• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

‘धडा’… शिक्षक, पदवीधरच्या ‘वर्गा’चा!

आशिष पेंडसे by आशिष पेंडसे
December 20, 2020
in कारण राजकारण
0
‘धडा’… शिक्षक, पदवीधरच्या ‘वर्गा’चा!

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भारतीय जनता पक्षाला अक्षरशः चारी मुंड्या चीत केले. १०५ चे १५० करण्याच्या वल्गना करीत असलेल्या पक्षाला एवढे नेस्तनाबूत का व्हावे लागावे? तोच आहे ‘धडा’… शिक्षक आणि पदवीधरच्या ‘वर्गा’चा.

तुला शिकवीन चांगलाच धडा… तुज्या पापाचा भरला घडा…
तुजा उतरीन समदा माज, तवा येशील गुंडाळून लाज…

पु. ल. देशपांडे यांच्या ‘ती फुलराणी’मधील हे अजरामर काव्य. अशोक मास्तरची झिगझिग नकोशी होऊन त्यांना धडा शिकविण्याच्या इराद्याने मंजुळेने केलेले हे अप्रतिम स्वगत. आता त्याचा इथे काय संबंध? कोण कोणाला धडा शिकवते आहे? किंवा शिकवला आहे?

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या झालेल्या निवडणुकीमधील हा ‘धडा’ आहे. गेल्या वर्षी महाविकास आघाडी सरकार स्थापनेच्या या `उद्धवायणा’चे `उत्तर उद्धवायण’ समजा हवं तर. वास्तविक, शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला फारसे वलय कधीच प्राप्त होत नाही. यंदा मात्र तशी परिस्थिती नव्हती. सत्ताभ्रष्ट झाल्यानंतर येणारी प्रत्येक निवडणूक ही आपल्या जणू अस्तित्वाचाच प्रश्न आहे, अशी समजूत करून घेत भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रगण दंड थोपटू लागतात. त्यातच, सोशल मीडियाचा शिरकाव झाल्यानंतरची या मतदारसंघातील ही पहिलीच निवडणूक. मग काय विचारता, भक्तगणांना चेव चढला. गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून प्रचारकी मेसेजचा अक्षरशः भडिमार सुरू होता. विक्रमी संख्येने करण्यात आलेल्या नोंदणीला न्याय मिळाला. शिक्षक-पदवीधर मतदारसंघातील मतदानाचा १५-२० टक्क्यांचा आकडा आता ५५-६० टक्क्यांपर्यंत पोचला. झाले, काम फत्ते झाले! आपल्या यंत्रणेने चोख काम केले. राज्यातील राजकीय हवा बदलली आहे. त्यापुढील काळाचे निदर्शक असलेल्या निकाल लवकरच बाहेर येईल आणि हे तीन चाकांवरील सरकार जमीनदोस्त होईल, अशा वल्गना केल्या जाऊ लागल्या. मात्र, दोनच दिवसांनी निकाल लागला. आणि अशा वाचाळवीरांचा खरोखरीच ‘निकाल’ लागला हो!

 

भाजपचा नागपूरला गड पडला. काँग्रेसने ऐतिहासिक विजय साकार केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुणे मतदारसंघात सपाटून मार खाण्याची वेळ आली. मराठवाड्यांत राष्ट्रवादीची हॅटट्रिक झाली. उत्तर महाराष्ट्रात भाजपने मते फोडण्याचा दावा केला. पण, तेथील उमेदवार काँग्रेसकडून आयात केलेलाच होता. तसेच, अमरावतीमध्येदेखील अपक्ष उमेदवार निवडून आला असला, तरी तो महाविकास आघाडी विचारसरणीचाच होता. परिणामी, मतदारांनी भाजप आणि तत्सम विचारधारेला सपशेल नाकारले होते.

असे का झाले?

वरकरणी वाहिन्यांना हेडलाइन्स मिळाल्या असल्या, तरी प्रत्यक्षात मात्र अगदी पुण्यापासून नागपूरपर्यंतच्या निवडणुकीमधील अतिशय बारीक-सारीक, परंतु निर्णायक ठरणारे मुद्दे भाजपच्या पाडावासाठी कारणीभूत ठरले. किंबहुना, त्यांच्या ‘हिट विकेट’ होण्याच्या ‘कामगिरी’ला खतपाणी घालणारे ठरले. आम्ही विरोधकांची ताकद आजमाविण्यास कमी पडलो. तीन पक्ष एकत्र आल्यानंतर निवडणुकीचा निकाल कसा फिरेल, याचा अंदाज बांधण्यास कमी पडलो, अशी जुजबी कारणे देत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी वेळ मारून नेली. हे तीन पक्ष काय आज एकत्र आले होते का? त्यांच्या संख्याबळाच्या ताकदीचा यापूर्वीच प्रत्यय आला आहे ना. मग, आत्ताच का ही परिस्थिती ओढवली? प्रत्यक्षात मात्र कोणत्या घटकांमुळे हा ‘सेल्फ गोल’ झाला आहे, याची भाजपच्या वरिष्ठ नेतेमंडळींना चांगलीच कल्पना असणार.

