रॉकेटसिंग हा रणबीर कपूरच्या उत्कृष्ट अभिनयाने एका वेगळ्याच पातळीवर गेलेला सिनेमा आहे. हरप्रीतचा निरागसपणा, ठामपणा आणि आयुष्याला आनंदाने स्वीकारणारा शीख पोरगा त्याने अप्रतिम साकारला आहे. रॉकेटसिंग आणि हरप्रीत आपल्या समाजाच्या, शिक्षण आणि नोकरी व्यवसाय जगतातल्या मिथकांना सौम्यपणे छेद देत राहतो. सौम्यपणेच का? कारण तो तिकडेच घुटमळत नाही. तो शांतपणे आपला रस्ता चालत राहतो.
—-
मिलेनियम युगाबरोबर बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात बस्तान बसवत होत्या. एक नवचैतन्य जणू भारतीय बाजारपेठेत सळसळत होतं. अनेक देश, अनेक संस्कृती, अनेक मानसिकता यांचं भारतात स्थूल किंवा सूक्ष्म दोन्ही पातळ्यांवर एक वेगळंच रसायन बनत होतं. पण भारतासारखे देश, ज्यांच्या सांस्कृतिक किंवा सामाजिक चलनवलनाच्या कल्पनांना कित्येक वर्षांचा पीळ आहे, ते या रसायनांचा पाया बनून या सर्व रसायनांच्या वरताण आपली चव कायम ठेवतात.
‘मी जेव्हा भारतातील व्यवसाय निगडित शैक्षणिक अभ्यासक्रमात एक विषय शोधला, जो मला मिळालाच नाही तो होता व्यावसायिक नीतीमूल्ये, अर्थात बिझनेस एथिक्स.’ शिमित अमीन.
शिमित अमीन म्हणजे ‘अब तक छपन्न’ आणि ‘चक दे’ या गल्लाबारीवर यशस्वी झालेल्या सिनेमांचा दिग्दर्शक. युगांडामध्ये जन्मलेल्या या मूळच्या भारतीय मुलाचं कुटुंब युगांडा, भारत करत मग अमेरिकेत स्थिरावलं. गणितात पदवी मिळवलेल्या शिमितचा चित्रपटांशी संबंध आधी अमेरिकेत फिल्म फेस्टिवल आयोजित करताना आला आणि मग तो अमेरिकन फिल्म इंडस्ट्रीत अनेक कामं करत कार्यरत राहिला. दरम्यान भारतात त्याला एका चित्रपटाच्या संकलनाची ऑफर आली. तो चित्रपट होता रामूचा (रामगोपाल वर्मा) ‘भूत’. रामूबरोबर एकदा नव्या प्रोजेक्टची चर्चा करत असताना त्याला मिळाला ‘अब तक छपन्न’. तो उत्तम चालला आणि त्याहीपेक्षा हा शिमित अमीन कोण म्हणून
बॉलिवुडच्या माना वळल्या. रामू कॅम्पमधून तो थेट चोप्रा कॅम्पमध्ये गेला आणि तत्कालीन सुपरस्टार शाहरुखबरोबर त्याने केला ‘चक दे’. या सिनेमातला शाहरुख आणि तो सिनेमाच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. त्याच यशाच्या पार्श्वभूमीवर शिमितने केला पुढचा सिनेमा ‘रॉकेटसिंग सेल्समन ऑफ दि इयर.’
