• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

महाराष्ट्राच्या मातीत उगवेल का थलपती?

सदानंद घायाळ (राज्यकारण)

marmik by marmik
May 15, 2026
in राज्यकारण
0
महाराष्ट्राच्या मातीत उगवेल का थलपती?

मे २०२६ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाने तामिळनाडूत एका नव्या राजकीय पर्वाला सुरुवात झाली. त्या राज्यातले राजकारण द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) आणि ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (अण्णाद्रमुक) या दोन राजकीय पक्षांभोवतीच फिरत होते. एक प्रकारची दुहेरी मक्तेदारी निर्माण झाली होती. हीच मक्तेदारी मोडीत काढलीय तामीळ सुपरस्टार सी. जोसेफ विजय उर्फ ‘थलपती’ याच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (टीव्हीके) या पक्षाने. टीव्हीकेने एकूण २३४ पैकी १०८जागा जिंकून सर्वांत मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आणि पदार्पणातच थलपती विजय राज्याचा मुख्यमंत्रीही बनला आहे. त्यामुळे, एक सुपरस्टार थेट मुख्यमंत्री कसा झाला? तामिळनाडूत सिनेस्टार्सना मिळणार्‍या या यशाचं गमक काय? महाराष्ट्राच्या मातीत मराठी थलपती का होत नाही? असे अनेक प्रश्न निर्माण झाले.

विजयने मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर केलेलं पहिले भाषण हे त्याच्या राजकीय परिपक्वतेची साक्ष देतं. जनतेशी संवाद साधताना तो म्हणाला, मी कोणताही देवदूत नाही, तर एक सामान्य जीवन जगणारा तुमच्यासारखाच एक साधा माणूस आहे. गरिबी काय असते आणि भूक काय असते, हे मला चांगलंच माहीत आहे, कारण मी एका सामान्य असिस्टंट डायरेक्टरचा मुलगा आहे. ही एक नवी सुरुवात आहे. आता खर्‍या धर्मनिरपेक्ष, सामाजिक न्यायाची नव्या युगाची सुरुवात झालीय. हे नवीन सरकार कोणत्याही एका विशिष्ट धर्माचे नाही. ते हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन अशा सर्व समाजांना समान न्याय देणारे ‘धर्मनिरपेक्ष’ सरकार असेल. त्याने प्रशासकीय पारदर्शकतेचा अजेंडाही मांडला. तसेच अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यातून तरुणांना वाचवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘अँटी-ड्रग स्क्वॉड’ नेमण्याची घोषणाही केली.

