ग्रहस्थिती : मंगळ मेषेत, हर्षल वृषभेत, गुरु-शुक्र कर्केत, राहू कुंभेत, शनि-नेपच्युन मीनेत, रवि बुध मिथुनेत, केतू सिंहेत, प्लूटो मकरेत. दिनविशेष : १३ जून शिवरात्री, १४ जून दर्श अमावस्या आरंभ दु. १२ वा. २० मि., १५ जून सोमवती अमावस्या समाप्ती स. ८ वा. २४ मि. १८ जून श्री विनायक चतुर्थी, गुरुपुष्यमृत योग.

मेष : नोकरी-व्यवसायात कोणावर विसंबून राहणे महागात पडेल. तरुणांनी आत्मसंशोधन करावे. कामे पुढे नेण्याचा प्रयत्न अधिक त्रासदायक ठरेल. झेपेल तेवढेच काम हातात घ्या, अन्यथा ताण वाढेल. प्रेमप्रकरणात एकमेकांची मने सांभाळताना अधिक कसरत करावी लागेल. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. सलोख्याचे धोरण ठेवा. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी नवे बदल स्वीकारा. नवीन घर घेण्याचा प्रयत्न मार्गी लागेल. मुलांकडे अधिकचे लक्ष द्या. अचानक धनलाभ होईल. आर्थिक नियोजन बिघडू देऊ नका. लेखक, पत्रकारांसाठी चांगला काळ.

वृषभ : कामाची घाई महागात पडेल. नोकरी-व्यवसायात चुका होतील. कामानिमित्त प्रवास करताना शरीर आणि मनाचे आरोग्य सांभाळा. महत्वाचे निर्णय काळजीपूर्वक घ्या. नवीन गुंतवणूक करताना घाई टाळा. तरुणांना बुद्धीला चालना देणार्या गोष्टांrतून आनंद मिळेल. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. घरगुती समारंभातून आनंद मिळेल. मुलांना अपेक्षित यश मिळेल. मालमत्तेचे प्रश्न तूर्तास पुढे ढकला. सहल, मौजमजेवर वेळ आणि पैसे खर्च होतील. नवीन कल्पना आकाराला येतील.

मिथुन : नियोजित कामे पूर्ण होतील. सरकारी कामांत शॉर्टकट टाळा. काही कामांत ज्येष्ठांचा सल्ला घ्या. व्यवसायात आर्थिक व्यवहारात सावध राहा. छोटी चूक महागात पडेल. कोणालाही सल्ले देऊ नका. नोकरीत आत्मविश्वास वाढेल, पण संयमाने काम करा. नवी नोकरी शोधणार्यांना चांगली संधी मिळेल. मुलांकडे लक्ष द्या. उच्चशिक्षणात अंदाज चुकू शकतात. व्यवसायात तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागेल. नवीन गुंतवणूक करताना काळजी घ्या. अडकलेली कामे मार्गी लागतील.

कर्क : अडलेली कामे सोडवण्याचा मार्ग सापडेल. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. व्यवसायात दिलेला शब्द पाळा. काळ-कामाचे गणित बांधताना तारेवरची कसरत करावी लागेल. सामाजिक कामात आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात कामाचा आलेख उंचावेल. मुलांच्या आरोग्याकडे अधिक लक्ष द्या. घरातील ज्येष्ठांचा सल्ला माना. तरुणांच्या मनोकामना पूर्ण होतील. कामात उतावळेपणा नको. अहंकार दूर ठेवा, त्यामुळे काम बिघडू शकेल. कलाकारांचा सन्मान होईल.

सिंह : आधी केले मग सांगितले हे काम करताना लक्षात ठेवा. तरुणांना कामाच्या नव्या संधी चालून येतील. प्रेमप्रकरणात भडका होईल. संयम आणि सकारात्मकता या गुणांचा फायदा होईल. घरासाठी महागडी वस्तू खरेदी कराल. कौटुंबिक धार्मिक पर्यटनाला जाल. घरातील वातावरण आनंददायी राहील. व्यवसायात अनपेक्षितपणे मोठे यश मिळेल. नव्या व्यवसायाची कल्पना पुढे नेताना योग्य काळजी घ्या. समाजकार्यातून मान-सन्मान वाढेल. तरुणांना अपेक्षित यश मिळेल. प्रवासात तब्येत सांभाळा.
कन्या : तरुणांना यशाचा मार्ग गवसेल. व्यवसायात योग्य आर्थिक नियोजन करा. नोकरीत कामाचा वेग वाढवा. बँकेची कामे करताना योग्य काळजी घ्या. घरात आनंद वाढवणारी बातमी कळेल. विवाहाचा विषय लांबणीवर पडेल. मामा मावशींची मदत मिळेल. नवीन व्यवसायाच्या कल्पना सुचतील. आर्थिक नियोजनात योग्य काळजी घ्या. सामाजिक आणि धार्मिक कार्यातून समाधान मिळेल. कलाकार, संगीतकारांना नव्या संधी चालून येतील. दाम्पत्यजीवनात वाद टाळा. नोकरीत उत्साह वाढेल.

