• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

डाळ वाईंग

शुभांगी जोशी (चवदार साठवण)

marmik by marmik
June 13, 2026
in चवदार साठवण
0
डाळ वाईंग

तुम्ही म्हणाल डाळवांगं म्हणायचे सोडून हे डाळवाईंग काय लिहीले आहे. माझी आजी ‘वांगं’ कधीच म्हणत नसे, कायम वाईंगच म्हणायची. कॉफी पण म्हणत नसे काफी म्हणायची. तिच्या तोंडून ऐकताना गंमत वाटायची. मी चेष्टेने सारखे तिला विचारी,’ कसली ग आमटी केलीस?’नंतर-नंतर तिच्याही लक्षात येवू लागले की आपली नात मुद्दाम विचारत आहे. मग एकदा धपाटा मिळाला चांगला. आजीचे हात फार खरखरीत व सुरकुतलेले असायचे. त्यामुळे धपाटा चांगलाच लक्षात राहिला.

आईला मी विचारी’ अगं, आजीचा हात इतका खरखरीत लागतो आणि मऊपणा पण नाही?‘

‘आजी पहाटेपासून सतत कामात असते. सारखे हात राखेत असतात. भांडी घासायला राख वापरते, परत चुलीवरची भांडी सुद्धा ती माती लावून मग वापरते. विहिरीवर रहाटाने पाणी काढायचे, कपडे धुणे, स्वयंपाक, शेणाची सारवण, वाळवण, आंब्याच्या दिवसांत तर ओ येईस्तोवर कामे- मग काय होणार त्या हातांचं.’

आई सांगत होती, त्यांच्याकडे गुळवेलीची वेल होता. आजी गुळवेलीचे खोड काढून तुकडे करायची. मग रात्री जेवणं झाली की कंदील जात्याजवळ ठेवायची. मग खोडाचा एकएक तुकडा त्या जात्याच्या पारीवर घासायचा. त्याचा जो चुरा पडायचा तो गोळा करून पाण्यात भिजत घालायची. असे पाणी साधारण तीन दिवस बदलत रहायची. मग खाली बसलेले सत्व स्वच्छ धोतराच्या फडक्यावर पसरवून वाळवायची. मग त्याच्या पुड्या करून ती विकत असे. आमच्या जालगावच्या घरासमोर तेव्हा पंडीत संजय अभ्यंकर यांची आजी रहात असे. या आजी कायम आमच्या आजीकडून हे सत्व विकत घेत असत. आई म्हणाली ‘आता तुझ्या लक्षात आले असेल की आजीचे हात कातरलेले, थंडीत काळे पडलेले आणी खरखरीत का आहेत ते.’

पण खरं सांगू का- आजीचे व्यक्तिमत्त्वच फार वेगळे होते. माझ्या मुलाच्या वेळच्या बाळंतपणात आजी दोन महिने आली होती. येताना मेथीचे लाडू, आंबोळीचे पीठ आणि जुन्या साड्या घेऊन आली. सोनाराच्या दुकानात बसून गोठवाळे करून घेऊन आली. मी म्हटलं, ‘आजी तू कशाला बसलीस सोनाराकडे?‘ तशी फणकारत म्हणाली,’तो सोनार मेला त्या वाळ्याला तास मारील आणि वाळ्याची दोन टोकं नीट घासून गुळगुळीत सुद्धा नीट करणार नाही.‘ मस्त ओव्या म्हणायची, गुटी उगाळणे, माझ्या मुलाला पायावर घेऊन तेल लावणे ही तिची फार आवडीची कामे. दुपारी झोपायची नाही. आणलेल्या जुन्या साडीचे तुकडे कापून त्याची दोन टोपडी शिवली. ती पण हाताने धावदोरे घालून शिवली. माप घेणे म्हणजे ते टोपडे चार वेळा तरी बाळाला घालून बघायची. मगच त्याचे बंद शिवायची. का तर म्हणे कान उघडे रहाता कामा नयेत. वर हसत म्हणायची, ’अगो नाहीतर कल्हईवाला होईल टोपड्याचे.’ माझी आई तिला म्हणायची, ‘अगं आण मी मशीनवर टीप मारून देते’ ‘नको! तान्ह्या बाळाला त्या मशीनवरच्या टीपा टणक लागतील ना, टोचेल हो.’ पहिले सव्वामहिना बाळाला तिने हाताने शिवलेलीच झबली, दुपटी, टोपडी घालायची अशी तिची इच्छा असायची.

