• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

गणेशोत्सवाला सार्वजनिक बनवण्यासाठी…

सचिन परब प्रबोधन-१००

marmik by marmik
May 15, 2026
in इतर, प्रबोधन १००, विशेष लेख
0
विक्रमाच्या साडेसातीचं फॅक्टचेक

दादरच्या सार्वजनिक गणेशोत्सवात स्पृश्यांबरोबर अस्पृश्यांना पूजेसह सगळे अधिकार मिळायला हवेत, यासाठी शेकडो कार्यकर्ते रावबहाद्दूर बोलेंच्या नेतृत्वात गोळा झाले होते. त्याची तयारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समता समाज संघाच्या कार्यकर्त्यांनी केली होती. हे कार्यकर्ते प्रबोधनकारांच्या तालमीतच तयार झाले होते.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धनंजय कीर यांनी लिहिलेल्या प्रसिद्ध चरित्रात प्रबोधनकारांविषयी आलेला एक संदर्भ इथे नोंदवायला हवा. महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह नुकताच झाला होता. महाडला तेव्हाच्या स्पृश्यांनी अस्पृश्यांच्या केलेल्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी मुंबईतील परळच्या दामोदर हॉलमध्ये एक सभा झाली होती. रावबहाद्दूर के.सी. बोले त्याचे अध्यक्ष होते. महाडला झालेले अत्याचार जालियनवाला बागेतल्या अत्याचारांसारखे असल्याचं या सभेचं मत ठरलं. त्यात प्रबोधनकारांचंही ज्वलंत भाषण झालं. पण ते फक्त बोलके समाजसुधारक तर नाहीत ना, याची तिथल्या अस्पृश्य कार्यकर्त्यांनी परीक्षाही घेतली. अस्पृश्यांच्या हातचं पाणी त्यांना प्यायला दिलं. प्रबोधनकार कोणतेही आढेवेढे न घेता सहजपणे ते पाणी प्याले. यात प्रबोधनकारांसाठी काही नवीन नव्हतंच. शाळेत असतानाच ते दलित सुभेदारांच्या घरात जाऊन चहा पीत असत. नंतर तर ठाकरेंच्या घरात कुणाला जातपात विचारलीच जात नसे. या सभेत ब्राह्मण ब्राह्मणेतर पाक्षिकाचे संपादक देवराव नाईक हेदेखील या परीक्षेत प्रबोधनकारांसारखेच पास झाले.

महाडचा सत्याग्रह २० मार्च २०२७ला झाला. या लढ्याची पानं चाळताना आपल्याला टिपणीस, चित्रे, चिटणीस, कारखानीस, कर्णिक, दोंदे, देशमुख अशी अनेक कायस्थ कार्यकर्त्यांची नावं दिसतात. अस्पृश्यांच्या लढ्यात ही सवर्ण मंडळी आली कुठून, असा प्रश्न आपल्याला पडतो. तेव्हाच्या महाड नगरपालिकेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्रनाथ उर्फ सुरबानाना टिपणीस यांनीच चवदार तळं अस्पृश्यांना खुलं करण्याचा ठराव संमत केला होता आणि बाबासाहेबांना निमंत्रण दिलं होतं. पुढे ते बाबासाहेबांच्या स्वतंत्र मजूर पक्षाकडून आमदारही बनले. त्यांच्याइतकंच या सत्याग्रहाचे मुख्य संघटक म्हणून काम बघणारे अनंतराव उर्फ भाई चित्रे यांचंही योगदान महत्त्वाचं होतं. त्याचे भाऊ कमलाकांत चित्रे यांचाही या लढ्यात सक्रिय सहभाग होता. हा अपवाद नव्हता तर असे अनेक कायस्थ कार्यकर्ते होते. ही सगळी प्रबोधनकारांनी केलेली मशागत होती. जुन्या जमान्यातील पत्रकार श्री. शं. नवरे यांनी १६ जानेवारी १९६५च्या महाराष्ट्र टाइम्स`मधे लिहिलंय, `आपल्या समाज सुधारणेच्या प्रचारासाठी कार्यकर्ते तयार करण्याचे उद्देशाने श्री. ठाकरे यांनी दादर येथे स्वाध्यायाश्रम नावाची संस्था बरीच वर्षे चालवली. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काढलेल्या समाज समता संघाला निष्ठावंत कार्यकर्ते पुरविण्याचे काम मुख्यतः याच संस्थेने केले. स्वतः प्रबोधनकारांनीही आत्मचरित्रात हे जाता जाता नोंदवलं आहे, डॉ. आंबेडकरांच्या सहाय्यकांतली बहुतेक मंडळी स्वाध्यायाश्रमाच्या तालमीतच तयार झालेली होती.

