• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

खाऊ गल्ल्यांची रौनक!

विलास कुमार (खाणार्‍याने खात जावे )

marmik by marmik
June 13, 2026
in खानपान, विशेष लेख
0
खाऊ गल्ल्यांची रौनक!

चित्र-आशुतोष वाळे

रात्र सरून पूर्वेच्या क्षितिजावर लालसर रंगाची उधळण सुरू होते… सगळीकडे इतकी शांतता आणि सामसूम असते की शेजार्‍याच्या घरातले अलार्म वाजताच आपल्या घरातले लोक उठायला लागतात. कबुतरे त्यांचा तो विशिष्ट आवाज काढून पंखांची फडफड करत उडायला लागतात. रस्त्याकडेच्या झाडावर कोकीळ कुहू-कुहू असा आवाज काढत कोकिळीण बाईला बोलवत असतो. तिच्याकडून काहीच रिस्पॉन्स न मिळाल्यामुळे चिडक्या स्वरात हे ‘कुहू-कुहू’ चाललेले असते. एखादा बुलेट-फटफटीवाला उगाच आवाज करत त्या शांततेला चिरत जात असतो. दुधाच्या आणि कचरा गोळा करणार्‍या गाड्या तेवढ्या निर्मनुष्य रस्त्यावर दिसायला लागलेल्या असतात. हा-हा म्हणता (किंवा काहीही नाही म्हटलं तरीही) सूर्याचा लालबुंद गोळा ‘गार्डन व्ह्यू’ असं नाव असलेल्या पण प्रत्यक्ष ‘गार्बेज व्ह्यू’ असणार्‍या समोरच्या इमारतीमागून आकाशात डोकावू लागतो.

पण हे सगळे निसर्गाचे चमत्कार पाहण्यासाठी मुंबईसारख्या शहरातील चाकरमान्यांना अजिबात वेळ नसतो. त्यांनी अर्धवट झोपेत असतानाच सकाळची आन्हिके उरकायला सुरुवात केलेली असते. कोकिळेच्या कूजनापेक्षा त्यांना आपल्या दंत-मंजनावर लक्ष केंद्रित करावे लागते. कोकिळेला काही ऑफिसमधले मस्टर गाठायचे नसते आणि कबुतराला काही लोकल पकडायची नसते. त्यामुळे कावळा तरी जरा जास्त वेळ पाण्यात आपले अंग बुडवत असेल, त्यापेक्षाही कमी वेळात (पक्षी-दोन मिनिटे म्हणजे बरोबर एकशे वीस सेकंदात) ह्यांची आंघोळ होते! आंघोळ कसली? आंघोळीची थट्टाच ती! तशी पण ती आंघोळ करून कमावलेली स्वच्छता अगदी अल्पकाळ टिकणारी असते. रस्त्यावरून चालताना पालिकेचे सफाई कामगार आपल्याकडच्या लांब दांड्याच्या झाडूने रस्त्यावरची धूळ ह्या किनार्‍यावरून त्या किनार्‍यावर अगदी सफाईदारपणे पसरवत असतात! त्यावरून वेगाने वाहने गेली की अगदी हिल-स्टेशनवरच्या धुक्यात हरवलेल्या रस्त्याचा भास होतो. ह्या धुळीचा ढग कमी म्हणून की काय, रस्त्याकडेच्या दुकानातील साफसफाई रंगात आलेली असते. हातातला झाडू तलवारीसारखा फिरवत दुकानमालक पदपथावरून चालणार्‍या लोकांचे कपडे खराब करण्याच्या उद्योगाला लागलेले दिसतात. ‘स्व-घरातील कचरा कुणी पाहत नसताना शेजारील दारात रस्त्यावर ढकलून देणे’ ह्या क्रियेला भारतात ‘स्वच्छता अभियान’ समजले जाते! रोज सकाळी अशी ढकला-ढकली करण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम सुरू झालेला असतो. त्यांना चुकवायचे असेल तर स्टेशनवर जायला रिक्षा पकडावी लागते.

