
‘मी तुम्हाला ओळखतो…’ हे साधं वाक्य, पण त्यामागे दडलेला धोका अनेकदा आपल्याला समजत नाही. आजच्या डिजिटल युगात फसवणुकीचे प्रकार केवळ प्रेम, मैत्री किंवा भावनिक जाळ्यापुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर ते आपल्या ओळखीच्या नात्यांचा आधार घेत अधिक धोकादायक स्वरूप धारण करत आहेत. सायबर ठग थेट हल्ला करत नाहीत. आधी तुमच्याबद्दल माहिती गोळा करतात. तुमचे मित्र कोण, कुटुंबातील सदस्य कोण, तुम्ही कुठे जाता, काय करता, हे सगळं सोशल मीडियाच्या माध्यमातून सहजपणे जाणून घेतात. एक दिवस अचानक एखादी अनोळखी व्यक्ती ‘मी तुमच्या अमुक एका मित्राच्या ओळखीचा आहे, आपण आधी भेटलो आहोत, असं सांगत संवाद सुरू करते. सुरुवातीला साधं, विश्वासार्ह वाटणारं हे बोलणं हळूहळू फसवणुकीच्या जाळ्यात बदललं जातं.
आपणही अनेकदा सोशल मीडियावर आपली वैयक्तिक माहिती निष्काळजीपणे आणि अकारण शेअर करत असतो. त्यामध्ये फोटो, लोकेशन, कुटुंबातील क्षण, मित्रांची नावे यांचा समावेश असतो. हे सगळं सायबर ठगांसाठी खुलं आमंत्रण ठरतं. ‘माझं काय जाणार आहे?’ असा विचार करून आपण पोस्ट टाकतो, पण त्याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो, याची आपल्याला उशिरा जाणीव होते. प्रत्येक पोस्ट करण्यापूर्वी थोडं थांबा… स्वतःला विचारा—ही माहिती खरंच सगळ्यांसोबत शेअर करणे गरजेचं आहे का? कोणाला त्याचा गैरवापर करता येईल का? थोडीशी सजगता आणि सावधगिरी तुमचं मोठं नुकसान टाळू शकते. अशा प्रकारापासून वाचण्यासाठी कोणताही जादूचा मंत्र नाही. फक्त योग्य काळजी घेणे हाच त्यावरचा सर्वात प्रभावी उपाय आहे.
ही ऑनलाइन तोतयागिरी कशी होते, याचा अतिशय वाईट अनुभव गीतांजली देशपांडे यांना आला. त्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून प्रसिद्ध होत्या. हुशार, समाजातील प्रश्नांची जाणीव असणार्या गीतांजली या एका मोठ्या सामाजिक संस्थेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत होत्या. मुलांच्या शिक्षण, आरोग्य आणि हक्कांसाठी काम करणार्या या संस्थेमुळे त्यांना समाजात मोठा सन्मान होता. त्यांचा स्वभाव मदत करणारा होता.
कोमल ही गीतांजलीची शाळेपासूनची जिवलग मैत्रीण. दोघींचं नातं इतकं घट्ट की, एकमेकींच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट त्या एकमेकांना शेअर करत असत. एप्रिल महिन्यात गीतांजली कामानिमित्त कोलकात्याच्या ग्रामीण भागात गेल्या होत्या. त्या भागात नेटवर्क नव्हतं. दिवसभर काम करून गीतांजली थकल्या होत्या. कामातून मोकळ्या झाल्यावर संध्याकाळी त्यांनी मोबाईल पहिला, तेव्हा त्यांना फेसबुक मेसेंजरवर अचानक एक मेसेज दिसला. त्यामध्ये ‘गीता, मला खूप मोठी अडचण आली आहे. कृपया मला ५०,००० रुपये तात्काळ पाठव. मी खाली अकाउंट नंबर दिला आहे. तुझा फोन सध्या लागत नाहीये… प्लीज लवकर कर’ असा मेसेज कोमलच्या नावाने आलेला होता. ते पाहून गीतांजली क्षणभर थबकली.
‘कोमल कशासाठी पैसे मागतेय? काहीतरी गंभीर असेल’, असा विचार करून गीतांजलीने तिला कॉल करण्याचा प्रयत्न केला. पण तिचा फोन लागत नव्हता. ‘अरे देवा… ही खरंच अडचणीत दिसते आहे. हा क्षण वेळ घालवण्याचा नाही, असे म्हणत तिने वेळ न दवडता त्या अकाउंटवर लगेच ५०,००० रुपये ट्रान्सफर केले. काही वेळाने गीतांजलीने पुन्हा कोमलला फोन लावला.
