• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

थरारक विनोदाचे परिपूर्ण नाट्य!

संजय डहाळे तिसरी घंटा

Marmik Team by Marmik Team
August 11, 2026
in तिसरी घंटा
0
थरारक विनोदाचे परिपूर्ण नाट्य!

बदलत्या काळात ‘मिडिया’ने आपल्या जणू काही अस्तित्वावरच चारी बाजूंनी अतिक्रमण केलंय. आजची तरुणाई या वेडापोटी अक्षरश: दिवसरात्र झपाटलेली आहे. एकीकडे त्याची आवश्यकता तर दुसरीकडे त्याच्या अतिरेकामुळे निर्माण होणारी संकटे काही कमी नाहीत. ती अनेकांच्या शारीरिक, मानसिक, आर्थिक जीवनावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हल्ला करीत आहेत. सोशल मीडियाच्या विळख्यात आपण सारे अलगद अडकत चाललोत. काही देशांत तर हा सोशल मीडिया बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. कारण एकामागोमाग एक स्क्रोल वापरण्यास भाग पाडणारा हा फेरा तरुणांची विचारशक्ती संपविण्याचा जीवघेणा छुपा खेळ ठरतोय. वैचारिक अपंगत्वाकडे घेऊन जाणारी लक्षणे त्यात आहेत. युकेमध्ये त्यावर आता कडक बंधने लावली गेली आहेत. यातून व्यक्तीची प्रतिष्ठा, गोपनीयता, अधिकार यावर गदा येऊ शकते. न्यायालयापुढेही अशी काही प्रकरणे आज निर्णयासाठी उभी आहेत. असो. एकूणच तरुणाईच्या या ज्वलंत विषयावर ‘थरार प्लस विनोदी’ शैलीत ‘बनवाबनवी’ या नव्या नाटकाचे कथानक गुंफले असून ते आजच्या सोशल मीडियावर आणि त्यांच्या परिणामांवर प्रथमच प्रभावी भाष्य करतेय. तसंच सतर्कही करतेय.

नाटकाचा पडदा उघडण्यापूर्वीच नाटक सुरू होतं. रसिकांशी जवळीक साधण्याचा हा प्रकार आजकाल कॉमन झालाय. दोन तरुण मित्र रंगमंचाबाहेरच्या जागेत टॉर्चच्या प्रकाशात शोध घेत आहेत. रातकिड्यांचा आवाज वाढतो आणि अखेर रंगमंच झळाळतो. तिथे एक भलामोठा व्हिला आहे. ही पॉश वास्तू काहीशी गूढता वाढविणारी. दोघेजण बंद दरवाजा उघडतात खरा, पण तो बंदही होतो. पुण्याजवळच्या वांगणीतल्या निसर्गातला हा व्हिला! एकेक करीत मित्रमंडळी जमते. यांची इथे बॅचलर पार्टी आहे. त्यासाठी सारे जण रात्रभर मुक्कामाच्या इराद्याने जमलेत. नव्या इंटरनेट जमान्यातले त्यांचे संभाषण. रील शूट करणारे दोघेजण त्यांच्या आधीच तिथे पोहोचले आहेत.

आता ही मंडळी कोण कुठली? तर शंतनू हा यातला म्होरक्या. पार्टीची कल्पना त्याचीच. त्याच्या काकांची ही प्रॉपर्टी. शंतनुचा विरारवाला दोस्त ओमकार उर्फ ओमी. या दोघांची पक्की जोडी आहे. अमराठी मित्र ऋषभ. सोबत सुमित आणि सोनाली. आणखीन एक मैत्रीण सिद्धी. अशी ही सहा जणांची टीम. सारे सोशल मीडियावर रील्स बनवणारे कंटेंन्ट क्रिएटर्स आहेत. शहरापासून दूर असलेल्या या व्हिलात शंतनूचे काका, त्यांची पत्नी आणि सायली यांच्या मालकीची ही आनंदी वास्तू. या त्रिकोणी कुटुंबात एकेकाळी चैतन्य होतं. पण आज नेमकं उलट झालंय. हा परिसर भुताटकीने भारावलाय, याची पदोपदी साक्ष पटते.

