विधानसभांच्या निवडणुकांचा केंद्र सरकारने फुगवलेला उल्हास संपला की इंधनटंचाईचा आणि महागाईचा फाल्गुन मास सुरू होणार याची देशातल्या शहाण्यासुर्त्या लोकांना खात्री होतीच. देशाची अर्थव्यवस्था तोळामासा प्रकृतीला पोहोचली आहे आणि आता ‘एक धक्का और दो’ असा नाराही न देता हा डोलारा आपल्या वजनानेच ढासळणार आहे, हेही दिसत होते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्ञानेश कुमारांच्या साथीने चोरलेल्या विधानसभा निवडणुकांचे हारतुरे, ढोलनगारे, नाटकी लोटांगणे वगैरे सगळी इव्हेंटबाजी करून झाल्यावर टीव्हीवर येऊन गंभीर चेहर्याने सगळ्या देशाला काटकसरीचं आवाहन केलं. शक्यतो घरून काम करा, सार्वजनिक वाहतुकीची साधनं वापरा, इंधन कमी जाळा, सोनं खरेदी करू नका, परदेश प्रवास करू नका, अशा सगळ्या नकारघंटा लोकांसाठी वाजवल्यानंतर ते सरळ बडोद्याला या सगळ्याचा व्यत्यास असलेला रोड शो नावाचा अनावश्यक इंधनजाळू तमाशा करायला निघून गेले!
आपण लोकांना जे ब्रह्मज्ञान सांगतो आहोत, त्यातला अंशमात्रही स्वत: करणार नाही आहोत, हे त्यांनी सरळ कृतीतून दाखवून दिलं. आपण नॉन बायोलॉजिकल असल्याचा भ्रम झाला की इतका आत्मविश्वास येत असावा! वर यांचे भक्तगण इतरांना सांगणार, लालबहादूर शास्त्रीजी पण देशाला असा त्याग करायला सांगत, तेव्हा लोक ऐकायचे त्यांचे! शास्त्रीजींची मोदींशी तुलना होते का कोणत्याही बाबतीत? त्यांच्या साध्या राहणीमानाचा आदर्श कुठे आणि मोदींची जनतेच्या पैशाने सप्ततारांकित राहणी, सिनेमानटासारखी रंगरंगोटी कुठे? शास्त्रीजी स्वत: उपवास करायचे, तेव्हा इतरांना सांगायचे. मोदींच्या भक्तगणांना गांधीनामाची अॅलर्जी आहे. पण, या देशात प्रसार-प्रचाराची साधनं नसताना अख्खा देश गांधींनी सांगितलं तर विलायती कपडे वापरणं टाळायचा, त्यांची होळी करून, चरख्यावर सूत कातून त्या सुताचे, खादीचे कपडे वापरायचा, कारण ‘बोले तैसा चाले’ ही गांधींची ओळख होती. मोदींची ओळख काय आहे?
जागतिक इंधन परिस्थिती आज बिघडलेली नाही. उलट ती आता रुळावर यायची शक्यता निर्माण झाली आहे. युद्धाचे सावट आता ओसरू लागलेले आहे. युद्धाचा फटका भारताला अधिक प्रमाणात बसला, त्याला इतर कशाहीपेक्षा एपस्टीन फाइल्समधलं काही भारतीय अय्याशांचं वास्तव उघडकीला येण्याचं भय हे होतं. त्या भयापोटी, भारताचा बसता उठता पाणउतारा करणार्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यापुढे आपण शरणागती पत्करली. ट्रम्प बोले आणि मोदी सरकार हाले, अशी परिस्थिती आपण करून घेतली. नरसंहारी नेतान्याहूच्या रक्तपिपासू इस्रायलला फादरलँड वगैरे संबोधून आपण इराणसारख्या, प्रत्येक संकटात पाठराखण करणार्या मित्राचा विश्वास गमावून बसलो. त्यामुळे हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून इराणच्या मित्रदेशांसाठीचे खनिज तेल सुविहित पुरवले जात असताना आपल्याला मात्र इराणच्या वक्रदृष्टीचा फटका बसला. आपल्या फसलेल्या परराष्ट्रनीतीमुळे देशाने इंधन टंचाई ओढवून घेतलेली आहे आणि निवडणुकांच्या काळात जनतेचा रोष ओढवून घ्यायचा नसल्यामुळे आता निवडणुका उरकल्यावर मोदी जनतेला काटकसर शिकवायला निघाले आहेत.
हे त्यांनी करायची गरज आहे का?
