• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

स्वयंपाकघरातून ‘किचन’कडे!

विलास कुमार खाणार्‍याने खात जावे

Marmik Team by Marmik Team
August 11, 2026
in खानपान, विशेष लेख
0
स्वयंपाकघरातून ‘किचन’कडे!

चित्र- आशुतोष वाळे

एक आटपाट नगर होते. त्या नगरात सुनीता, वनिता आणि अनिता अशा तीन स्त्रिया रहात होत्या. तिघींना प्रत्येकी एक पती होता. नगरातील एका रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सच्या एकाच माळ्यावर असलेल्या बाजूबाजूच्या फ्लॅटमध्ये त्या राहात होत्या. तिघींच्या घरी एक हँडसम दूधवाला दूध द्यायला यायचा. तिघींचे पती सकाळी ऑफिसमध्ये गेल्यावर तो दूध देण्यासाठी येत असे!

एके दिवशी तिघींनी प्रत्येकी एक-एक लिटर दूध घेतले. सुनीताने ते गॅसवर गरम केले आणि थंड झाल्यावर फ्रिजमध्ये ठेऊन दिले. वनिताने ते गॅसवर गरम करण्यासाठी ठेवले. ते गरम होईपर्यंत पाच मिनिटे व्हॉट्सअ‍ॅप पाहू म्हणून तिने फोन हातात घेतला. ते पाहता-पाहता बराच वेळ गेला. इकडे दूध उतू जाऊन करपल्याचा वास आला. पळत जाऊन तिने गॅस बंद केला. पातेल्यात जेमतेम एक कप दूध शिल्लक राहिले होते. त्यात कॉफी टाकून तिने पिऊन टाकले.

अनिताने दूध गरम केले. त्यातल्या काही दुधात तिने दह्याचे विरजण लावून टाकले. थोडे दूध चहासाठी बाजूला काढून ठेवले. थोडे दूध खीर बनवण्यासाठी ठेवले तर थोडे पिण्यासाठी. सुनीता दूध फ्रिजमध्ये ठेऊन विसरून गेली. ते तसेच आठ दिवसांनी खराब झाले आणि टाकून द्यावे लागले.