तूळ : हातातले काम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घ्या. व्यवसायात स्पर्धेचा सामना करावा लागेल. नोकरीत कामाकडे बारकाईने लक्ष द्या. तरुणांना कर्तृत्वाचा ठसा उमटवण्याची संधी येईल. घरात कामासाठी भरपूर वेळ खर्च होईल. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. काही ठिकाणी सबुरीने घ्या. सामाजिक कार्यातून समाधान मिळेल. महिला उद्योजकांना यश मिळेल. कुटुंबात मतभेद टाळा. संततीकडून चांगली बातमी कळेल. आरोग्याच्या तक्रारी वाढतील. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. राग व्यक्त करू नका. भावंडांशी वाद होतील. सार्वजनिक जीवनात आपलेच म्हणणे रेटू नका.

वृश्चिक : आर्थिक व्यवहारात योग्य काळजी घ्या. कुणाचे विचार पटले नाहीत तर त्याला प्रतिक्रिया देऊ नका. तरुणांच्या मेहनतीला यश मिळेल. व्यावसायिक आत्मविश्वासाच्या जोरावर यश मिळवतील. छंदातून नव्या व्यवसायाच्या योजना आकाराला येतील. उच्चशिक्षणाचे प्रश्न मार्गी लागतील. काही ठिकाणी द्विधा मनस्थिती निर्माण होईल. सल्लामसलतीने प्रश्न मार्गी लावा. शिक्षक, संशोधकांसाठी उत्तम काळ. संततीला शिक्षणक्षेत्रात स्पर्धात्मक यश मिळेल.

धनु : येत्या आठवड्यात कामात चुका होतील. मनाची एकाग्रता वाढवा. व्यवसायात निर्णय घेताना बारीक लक्ष द्या. तरुणांना करियर घडवण्यासाठी नवे मार्ग सापडतील. धाडसी वृत्तीचे कौतुक होईल. कामात सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. नोकरीत काही बदलांना सामोरे जावे लागेल. कोर्टाची कामे लांबणीवर पडतील. तरुणांची शैक्षणिक प्रगती होईल. खेळाडूंना यश मिळेल. घरामध्ये वेळ खर्च होईल. समाधान मिळेल. व्यवसायात प्राप्ती वाढेल. सकारात्मकता आणि आत्मविश्वास वाढेल.

मकर : कुटुंबासाठी भरपूर वेळ आणि पैसे खर्च करा. व्यवसायात ठाम राहा. नवीन गुंतवणूक करताना विशेष काळजी घ्या. नोकरीत वरिष्ठ अधिकार्यांच्या मताचा आदर करा. मनावर संयम व रागावर नियंत्रण ठेवा. ज्येष्ठांशी वाद टाळा. मित्रांची साथ मिळेल. गडबडीच्या वातावरणात मन शांत ठेवा. आत्मविश्वासाने निर्णय घ्या. सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नका. तरुण व्यावसायिकांना ध्येयप्राप्तीसाठी प्रयत्न करावे लागतील. धावपळ करावी लागेल. मधुमेह, हृदयरोगग्रस्तांनी काळजी घ्यावी.

कुंभ : घरात आणि बाहेर वागताना बोलताना मनाचा तोल सांभाळा. बँकेच्या कामांमध्ये कागदपत्रे तपासूनच पुढे जा. ब्रोकर मंडळींनी व्यवहारात काळजी घ्यावी. नोकरीत तडजोडीचे धोरण ठेवा. महिलांनी शांतता आणि संयम असे धोरण स्वीकारावे. तरुणांनी मनाची अशांतता वाढू देऊ नये. नोकरीत आत्मविश्वास वाढेल. भागीदारीत काळजी घ्या. व्यवसायात दडपण येईल. अनोळखी व्यक्तीबरोबर आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. सकारात्मक विचार करा. व्यवसायात अति आत्मविश्वास दाखवणे टाळा.

मीन : कामात विलंब करू नका. प्रेमप्रकरणात सबुरीने घ्या. बँकेची कामे मार्गी लागतील. तरुणांना कामाच्या नव्या संधी चालून येतील. व्यवसायात तडजोडीचे धोरण स्वीकारा. ज्येष्ठांच्या सल्ल्याने मोठे निर्णय घ्या. नोकरीत अधिकचे काम करावे लागेल. व्यवसायात मोठ्या उलाढाली करण्याचे धाडस आर्थिक घडी विस्कटवेल. नवी गुंतवणूक फायदा मिळवून देईल. घरासाठी भरपूर वेळ खर्च होईल. आप्तेष्टांची गाठभेट होईल. उधार-उसनवारीचे व्यवहार नकोच. आई-वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्या.