एकदा काकांनी रीलमध्ये नृत्य केलं. ती मिमिक्री बनली. त्याच्या हादर्‍याने काकांचं निधन झालं. या रीलबद्दल चाहात्यांनी अनेक घाणेरड्या प्रतिक्रिया नोंदवल्या. चेष्टा केली. काकांच्या वयाचा मान न ठेवता सोशल मीडियावर त्यांची बदनामी झालेली. त्यांना आणि मुलगी सायली हिला टोकाचा निर्णय घेणे भाग पडलं. ही कथानकाची पार्श्वभूमी.

दारूपार्टीत मित्र नाचतात, गातात, धमाल उडवितात. एकमेकांना घाबरवितात. वेडेपणा करतात. अचानक या व्हिलाचे मालक असलेले काका प्रगटतात. त्यांच्या हातात पट्टा आणि पिस्तूल आहे. त्यांच्या परवानगीशिवाय पार्टी करीत असल्याने ते सार्‍यांना पट्ट्याने मारतात. ‘शोले’ चित्रपटातील गब्बरच्या तोंडी असणारे एकेक डायलॉग काका म्हणतात. तेवढ्यात एक मोबाईल खणखणतो. रेंज नसतानाही कॉल येतो. त्यात सायलीचा आवाज असतो. बरेच दिवस भेट नसल्याने काका तिला व्हिलावर बोलवितात खरे, पण सायली काकांना सतर्क करते. हे सारेजण खुनी, गुन्हेगार आहेत. कुणालाही बाहेर सोडू नका, असे सांगून सावध करते. एक हादराच बसतो. उत्कंठा वाढत असतानाच पहिल्या अंकाचा पडदा पडतो.

पार्टी करायला आलेली ही ‘टीम’ आता ह्या ‘व्हिला’त पूर्णपणे अडकलेली आहे. त्यांना जराही सुटकेची वाट मिळत नाही. दारं, खिडक्या सारं काही बंदच. आजूबाजूला वस्ती नसल्याने कुणीही येण्याचा प्रश्नच नाही. सारे जण मदतीची वाट बघत आहेत. एकच घबराट प्रत्येकाच्या मनात उडालेली. अर्थात त्यातून विनोदनिर्मिती होतेय. पण वातावरण दहशतीखाली. विचित्र घटना घडू लागतात. प्रत्येकाच्या अंगात सायलीचा संचार होतो. त्यावेळी ठराविक आवाजाने सारा परिसर हादरून जातोय. कुणाच्या हातून आजवर खून झालाय हे आठवून सांगा, आणि आपण सारे इथून सुटका करून घेऊ या, असं सुमितसह सारेजण सांगतात. पण प्रत्यक्ष कुणीही कुणाचाही खून केलेला नाही, हे दिसतं. देवाची प्रार्थना, कुलदैवताच स्मरण, देवापुढे नारळ ठेवून गार्‍हाणं- सारं काही होतं…पण…गुंता अधिकच वाढत जातो. काका आणि सायली यापैकी कुणाचा खून झाला आहे का? या एकाकी वास्तूत आणखी कोण आहे? ही भुताटकी की रील्ससाठी केलेलं खोटं नाटक? सुटकेसाठी दार उघडतात की ही टीम इथेच अडकते? ही सारी बनवाबनवी की सत्य? हे प्रश्न उभे राहतात. अर्थात त्यासाठी नाट्यगृहात या थरार कम विनोदी नाटकासाठी जाणं उत्तम!

