• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

थलपतीची ’विजय’ गाथा!

मुकेश माचकर (अधोरेखित)

Nitin Phanse by Nitin Phanse
May 15, 2026
in अधोरेखित
0
थलपतीची ’विजय’ गाथा!

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये धक्कादायक आणि अपेक्षित निकाल होता पश्चिम बंगालचा. तिथली निवडणूक चोरण्यासाठी खुद्द पोलिस प्रमुखाच्याच नेतृत्त्वाखाली अशी काही व्यवस्था करण्यात आली होती की ती निवडणूक ममता बॅनर्जी जिंकल्या असत्या तर तो एक फार मोठा पराक्रम ठरला असता…त्यातून कदाचित दिल्लीची सत्ता उलटली जाण्याइतकी मोठी वावटळ सुरू झाली असती…२०२४ च्या लोकसभा निवडणुकांनंतरचा सत्ताधार्‍यांच्या तोंडचं पाणी पळवणारा तो सगळ्यात महत्त्वाचा क्षण ठरला असता… पण, यावेळी अगदी नेमून दिल्यासारखं चोख काम केलं फौजदारानं… या निवडणुकीत खरा धक्का दिला थलपती विजय याने.

तामिळनाडूच्या निवडणुकीत खरी लढत द्रविड मुन्नेत्र कळघम आणि अण्णाद्रमुक यांच्यात आहे, थलपती विजय हा सुपरस्टार असला तरी तो १५-२० जागा मिळवेल आणि कदाचित त्रिशंकू विधानसभेत त्याला टेकू देण्याची संधी मिळेल, तो किंगमेकर बनेल, अशी अनेक राजकीय पंडितांची अपेक्षा होती. प्रशांत किशोर यांचा अपवाद वगळता एकाही राजकीय निरीक्षकाने विजयला सिरियसली घेतलं नव्हतं… प्रशांत किशोर म्हणाले होते, विजय एक त्सुनामी घेऊन येणार या निवडणुकीत. तामीळ वेट्री कळघम या विजयच्या पक्षाने अक्षरश: तेच केलं आणि सर्वाधिक १०८ जागा जिंकल्या… तामिळनाडूतल्या भाज्यपालांनी विजयच्या सत्तास्थापनेच्या दाव्यात अडसर सारण्याचे खूप प्रयत्न केले (तिथे भारतीय जनता पक्षाच्या एकमेव आमदाराने सत्तास्थापनेचा दावा केला असता, तर भाज्यपालांनी जातीने सगळी जुळवाजुळव करून दिली असती कदाचित, फोडाफोडी, ईडी-सीबीआयच्या दमदाट्या वगैरेंचं प्रशिक्षण शाखेवरच देत असावेत त्यांना), पण अखेर विजयने ११८चा बहुमताचा आकडा ओलांडला आणि रविवारी त्याचा शपथविधीही पार पडला.

स्टॅलिन यांचा द्रमुक हा सत्ताधारी पक्ष विजयच्या झंझावातात उद्ध्वस्त झाला. खुद्द स्टॅलिन यांना पराभूत व्हावं लागलं (अर्थात, स्टॅलिन, बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि आसाममध्ये तरुण गोगोई यांच्या पराजयाचे शिल्पकार ज्ञानेश कुमार आहेत, असा दावा विरोधक आकडेवारीनिशी करत आहेत, तो भाग वेगळा). स्टॅलिन यांची कारकीर्द आताच्या सर्व मुख्यमंत्र्यांमध्ये (राज्यात कायदा सुव्यवस्था, सामाजिक सलोखा राखणे, राज्याची खरी प्रगती साधणारे उद्योगधंदे आणणे, विकासाचा दर कायम राखणे, शिक्षणावर खर्च करणे, ही मुख्यमंत्र्यांची कामं असतात, असं गृहीत धरलं तर) सर्वात उजवी होती. त्यांची तुलना केरळच्या पिनरई विजयन यांच्याशीच होऊ शकते. पण, तरीही अँटी इन्कम्बन्सी आणि घराणेशाहीचा फटका त्यांना बसलाच. उदयनिधी स्टॅलिन या आपल्या चिरंजीवांना उपमुख्यमंत्री बनवण्याचा आणि त्यांचं राजकारण सेट करून देण्याचा त्यांचा इरादा जनतेने उधळून लावला.