तामिळनाडूमध्ये एखाद्या सुपरस्टारने राज्याची सूत्रं हाती घेण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. तामिळनाडूच्या राजकारणात सिनेमा आणि राजकारण यांनी नेहमीच एकमेकांना पूरक अशी भूमिका बजावलीय. द्रविड चळवळीने तामिळ सिनेमाचा अख्खा चेहरामोहराच बदलून टाकलाय. १९६७पासून आतापर्यंत तामिळनाडूचे पाच मुख्यमंत्री हे चित्रपटसृष्टीशी थेट जोडलेले होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणी शंकर अय्यर यांनी आपल्या एका पॉडकास्टमध्ये केलेल्या विश्लेषणानुसार, तामीळ सिनेमाने द्रविडी राजकारण घडवलं नाही, तर द्रविडी राजकारणाने सिनेमावर प्रभुत्व मिळवलं आणि त्याचा अत्यंत प्रभावीपणे वापर केला. १९३०च्या दशकातील रंगभूमीपासून ते १९४०च्या दशकातील तामीळ सिनेमापर्यंत, द्रविडी नेत्यांनी विचार पोहोचवण्यासाठी सिनेमाचा ‘वैचारिक संवादाचे माध्यम’ म्हणून वापर केला.
द्रमुकचे संस्थापक आणि तामिळनाडूचे पहिले द्रविडी मुख्यमंत्री सी. एन. अण्णादुराई हे पेशाने सिनेमा लेखक होते. त्यांनी ब्राह्मणवादविरोधी, जातविरोधी आणि आत्मसन्मान चळवळीचा प्रसार करण्यासाठी सिनेमा आणि नाटकांचा एक ‘मास मिडिया’ म्हणून अत्यंत जबाबदारीने आणि जाणीवपूर्वक वापर केला. त्यांनी ‘नल्लाथंबी’ (१९४८) आणि ‘वेल्लैकारी’ (१९४९) यांसारख्या सिनेमाच्या कथा लिहून प्रस्थापित व्यवस्थेवर टीका केली. अण्णादुराई यांच्यानंतर एम. करुणानिधी यांनी हा वारसा पुढे चालवला. यानंतर उदय झाला तो एम. जी. रामचंद्रन (एमजीआर) यांचा. द्रमुकचे खजिनदार असलेल्या एमजीआर यांनी सिनेमांमधून ‘सामान्यांचा तारणहार’ अशी आपली प्रतिमा उभी केली. गरिबांना मदत करणं, अन्यायविरुद्ध लढणं आणि द्रविडी विचारधारेचा प्रचार करणं हा त्यांच्या सिनेमांचा गाभा होता. १९७२ मध्ये करुणानिधी यांच्याशी मतभेद झाल्यानंतर एमजीआर यांनी ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (अण्णाद्रमुक) पक्षाची स्थापना केली आणि १९७७ मध्ये ते राज्याचे मुख्यमंत्री बनले. त्यांच्या पश्चात त्यांच्या सहकलाकार आणि राजकीय वारसदार जे. जयललिता यांनीही हाच वारसा चालवत राज्यावर अनेक वर्षे अक्षरक्ष: अधिराज्य गाजवलं.

‘द हिंदू’मध्ये बी. कोलप्पन यांनी पेरुमल मुरुगन यांच्या ‘द लँड अँड द शॅडोज’ या पुस्तकाचे परीक्षण लिहिले आहे. यात त्यांनी ‘एमजीआर फेनोमेनन’ काय आहे, याची मांडणी केलीय. या लेखानुसार, ‘कोंगु नाडू’सारख्या ग्रामीण भागात एमजीआर यांनी स्वतःला सामान्यांचा तारणहार म्हणून उभं केलं. शिवाजी गणेशन यांचे सिनेमे प्रेक्षकांना रडवत असत आणि मानसिक त्रास देत असत. याउलट एमजीआर यांच्या सिनेमांनी कधीही दुःखद प्रसंग निर्माण केले नाहीत. प्रेक्षकांना निराश केलं नाही. आज विजयच्या राजकारणातील प्रवेशाला जो प्रचंड प्रतिसाद मिळतोय, तो सिनेमाच्या तामीळ समाजावरील याच चिरंतन प्रभावाचा पुढचा टप्पा आहे.