‘हॅलो कोमल, तुझा मेसेज मिळाला. मी तुला पाठवलेले पैसे मिळाले का? काय झालं होतं? आता ठीक आहेस ना?’ हे ऐकून कोमल गोंधळून गेली. अगं, काय म्हणतेस तू कुठले पैसे? कसली अडचण? कुणाबद्दल बोलते आहेस तू?
‘अर्थातच तुझ्याबद्दल. अगं, तू फेसबुकवर मेसेज केला होता ना मला. ५० हजार रुपये मागितले होतेस ना?
हे ऐकून कोमल घाबरलेल्या आवाजात म्हणाली, ‘गीता… मी तुला कोणताही मेसेज केलेला नाही. तू कुणाला पैसे टाकलेस? हे ऐकताना गीतांजलीच्या हातातून फोन निसटला. मला आलेला मेसेज तुझ्याच अकाउंटवरून आला होता. त्यावर कोमल म्हणाली, माझं अकाउंट हॅक झालंय का? की कुणी माझे बनावट अकाउंट तयार केलंय. या दोघींनाही आता परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले होते. याबाबत कोमलने लगेच पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. कुणीतरी तुमच्या नावाने फेक प्रोफाइल बनवलंय आणि तुमच्या ओळखीच्या लोकांना मेसेज करून पैसे उकळतोय, असे पोलिसांनी त्यांना सांगितले.
त्याचा तपास सुरू झाला. तांत्रिक विश्लेषण, आयपी अॅड्रेस, बँक ट्रान्झॅक्शन यांचा मागोवा घेतला गेला. त्यामधून हा प्रकार बिहारमधल्या एका छोट्या गावातून चालवला जात असल्याचे समोर आले होते. यामध्ये चोरटे सोशल मीडियावरून माहिती गोळा करतात, नंतर बनावट अकाउंट तयार करून ओळखीच्या लोकांना टार्गेट करतात, हे स्पष्ट झाले होते. या प्रकारामुळे गीतांजली खूप खचली. त्यावर कोमल म्हणाली, ‘गीता, तुझी चूक नाही… तू मदतीसाठी पुढे आलीस, त्याचा गैरफायदा घेतला गेला.
ऑनलाइन तोतयागिरी करणारे गुन्हेगार सोशल मीडियावरून माहिती गोळा करणे, व्यक्तीच्या मित्र-परिवाराची यादी मिळवणे, त्यांच्या नावाने बनावट अकाउंट तयार करणे, अत्यंत तातडीची गरज दाखवून पैसे मागणे, कॉल न लागण्याची कारणं देऊन घाई निर्माण करणे, असे प्रकार करतात. आज आपण ज्या वेगाने डिजिटल जगात वावरतो, त्याच वेगाने गुन्हेगारही आपली पावलं टाकत आहेत. विश्वास हा नात्यांचा पाया आहे. मात्र, ऑनलाईन जगात तोच विश्वास आपल्यासाठी सापळा ठरू शकतो, हे कधी विसरता कामा नये.
अशी घ्या काळजी
- कोणत्याही मेसेजवर लगेच विश्वास ठेवू नका.
- कोणालाही पैसे पाठवण्यापूर्वी फोन किंवा व्हिडिओ कॉल करून खात्री करून घ्या. ती झाल्याशिवाय पैसे पाठवू नका.
- सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती कमी शेअर करा
- संशयास्पद अकाउंट लगेच रिपोर्ट करा
- ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आर्थिक मागणी करणारा मेसेज आला तर त्याची तपासणी करा. तो खरंच आपले नातेवाईक, मित्र यांनी पाठवला आहे का? हे तपासून पाहा. लगेच पैसे देण्याचे धाडस करू नका, त्यामध्ये फसगत होण्याची शक्यता अधिक आहे. कोणी आर्थिक व्यवहार करण्याची विनंती करत असेल तर आपल्या विश्वसनीय स्त्रोताद्वारे त्यांची ओळख तपासून पहा.
- गोपनीयता सेटिंग्ज : लोकांसाठी दृश्यमान वैयक्तिक माहितीचे प्रमाण मर्यादित करण्यासाठी तुमचे सोशल मीडिया आणि
ऑनलाइन प्रोफाइल गोपनीयता सेटिंग्जचा वापर करा. तुम्ही काय आणि कोणासोबत शेअर कराल, याबद्दल स्पष्ट राहा. - तोतयेगिरीच्या युक्त्या आणि नवीनतम ऑनलाइन घोटाळ्यांबद्दल माहिती मिळवा. आपल्या स्वतःला कायम अपडेट ठेवा.
- अनोळखी फ्रेंड रिक्वेस्टबाबत कायम सावध आणि संशयी राहा.
- तोतयागिरीचा प्रयत्न आढळल्यास, प्लॅटफॉर्मवर किंवा बनावट प्रोफाइल होस्ट करणार्या वेबसाइटवर किंवा सायबर पोलिसांकडे त्याची तक्रार करा.