अशा तर्‍हेने एक लिटर दुधाचा तिघींनी वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग करून घेतला. ह्या कथेवरून असा बोध घ्यायचा की एखादी गृहिणी नुसतीच सुगरण असून चालत नाही, ती उत्कृष्ट मॅनेजर असली पाहिजे. स्वयंपाकघरात फक्त चविष्ट पदार्थ तयार करायचे नसतात, तर त्याव्यतिरिक्तही बर्‍याच गोष्टी मॅनेज करायच्या असतात. बिजनेस मॅनेजमेंटचा कोर्स असतो तसा किचन मॅनेजमेंटचा कोर्स असला पाहिजे.
रोज सकाळीच ‘आज नाष्ट्याला काय बनवावे?’ असा यक्षप्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो. घरात शाळकरी मुले असतील आणि सकाळी शाळा असेल तर त्यांच्यासाठी नाश्ता तयार करणे हे वेळ सांभाळून करण्याचे ‘टास्क’ असते. रोज नवीन-नवीन पदार्थ तरी कुठले करायचे? मग मुलांच्या डब्यात केक, बिस्किटे, मॅगी असे जंक वर्गात मोडणारे निष्कृष्ट दर्जाचे पदार्थ दिले जातात. नाश्त्याचा प्रश्न सोडवला की लगेचच दुपारच्या जेवणात काय बनवायचे हा प्रश्न उपस्थित होतो आणि तो मिटवला की रात्रीच्या जेवणात काय बनवायचे हा प्रश्न निर्माण होतो! इथे तुमच्या व्यवस्थापन कौशल्याची कसोटी लागते.
आठवडी बाजारातून आणलेल्या ताज्या भाज्या आधी वापरात आणल्या जातात. त्यानंतर भिजवून मोड आलेले कडधान्य वापरू शकता. बुधवारी मासे, रविवारी चिकन किंवा मटण तसेच शनिवारी सरळ हॉटेलमध्ये जाऊन खाणे, असा एक ढोबळ प्लॅन तयार करता येतो. आठवड्यात तीन पालेभाज्या आणि तीन वेळा फळभाज्या असे विभाजन करून संतुलित आहार घेण्याचा प्रयत्न करावा. शिवाय घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आवडी-निवडी वेगळ्या असतात. त्या सांभाळाव्या लागतात. मग ते व्यंजन करण्याची तयारी म्हणून बाजारातून त्याचे साहित्य आणणे, ते  फ्रिजमध्ये व्यवस्थित ठेवणे आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा वापरणे हे गणित जमले पाहिजे. ही रोजच तारेवरची कसरत तर करावी लागतेच, शिवाय सणासुदीच्या दिवशी घरातल्या लहान थोर लोकांच्या अपेक्षा असतात की काहीतरी गोड-धोड घरीच बनवायचं. अनुभवी गृहिणी अशा वेळी दोन तीन सोपे आयटम स्वतः घरी बनवते, तर चार आयटम रेडिमेड मागवते! जसे काहीजणांचे दाखवायचे दात आणि खाण्याचे दात वेगळे असतात तसेच खाण्याची मिठाई आणि लोकांना वाटण्याची मिठाई वेगवेगळी असते!
एका नामांकित कंपनीने आता एक आधुनिक एआय तंत्रज्ञान वापरून स्मार्ट फ्रिज बाजारात आणला आहे. आतमध्ये काय आहे आणि काय संपलंय याची माहिती या फ्रिजच्या दारासमोरच्या स्क्रीनवर दिसते. आपल्या साध्या फ्रिजमध्ये दार उघडून आत पाहावे लागते! म्हणजे त्यांनी आपले किती काम सोपे केले आहे पाहा! फ्रिजमधले काय पदार्थ संपलेले आहेत ते हा फ्रिजच तुमच्या फोनवर मेसेज करून सांगतो. म्हणजे तुम्ही बाजारात गेलात आणि फ्रिजमधले कोणते आयटम संपले होते हेच विसरलात, तर ह्या फ्रिजशी संपर्क करून विचारू शकता. फ्रिजमध्ये शिल्लक असलेले घटक वापरून कोणते पदार्थ तयार करता येतील याची रेसिपीसुद्धा हा फ्रिज आपल्यापुढे शोधून हजर करतो.

कृत्रिम बुद्धिमत्तेचे हे शास्त्र अजून बाल्यावस्थेत असल्यामुळे असले बालिश उद्योग हा फ्रिज करताना दिसतो. संशोधनात करोडो रुपये खर्च करून व ग्राहकांच्या उत्पादनाची लाखो रुपये किंमत वाढवून काही विशेष असा मोठा बदल होत नाही असे आजपावेतो दिसतंय. दार उघडून एका मिनिटात आतमध्ये काय शिल्लक आहे आणि काय आणायचं आहे हे समजते. फ्रिजच्या दरवाजावर एक कागदाचा तुकडा मॅग्नेटने चिकटवून ठेवला आणि संपलेल्या पदार्थांची यादी बनवली की बाजारात जाताना आयती घेऊन जाता येईल. मी तर फ्रिजला स्मार्ट तेव्हाच म्हणेन जेव्हा तो घरातील सदस्यांना उद्देशून काही संवाद साधेल. उदाहरणार्थ, आठवड्यापूर्वी फ्रिजमध्ये ठेवलेली वरण असलेली वाटी विसरून गेलेल्या मावशीला सांगेल,”मावशी, त्या वाटीतल्या वरणाची काहीतरी व्यवस्था लावा, त्यावर बुरशी चढायला लागलीय बघा!’ किंवा ‘ अहो काकू, रात्री दोन वाजता काका आले होते आणि दोन गुलाबजाम खाऊन गुपचूप झोपले!’ असा घरातील सदस्याचा मधुमेह ताब्यात ठेवण्यासाठी पहारा देणारा फ्रिज जोपर्यंत बाजारात उपलब्ध होत नाही, तोपर्यंत ह्या टेक्नॉलॉजीच्या गमजा मारण्याची गरज नाही!