रॉकेटसिंगची कथा ही अगदी छोटा जीव असणारी आणि कथा म्हणून अनाकर्षक वाटणारी. कहाणी आहे मुंबईतल्या हरप्रीत सिंग बेदी या तरूण शीख मुलाची. आई बापाचं छत्र हरवलेल्या हरप्रीतला आजोबांनी वाढवलं आहे. स्वभावाने मस्त आनंदी असणारा हरप्रीत अभ्यासात मात्र यथातथाच आहे. अडतीस आणि एकोणचाळीस टक्के घेऊन कसाबसा पास होत आलेला हरप्रीत कम्प्युटर्स विकणार्या एवायएस नावाच्या मोठ्या कंपनीत शिकाऊ सेल्समन म्हणून जॉईन होतो. मात्र एवायएस कंपनी आणि तिथल्या सेल्सच्या पद्धती पाहून त्याचा भ्रमनिरास होतो. तो काही गोष्टींविषयी मत मांडतो म्हणून त्याला भरपूर वाईटसाईट ऐकवलं जातं. त्याची इंटर्नशिप धोक्यात येते. पण हरप्रीत त्याही परिस्थितीत एवायएसमध्ये राहूनच एक समांतर व्यवसाय सुरू करतो. हळूहळू त्याला एवायएस कंपनीमधल्या थोड्या लोकांची चोरटी साथ मिळते… आणि त्यांच्या शॅडो कंपनीचं नाव ठरतं रॉकेट सेल्स कॉर्पोरेशन. रास्त दर आणि प्रामाणिक सेवा देणार्या रॉकेट सेल्सचं अल्पावधीतच खूप नाव होतं. पण काहीच दिवसात ही कंपनी हरप्रीतच्या एवायएस कंपनीच्या एमडीच्या लक्षात येते आणि…
रॉकेटसिंग शिमित अमीनच्या ‘अब तक छपन्न’सारखा ना ग्रिटी ड्रामा आहे ना त्याच्या ‘चक दे’सारखा उत्कंठावर्धक. रॉकेटसिंग अगदी सरळ साधा चित्रपट आहे बासू चॅटर्जींची परंपरा सांगणारा. ‘आम्ही सिनेमा बनवतानाच ठरवलेलं याची हाताळणी लो की असणार.’ शिमित म्हणतो. आणि हा निर्णय योग्यच वाटतो. कारण रॉकेटसिंग नाट्यमय केला असता तर चित्रपटाचा आत्माच हरवला असता.
काय आहे चित्रपटाचा आत्मा?
सचोटी आणि नीतिमूल्यं.
विशेषत: भारतीय व्यापारजगात दुर्मिळ असणारा प्रामाणिकपणा.
रॉकेटसिंग ही ‘जो जीता’ किंवा ‘लगान’सारखी अंडरडॉगची कथा नाही.
रॉकेटसिंगचा कथानायक हरप्रीत हा अंडरडॉग नाही. तो बेजबाबदार नाही. तो फक्त लौकिक दृष्टीने अभ्यासात कमी आहे आणि आपल्याकडे तर मार्कशीटवर आयुष्याचे फैसले होतात. यावर एका प्रसंगात हरप्रीत आजोबांना म्हणतो, ‘बॉस, नंबर्स कम हैं, दिमाग नहीं.’
रॉकेटसिंग आणि हरप्रीत आपल्या समाजाच्या, शिक्षण आणि नोकरी व्यवसाय जगतातल्या मिथकांना सौम्यपणे छेद देत राहतो. सौम्यपणेच का? कारण तो तिकडेच घुटमळत नाही. आकांडतांडव करत नाही. तो शांतपणे आपला रस्ता चालत राहतो. बरं हा रस्ता हाही त्याने थंड डोक्याने घेतलेला निर्णय नाही. त्याचा रस्ता अडखळत जाणारा आहे. हरप्रीतचा फक्त आपल्या मूल्यांवर, संस्कारांवर विश्वास आहे. प्रामाणिकपणावर विश्वास आहे. ज्या कंपनीत तो काम करतोय त्या एवायएस कंपनीची वीज, प्रिंटर वगैरे आपल्या शॅडो कंपनीसाठी वापरणं हे तो नाईलाजास्तव करतोय. त्याचा खर्च तो आपल्या नफ्यातून देणार आहे. हे ऐकताच त्याच्या रॉकेट सेल्समध्ये आलेला, एवायएसमधला सहकारी मित्र रेड्डी त्याला वेड्यात काढतो. पण या बाबतीत हरप्रीत ठाम आहे. एवायएस कंपनीतून त्याला डच्चू मिळतो आणि तेही पोलीस तक्रार वगैरे होऊन, त्या वेळी त्याचे आजोबा त्याने वाईट काम केलं असा त्रागा करतात. मग हरप्रीत वैतागून आजोबांना म्हणतो, ‘चोरोवाले काम ही तो नहीं सिखाये आपने.’
तो एवायएस कंपनीत ज्या टेबलवर बसतोय, तिथे आधी इनामदार नावाचा इमानदार माणूस होता. हरप्रीत जेव्हा रॉकेट सेल्स चालू करतो तेव्हा त्याला इनामदारच्या नव्या कंपनीत कॉम्प्युटर्स पुरवण्याची ऑर्डर मिळते. हरप्रीत त्याच्या आधीच्या
ऑर्डरचे येणारे चेक्स त्या ऑर्डरसाठी तारण म्हणून ठेवायला तयार होतो. पहिल्या वहिल्या ऑर्डरसाठीही त्याने याच प्रकारे होलसेल मार्केटमधल्या लालवानीकडे, हार्डवेअरसाठी आपली नवी कोरी स्कूटर ठेवण्याची तयारी दाखवली होती. इनामदारच्या ‘माझ्याकडे फक्त प्रामाणिकपणा चालेल’ या वाक्यावर हरप्रीत प्रांजळ आवाजात म्हणतो, ‘प्रामाणिकपणा ही एकच गोष्ट आहे माझ्याकडे.’ याच प्रामाणिकपणामुळे मोठी ऑर्डर आली तरी तो लालवानीसारख्या सप्लायरला सोडत नाही. याला म्हणतात खरा आंत्रप्रुनर, खरा उद्योजक.