थरार उडविणार्‍या अनेक घटना यात जागोजागी आहेत. दाराची उघडझाप, कितीही प्रयत्न केला तरीही दार न उघडणं, किंवा फोन ब्लॉक केला किंवा रेंज नसतान्ााही त्यातून आवाज येणं. एकीकडे असलेली ‘ती’ अचानक दुसरीकडून बाहेर येणं; पाकीट उघडल्यावर त्यातून आग येणं, फ्रिजमधून हात बाहेर येणं, पायाच्या तालावर घुंगरांचा ताल ऐकू येणं, वीज येणं आणि जाणं… यात भर म्हणजे एक
फ्लॅशबॅकमधला शॅडो प्ले.

या नाटकाचे लेखक-दिग्दर्शक समीर खांडेकर हा विनोदाची उत्तम जाण असलेला रंगकर्मी. त्याचे स्वतःचे ‘आसोवा’ हे यूट्युब चॅनेल आहे. त्यामुळे यातील इनफ्लुएन्सर्स टीमशी त्याचा कायम संपर्क असतो. त्याचे दादरमध्ये अस्सल मराठमोळे ‘पिठीभात’ हे
हॉटेल देखील सध्या चर्चेत आहे. त्याच्या या निर्मितीत नव्या पिढीची बोली असणारे संवाद आणि थरारनाट्याला दिलेली विनोदाची फोडणी चांगली जमली आहे. कथानक कुठेही रेंगळत नाही ते वेगवान आहे. सर्वांची भट्टी चांगली जुळवून आणलीय.

नाटकातून एक प्रश्न मांडला गेलाय, तो महत्त्वाचा वाटतो. ट्रोलिंग हा प्रकार युवकांमध्ये हल्ली वाढत चालला आहे. त्यातील भूमिका सादरीकरण हे तापदायक, अतिरेकी असलं तर प्रसंगी एखाद्याचा जीवही जाऊ शकतो. नव तंत्रज्ञान संयमाने हाताळलं तर ठीक, नाहीतर ट्रोलिंग हे एक महासंकट ठरू शकेल, असा इशारा, संदेश यातून नाटककारांनी दिलाय. आजच्या पिढीचे रसिक डोळ्यापुढे ठेवून कथानक मांडले असून दिग्दर्शनातही परिपक्वता दिसते. ‘थरार प्लस विनोदी’ अशी दुहेरी ट्रीटमेंट याला दिलीय खरी, पण हे नाट्य केवळ थरारक प्रकारातही सादर करता येईल, एवढ्या ताकदीने त्यात नाट्य भरले आहे. निर्मात्यांनी यावरही विचार करावा.

आठ कलाकारांनी हे नाट्य पेलले आहे. त्यातल्या त्यात इन्फ्लुएन्सर्सचा धुमाकूळ अक्षरशः धम्माल उडवितो. फक्त दोन मिनिटांची कला सादर करणार्‍यांमध्ये पूर्ण नाटक पेश करण्याची क्षमता नजरेत भरते. कलाकारांची नावेच यातील पात्रांना देण्यात आलीय. हे वेगळेपण. म्होरक्या शंतनू रांगणेकर याने भूमिकेत चांगले रंग भरलेत. विनोदी आणि गंभीर या दोन्ही प्रकारचे पुरेपूर भान शंतनूमध्ये दिसते. टिपिकल विरारकर, आई जीवदानीचा भक्त ओमकार कदम उर्फ ओमी यानेही चांगली साथ सोबत केलीय. घाबरट ओमी लक्षात राहतो.
ऋषभ मोरे यांचे मराठी ‘लाऊड’ संवाद हे काहीदा असह्य ठरतात. पण हाती असलेल्या भूमिकेला त्याने न्याय दिलाय. सरळमार्गी, शांत स्वभावाचा सुमित चव्हाण पार्टीला आलाय की सत्संगाला हा प्रश्न पडतो. एखाद्याचा खून करणं हा विचारच त्याच्या मनात कधी येणार नाही. सोनाली गुरव ही लालबागकर. सहकलाकारांशी ट्युनिंग तिनं चांगले जमविले आहे. सिद्धी पोतदार उर्फ मौसमी ही हशे वसूल करते. काकांच्या भूमिकेत सुधाकर सोनवणे यांनी गूढता वाढविणारा अभिनय केलाय. सखी गुंडये हिची सायली पडद्यामागे असूनही लक्षवेधी ठरते. भूमिकेला असलेल्या भावनिक ओलावाही दिसतो. टायमिंगची चांगली समज तिला आहे. या टीमचे माध्यम बदलले असले तरी त्यांना नाटक या माध्यमाची भीती वाटत नाही किंवा दडपणही दिसत नाही. सार्‍या व्यक्तिरेखा वैशिष्ट्यपूर्ण असून नाटकाची बलस्थाने आहेत.
डॉ. सुमित पाटील याचे नेपथ्य हे भव्यता निर्माण करणारे आहे. पॉश व्हिलाभोवती असलेली गूढता चांगली वातावरणनिर्मिती करते. लाकडाचा इफेक्ट असणारे कोपरे तसेच हालचालींना पुरेशी जागा आहे. शॅडो प्लेसाठी मध्यवर्ती जागा नेमकी आहे. चेतन पडवळ याची प्रकाशयोजना आणि निनाद म्हैसाळकर याचे संगीत प्रसंगाला न्याय देणारे ठरतात. गाणी, नृत्यासह सर्व तांत्रिक बाजू पूरक आहेत. भुतानं झपाटलं हे नागेश मोरवेकर यांचं गाणं धम्माल आहे. सार्‍यांना ताल धरण भाग पडतं.