रिक्षा पकडणे आणि जुगारात फासे टाकणे हे सारख्याच कौशल्याचे काम असते. तुमचे नशीब जोरावर असेल तरच तुम्हाला ही त्रिचक्र-देवता प्रसन्न होते. रिक्षाचालकांना रोज काही-शे-दीडशे ग्राहकांना नकार देण्याचे टार्गेट असते. ते पूर्ण झाल्याशिवाय ते लोक नवीन भाडे स्वीकारत नाहीत. अशा परिस्थितीत कधी कधी रिक्षा मिळूनही जाते. ती घेऊन स्टेशनवर उतरले की तेथे आपल्या स्वागताला आपल्यासारख्याच ‘कर्म-बंधूंची’ तुडुंब गर्दी झालेली पाहून त्या चाकरमान्याचा ऊर भरून येतो. तेथे कुठली तरी लोकल ऐनवेळी रद्द केल्याबद्दल रेल्वे खाते दिलगिरी व्यक्त करत असल्याची अनाऊन्समेंट ऐकू येत असते. मला तर पक्की खात्री आहे की काही गाड्या ते मुद्दाम खास करून रद्द करण्यासाठीच रेल्वे-वेळापत्रकात समाविष्ट करत असावेत! (रेल्वेवाल्यांना पण दिलगिरी व्यक्त करावयाचे रोजचे टार्गेट असावे!) गाडी आल्यावर गर्दीच्या रेट्यामुळे फ्लॅटफॉर्म वर कधी डावीकडे तर कधी उजवीकडे असे नागमोडी
वॉर्मअप झाल्यावर आणि तोपर्यंत तीन-चार लोकल गाड्या सोडल्यावर प्लॅटफॉर्मवरील बहुमताच्या रेट्यानेच गाडीच्या दाराच्या एका फटीत आपला देह कोंबलेला आहे, हे त्याच्या लक्षात येते. आपले स्टेशन येईपर्यंत ‘ठेविले अनंते तैसेची रहावे’ म्हणत इच्छितस्थळी तो एकदाचा उतरतो. आता इथून चालत ऑफिसला जाताना त्याला भुकेची तीव्र जाणीव होते.

सकाळपासूनच्या धावपळीत नाश्ता करायला सुचलेसुद्धा नव्हते. आता वाटेवरच्या खाऊ-गल्लीतला सुगंध दरवळत येत असल्याने भूक अजूनच तीव्र होते. नकळत त्याचे पाय तिकडे पडू लागतात. चला आपण खाऊ गल्लीत एक चक्कर मारून येऊ. खाऊ गल्लीत शक्यतो ताजे पदार्थ मिळतात. किमतीलाही सर्व सामान्य कामगाराच्या खिशाला परवडणारे असतात. वडा-पाव असो की पोहे, रोजचे रोज संपणार आणि रोज नवीन ताजे बनवणार. ती पाहा पोहेवाली मावशी. रोज एक मोठा डबा पोहे घरूनच तयार करून आणते. सोबत पिवळी बारीक शेव भुरभुरून टाकते. कागदी प्लेटमध्ये प्लॅस्टिकच्या चमच्यासोबत प्लेट भरून पोहे असतात. मावशी भले एका लिंबाच्या आठ फोडी करते, पण लिंबूसुद्धा देते.

बुधवारी आणि शुक्रवारी ऑम्लेटच्या गाडीवर नेहमीपेक्षा जास्तच गर्दी असते. ‘ऑम्लेट’ ह्या शब्दाची उत्पत्ती कशी झाली असावी, हा प्रश्न मला नेहमी पडायचा. कारण इंग्रज लोक ऑम्लेटला ‘फ्राईड-एग्ग’ असे म्हणतात. ‘स्क्रँबल्ड एग्ग’ म्हणजे आपली ‘अंडा-भुर्जी’ असावी असे मला वाटले होते. पण एकदा एका तारांकित रेस्तराँमध्ये नाश्त्याला ऑर्डर देताना हे दोन्ही पदार्थ वेगळे आहेत असे समजले. भुर्जीमध्ये कसे कांदा, टोमेटो, हिरवी मिरची, कोथिंबीर असे सर्व सोळा-शृृंंगारवाले जिन्नस टाकतात तसे ‘स्क्रँबल्ड एग्ग’मध्ये ह्यातले काहीच नस्ाते. त्यात फक्त अंड्याचे ‘अलख-निरंजन’ केलेले असते! तर ऑम्लेट हा शब्द  फ्रेंच भाषेतून आलेला आहे, असा एक सार्वत्रिक समज आहे. मला तर वाटते इंग्रजांच्या काळात गोरा साहेब सकाळी ऑफिसला जायला उशीर झाल्यावर ‘आय अ‍ॅम लेट’ असा तगादा बायकोकडे लावत असावा. मॅडम मग भारतीय आचार्‍याला ताबडतोब तयार होणारी अंड्याची पोळी करायला लावत असेल. आचार्‍याला साहजिकच अंड्याच्या पोळीला ‘आय अ‍ॅम लेट’ म्हणतात असा समज झाला असावा. त्यावरूनच अपभ्रंश होऊन ‘ऑम्लेट’ हे नाव रूढ झाले असावे!
गरीब असला तरी ग्राहक हा राजा असतो. त्या राजाचे त्यातल्या त्यात चाललेले नखरे विक्रेत्याला सांभाळावे लागतात. वडापाव म्हणजे काय? तर एका मधून अर्ध्या कापलेल्या पावामध्ये वडा कोंबून देणे. पण कुणा गिर्‍हाईकाला त्यात फक्त सुकी चटणी हवी असते. कुणाला फक्त हिरवी चटणी पाहिजे असते तर कुणाला फक्त लाल किंवा गोड चटणी पसंद पडते. माझ्यासारख्या काहीजणांना सर्व चटण्या टाकूनही वर सोबत तेलात खरपूस तळलेली हिरवी मिरची हवी असते.