भारतात जेव्हा आंत्रप्रुनरशिपचे वारे आले तेव्हा आपण ज्याप्रमाणे चायनीज पदार्थांच्या नावाने इंडो चायनीज पदार्थ चालू करून तेच लोकप्रिय केले, त्याचप्रमाणे एका आंत्रप्रुनरचा कार्यकारण भाव न समजता आपण, म्हणजे भारतीय व्यापारी वर्ग आणि मीडिया यांनी सरसकट कुठल्याही नव्या व्यवसाय करणार्या आणि फाडफाड इंग्रजी बोलणार्या तरुणाला आंत्रप्रुनर बनवून टाकलं. बाटली नवी पण पाणी शिळंच. मुळात आंत्रप्रुनरशिप म्हणजे एखादा नवा उद्योग धाडसाने आणि जिद्दीने करणारा. हा व्यवसायही समाजात एखादा मानसिक किंवा व्यावहारिक बदल घडवून आणणारा असणं त्यात अभिप्रेत आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या उंबरठ्यावर असणार्या भारतात अशा तरुणांची कमी नव्हती. पण दुर्दैवाने उमदी सुरुवात करूनही अनेक व्यवसाय हे व्हीसी म्हणजे व्हेंचर कॅपिटलिस्टांच्या फंडिंग राऊंड्सच्या आमिषात वाहवत गेले. ज्या मूल्यांवर पाश्चात्य जगातून ही नवी व्यापारी संकल्पना आली होती, त्यांचीच धूळधाण आपल्याकडे न शिकवल्या गेलेल्या आणि अभावानेच आढळणार्या विषयाने केली. तो विषय होता व्यावसायिक नीतीमूल्यांचा म्हणजे बिझनेस एथिक्सचा.
कालांतराने अशा उद्योगांची, अशा भरकटलेल्या स्वप्नांची सूत्रं पिढ्यानपिढ्या व्यापारात गेलेल्या, भांडवलशाही कोळून प्यायलेल्या लोकांकडे, घराण्यांकडे आली. ज्यांना बिझनेस एथिक्स हा प्रकार माहिती तर सोडा, कधी मान्यच नव्हता. व्हीसी फंडिंग असो किंवा बँकांकडून घेतलेली कर्जं… हपापाचा माल गपापा अशी खानदानी वृत्ती असणार्या शेठियांनी लवकरच या खेळाचा ताबा घेतला. बिझनेस म्हणजे मालक आणि नोकर. बास. यही ठीक है. यही होता आया है और यही होगा. ईएसओपी म्हणजे समभाग- एखाद्या उद्योगात त्यातील कर्मचार्यांची असणारी मालकी किंवा वाटा- याला तर या लोकांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या, कारण त्यांच्या मते मालिक मात्र मालिक होता है, नौकर नौकर.
‘यहाँ कोई मालिक नौकर नहीं. इथे आपण सगळे पार्टनर आहोत. म्हणजे भागीदार.’ हरप्रीत रॉकेट सेल्स कॉर्पोरेशनमध्ये सामील होणार्या प्रत्येक सहकार्याला सांगतो. अगदी त्यांच्या कंपनीच्या चहावाल्यालासुद्धा आणि चहावाल्याला गहिवरून येतं. ‘इतनी इज्जत हमें आज तक किसी ने नहीं दी,’ असं त्याचं म्हणणं वरकरणी मजेशीर वाटलं तरी या म्हणण्याचं मूळ कारण आहे आर्थिक स्तराच्या अनुषंगाने आपण लोकांच्या केलेल्या विभागण्या आणि ठरवलेल्या योग्यता.
हरप्रीतच्या रॉकेट सेल्सवर संकट येतं तेव्हा स्वतःवर तीन वर्षांची बंदी मंजूर करून हरप्रीत रॉकेट सेल्स कंपनी एवायएसच्या एमडीला देतो. कारण हरप्रीतवरच्या विश्वासाने इतर लोक रॉकेट सेल्स कंपनीत आलेले असतात. हरप्रीतला त्यांचं इतकं मोठं नुकसान करणं मान्य नाही.