आजी तितकीच निरागस होती. माझा मुलगा चांगला बाळसेदार होता. माझ्या मैत्रिणी पहिल्या पाच दिवसात दवाखान्यात येऊन माझ्या मुलाला पाहून गेल्या होत्या. महिन्यानंतर त्या परत पाहायला आल्या. त्यातील एक पटकन म्हणाली, ’चांगलाच हेल्दी झालाय गं!’ आजीला ‘हेल्दी’ शब्दाचा अर्थ समजत होता. तिला जरा रागच आला. पटकन त्यांना म्हणते कशी, ’अगो मुलींनो, बाळाला आजच तीन महिने झाले ना मग मोठा दिसणारच ना.’ माझ्या मैत्रिणींना समजले आजीला काय सांगायचे ते!

काजळ तयार करणे हाही एक कार्यक्रमच असायचा. आजीला स्वयंपाकाची प्रचंड आवड होती. ती सुगरण होती. गावकीच्या जेवणावळीत तर बायका तिला प्रमाण विचारल्याशिवाय पदार्थ करीत नसत. आमच्या जालगावत ती सुगरण म्हणूनच ओळखली जायची. शिवणकाम, भरतकाम, सगळ्यात तरबेज होती. आणि हो, तिला पत्ते खेळायला फार आवडायचे. मस्त पान लपवून ठेवायची, आमची फजिती करायची आणि खळखळून हसायची. तिने भाताच्या तुसापासून सुंदर पंखा करून तो छापडीला चिकटवला होता.
बांधावरती उन्हाळ्याच्या दिवसात खूप घाणेरीची फुले फुलत असत. चैत्रगौरीच्या हळदी कुंकवात छोट्या छोट्या खापरांमध्ये पाणी घालून त्यात या फुलांची नयनरम्य आरास ती करायची. उन्हाळ्यात माठाच्या खाली गार पाणी साचते. ते वापरून ती लोण्याची चकली त्यावर तरंगवायची आणि ही गोष्ट ती गौरीपुढे मांडत असे. केवढी कलात्मक व शोधक दृष्टी होती तिची! हे सगळे अजबच वाटते ना?
अशी माझी आजी आज डाळवांगं करताना आठवली.

मागच्या परसात आजीने तिला लागणारी झाडे लावली होती. त्यात वांगं, कढीपत्ता, मिरची, टॉमेटो, कारेती, अशी बरीच. डाळवांगं करायचे म्हटले की पटकन चार वांगी तोडून आणायची आणि आमटी करायची. किती सोपी पद्धत त्या आमटीची.
साहित्य :
१) एक वाटी तूर डाळ. तीन चार वेळा स्वच्छ धुऊन घ्या. त्यात किंचितशी हळद व हिंग घाला. कुकरमध्ये चार शिट्ट्या देऊन शिजवून घेणे.
२) दोन लहान वांग्याच्या फोडी चौकोनी आकाराच्या करून घ्या.
३) तीन चमचे खोबरे आणि एक चमचा जिरे भाजून खलबत्त्यात कुटून घ्या.
४) तीन ते चार आमसुले पाकळ्या, गोडा मसाला एक चमचा, पाहून चमचा लाल्ा तिखट, एक चमचा गूळ व चवीनुसार मीठ घाला.
५) पाव वाटी कोथिंबीर चिरलेली (उपलब्ध असल्यास कोथिंबीरीच्या राहिलेल्या काड्यांची जोडी करून उकळत्या आमटीत ती घालावी.)

 


कृती :
१) पातेलीत एक चमचा तेल गरम करून त्यात आधी मेथ्या, मग मोहरी, जिरे, हिंग हळद आणि कढीपत्ता क्रमशः घालून फोडणी करून घ्या.
२) या खमंग फोडणीत वांग्याच्या फोडी घाला आणि त्याला दणकट वाफ आणा.
३) वाफ आल्यानंतर डावेने वांग्याच्या फोडी थोड्या ठेचून घ्यायच्या. त्यावर मीठ, गोडा मसाला, गूळ, तिखट घाला. आता त्यात जिरे खोबरे आणि आमसूल घाला. महत्त्वाचे म्हणजे आधण आलेले पाणी नेहमी आमटीला फोडणीस घालावे, म्हणजे सर्व वापरलेल्या पदार्थांचा स्वाद त्यात उतरतो.
४) वरण घोटून आधण आलेल्या पाण्यात घाला आणि पाच ते सहा मिनिटे आमटी खळखळ उकळू द्या. उकळतानाच यावर कोथिंबीर भुरभुरा.
ही आमटी पातळसर करायची असते. घरात डाळ वांगे होते आहे हे पार घराच्या कवाडीपासूनच समजले पाहिजे.

Previous Post

राशीभविष्य

Next Post

अनोळखी ओळख

Next Post
अनोळखी ओळख

अनोळखी ओळख

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.