अण्णाद्रमुक हा एमजी रामचंद्रन यांच्या ग्लॅमरमधून जन्मलेला आणि नंतर जयललिता यांच्या ग्लॅमरवर तगलेला पक्ष. त्याची स्वतंत्र, वेगळी काही विचारधारा नाही. तामिळनाडूमध्ये हीच एक चमत्कारिक गोष्ट आहे. प्रखर द्रविड अस्मिता, द्विभाषा सूत्र, बहुजनवाद यांच्या पायावर सगळी द्रविड चळवळ उभी होती. तीच तामिळनाडूचा एकंदर राजकीय अवकाश व्यापून आहे. द्रविड अस्मितेच्या विचारधारेचा मुख्य वारसा द्रमुककडे आणि प्रतिबिंबित वारसा अण्णाद्रमुककडे आहे. पण, थलपती विजयसुद्धा हाच वारसा सांगतो, हे विशेष.
थलपती विजयचा विजय व्हायला लागला, तसा तामिळनाडूच्या राजकारणाशी परिचय नसलेल्या कुजबुज आघाडीने तो ‘भाजपचाच माणूस’ असल्याच्या कंड्या पिकवायला सुरुवात केली. कधी ना कधी धाक दाखवून किंवा आमीष दाखवून त्याला आपल्या कळपात ओढता येईलच, असा विचार त्यामागे असणार. भाजपशी प्रमाणाबाहेर घरोबा करणार्‍या अण्णाद्रमुकची काय अवस्था लोकांनी केली आहे, हे विजयला माहिती असेलच ना! विजयने प्रचाराच्या सुरुवातीलाच भाजप हाच आपला शत्रू आहे आणि द्रमुक हा राजकीय शत्रू आहे, हे स्पष्ट केलेलं होतं. साहजिकच तो (ईडीप्रयोग, सिंगल इंजीन सरकारांना त्रास देण्याचे केंद्र सरकारचे उपक्रम या सगळ्या प्रकारांना तोंड देण्यात यशस्वी ठरला तर) स्वेच्छेने भाजपबरोबर जाण्याची शून्य शक्यता आहे. मुळात या राज्यात द्रविड अस्मिता ही द्रविड संस्कृती हा एक देश आहे, असं मानणारी आहे. ती संघराज्याचा भाग आहे, हे मानणारे सरकार दिल्लीत नसताना दिल्लीशी सोयरीक करणारा पक्ष किंवा नेता इथे तग धरू शकत नाही. त्यामुळे विजय काँग्रेसबरोबर जाणार हे स्पष्ट होतं, तसंच घडलं.

हे झाल्यावर आणि मुळात विजय निवडणूक लढवत असतानाही दक्षिणेतल्या सिनेमा आणि राजकारण यांच्यातल्या सांगडीची विशेष माहिती नसलेली मंडळी हा कोण अर्धवट उपटसुंभ राजकारणात आलाय? या दक्षिणेच्या मंडळींमध्ये व्यक्तिस्तोम (विश्वगुरूंच्या लेकरांच्या तोंडी हा शब्द शोभत नाही… पण तसं तर त्यांनी मौनात जाणंच योग्य आहे अशी परिस्थिती आहे एकंदर) फार, सिनेमानटांच्या ग्लॅमरला भुलणारे हे लोक आहेत, म्हणून कोणालाही निवडून देतात, असले अज्ञानमूलक ताशेरे ओढू लागली.

दक्षिणेतला सिनेमा राजकारण आणि समाजकारणाच्या हातात हात घालून चालतो, यालाही आता जवळपास एक शतक लोटलेलं आहे. पेरियार यांच्या बहुजनमुक्तीच्या, सामाजिक विषमतेच्या विरोधात सुरू झालेल्या लढ्यातून तयार झालेली द्रमुकची चळवळ सुरुवातीपासूनच पथनाट्यांसारखी माध्यमं प्रभावीपणे वापरत होती. कलेचं माध्यम लोकांपर्यंत पोहोचायला योग्य राहील, याची जाणीव असलेले लेखक त्यांच्याकडे होते. अण्णादुराई हे त्यांच्यापैकीच एक. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात महात्मा गांधीजींना सिनेमाच्या कलेचं महत्त्व लक्षात आलं नाही, त्यांना ती स्वस्त, लोकानुनयी कला वाटली. साहजिकच काँग्रेसची नेतेमंडळीही या कलेबद्दल हीनत्वाच्या भावनेने बोलत. स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत तामिळनाडुमध्ये चांगली पकड जमवलेल्या द्रमुकच्या नेत्यांनी जेव्हा ‘कधीतरी या राज्यात आमचं सरकार असेल’ अशी भावना व्यक्त केली, तेव्हा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेल्या कामराज यांनी त्यांची हेटाळणी केली. ‘नट एखाद्या राज्याचं सरकार सांभाळतायत अशी कल्पना तरी करता येईल का,’ अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी १९५०च्या आसपास केलं. त्यानंतर १७ वर्षांनी द्रमुकचे अण्णादुराई मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले.