स्वयंपाकघर सांभाळणे इतके कठीण असल्यामुळे आजकाल बाहेरून मागवलेल्या पदार्थांची चलती आहे. मोबाईल फोनवर एक क्लिक करून कोणतीही वस्तू थोड्याच वेळात समोर हजर होण्याची जादू ह्या टेक्नॉलॉजीच्या आधारे प्रत्यक्षात उतरली आहे. नवीन फ्लॅटमध्ये देखील आजकाल किचनच्या नावाखाली हॉलमध्येच एका बाजूला एक ओटा बनवला जातो. ‘ओपन किचन’ अशी ह्या जागेची जाहिरात करण्यात येते. स्वयंपाक करण्यासाठी ही जागा अतिशय अपुरी पडते. फार फार तर तेथे चहा बनवता येईल! ह्यापेक्षा बाथरूम मोठी असतात. ‘रेडी टू कूक’ प्रकारच्या पदार्थांना येथे गरम करण्यापुरती जेमतेम जागा असते.

सुगरण असणे आणि स्वयंपाकघर सांभाळणे ह्या गोष्टी आता ‘आऊट ऑफ फॅशन’ होत आहेत. असेच चालू राहिले तर स्वयंपाकघर आक्रसून एक दिवस लुप्त झाल्यास काही आश्चर्य वाटणार नाही! जे आपण वापरत नाही ते एक दिवस नष्ट होते हा सृष्टीचा नियमच आहे. (आपला मेंदू सुद्धा असाच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे!) ठीक आहे. नसेल स्वयंपाकघर सांभाळणे जमत तर नका सांभाळू . पण मग चांगली पर्यायी व्यवस्था तरी करा. मी तर असे सुचवतो की हे बिल्डर लोक आपल्या प्रोजेक्टमध्ये पार्किंग, कम्युनिटी हॉल, स्विमिंग पूल, बॅडमिंटन कोर्ट अशा विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची जाहिरात करतात, त्याच धर्तीवर एक कॉमन किचनची सुविधा उपलब्ध का करून देऊ नये? बेसमेंटमध्ये पार्किंगची सोय असते तशीच सोय टेरेसवर मस्तपैकी किचन आणि डायनिंग हॉल उपलब्ध करून द्यावा. सगळे फ्लॅटधारक जेवायला अगदी सहकुटुंब येतील. एकमेकांची ओळख देखील नसलेले शेजारी त्या निमित्ताने एकत्र येऊन त्यांच्यात एकोपा निर्माण होईल. घाऊक बाजारातील दराने कमी किंमत देऊन सामान विकत घेतले जाऊ शकते. सोसायटी मेंबर देखरेख करतील. अगदीच नाही जमले तर कॅटरिंगवाल्यांना कंत्राट दिले तरी हे फायदेशीर ठरेल.

हॉस्टेलमधल्या मेससारखे असे किचन मॅनेज करणे काही कठीण नाही. त्यामुळे रोजच्या स्वयंपाक करण्याच्या जंजाळातून स्त्रियांची सुटका होईल. बेचव स्वयंपाक करणार्‍या बायकांपासून सुटका झाल्याने त्यांच्या नवर्‍याना हायसे वाटेल. महिलांना अधिक मोकळा वेळ मिळेल. त्या फावल्या वेळाचा उपयोग त्या व्हॉट्सअ‍ॅप किंवा यू ट्यूब पाहणे, ब्युटीपार्लरमध्ये जाणे अशा विधायक कार्यात सत्कारणी लावू शकतील! नवर्‍यालाही त्यामुळे आपल्या ‘कुगरण’ बायकोच्या ‘कशी झालीय भाजी?’ ह्या प्रश्नाला खोटे-खोटे उत्तर देण्याची पाळी येणार नाही! तुम्हांला कशी वाटते ही आयडियाची कल्पना?

Previous Post

थरारक विनोदाचे परिपूर्ण नाट्य!

Next Post

वेठबिगार

Next Post
वेठबिगार

वेठबिगार

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.