्नाची सुपारी यापूर्वीच फुटलेली. पण अचानक या दोघी मैत्रिणी एकमेकींसोबत चक्क लग्न करण्याचा निर्णय घेतात आणि सार्‍यांना एकच हादरा बसतो.

या गावाची गोष्ट सांगण्यासाठी सूत्रधार कम् गोंधळी मॉडर्न रंगरूपात प्रगटतो. रंगीतराव त्याचं नाव. तो वासुदेवाच्या कथनशैलीत गावच्या सरपंचाची कहाणी कथन करतो. आता गावची इभ्रत, परंपरा आणि सरपंचाची मुलगी हिची लव स्टोरी सांगू लागतो. एकीकडे लैला-लैलाचे गोडवे तर दुसरीकडे तंटामुक्त गाव स्पर्धा. स्पर्धेत आता गाव अंतिम फेरीत पोहोचलं आहे. याचवेळी मोहनीराज जगदाळे हा शासकीय अधिकारी गावात येतो. ‘तंटामुक्त आदर्श गाव’ ठरवण्यासाठी तिथं वास्तव्य करून त्याला निर्णय घ्यायचा आहे. हिरवा आणि लाल सिग्नल त्याच्या गळ्यात अडकविलाय. लाल सिग्नल म्हणजे वजा मार्क आणि हिरवा म्हणजे बेरीज गुण. गावात कुठलाही वादविवाद, भांडण, तंटे नसल्याचा दाखला मिळाला की गावाला रोख रक्कम आणि सन्मान मिळणार. त्यासाठी सार्‍यांची बनवाबनवी, फसवाफसवी सुरू होते.
त्यात गावात ‘मुलीचं मुलीशी लग्न’ ही कल्पना कुणालाही पटत नाही. त्याला सार्‍या गावाचा विरोध. पण तंटामुक्त अधिकार्‍यासमक्ष त्यामुळे भांडण शक्य नाही. आणि नेमका हाच मुहूर्त दोघीजणी निश्चित करतात. जेणेकरून विरोध होणार नाही हा हेतू असतो. अशाप्रकारे लग्नाची तयारी सुरू होते. या प्रकरणातून काही तोडगा, मार्ग निघावा यासाठी शहरात शिकून आलेला जॅकी उर्फ जनार्दन डिसोझा याला अण्णांनी खास निमंत्रित केलंय. तोही अजब वल्ली. एका प्रश्नाच्या सल्ल्यासाठी तो २० रुपये आकारतो. गावाला मूर्ख बनवतो. त्याच्या मार्गदर्शनातून विनोदनिर्मिती होते… गायत्रीची सुपारी ज्या पवनबरोबर फुटलेली आहे तो वेडापिसा होतो. वेशांतर करून लग्नात पोहोचतो. गायत्री तन्वीचं लग्न होतं का? गावाला तंटामुक्त गावाचा पुरस्कार मिळतो का, या प्रश्नांची उत्तरे शेवटच्या प्रसंगातून मिळतात.

समलिंगी आकर्षण आणि संबंध हा विषय साहित्यात यापूर्वी गंभीरपणे मांडला गेलाय. अशा संबंधांना आता कायदेशीर मान्यता आहे. हे संबंध गुन्हेमुक्त मानले जातात. आजही समलिंगी पुरुष किंवा स्त्रिया स्वतंत्रपणे ताठ मानेने समाजात जगताना दिसतात. याच आधारावर नाटककार चैतन्य कुलकर्णी यांनी कथानकाचा डोलारा उभा केलाय. तरी पूर्णपणे तसा हा विषय त्यात नाही. गावातील वातावरण, व्यक्तिरेखा, याला अधिक ठळकपणे महत्त्व दिलय. विनोदी शैलीत संहिता मांडली आहे. काही मराठी चित्रपटांचे गीतकार संगीतकार म्हणून परिचित असलेल्या चैतन्य यांनी या निर्मितीतून ‘नाटककार’ म्हणून पदार्पण केलय. संहितालेखनाचं एक तंत्र असतं ते यात प्रभावीपणे मांडलं गेलंय. दिग्दर्शक श्रेयस इंदापूरकर यांनी दिग्दर्शनासह या नाटकाची निर्मिती आणि विनोदी भूमिकाही केलीय. तिहेरी रूपात त्यांचे दर्शन होते. सारे कलाकार नवोदित जरी असले तरी तंत्रज्ञ पक्के मुरलेले आहेत.