गेल्या दहा वर्षांमध्ये ना पगार वाढले आहेत, ना नोकर्या वाढल्या आहेत. भारतीय जनता पक्षाची कार्यालयं, निवडणूक देणग्या आणि राष्ट्रीय उद्योगपतींची मालमत्ता यांतच फक्त वाढ झालेली आहे. सर्वसामान्य जनता काटकसरीनेच राहते आहे. युद्धसंकट ओढवल्यापासून गॅसच्या किंमती ज्याप्रकारे वाढतायत, त्यामुळे कोळसा, केरोसीन, विजेवरच्या शेगड्या यांचा वापर करते आहे. इथे दातावर मारायला पैसा नाही, गंमत म्हणून सोनं कोण खरेदी करत सुटणार? लग्नसोहळ्यांमध्येच सोन्याची खरेदी होते, ती पोट मारून पै पै साठवून केली जाते, तीही करू नका? खाद्यतेलांचे भाव किती आहेत, याची कल्पना संसारी माणसाला असते, तो कशाला त्या तेलाची उधळपट्टी करील? इथेनॉलची भेसळ केलेलं इंधन शुद्ध इंधनाच्या भावाने विकलं जात असताना कोण त्याची उधळपट्टी करत फिरेल. सार्वजनिक वाहतुकीची अवस्था बघितली आहे का कधी? रस्त्यांची काय वाट लावून ठेवली आहे, ती नजरेला पडते का कधी? रोज कामाला बाहेर पडणारा माणूस जिवावरची बाजी लढायला चाललाय असा जातो, त्याला तुम्ही अमुक वाहनाचा प्रवास टाळा वगैरे सांगणार.
शक्यतो वर्क फ्रॉम होम करा हे तुम्ही कुणाला सांगताय, कर्मचार्याला? त्या वेठबिगाराने असं ऑफिसात सांगितलं तर नोकरी राहील का त्याची? जे कंपन्यांना सांगितलं पाहिजे, ते कामगारांना सांगताय? तुम्हाला राष्ट्रीय उपदेशक म्हणून नेमलेलं नाही, आलेल्या संकटांच्या निवारणासाठी विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन, सगळ्यांना एकत्र आणून, ज्यांना त्यातली काही अक्कल आहे, अशा तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपाययोजना आखणं आणि त्यांची अंमलबजावणी योग्य यंत्रणांमार्फत करून घेणं हे तुमचं काम आहे ना? ते करण्याऐवजी तुम्ही एकेक महिना प्रचारात फिरणार आणि रोड शोसारख्या भाकड उपक्रमांवर वेळ, पैसा, इंधन वाया घालवून दाखवणार. लोकांनी कसला आदर्श घ्यायचा तुमच्याकडून?
युद्ध सुरू झाल्यापासून तुमच्या परदेश वार्या बंद झाल्या होत्या जिवाच्या भीतीने. आता चार महिन्यांचा दौरा हजारो कोटींच्या विमानातून लाखो रुपयांचं इंधन जाळून करणार आहात. त्याऐवजी सरकारी विमानाने, इकॉनॉमी क्लासने जाऊन इंधनाची बचत का नाही करत? रोज डिझायनर कपडे, महागड्या अॅक्सेसरीज, वाहनं, त्यांचे ताफे, त्यांच्या शूटिंगच्या व्यवस्था, रंगरंगोटी हे सगळं बंद केलं तर एखाद्या छोट्या राज्याच्या इंधनाचा खर्च निघेल.
आता कोणी म्हणेल की पंतप्रधानांचे विदेश दौरे ही काही चंगळ नसते, त्यातून परराष्ट्र नीती आकार घेत असते. आपल्या परराष्ट्र नीतीने गेल्या काही वर्षांत जो काही अमीबासारखा भोंगळ आकार घेतलेला आहे, तो पाहता पंतप्रधानांनी कुठेही बाहेर न जाण्यातच देशाचं हित सामावलेलं आहे. ना शेजारी देशांशी चांगले संबंध, ना आंतरराष्ट्रीय राजकारणात काही पत, अशी आपली अवस्था झालेली आहे. छोट्या छोट्या देशांमध्ये जाऊन तिथले सन्मान आणि पदकं स्वीकारत फिरण्याला परराष्ट्र नीती म्हणत नाहीत.
लोक आधीच भिकेला लागले आहेत, त्यांना आता यापुढे आणखी काटकसर शिकवण्याची गरज नाही… तुम्ही आणि राज्याराज्यांमधले तुमचे इव्हेंटबाज नेते यांनी वर्क प्रâॉम होम करून काटकसर केली, तर देशावरचं आर्थिक संकट आपोआपच टळेल!