इकडे हरप्रीत खूप मोठा हिरो होतो. आपल्या अध:पतनासाठी सिस्टमला दोष देणार्या गुरुकांत देसाई, विजय दीनानाथ चौहान, महेश देशमुख उर्फ मुन्ना यांच्यापेक्षा खूप मोठा आणि सत्यकामच्या जवळपास जाणारा.
बरं रॉकेट सेल्स बंद पडल्यावर त्याचे साथीदार काय करतात? तेही नोकरीला मुकले असतात. पण त्या छोट्याश्या काळात त्यांनी जे अनुभवलं आहे ते अद्भुत आहे. त्यांनी अनुभवलं आहे स्वातंत्र्य. सचोटीने, सत्त्वाने वागण्याचं स्वातंत्र्य. आणि तीच त्यांची ताकद बनली आहे. एवायएसचा सुपरसेल्समन नितीन, ज्याने या सेल्स जगातले सगळे हथकंडे कोळून प्यायले आहेत, तो जेव्हा रॉकेट सेल्समध्ये ते हथकंडे न वापरता, सरळसोट काम करून बिझनेसचा आलेख उंचावतो, तो अनुभव, ती आठवण त्याला एवायएसमधून डच्चू मिळाल्यानंतरही बळ देत राहते.
रॉकेटसिंगचा शेवट कमाल आहे. म्हटलं तर अळणी आणि म्हटलं तर रसपूर्ण. आपण कुठल्या दृष्टीने बघतोय त्यावर हा प्रसंग आणि एकंदरीतच रॉकेटसिंग भावतो की नाही हे अवलंबून आहे. एवायएसचा एमडी सुनील पुरी, जो आतापर्यंत कहाणीत खलनायक आहे आणि ज्याला बिझनेस मिळवण्यासाठी काहीही निषिद्ध नाही. माणसाकडे दोन गुण असतात, एक त्याला वर घेऊन जाणारा आणि दुसरा त्याला रसातळाला नेणारा, हे ज्याचं लाडकं मत आहे. हरप्रीतकडे दुसरा गुण जास्त आहे असं म्हणून तो त्याला वेळोवेळी अपमानित करतो, त्याला शून्य म्हणून हिणवतो. असा हा पुरी हरप्रीतला शोधत येतो. हरप्रीतची रॉकेट सेल्स कॉर्पोरेशन विकत घेतलेल्या एका रुपयात त्याला परत विकतो आणि म्हणतो. ‘आयुष्यात काहीही कर पण बिझनेस करू नकोस. अपयशी होशील.’
अतिशय खोल अर्थ आहे पुरीच्या या वाक्याचा. कारण त्याने स्वत:ची हार तर मानली आहेच पण हरप्रीत जे करतोय तो सगळे करतात तसा बिझनेस नाही हे पुरीला समजलं आहे. हरप्रीतचा बिझनेस हा इथे रूढ झालेल्या अर्थाचा धंदा नाही. हरप्रीत लोकांना सेवा देतोय. नुसतं उत्पादन नाही, जबाबदारी घेतोय नुसता फायदा नाही. सहकर्मचार्यांना भागीदार करतोय, नोकर नाही. ही गोष्ट पुरीला जमणार नाही मात्र ती गोष्ट बिझनेसच्या पलीकडे ग्राहक आणि विक्रेता यात एक बंध निर्माण करणारी आहे, हे त्याला बरोबर कळलेलं आहे. म्हणून तो म्हणतो, ‘लाइफ में कभी बिझनेस मत करना.’
दुर्दैवाने भारतातल्या फार कमी उद्योगांना हे उमजलं आहे. स्वस्त ते मस्त अशी इकडे मागणी असते आणि तीसुद्धा ‘चले तो चांद तक, नहीं तो रात तक’ अशा शब्दांत. उत्पादनातील टिकाऊपणा, विक्रीनंतर सेवा वगैरे गोष्टी फक्त वस्तू खपवण्याआधी. आपला ब्रँड लोकांशी नेमका काय संवाद साधतोय, लोक ब्रँडबद्दल काय बोलतायत हा विचारही ‘मेरा लोगो बडा करो’ इतकीच समज असलेल्या ब्रँड मॅनेजर जमातीच्या डोक्यात नसतो. ‘बेच डालो’ हा युद्धघोष असणार्या भारतीय विक्रेतावर्गात ‘ग्राहकांचा संतोष हेच आमचे समाधान’ ही फक्त दुकानातली पाटी बनून राहते. प्रॉफिट मार्जिन फुगवून सद्सद्विवेकबुद्धीची मार्जिन चिमटून टाकताना यालाच व्यापार म्हणतात हा समज, त्यांच्या मनात किंचितही अपराधी भावना येऊ देत नाही. ग्राहक, त्यांनी मोजलेली किंमत यांच्यापासून कामगार, त्यांचं श्रम आणि त्यांचं योगदान हे कवडीमोल ठरवणारा व्यापारी, कारखानदार वर्ग आहे आपला.