अंड्याच्या टपरीवर तर ह्या सर्वात अल्ट्रा-प्रो म्हणजे अत्यंत चोखंदळ गिर्‍हाईके येतात. कुणाला ऑम्लेटमध्ये हिरवी मिरची नको असते. कुणाला ऑम्लेटसोबत सॉस हवा असतो. अंड्याच्या पिवळ्या बलकामध्ये बर्‍याच प्रोटीन-व्हिटॅमिनची रेलचेल असते. पण त्यात कोलेस्ट्रॉल असते म्हणून उकडलेल्या अंड्यातला तो बलक काढून टाकून नुसता पांढरा भाग खाणारे महाभाग आहेत! ह्या उकडलेल्या अंड्यात काहींना नुसते मीठ भुरभुरवून पाहिजे असते. काहीजण त्यावर बारीक चिरलेला कांदा, मीठ, मसाला असे टाकून खाणे पसंद करतात. काही नीम-हकीमाकडे खुराक लावलेले पैलवान एका वेळी एका दमात एक डझन उकडलेली अंडी फस्त करतात. ऑम्लेट, भुर्जीनंतर आणखी एक अंड्याचा लोकप्रिय प्रकार म्हणजे ‘हाफ- फ्राय ’ ह्या प्रकारात अंडे अर्धे कच्चेच खाल्ले जाते. काही गिर्‍हाईके फक्त एका बाजूने असे अंडे भाजायची फर्माईश करतात, तर काही ‘पलटी’ मार असा आदेश सोडून दोन्ही बाजूंनी भाजायला लावतात. काहींना अंड्याचा पिवळा बलक फुटलेला चालतो तर काहीजण तो बलक अब्रूसारखा जपून अबाधित ठेवायला भाग पाडतात. त्यामुळे अंड्याचे पदार्थ बनवणारे तो पदार्थ बनवताना प्रत्येक स्टेजला गिर्‍हाईकाला प्रश्न विचारत असतात. भले असे गिर्‍हाईक स्वत: घरी ऑम्लेट परतत असताना ते तुटल्यामुळे त्याची भुर्जी बनवून खाणारे असले तरी टपरीवर मात्र त्याला आपल्याला हवे तसे ‘डिझाईनर स्पेशल’ अंडे बनवून हवे असते. बाकी अंड्याचे अगदी हजारो प्रकारचे विविध पदार्थ जगभर बनतात काही विचारू नका.

ह्या खाऊ गल्ल्या वर्षानुवर्षे आपले अढळ स्थान टिकवून आहेत. विक्रेते आणि ग्राहक ह्या दोघांच्याही पोटाचा प्रश्न सोडवण्यासाठी त्या आवश्यक आहेत. बरीचशी मध्यम आकाराची टेबल-खुर्चीवाली हॉटेल्स जमाखर्चाचा ताळमेळ न जुळल्यामुळे बंद पडली आहेत. खाऊ गल्लीतली बहुतांश दुकाने तर बेकायदा आहेत. नगरपालिकेची गाडी आल्यावर, हरणांच्या कळपात वाघ घुसल्यावर होते तशी, पळापळ होते. विक्रेते माल तेथेच सोडून कोपर्‍यात जाऊन लपून बसतात. ग्राहक राजा हातात उरलेल्या पदार्थाची प्लेट घेऊन त्यांच्या शोधात फिरायला लागतात. काही वेळाने गाडी गेल्यावर परत रोजचा व्यवहार काही झालेच नाही अशा तर्‍हेने चालू होतात. अशी अधून-मधून संकटे आली तरी दर वर्षी पाऊस आल्यावर गवत ज्या सहजतेने उगवते तसे हे खाण्याचे स्टॉल निर्माण होतच असतात. पोटाच्या गरजेचे आणि जिभेच्या चोचल्यांचे शमन जोपर्यंत सुरू असेल तो पर्यंत अशा खाऊ-गल्ल्या अमर राहतील, नाही का?

Previous Post

अनोळखी ओळख

Next Post

काँग्रेसचा ‘दक्षिणगड’ मजबूत होतोय…

Next Post
काँग्रेसचा ‘दक्षिणगड’ मजबूत होतोय…

काँग्रेसचा ‘दक्षिणगड’ मजबूत होतोय...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.