प्रबोधनकारांचे एक मित्र रं. ग. कुलकर्णी यांनी ही प्रक्रिया थोडी अधिक उलगडून सांगितलीय, कायस्थ प्रभूंनी एकादी नवी चालरीत अमलांत आणली तर ब्राह्मणेतर त्यांचे अनुकरण बिनदिक्कत करीत. किंवा कायस्थ प्रभूंच्या पावलावर पाऊल टाकून एखादी जीर्ण रूढी मोडून काढण्याचें धाडस करीत. म्हणून प्रबोधनकारांनी जेव्हां भिक्षुकशाहीवर बेडर हल्ले चढविण्यास सुरवात केली तेव्हां ब्राह्मणेतर बहुजन समाजाला मनापासून आनंद झाला आणि धीर आला. डॉ. आंबेडकरांच्या सुरवातीच्या चळवळींना गावोंगावचे कायस्थ प्रभू पाठिंबा देत आहेत असं पाहूनच तेथील महारमांगांना अवसान येत असे, असा पुष्कळांचा अनुभव आहे.

याच दरम्यान म्हणजे ४ सप्टेंबर १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता समाज संघाची स्थापना मुंबईत केली. रोटीबंदी आणि बेटीबंदी संपवण्यासाठी कार्यक्रम सुरू केले. सगळ्या जातीतल्या लोकांनी एकत्र येऊन सहभोजनाचे कार्यक्रम हे त्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं. या संघात फक्त अस्पृश्य नव्हते तर विविध जातींमधली सुधारणावादी मंडळी एकत्र आली होती. प्रबोधनकारांनी त्यांच्या कायस्थ प्रभू समाजात घडवलेल्या लोकजागृतीमुळे या समाजातले अनेक तरुण समता संघात सक्रिय होते. भा.वि. प्रधान, एस.एस. गुप्ते, जी.आर. प्रधान, भा.र. प्रधान, द.वि. प्रधान ही प्रबोधनकारांच्या चळवळीत घडलेली मंडळी समता संघाची प्रमुख पदाधिकारीही होती. मुंबईतली हुंडाबंडीची चळवळ अर्धवट सोडून प्रबोधनकार अचानक सातार्‍याला आणि पुढे पुण्यात गेल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते बाबासाहेबांशी जोडले गेले होते. पुण्यात श्रीधरपंतांच्या पुढाकाराने समता समाज संघाची शाखा थेट गायकवाड वाड्यात सुरू झाली होती. प्रबोधनकार तेव्हा पुण्यात नसले तरी त्या प्रक्रियेतले एक मार्गदर्शक होते.