नाटकाचे निर्माते प्रभात थिएटर्सचे ज्योती प्रमोद कठापूरकर आणि निखिल एकनाथ करंडे हे असून त्यांनी काही महिन्यांपूर्वीच ‘लागली पैज’ हे नाटक व्यावसायिकवर आणले होते. निर्मितीमूल्ये परिपूर्ण आहेत. तरुण रसिकांना नाट्यगृहाकडे आणण्याचा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पदच आहे. सोशल मीडियावर सक्रिय पिढी यातील नाट्याशी ‘रिलेट’ करते ही समाधानाची बाब आहे.
नाटकाचं ‘टायटल’ महत्त्वाचं असतं, रसिकांना नाट्यगृहापर्यंत खेचून आणायची जादू त्याठायीं असते. अनेक चांगली नाटके नावामुळे फसली, असेही दिसले. सचिनच्या ‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटातील काही प्रसंग आठवले की आजही हसू फुटते. रसिकांच्या मनावर चित्रपटाचे नाव पक्के कोरले गेलेले. त्याचंच ‘बारसं’ नाटकासाठी केलंय. हा योगायोग नसावा.
प्रत्यक्ष जीवनात सोशल मीडियावर कंटेंट क्रिएटर असलेल्या दोस्त मंडळींचे प्रथमच व्यावसायिक रंगभूमीवर आगमन झालंय. ही घटना नाट्य वाटचालीतली नोंद घेण्याजोगी अशीच आहे. आजच्या डिजिटल युगात लोकांना सजग बनवणारी ही बनवाबनवी रसिकांना हसवेल आणि घाबरूनही सोडेल, यात शंका नाही.

बनवाबनवी
लेखन/ दिग्दर्शन- समीर खांडेकर
नेपथ्य- डॉ. सुमित पाटील
प्रकाश- चेतन पडवळ
संगीत- निनाद म्हैसाळकर
गाणी- नागेश मोरवेकर
निर्माते- ज्योती प्रमोद कठापुरकर/ निखिल करंडे
कार्यकारी निर्माता- हर्षद प्रमोद कठापुरकर
छायाचित्रे – संजय पेठे

Previous Post

फसवणुकीचा ओटीपी!

Next Post

स्वयंपाकघरातून ‘किचन’कडे!

Next Post
स्वयंपाकघरातून ‘किचन’कडे!

स्वयंपाकघरातून ‘किचन'कडे!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.