पण हा प्रवास सोपा नव्हता. द्रमुकची वाढती लोकप्रियता काँग्रेसला सलत होतीच. त्यांच्या प्रचाराची सगळी माध्यमं निष्प्रभ करण्याचे प्रयत्न झाले. करुणानिधी यांनी लिहिलेल्या दोन नाटकांवर बंदी आली. पराशक्ती या त्यांनीच लिहिलेल्या आणि शिवाजी गणेशन यांनी नायकाची भूमिका साकारलेल्या सिनेमावरही बंदी आली होती सुरुवातीला. हा द्रविड समाजकारण आणि राजकारणातला एक मैलाचा दगड असलेला सिनेमा आहे. या सिनेमाच्या माध्यमातून करुणानिधी यांनी तत्कालीन तामीळ समाजातल्या अनेक कुप्रथांना ललकारलं होतं. याच सिनेमातून त्यांनी अभिजनांची संस्कृतोद्भव शब्दांनी भरलेली पुस्तकी भाषा नाकारून सर्वसामान्य माणसांच्या अस्सल तामीळ भाषेतले संवाद लिहिले होते.

यानंतर द्रमुकचं तत्त्वज्ञान मांडणार्‍या, प्रचार करणार्‍या सिनेमांकडे काँग्रेस सरकारच्या सेन्सॉर बोर्डाची वक्रदृष्टी अधिक तीव्रतेने वळू लागली. द्रमुकचा झेंडा, राजकीय तत्त्वज्ञान यातलं काहीही सिनेमात दिसलं, ऐकायला आलं की ते कापून टाकायचं, हा सेन्सॉरचा अलिखित नियम होता. ज्या सिनेमांमध्ये असं कापता येण्यासारखं काही दिसायचं नाही, त्यांच्यात असे कट दिले जायचे की सिनेमाची कथाच प्रेक्षकांना धड समजू नये. हा वाईट पद्धतीने लिहिलेला, सुसंगत नसलेला सिनेमा आहे, असं प्रेक्षकांना वाटलं की तो बॉक्स ऑफिसवर चालणार नाही, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार नाही, हे त्यामागचं हिशोबी गणित. पण द्रमुककडे एकाहून एक सरस लेखक होते. त्यांनी द्रमुकचा उघड प्रचार करण्याऐवजी वेगळे, चतुर मार्ग शोधून काढले. उदा. सिनेमात अण्णा म्हणजे मोठ्या भावाची व्यक्तिरेखा असायची. तो सद्गुणीr, त्यागमूर्ती असायचा (दक्षिणी सिनेमांवर बेतलेल्या हिंदी सिनेमांमध्येही असे बडे भय्या आढळतात ते त्यामुळेच). साहजिकच अण्णा किती चांगला आहे, अण्णा किती महान आहे, अण्णासारखा कोणी नाही, अशा आशयाच्या संवादांची सिनेमात रेलचेल असायची. हा संदर्भ अण्णादुराई यांना उद्देशून आहे, हे प्रेक्षकांना माहिती असल्यामुळे अण्णाचा उल्लेख आला की थिएटरमध्ये टाळ्याशिट्यांचा कडकडाट व्हायचा. काय उपयोग त्या सेन्सॉरशिपचा.