शिमित अमीनचा रॉकेटसिंग म्हणजे या बुरसटलेल्या जगातून तळपत उडालेला सचोटीचा अग्निबाण आहे.
चित्रपटाची खासियत जयदीप साहनीची पटकथा आणि संवाद हे आहेत. गंमत म्हणजे एक तत्वज्ञान, एक विचारसरणी मांडणारे हे संवाद अतिशय साध्या भाषेत आहेत. जेव्हा एमडी सुनील पुरी हरप्रीतला म्हणतो ‘जब खून पसीना मेहनत बनकर कागज़ पर छपता है, टेबल बेड बन जाती है और ऑफिस घर. भूख प्यास भूल जाती है. बालबच्चे भूल जाते है. तब जाके साली कंपनी बनती है,’ तेव्हा एखादा उद्योग उभारण्यात असणारी किंवा असायला हवी असणारी तळमळ, फिलॉसॉफी तो इतक्या साध्या भाषेत मांडत असतो. आणि हरप्रीत त्याला म्हणतो, ‘जब लोग खूश होते हैं तब नंबर्स अपने आप बढने लगते हैं, क्योंकी बिझनेस नंबर्स नहीं लोग हैं.’
रॉकेटसिंग हा रणबीर कपूरच्या उत्कृष्ट अभिनयाने एका वेगळ्याच पातळीवर गेलेला सिनेमा आहे. हरप्रीतचा निरागसपणा, ठामपणा आणि आयुष्याला आनंदाने स्वीकारणारा शीख पोरगा त्याने अप्रतिम साकारला आहे. शीख कथानायक वापरण्याचं एक मोठं कारण म्हणजे या समाजाच्या सत्यप्रियतेवर आणि सचोटीवर भारतीयांचा असलेला विश्वास.
रॉकेटसिंगची अजून एक विशेषता म्हणजे त्यातले इतर अभिनेते. हरप्रीतला साथ देणारे त्याचे आजोबा प्रेम चोप्रा, रिसेप्शनिस्ट कोयना म्हणजे गौहर खान, सुपर सेल्समन नितीन म्हणजे नवीन कौशिक, चहावाला मुकेश एस. भट, हरप्रीतची गर्लफ्रेंड शझान पदमसी, सहकारी मित्र रेड्डी म्हणजे डी. संतोष हे सगळे अफलातून आहेत. मनीष चौधरीचा अकडू, कावेबाज, धूर्त एमडी सुनील पुरी फर्मासच.
संगीत रॉकेटसिंगप्रमाणेच साधं असलं तरी पॉकेट में रॉकेट है असं सहज तोंडात बसणारं गाणं आहे. बाकी तांत्रिक बाजू उत्तमच. आदित्य चोप्राचा चित्रपट म्हटल्यावर हे ओघाने आलंच.
२००९ साली आलेला हा चित्रपट तेवढा चालला मात्र नाही. पण कालांतराने एक क्लासिक म्हणून नक्की गणला जावा. कारण हा प्रामाणिक हरप्रीत आपल्या सगळ्यांत कुठे न कुठे आहेच आणि अनेक वर्षांपासून आहे. ‘जोडोनिया धन उत्तम वेव्हारें’ करण्याची इच्छा आणि ‘जीतोड मेहनत’ करून स्वत:चा व्यवसाय उभा करण्याचं स्वप्न पाहणारे अनेक रॉकेटसिंग आपल्या अवतीभवती आहेत. शिमित अमिनचा हरप्रीत सिंग बेदी यांच्या मनातलंच तर बोललाय.
‘बिझनेस नंबर्स नहीं. लोग हैं. सिर्फ लोग.’
कट इट!
– गुरुदत्त सोनसुरकर
(लेखक चित्रपट रसिक, लघुपट दिग्दर्शक आणि जाहिरात व्यावसायिक आहेत)