नागपूरचा निकाल खरोखरीच ऐतिहासिक आहे. या मतदारसंघावरील तब्बल पाच दशकांची मक्तेदारी मोडीत निघाली. आयत्या वेळेचा उमेदवार लादण्यात आला. तसे करताना एका समाजाला प्रचंड दुखावण्यात आले. गेल्या वर्षी विधानसभेच्या रिंगणात चंद्रशेखर बावनकुळे यांना कोणतेही ठोस कारण न देता डावलण्यात आले. ते याच समाजाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळेच, समाजावरील अन्यायाचा बदला घेण्याची ही वेळ मतदारांनी अचूकपणे साधली. काँग्रेसच्या डॉ. नितीन राऊत यांनी ऐतिहासिक विजयानंतर भाजपचे विदर्भातील दिग्गज नेते नितीन गडकरी यांचे जाहीरपणे आभार मानले. त्यावर गडकरी यांची कोणतीही प्रतिक्रिया न येणे, हे कशाचे द्योतक मानायचे?

मराठवाड्यामध्येदेखील पंकजा मुंडेसमर्थक उमेदवारावर अन्याय करून तिथेही उमेदवार लादण्यात आला, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये होती. त्याचा फटका नक्कीच बसला. अर्थात, राष्ट्रवादीने या जागेवर  हॅटट्रिक साधली. पण, पराभवाबरोबरच भाजपची उरलीसुरली पतदेखील गेली.

पुण्यामध्ये भाजपच्या विश्वासार्हतेला यापूर्वीच ग्रहण लागले आहे. कोथरूडच्या तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी यांना सक्तीची विश्रांती दिली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांची कोल्हापुरातून उचलबांगडी करून कोथरूड आमदारकीची जहागिरी दिली. त्यामुळेच, भाजपच्या प्रदेशाध्यक्षांची ना घर का, ना घाट का अशी अवस्था झाली. पदवीधरच्या निमित्ताने दादांना हद्दपार करण्यासाठी हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील कोल्हापूरच्या आखाड्यात पूर्ण शड्डू ठोकून राहिले. सांगलीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि डॉ. विश्वजित कदम यांनी फुल्ल फिल्डिंग लावली. पुण्यात मतदान खूप झाले होते. त्यामुळेच, भाजपच्या उमेदवाराला पुणे तारून नेईल, अशी आशा सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवली जात होती. मात्र, ती फोल ठरली. शिक्षक मतदारसंघातदेखील तीच परिस्थिती होती. किंबहुना, विद्येच्या माहेरघरातील या मतदारसंघात भाजपला स्वतःचा उमेदवारदेखील मिळू शकला नाही. अशा परिस्थितीत विजयाची अपेक्षा ती काय धरणार?

सत्ताधीश होण्याची स्वप्ने पाहण्यात गैर काहीच नाही. पण, आता विरोधात बसण्याची वेळ आली असेल, तर तीच भूमिका प्रामाणिकपणे वठविणे सूज्ञपणाचे नाही का? ऊठसूठ सरकार पाडण्याविषयीच्या वल्गना करण्यात अर्थ तो काय? शीर्ष नेतृत्वापासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांमध्ये अहंभावाचा दर्प अजूनही आहे. तो कसा आत्मघात करू शकतो, याचा शिक्षक-पदवीधरच्या निमित्ताने मिळालेला आणखी एक धडा आहे. त्यापासून काही शिकवण घेतली नाही तर राजकीय परिपक्वतादेखील पदवीप्रमाणेच केवळ कागदापुरतीच छापील ठरेल!

‘महाआघाडीचे राजकारण परिपक्व झाले’

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर विरोधकांकडून त्याची खिल्ली उडविण्यात आली. `तीन चाकांच्या रिक्षाचे सरकार’ इथपासून ते `अमर-अकबर-अँथनी’चे सरकार, अशा शब्दांत विरोधकांकडून अधिकृत व्यासपीठांवरून ट्रोलिंग करण्यात आले. सत्ताभ्रष्ट झाल्याची सल त्यांच्या मनातून अजूनही गेलेली नाही. त्यामुळेच त्यांची विश्वासार्हतादेखील रसातळाला जात आहे, अशी भावना जनमानसातून व्यक्त होत आहे.

त्या तुलनेत, महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष अतिशय परिपक्व राजकारणाची प्रचिती देत आहेत. एकमेकांच्या पक्षीय, वैचारिक, धर्मविषयक भूमिकांचा आदर राखला जात आहे. तसेच, महाविकास आघाडी सरकार चालविण्याच्या जबाबदारीच्या भूमिकेला प्राधान्य दिले जात आहे. या दोन्ही भूमिकांचा ताळमेळ योग्य पद्धतीने बसविला जात आहे, असे मत जनतेकडून व्यक्त होत आहे.

या दोन्ही मतांचे प्रतिबिंब शिक्षक-पदवीधर निवडणुकीत नक्कीच उमटले.

Previous Post

जनतेच्या प्रश्नांपेक्षा विरोधी पक्षाला अर्णब, कंगनाचा पुळका; सभागृहाच्या वेळेचा अपव्यय

Next Post

अविश्वासाचे वातावरण संघराज्य पद्धतीला घातक

Next Post
अविश्वासाचे वातावरण संघराज्य पद्धतीला घातक

अविश्वासाचे वातावरण संघराज्य पद्धतीला घातक

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.