१९६७ मध्ये अण्णादुराई यांच्या नेतृत्त्वाखाली द्रमुकचं पहिलं सरकार आलं. त्यांच्या निधनानंतर करुणानिधी हे मुख्यमंत्री झाले. त्यांनी लिहिलेल्या व्यक्तिरेखा साकारणारे एमजी रामचंद्रन हे त्यांचे घनिष्ट मित्र. या दोन मित्रांमध्ये दुरावा आला आणि परिणामी एमजीआर यांनी बाहेर पडून अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम हा दुसरा पक्ष स्थापन केला. दोघांची विचारधारा तीच. करुणानिधींनी कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेत गोरगरीबांना आधार देणार्‍या योजना, शिधावाटप, वस्तूवाटप, द्रविड अस्मितेचं रक्षण असा एक पॅटर्न तयार केला होता. एआयएडीएमकेकडेही तोच पॅटर्न होता, शिवाय एमजीआर यांचं ग्लॅमर होतं. साहजिकच त्यानंतर एक टर्म द्रमुक, एक टर्म अण्णाद्रमुक अशी सत्तेची भाकरी सतत फिरत राहिली. कोणीही शिरजोर बनू नये, याची काळजी (केरळमधील जनतेप्रमाणेच) तामीळ जनतेनेही घेतली. एमजीआर यांच्यानंतर पक्षात आणि त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात सावलीसारख्या असलेल्या जयललिता यांच्या कारकीर्दीपर्यंत हा चषक फिरता राहिला. त्यांच्या पश्चात त्या पक्षाकडे मोठा करिश्मा असलेला नेताच राहिला नाही. साहजिकच द्रमुकला अधिक काळ सत्ता मिळाली. ती आकस्मिकपणे विजयने हिसकावून घेतली.

थलपती विजयसारख्या नटाला एवढा मोठा विजय कसा मिळाला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना?
मुळात तामिळनाडूमध्ये राजकीय पार्श्वभूमी आणि भूमिका नसलेला नट असणं कठीण आहे. हा सिनेमा राजकारणाचा एक भाग असल्यासारखाच चालतो. मनोरंजनाच्या गुटीतून द्रविड अस्मितेचा आणि आपल्या विचारधारेचा प्रचार केला जातो. सरकारवर ताशेरे ओढले जातात. बाह्यत: भडक आणि बटबटीत कथानकं, तशीच गाणी, असा सगळा सरंजाम असतो तो पिटातल्या पब्लिकला खेचायला. वरून तमाशा आणि आतून प्रचाराचं कीर्तन असा हा प्रकार.

अभिनेत्यांना दैवत्व देणारा हा समाज आहे, कारण इथे सिनेमा ही लोककलाच आहे. सर्वात मोठी. त्यामुळे भावनाशील चाहते
फॅन क्लब स्थापन करतात. प्रत्येक अभिनेत्याचा सिनेमा रिलीझ होत असताना पहिल्या काहाr दिवसांचे सगळे खेळ या
फॅन क्लब्जनीच बुक केलेले असतात. सिनेमा थिएटरांच्या बाहेर भव्य कटआऊट उभे करून त्यांना दुधाने अभिषेक घालणे, फुलांची सजावट करणे, हे सगळे उपक्रम फॅन क्लबच्या माध्यमातून होतात. पण तेवढंच होत नाही. कमल हासनने त्याच्या फॅन क्लब्जना व्यक्तिपूजेच्या पलीकडे सामाजिक कार्य करायला उद्युक्त केलं. त्यानंतर तोच पायंडा पडला. अभिनेत्याचा राजकीय कल काय आहे, त्यानुसार कार्यक्रम आयोजित करणं, समाजात कामं करणं, समाजाच्या आशा आकांक्षा स्टारपर्यंत पोहोचवणं हे सगळं काम फॅन क्लब करतात. विजयचे फॅन क्लब २००९पासून हे काम करतात आणि २०१७ सालापासूनच भविष्यात राजकारणात उतरायचं आहे, अशा प्रकारे त्यांचं काम सुरू झालं होतं… म्हणजे पक्ष संघटना तयार होती, कार्यरत होती, तिने फक्त औपचारिकपणे राजकारणात उतरायचं होतं.
थलपती विजय हा आजच्या काळातला निर्विवाद सर्वात मोठा स्टार आहे तामीळमधला. त्याच्या सिनेमांमध्ये काही खास आशयघनता नसते. तो अभिनय कौशल्यासाठी ओळखला गेलेला नाही. मात्र, तद्दन व्यावसायिक सिनेमांमध्ये ज्या प्रकारचा ग्रेटर दॅन लाइफ पर्सोना उभा करायचा असतो, त्यात तो माहीर आहे. १९९०च्या दशकापासून एस. ए. चंद्रशेखर या दिग्दर्शक पित्याच्या प्रयत्नांनी तो सिनेमात नायक म्हणून कार्यरत आहे. सुरुवातीला गोल चेहर्‍याचा ठोकळा अशी संभावना झालेल्या विजयने काळानुसार बदल केले आणि
अ‍ॅटलीसारख्या दिग्दर्शकाबरोबर त्याला आपल्या पद्धतीचा सिनेमा घडवता आला… किंबहुना अ‍ॅटलीनेच त्याची आजची इमेज घडवली, असं म्हणायला हरकत नाही.