या समता संघाने दादरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात पूजेसह सर्वच प्रकारचा समान अधिकारासाठी आंदोलन सुरू केलं होतं. त्याची पार्श्वभूमी प्रबोधनकारांनी समजावून सांगितली आहे, ती अशी, दादरचा सार्वजनिक गणेशोत्सव सालोसाल थाटामाटात साजरा व्हायचा. सगळ्या लहानमोठ्या दादरकर जाती जमातीकडून वर्गण्या गोळा व्हायच्या. कोण्ाी ना म्हणायचे नाही. आपल्याला होत नाही, जमत नाही नि दादरकर ब्राह्मण मंडळी पुढाकाराने उत्सव साजरे करतात, अलबत सर्वांनी हातभार लावलाच पाहिजे, अशा समजुतीने लोक वर्गण्या देत असत. पण हा ‘पुढाकार’ इतका बळावला की उत्सवाचे कार्यकारी मंडळ एकजात ब्राह्मणांचे, इतरांचा तेथे शिरकाव नाही. कार्यक्रमासाठी येणारे वक्ते, कवि, शाहीर कीर्तनकार सारी एका पिसाची बामण मंडळी. बरे कुणी गावकर्‍यांनी एखाद्या बामणेतर कवि, वक्ता, शाहिराचे नाव सुचविले तर जो तो कार्यकारी मंडळाच्या हुकमतीकडे बोट दाखवायचा. मंत्रजागर म्हणजे फक्त याच मंडळीची घवघवीत कोजागिरी. बामणेतर जागरूक तरुण बारकाईने हे सर्व अभ्यासीत होता. यावेळी स्पृश्यास्पृश्य भेद नष्ट करून अखिल हिंदू जनांची एकजूट एकवटणी करण्यासाठी काही युवक मंडळे निघाली होती आणि त्यांची कामेही चालू झाली होती. सार्वजनिक गणेशोत्सव जर अखिल हिंदूंचा, तर त्यात स्पृश्यांबरोबर अस्पृश्यांनाही भरपूर भाग घेता आला पाहिजे. इतकेच काय, पण कोणत्याही अस्पृश्याला सार्वजनिक उत्सवातल्या गणेश मूर्तीचे पूजन स्वतः करण्याचा हक्क असला पाहिजे, हा विचार बळावला.

प्रबोधनकारांच्या उतार्‍यात असलेला युवक मंडळांचा उल्लेख हा समता समाज संघचाच. समता संघानेच अधिकाधिक अस्पृश्यांना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात वर्गणीदार सदस्य बनवण्याची मोहीम हाती घेतली होती. दैनिक ज्ञानप्रकाश`ने २२ सप्टेंबरच्या १९२८च्या अंकात आलेल्या बातमीत हा उल्लेख सापडतो. `दादरचा गणेशोत्सव व अस्पृश्यांचा सत्याग्रह या मथळ्याने आलेली ही बातमी शांताराम पोतनीस यांच्या बायलाईनने आहे. त्यात बाबासाहेबांच्या समता संघाचं यातलं योगदान स्पष्ट होतं, दादर (मुंबई) येथे दरसाल एक सार्वजनिक गणेशोत्सव होतो. सदर उत्सवांतील पूजाअर्चा, मिरवणूक वगैरे कार्यक्रम स्पृश्य लोकांकडून आजपर्यंत होत असे व ह्या उत्सवास स्पृश्य लोकांकडूनच वर्गणी मिळत असे. यंदांचे साली समाज समता संघाचे रा. देवराव नाईक, प्रधान वगैरे मंडळींनी ह्या सार्वजनिक उत्सवासाठी दादरच्या अस्पृश्य मंडळींकडून सभासदत्वाची बरीच वर्गणी गोळा केली. अस्पृश्य समाजाकडून वर्गणी गोळा केली गेल्यामुळे ह्या उत्सवात त्यांना स्पृश्य समाजाप्रमाणे वावरण्यास व प्रत्येक कार्यक्रमांत भाग घेण्यास पूर्ण अधिकार प्राप्त झाले. परंतु उत्सवाची वर्गणी घेतली जाऊनही उत्सवांतील कार्यक्रमांत भाग घेण्यास कार्यकारी मंडळांत पुराणमतवाद्यांचा विशेष भरणा असल्यामुळे अस्पृश्यांना अडथळे उत्पन्न करण्यात येऊन हरकती घेण्यांत येण्याचा संभव होता म्हणून उत्सवात जरूर तर सत्याग्रह करून आपले न्याय्य हक्क प्रस्थापित करण्याचे त्यांनी ठरविले.