कुणीही ‘ बिग स्टार’ नसतानाही नाट्य कुठेही कमी वाटत नाही. उलट ते अधिक फ्रेश  वाटते. जेमतेम दीड एक महिन्यात पुणेकर कलाकारांकडून हे नाटक रंगभूमीवर उभं करण्याचं धाडस दिग्दर्शकांनी केलंय. ग्रामीण बाज, वेगवान हालचाली, विनोदाच्या नेमक्या जागा यामुळे दिग्दर्शकाची पकड दिसते. गायक संगीतकार अवधूत गुप्ते यांचं टायटल साँग आणि श्रद्धा आपटे केळकर हिचे प्रेमगीत ताल धरायला भाग पाडते. गाण्यांचे स्वतंत्र म्युझिक लाँच झालंय. पहिल्या अंकाचा पडदा हा ‘थीम साँग’वर पडतो. गडबड झाली, लगबग आता, दाराशी आली, हे गाणं गुणगुणतच प्रेक्षक नाट्यगृहाबाहेर पडतो. ही एक प्रकारची दादच! नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनी भव्य वाडा तपशिलासह उभा केलाय, तर प्रकाशयोजनाकार शितल तळपदे यांनी गाण्यांच्या नृत्यात चांगले रंग भरलेत. नृत्य-गाणं यांनी नाट्य बहारदार होतेय. त्यातून कथानक अलगद उलगडत जातं.

नाटकात डझनभर कलाकारांचा फौजफाटा आजकाल अभावानेच दिसतो. पूर्ण वेळ नाटक करणार्‍या कलाकारांची संख्या तशी घटत चाललीय. कमीत कमी पात्रांचं नाटक करून एखाद्या सेलेब्रिटी कलाकाराला त्यात घेण्यास निर्माते त्यामुळेच अग्रक्रम देतात. इथे मात्र या गावातील अस्सल व्यक्तिरेखा त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांसह दिसतात. नवखेपणा जराही दिसत नाही. विनोदाची चांगली जाण आहे. ‘टीमवर्क’ उत्तम!

पायल साळुंखे हिने गायत्रीची भूमिका पूर्ण तयारीने केलीय. तिची देहबोली शोभून दिसते. भूमिकेची समज चांगली आहे. तिच्यासोबत मैत्रिणी म्हणून श्वेता काजळे हिने तन्वी उभी केलीय. दोघींचं ट्यूनिंग मस्त जमलं आहे. दोघींना अभिनयासोबत नृत्याची जाण असल्याने त्या लक्ष वेधून घेतात. एकमेकींवरलं प्रेम हे संवादातून, अभिनयातून लक्षवेधी ठरते. अश्लील किंवा भडकपणा टाळला आहे. श्रेयस इंदापूरकर यांचा ‘जॅकी’ हा इरसाल नमुना. त्यांचं या प्रकरणातलं मार्गदर्शन म्हणजे कहरच! विनोदनिर्मितीसाठी जॅकी धमाल करतो. स्वतः दिग्दर्शक असल्याने त्यांची हजेरी कलाकारांना बळ देते. मॉडर्न रंगरूपातला सूत्रधार रंगीतराव साकारण्यासाठी अभिजीत पाटसकर यांची निवड चपखल आहे. संवाद साधण्याचे कौशल्य नजरेत भरतं. प्रतिष्ठित सरपंच अण्णासाहेबांच्या भूमिकेत योगेश कदम यांचा भोळेपणा व घाबरट स्वभाव दिसतो. सरपंच पत्नी प्राची कात्रे हिचा ठसका उत्तम. आत्याबाई वासंती ही अश्विनी माळी चांगली साकार केलीय. प्रदीप कसबे (त्र्यंबक) विशाल दुराफे (मोहिनीराज) विनायक पाटील (माणिकराव, पंच) वैभव महाले (प्रेमवीर पवन) दुर्गेश लांडगे (गुण्या) आकाश राठोड (गोविंदा) यांनीही या जगावेगळ्या लग्नात सोबत केलीय.