रजनीकांत विरुद्ध विजयकांत
तामिळनाडूत केवळ सिनेमात लोकप्रिय असणं म्हणजे राजकारणात यशस्वी होणं, असं नाही. ‘द इंडियन एक्सप्रेस’मधील ‘स्क्रीन टू स्टेट’ या लेखात डॉ. गोपालन रवींद्रन म्हणतात, तळागाळातील लोकांसाठी रजनीकांत हे केवळ एक ‘स्टार’ आहेत, राजकीय नेते नाहीत. त्यांच्या पाठीशी कोणतीही ‘विचारधारा’ नव्हती. केवळ अफाट लोकप्रियता असूनही वैचारिक पाठिंब्याअभावी रजनीकांत हे राजकारणात मोठी मजल मारू शकले नाहीत. पण १९९६च्या निवडणुकीत सुपरस्टार रजनीकांत यांच्या एका विधानाने अख्खं निवडणुकीचं गिणत फिरलं होतं. ते वाक्य होतं- अण्णाद्रमुक पुन्हा सत्तेत आली, तर देवालाही तामिळनाडूला वाचवता येणार नाही. या एका वाक्याने जयललितांचाचा पक्ष फक्त चार जागांवरच गुंडाळला गेला आणि त्यांचा स्वतःचाही पराभव झाला. याउलट, स्वतःची एक भक्कम वैचारिक प्रतिमा उभी केल्यास कसा राजकीय फायदा मिळतो, हे अभिनेते विजयकांत यांच्या उदाहरणावरून समजते. विजयकांत यांनी आपल्या सिनेमांमधून जाणीवपूर्वक प्रामाणिकपणा आणि भ्रष्टाचारविरोधी अधिकार्‍याच्या भूमिका साकारल्या. या भूमिकांमुळे गरीब आणि उपेक्षित वर्गामध्ये त्यांची एक भक्कम राजकीय प्रतिमा निर्माण झाली. याच प्रतिमेच्या जोरावर त्यांनी २००५ मध्ये ‘डीएमडीके’ नावाच्या पक्षाची स्थापना केली. पहिल्याच राजकीय सभेत ते एमजीआर यांच्या निळ्या रंगाच्या व्हॅनमधून आले. त्यांनी स्वतःला ‘करुप्पु एमजीआर’ (काळा एमजीआर) म्हणून प्रोजेक्ट केलं आणि २०११च्या विधानसभा निवडणुकीत २९ जागा जिंकून विरोधी पक्षनेतेपदापर्यंत मजल मारली होती. पण विजयकांत यांचं हे यश अल्पजीवी ठरलं.

थलपती विजयचा फॅन क्लब
थलपती विजय यांना आज मिळालेलं, यश ही १५ वर्षांची कमाई आहे. १५ वर्षांपूर्वी जे पेरलं होतं, त्याचं फळ त्यांना आज मिळालं. विजय यांनी २०११ मध्ये ‘विजय मक्कल इयक्कलम’ (व्हीएमआय) नावाने राज्यभर स्वतःच्या फॅन क्लबचं जाळं विणलं. त्याच्या माध्यमातून त्याने शिक्षण, अन्नदान, रक्तदान शिबिरे आणि मोफत शिकवण्या चालवून ग्राऊंड लेवलला काम उभं केलं. याचं संघटनेच्या जिवावर त्याने दोन वर्षांपूर्वी २०२४ मध्ये तमिळगा वेत्री कळघम म्हणजेच टीव्हीके (मराठीत- तामीळ विजय पक्ष) या पक्षाची स्थापन केली. पक्षाकडे सध्या १८.७५ लाख सक्रिय सदस्य आहेत आणि ते २ कोटींपर्यंत नेण्याचे त्यांचं उद्दिष्ट आहे.

विजयने फेब्रुवारी २०२४मध्ये राजकीय पक्षाची स्थापना करतानाच एक गोष्ट क्लिअर केली होती. ती म्हणजे, राजकारण हा आपल्यासाठी फुल टाईम जॉब आहे. सिनेमात काम करत करत राजकारण करणार नाही, तर सिनेमातून १०० टक्के निवृत्तीची ऐतिहासिक घोषणाच त्याने केली. यामुळे जनमानसात एक सिरिअस पॉलिटिशियन म्हणून त्याची प्रतिमा तयार झाली. तसंच पुढे त्याने आपली पॉलिटिकल विचारधाराही स्पष्ट केली. ऑक्टोबर २०२४ मध्ये विल्लुपुरम जिल्ह्यात झालेल्या पहिल्या राजकीय सभेला तब्बल ८ लाख लोकांची उपस्थिती होती. याच सभेत विजयने आपला पक्ष धर्मनिरपेक्ष आणि सामाजिक न्यायावर आधारित चालेल, असं जाहीर केलं. तसंच कोणतीही गोलमोल भूमिका न घेता भाजपला आपला ‘वैचारिक विरोधक’ आणि सत्ताधारी द्रमुकला आपला ‘राजकीय विरोधक’ म्हणून घोषित केलं. केवळ भाजपच नाही, तर भाजपच्या मित्रपक्षांवरही, एनडीए आघाडीवरही टीका केली. भाजप प्रणित आघाडी म्हणजे गुलामांची युती आहे, असा हल्ला चढवला. द्रविड मॉडेलच्या नावाखाली लोकांना फसवणार्‍या आणि भ्रष्टाचाराला वैचारिकतेचा मुखवटा घालणार्‍या पक्षाला सत्तेवरून खाली खेचणं, हे आपल्या पक्षाचं प्रमुख उद्दिष्ट असल्याचं विजयने जाहीर केलं. भाजप फॅसिस्ट असेल तर डीएमकेदेखील त्यांच्यापेक्षा काही कमी नाही, अशी टीका त्याने केली होती.