दादर पश्चिमेला फूल मार्केटपासून कबुतरखान्याला जाणार्‍या रस्त्याचं नाव डॉ. मो.चि. जावळे रोड असं आहे. कबुतरखान्याच्या जवळ असणार्‍या मशि‍दीविरुद्ध विष कालवून त्यांनी पुढच्या काळात महापालिकेत नगरसेवक आणि पुढे थेट महापौरपदही मिळवलं. हेच जावळे तेव्हा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष होते. समता संघाच्या कार्यकर्त्यांनी गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी म्हणजे १६ सप्टेंबर १९२८ला जावळेंना एक नोटीस पाठवली, आम्ही सगळे सह्या करणारे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सभासद आहोत. त्यामुळे प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर इतर स्पृश्य लोकांप्रमाणे आम्हालाही पूजा करायची आहे. त्यामुळे अध्यक्ष या नात्याने त्याची व्यवस्था करावी.
ही नोटीस मिळताच मंडळाच्या कार्यकारी मंडळावर बॉम्बगोळाच पडला. प्रबोधनकारांनी दिलेल्या माहितीनुसार समता संघाने जवळपास पाचशे अस्पृश्यांकडून प्रत्येकी चार आणे वर्गणी गोळा केली होती. ही संख्या खूपच मोठी होती. पण त्यांच्या नोटीशीला उत्तर देण्याऐवजी किंवा समता संघाच्या कार्यकर्त्यांशी बोलणी करण्याऐवजी डॉ. जावळेंनी बळाच्या जोरावर अस्पृश्यांना दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी पोलिसांना बोलावलं. गोरे सार्जंट आपली तुकडी घेऊन हजर होते. शिवाय `ज्ञानप्रकाश`च्या बातमीनुसार त्यांनी बंदोबस्तासाठी गिरणीतून बेकार झालेले उत्तर भारतीय भय्येही बोलावलेले होते. त्यांच्याकडून अस्पृश्य सभासदांना हाकलवून देण्याचा असफल प्रयत्नही त्यांनी करून बघितला. अस्पृश्यांच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय प्राणप्रतिष्ठा करायची नाही असं रावबहाद्दूर बोलेंच्या नेतृत्वात आंदोलकांनी मागणी केली. तर काहीही करून अस्पृश्यांना पूजेचा अधिकार मिळू द्यायचा नाही, असा चंग सनातनी पदाधिकार्‍यांनी बांधला होता.

प्रबोधनकारांनी हे सारं दादरला नेमकं कुठे होत होतं, याचीही माहिती दिली आहे. टिळक पुलाच्या दक्षिणेला पायश्यापाशी आता इमारती असलेल्या ठिकाणी पूर्वी रिकामी जागा होती. त्या जागेवर उत्सवाचा मोठा मंडप बांधलेला होता. जवळच एक नवीन इमारत बांधली जात होती. त्यातल्या प्रवेश करण्याच्या पोर्चसारख्या चिंचोळ्या जागेत गणपतीचं मखर बांधलं होतं. गणपतीची मूर्ती सकाळीच आणून ठेवली होती. प्राणप्रतिष्ठेसाठी ९ वाजताचा वेळ नक्की केला होता. पण बोले सकाळी ८ वाजताच हजर झाले होते. त्यांच्याबरोबर कार्यकर्त्यांचा मोठा जमाव गोळा झाला होता. `ज्ञानप्रकाश`नुसार त्यांची संख्या शेकडो होती, प्रबोधनकार पाच सहाशे सांगतात, तर धनंजय कीरांच्या नुसार तिथे हजारेक कार्यकर्ते होते. थोडक्यात कार्यकर्त्यांची संख्या मोठी होती. तेव्हा टिळक पुलावर जास्त्ा रहदारी नसायची, त्यामुळे चालून गेलं. पण त्यातून मार्ग निघत नव्हता. बोलेंच्या लक्षात आलं की यातून मार्ग काढायचा असेल तर प्रबोधनकारांना बोलवावं लागेल. कारण सोबत असणारे कार्यकर्ते प्रबोधनकारांच्या तालमीतच तयार झालेले होते आणि आंबेडकरांच्या अस्पृश्य कार्यकर्त्यांनी प्रबोधनकारांची परीक्षा घेऊन त्यांना पूर्वीच आपलं मानलं होतं.

बोलेंच्या सांगण्यावरून तरुण कार्यकर्ते भास्करराव कद्रेकर धापा टाकत प्रबोधनकारांच्या घरी आले. तेव्हा साधारण १० वाजले होते. आता पुढचे पाच तास या आंदोलनाची दिशा प्रबोधनकार ठरवणार होते, त्यातून इतिहास घडणार होता. फक्त नावापुरता सार्वजनिक असणारा गणेशोत्सव आता खर्‍या अर्थाने सार्वजनिक बनणार होता…

 

Previous Post

महाराष्ट्राच्या मातीत उगवेल का थलपती?

Next Post

थलपतीची ’विजय’ गाथा!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.