ब्लॅक अँड व्हाईट कुटुंबाची सप्तरंगी गोष्ट, ही ‘ जोडीचा मामला’ला दिलेली कॅचलाईन समर्पक आहे. जुनी आणि नवी पिढी यातील वैचारिक फरक त्यातून दिसतोय. गेली वीस एक वर्षे व्यावसायिक रंगभूमीवर वेगवेगळ्या नाटकांची निर्मिती करणारे निर्माते राहुल भंडारे यांच्या अद्वैत थेटर्सने निर्मितीसाठी पुढाकार घेतलाय. नव्या संकल्पनांना रंगभूमीची दारे उघडून दिल्यानेच आजवर अनेक रंगकर्मी स्थिरावले आहेत. पुणेकर श्रेयस इंदापूरकर यांच्या ‘दृष्टी’ संस्थेला या निमित्ताने व्यावसायिक आधार मिळाला आहे. निर्मितीमूल्ये श्रीमंती थाटाची असून कुठेही तडजोड केलेली नाही.

सामान्यत: प्रत्येक स्त्री पुरुषाचा जीवनलेख ठरलेला असतो. एका रूढ चाकोरीतून हा प्रवास होतो खरा,पण बदलत्या परिस्थितीत स्वतंत्र व्यक्तिमत्व जगण्यासाठी जर चौकटीबाहेरचे प्रयत्न झाले तर तिची कुचंबणा होते. हे देखील मान्य करावेच लागेल. चूल-मूल, संसार यात होणारी तिची कोंडी, मग काहीदा संघर्षाचे रूप धारण करते. लग्न या विषयावर अनेक नाटके येत आहेत. अजूनही येतील. त्याला अनेक पैलू आहेत. काळ बदलला. नवे प्रश्न उभे ठाकले. शिक्षणामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला. स्वकर्तृत्वाची जाणीव झाली. अशी लग्न म्हणजे पुरुषप्रधान संस्कृतीतल उत्तर न मिळालेल एक वेगळं पुढलं पाऊल म्हणावे लागेल; एकूणच या विषयाकडे रसिकांनी विनोदी चष्म्यातून बघितले तर हा जोडीचा मामला दोन घटका हसवणुकीची गोष्ट निश्चितच ठरेल, यात शंका नाही. जो ‘अजब’ लग्नाची ‘गजब’ गोष्ट सांगणारा सप्तरंगी मामला आहे!

जोडीचा मामला
लेखन /संगीत- चैतन्य कुलकर्णी
दिग्दर्शन- श्रेयस इंदापूरकर
नेपथ्य -संदेश बेंद्रे
प्रकाश- शितल तळपदे
रंगभूषा- उल्लेश खंदारे
गाणी – अवधूत गुप्ते /श्रद्धा आपटे केळकर
निर्माते -श्रेयस इंदापूरकर, राहुल भंडारे
निर्मिती संस्था – दृष्टी /अद्वैत थिएटर्स

Previous Post

मोबाइलची स्क्रीन शेअर करताय?

Next Post

नावडतीची आवडती डाळमेथ्याची उसळ

Next Post
नावडतीची आवडती डाळमेथ्याची उसळ

नावडतीची आवडती डाळमेथ्याची उसळ

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.