द्रविड विचारधारेचे आधारस्तंभ असलेले ई. व्ही. रामासामी पेरियार यांचा विचार हाच द्रमुक आणि अण्णाद्रमुक या पक्षाचा मूळ विचार आहे. त्याच पेरियार यांना थलपतींनीही आपल्या पक्षाचा मार्गदर्शन मानलं. त्यांनी पहिल्याच सभेत स्पष्ट केलं की, आम्ही द्रविड राष्ट्रवाद आणि तामीळ राष्ट्रवाद यांच्यात भेद करणार नाही. हे दोन्ही याच मातीचे दोन डोळे आहेत. आम्ही स्वतःला कोणत्याही एका ओळखीमध्ये बंदिस्त करू इच्छित नाही. त्याचवेळी विजय यांनी आपला पक्ष पेरियार यांनी दाखवलेल्या सामाजिक न्याय आणि महिला शक्तिकरणाच्या मार्गानेच वाटचाल करेल हेही स्पष्ट केलं. पण त्याचवेळी त्यांनी पेरियार यांचा नास्तिकतावाद मात्र नाकारला. पेरियार यांच्या समाजसुधारणेच्या विचारासह विजय यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सामाजिक न्यायाचा विचार आणि राज्यातील मातब्बर काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री के. कामराज यांचा प्रशासकीय, विकासकामांचा दृष्टिकोन आपल्या पक्षाची विचारधारा असल्याचं जाहीर केलं.

महाराष्ट्रात थलपती का नाही?
तामिळनाडूत सिनेस्टार्स राजकारणात यशस्वी होतात, अभिनेत्याचा नेता होतो, तसं महाराष्ट्रात का होत नाही?

१. महाराष्ट्रातलं प्रादेशिक वैविध्य

तामिळनाडूमधला नाडू म्हणजे देश. महाराष्ट्रातही राष्ट्र आहे, पण दोन्हीमध्ये बेसिक केमिकल लोचा आहे. तामिळनाडूमध्ये द्रविड चळवळीने संपूर्ण राज्याला द्रविड अस्मितेमध्ये बांधलं. स्वातंत्र्यकाळात काँग्रेसमध्ये असलेल्या ई. व्ही. रामासामी पेरियार यांनी द्रविड अस्मितेची वैचारिक मांडणी केली. स्वातंत्र्यानंतर ६०च्या दशकात याच द्रविड अस्मितेला नवे धुमारे फुटले. द्रमुकने आपला राजकीय विचार सिनेमातून, कलेतून मांडायला सुरुवात केली. संपूर्ण राज्यात आपला विचार पसरवला. परिणामी, १९६७ मध्ये काँग्रेसच्या हातातून द्रमुकच्या हातात सत्ता आली. त्यानंतर द्रविड अस्मिता आणखी मजूबत झाली. याउलट महाराष्ट्रात राष्ट्र असूनही मराठी अस्मिता नावाची गोष्ट समजायला महाराष्ट्राला ६०चं दशक उजडावं लागलं. शिवसेनेच्या स्थापनेनंतर मराठी अस्मिताकेंद्री राजकारण सुरू झालं. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मुंबई ही महाराष्ट्राची अस्मिता. पण ती टिकवण्यासाठी मराठी अस्मिता टिकली पाहिजे. मराठी बाणा टिकला पाहिजे, हेच उर्वरित महाराष्ट्राला अजूनही कळालं नाही. कारण, वेगवेगळ्या प्रदेशामध्ये विभागलेल्या महाराष्ट्राला एका विचारात बांधण्यात आपल्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय चळवळी अपयशी ठरल्या. विदर्भाला, मराठवाड्याशी आणि मराठवाड्याला पश्चिम महाराष्ट्राशी देणंघेणं नाही, अशा पेचात मराठी अस्मिता अडकली. ती मुंबईबाहेर रुजलीच नाही. मुंबईतही केवळ सोयीपुरताच तिचा वापर झाला.