वयाच्या ५८ व्या वर्षी त्याने अभिनयाचं करियर बाजूला सारून राजकारणात येताना काही फंडे क्लियर ठेवले आहेत. भाजपचा आणि दिल्लीच्या बुलडोझरचा विरोध हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. द्रविड चौकटीतलं राजकारण हा दुसरा मुद्दा. वडील ख्रिश्चन आणि आई हिंदू असणं हे त्याच्यासाठी मायनस पॉइंट ठरलं नाही, तर प्लस पॉइंट ठरलेलं आहे- याचं श्रेय अर्थातच तामीळनाडूच्या सुबुद्ध स्वीकारशीलतेला द्यायला हवं. द्रविड अस्मितेचा सतत जागर करणार्‍या या राज्याने मराठी शिवाजी गायकवाडला रजनीकांत बनवलंच आणि जन्माने मल्याळी असलेल्या एमजीआर आणि जयललिता यांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारलंच की!

थलपती विजयसाठी प्रचार सोपा नव्हता. त्याला राजकीय भाषणबाजी जमत नाही. त्याने शिकवणी लावून, टेलिप्रॉम्पटर वापरून ती केली नाही- त्यापेक्षा छोटे छोटे संदेश दिले. स्थानिक न्यूज चॅनेल्सवर आपल्याला प्रचार करता येणार नाही, हे लक्षात आल्यावर त्याने फॅन क्लब्जच्या माध्यमातून स्मार्ट जाहिरातींमधून प्रचार केला. त्यासाठी रील्स, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप, यूट्युब यांचा चांगला वापर केला. एकाही प्रमुख माध्यमाला त्याने एकही मुलाखत दिली नाही. तामिळनाडूच्या रेवडीवाटपाच्या परंपरेनुसार इतरांपेक्षा जास्त रेवड्या वाटण्याचं आश्वासन त्याने दिलं. मात्र एआय मंत्रालय, नोकर्‍या, उच्चशिक्षणासाठी विनातारण कर्ज अशा, जेन झी या नावाने ओळखल्या जाणार्‍या नवमतदारांना भुरळ घालणार्‍या योजना त्याने जाहीर केल्या.

त्यातूनच तो पहिल्या उतारीतच ३४ टक्के मतं मिळवून मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचला.

त्याच्या विजयातून काय लक्षात घ्यायचं?

जेन झी ही पिढी राज्यकर्त्यांकडून वेगळ्या अपेक्षा करते आहे, निदान शिक्षित प्रदेशांमध्ये. त्यांची पूर्तता न करता नेहमीच्या राजकीय चाकोरीत फिरणारे, विभाजनवादी राजकारण करणारे पक्ष काही प्रमाणात यशस्वी होतील. निवडणुका चोरून जितंमयाचे ढोल पिटतील. सोशल मीडियातल्या पाळीव बगलबच्च्यांकडून आपण अजेयच आहोत, असा आव आणतील. पण तरुणाईची खदखद बाहेर पडेल तेव्हा ती या सगळ्यांना धक्का देऊन कायमची कोपर्‍यात ढकलून देईल. या पिढीच्या गरजा, संवेदना ओळखणारे आणि सर्वसमावेशक राजकारण करणारे नेते भक्कमपणे उभे राहिले, तर तरुणांचा सैलाब त्यांना हातोहात उचलून घेईल.

थलपती विजय सक्रिय राजकारणात नवखा आहे. त्याच्यात खरोखरच राजकीय गुणवत्ता किती आहे, त्यावर त्याचं आणि तामीळनाडूचं काय होईल ते ठरेल. तो यशस्वी ठरला किंवा नाही ठरला, तरी राजकारणाचा हा बदललेला पोत जे लक्षात घेणार नाहीत, ते राजकीय पक्ष ज्वालामुखीच्या मुखावर निवांत बसल्यासारखेच असतील.

ज्वालामुखीचा उद्रेक अटळ आहे आणि त्यानंतरचा विनाशही.

Previous Post

गणेशोत्सवाला सार्वजनिक बनवण्यासाठी…

Next Post

लोकां सांगे ब्रह्मज्ञान…

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.