सम्राट यमुनातीर्थाला भेट देणार म्हटल्यावर त्या छोट्याशा गावात
खळबळ उडाली. भाविकांना तीर्थदर्शन घडवणाऱ्या ब्राह्मणांमध्ये
वेगळीच उत्कंठा निर्माण झाली. सम्राटाला तीर्थदर्शन घडवण्याची
संधी कुणाला मिळणार? कारण, तीर्थदर्शनानंतर सम्राट भरघोस
दक्षिणा देणार आणि त्या ब्राह्मणाची सात पिढ्यांची ददात मिटून
जाणार, हे निश्चित होतं.
सम्राट आले, त्यांना तीर्थदर्शन घडवण्याची संधी चतुरदासाला
मिळाली. चतुरदासाने सगळं ज्ञान एकवटून, जिभेवर देवी
सरस्वतीला पाचारण करून अतिशय उत्तम रीतीने सम्राटाला
तीर्थाची माहिती दिली. सगळी फेरी संपल्यावर सम्राटाने जवळ
मातीत पडलेली एक फुटकी कवडी उचलली आणि ती चतुरदासाला
बक्षीस दिली. चतुरदासाने ती मुठीत घेऊन झटकन् बंद केली आणि
अतिशय विनम्रतेने त्या बक्षीसाचा स्वीकार केला.
सम्राट चतुरदासाला काय बक्षिसी देतायत, हे पाहण्याची उत्सुकता
असलेल्या सगळ्या ब्रह्मवृंदाला दुरून फक्त सम्राटाने काहीतरी दिलं
आणि चतुरदासाने मूठ झाकली एवढंच दिसलं. चतुरदासाच्या
चेहऱ्यावरचा विलक्षण आनंद पाहून त्यांच्या मनात असूया दाटली.
सम्राट गेल्यानंतर चतुरदासाला वेढाच पडला त्यांचा. सगळ्यांनी
विचारलं, काय दिलं सम्राटाने?
चतुरदासाने सांगितलं, माझ्या यापुढच्या शंभर पिढ्यांनी खर्च
करण्याचा प्रयत्न केला तरी खर्च होणार नाही, अशी संपत्ती दिली
सम्राटाने.
झालं.
चतुरदासाच्या शंभर पिढ्यांना पुरेल अशी संपत्ती सम्राटाने दिली,
असा बोभाटा सगळ्या गावभर झाला. मग तो शेजारच्या गावात
पसरला. मग पंचक्रोशीत, मग सगळ्या राज्यात. दरबारी मंडळींपर्यंत
ही चर्चा गेली. मोठमोठ्या महालांमध्ये राहणारे आणि ऐश्वर्यात
लोळणारे सरदार, दरबारी आणि राजधानीतले धनिकही चंद्रमौळी
झोपडीत राहणाऱ्या चतुरदासाचा द्वेष करू लागले. ही चर्चा
सम्राटाच्या राण्यांपर्यंत गेली. त्याही सम्राटाला कोसू लागल्या.
तुमचं आमच्यापेक्षा जास्त प्रेम त्या भिकारड्या चतुरदासावर
आहे, असं बोलू लागल्या.
सम्राटाने हैराण होऊन चतुरदासाला बोलावून घेतलं. त्याला विचारलं,
हे मी काय ऐकतो आहे? मी तर तुला एक फुटकी कवडीच दिली होती.
चतुरदास म्हणाला, हो तर. मीही लोकांना हेच सांगतोय की माझ्या
शंभर पिढ्याही खर्च करू शकणार नाहीत, अशी संपत्ती मला सम्राटांनी
दिली आहे… फुटकी कवडी कोणी घेईल का? तिच्याबदल्यात काहीतरी
येईल का?
सम्राट म्हणाला, मग लोकांनी हा अर्थ कसा लावला?
चतुरदास म्हणाला, अभय देणार असाल तर सांगतो. सम्राटाकडून
लोकांना सम्राटाला साजेशा वर्तनाची अपेक्षा असते, भिकारडेपणाची
अपेक्षा नसते, म्हणून त्यांचा हा गैरसमज झाला असावा.
सम्राटाने यावेळी मात्र चतुरदासाला खरोखरची घसघशीत बक्षिसी
देऊन रवाना केलं.