२. फॅन क्लबची प्रयोगशाळा
तामिळनाडूत फॅन क्लब्स हे केवळ ‘एनजीओ’ म्हणून काम करत नाहीत, तर ते राजकीय पक्ष उभारणीच्या प्रयोगशाळा असतात. जसं आपल्याकडे राजकारणी लोक आपल्याला मुलाला लाँच करण्याआधी ‘महिपतराव बोंबले मित्रमंडळ’ टाईप गोष्टी करतात, काहीसा तसाच हा प्रकार आहे. विजयच्या ‘व्हीएमआय’ने १५ वर्षे तळागाळात काम करून एक भक्कम राजकीय जाळं निर्माण केलं आणि त्याचं रूपांतर ‘टीव्हीके’ पक्षात केलं. महाराष्ट्रात मात्र सिने अभिनेत्यांचे फॅन क्लब किंवा सामाजिक उपक्रम (उदा. नाम फाऊंडेशन) हे पूर्णपणे ‘एनजीओ’ टाईप आहेत. महाराष्ट्रातील नट सामाजिक काम उभे करतात. पण त्यांची भूमिका प्रस्थापित सत्तेला आव्हान देण्याची नसते. सरकारवर टीका करत बसण्यापेक्षा सरकारशी जुळवून घेत आपलं काम करावं, अशा मर्यादित विचारात महाराष्ट्रातील नटांचं सामाजिक काम चालतं.

३. बहुजनवादाचा प्रभाव
हा सर्वांत महत्त्वाचा वैचारिक भेद आहे. तामिळनाडूत पेरियार यांच्या ‘स्वाभिमान चळवळीचा’ आणि सामाजिक न्यायाचा विचार तळागाळात पोचवण्यासाठी अण्णादुराई व करुणानिधी यांनी जाणीवपूर्वक ‘सिनेमा’ या माध्यमाचा वापर केला. तामीळ सिनेमाने बहुजन राजकारणाचं आणि द्रविडी तत्त्वज्ञानाचं थेट प्रतिनिधित्व केलं. याउलट, महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे महाराष्ट्रात बहुजन चळवळ आधी आली असली, तरी मराठी सिनेमाने या बहुजन विचाराला कधीही मुख्य प्रवाहात आणलं नाही. मराठी सिनेसृष्टी बहुतांशी विशिष्ट जाती-परंपरा आणि त्यांच्याच चालीरीतींपुरती मर्यादित राहिली. तामीळ सिनेमा जसा संपूर्ण तामीळ समाजाचा इतिहास, त्यांची राजकीय मांडणी आणि त्यांचा सांस्कृतिक संघर्ष पडद्यावर उभा करतो, तसं मराठी सिनेमाला जमलं नाही. मराठी सिनेमाचे सांस्कृतिक भांडवल तोकडे राहिल्यामुळे तो कधीही बहुजन चळवळीचं किंवा राजकीय क्रांतीचं हत्यार बनू शकला नाही.

४. सुपरस्टार आणि चाहत्यांमधील ‘दुहेरी नातं’
तामिळनाडूतील सुपरस्टार्स केवळ चाहत्यांच्या प्रेमावर जगत नाहीत, तर ते चाहत्यांसाठी राजकीय जोखीम घेतात. विजयने भाजपला आपला वैचारिक विरोधक आणि द्रमुकला राजकीय विरोधक घोषित करून थेट प्रस्थापित सत्तेला आव्हान दिलं. नटाने चाहत्यांसाठी अशी स्पष्ट राजकीय भूमिका घेणं, हे त्या ‘दुहेरी नात्याचं’ यश आहे. महाराष्ट्रात मात्र नटांचा प्रभाव काही विशिष्ट वर्तुळांपुरताच मर्यादित राहतो. मराठी प्रेक्षकाने मराठी नटाला डोक्यावर घेतलं, तरी मराठी नट मात्र चाहत्यांसाठी आणि समाजाच्या प्रश्नांसाठी स्पष्ट ‘राजकीय भूमिका’ घेण्यापासून पळ काढतो. सपक असण्यातच त्याला लोकप्रिय असणं वाटतं. त्यामुळे कोणत्याही प्रस्थापित सत्तेच्या विरोधात ठामपणे उभं राहण्याची किंवा स्वतःची राजकीय विचारधारा मांडण्याची हिंमत मराठी स्टार्स दाखवत नाहीत. परिणामी, महाराष्ट्रात ‘सुप्रसिद्ध अभिनेते’ तयार होतात, पण तामिळनाडूसारखे थेट मुख्यमंत्रीपदावर बसणारे ‘मास लीडर’ तयार होत नाहीत.

तामीळ सिनेमामध्ये जसे सुपरस्टार, मास हिरो आहेत, तसे मराठीत सुपरस्टारही नाहीत. दादा कोंडके यांचा अपवाद वगळला, तर आजही संपूर्ण महाराष्ट्रभर प्रभाव असलेला, अपील असलेला सुपरस्टार नसणं, ही तशी महाराष्ट्राचीच शोकांतिका आहे. दादा कोंडकेही सुपरस्टार कसे झाले, याचं कारणंही आपल्याला त्यांच्या वैचारिक जडणघडणीत सापडतं. दादा कोंडके यांची वैचारिक जडणघडण ही ‘राष्ट्र सेवा दल’मध्ये झाली. राष्ट्र सेवा दल ही १९४१ मध्ये साने गुरुजी, नानासाहेब गोरे, एस. एम. जोशी यांनी देशात समाजवादी, धर्मनिरपेक्ष विचारधारेची पाळंमुळं रुजावी म्हणून केली होती. तसंच, महाराष्ट्रातील सामाजिक, सांस्कृतिक चळवळी पथनाट्यापुरत्या राहिल्या. जब्बार पटेलांसारखा अपवाद वगळला, तर महाराष्ट्रात राजकीय भाष्य करणारे सिनेमेही कुणी तयार केले नाहीत. निळू फुले, श्रीराम लागू यांनी राजकीय भाष्य केलं. पण त्यांचं काम हे भूमिकाकेंद्री राहिलं.

त्यामुळेच तामिळनाडूतील थलपती विजयचा हा ऐतिहासिक विजय केवळ एका अभिनेत्याच्या लोकप्रियतेचा चमत्कार नाही. तो तामिळनाडूच्या गेल्या साठ वर्षांच्या द्रविडी विचारधारेचा, फॅन क्लबच्या संस्थात्मक बांधणीचा आणि नव्या पिढीच्या राजकीय आकांक्षांचा परिणाम आहे. विजयने मूळ परंपरेला आधुनिक तंत्रज्ञानाची, पारदर्शक प्रशासनाची आणि धर्मनिरपेक्षतेची जोड देऊन एका नव्या ‘द्रविडियन मॉडेल’चा पाया रचलाय.

महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सिनेमात ही वैचारिक सांगड कधीच बसली नाही. त्यामुळे इथे सुपरस्टारही जन्मला नाही आणि सुपरस्टारचा मुख्यमंत्रीही झाला नाही. नजीकच्या भविष्यकाळात्ा तशी शक्यताही नाही. स्टारडमला सामाजिक न्यायाची आणि ठाम राजकीय विचारधारेची जोड मिळते, तेव्हाच खर्‍या अर्थाने ‘थलपती’ जन्मतो, हेच खरं.

Previous Post

मराठीला ‘बोल’ लावू नका !

Next Post

गणेशोत्सवाला सार्वजनिक बनवण्यासाठी…

Next Post
विक्रमाच्या साडेसातीचं फॅक्टचेक

गणेशोत्सवाला सार्वजनिक बनवण्यासाठी...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.