
सायबर ठग समोरच्या व्यक्तीला फसवण्यासाठी नवनव्या तंत्राचा अवलंब करतात. उच्चशिक्षित व्यक्तीही सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अलगदपणे अडकतात.मिठ्ठास बोलणे हे त्यांचे हत्यार.
विद्या पंडित. हैदराबादमधील एका नामांकित शाळेत इंग्रजी विषय शिकवणार्या, अभ्यासू आणि विद्यार्थ्यांच्या लाडक्या शिक्षिका. शिक्षणाबरोबरच समाजकार्यात त्यांना प्रचंड रस होता. शनिवार-रविवार त्यांच्यासाठी सुटीचा नसे. अनाथ मुलांसाठी पुस्तक वाटप, महिलांसाठी साक्षरता मोहीम, वृद्धाश्रमात जाऊन संवाद, अशा कार्यक्रमामध्ये त्या कायमच व्यग्र असत. सोशल मीडियावरही त्यांचा मोठा वावर होता. समाजकार्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून त्या फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅपवर सतत सक्रिय असायच्या. मात्र सायबर फसवणुकीबद्दलही त्या नेहमी सजग असायच्या. शाळेतल्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांनाही त्या वारंवार सांगायच्या, ‘अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, ओटीपी कोणाला सांगू नका, सायबर चोरटे खूप हुशार असतात. पण नियतीने त्यांच्यासाठी वेगळाच सापळा तयार करून ठेवला होता, ज्याची त्यांना काहीच कल्पना नव्हती.
सोमवारचा दिवस. दुपारचे साडेबारा वाजले होते. शाळा सुटल्याची घंटा झाली. विद्यार्थी गोंगाट करत बाहेर पडू लागले. विद्या मॅडम स्टाफरूममधून पर्स घेऊन शाळेबाहेर पडत होत्या. उन्हामुळे वातावरण गरम झाले होते. रिक्षा थांबवण्यासाठी त्यांनी हात पुढे केला, इतक्यात त्यांच्या मोबाइलची रिंग वाजली. स्क्रीनवर अनोळखी नंबर झळकत होता. त्यांनी फोनकडे पाहिले. यावेळी कोण असेल? असे त्या मनाशी पुटपुटल्या. समोरून एका महिलेचा गोड आवाज आला. ‘हॅलो… ये विद्या मॅडम का नंबर है क्या? ‘हाँ… बोल रही हूँ. कौन?’ विद्या म्हणाल्या. मॅडम, मैं बैंक से बोल रही हूँ. बँक से? विद्या सावध झाल्या होत्या. जी मॅडम… आपके क्रेडिट कार्ड में जो इंश्योरेंस सुविधा दी गयी है, वो हमारी नई पॉलिसी के अनुसार बंद की जा रही है, त्यावर विद्या यांनी क्यूँ? असा प्रश्न केला होता. समोरची महिला अत्यंत आत्मविश्वासाने त्यांच्याबरोबर बोलत होती. मॅडम, ही सुविधा काढली गेली तर तुमचं फार नुकसान होईल, हे ऐकून विद्या मॅडम थोड्या गोंधळल्या. मग आता ती ठेवण्यासाठी काय करायचं, असे त्यांनी विचारताच समोरच्या महिलेने आनंदाने उत्तर देत ते सगळं मी करते, तुम्ही चिंता करू नका असा दिलासा दिला. त्यांच्या कार्डवर जमा होणारे पॉइंट्स, कॅशबॅक वगैरेंची माहिती ती सफाईने देत होती, त्यामुळे विद्या मॅडमचा विश्वास बसत गेला.
रस्त्याकडेला उभ्या राहून त्या फोनवर बोलत होत्या. त्यांचं पूर्ण लक्ष संभाषणात गुंतलं होतं. त्या मुलीने आता फोनवर ओटीपी येईल, तो सांगा, असं सांगितलं आणि विद्या मॅडम क्षणभर थांबल्या. त्यांच्या मनात विचार आला, असा फोनवर कुणाला ओटीपी सांगायचा नसतो. पण लगेच दुसरा विचार आला, अरे ही बाई तर आपल्याच बँकेतून बोलतेय, आपल्या कार्डची माहितीही तिला आहे. इतक्यात त्यांच्या मोबाईलवर मेसेज आला. त्यांनी फोनवरच्या मुलीला ओटीपी सांगितला. ‘थँक यू मॅडम, फोन ठेवू नका. प्रोसेस चालू आहे. महिलेचा आवाज अजूनही गोडच होता. काही सेकंदांनी पुन्हा एक मेसेज आला. मॅडम ही शेवटची स्टेप. आणखी एक ओटीपी येईल…’
विद्या यांचा आता त्यावर पूर्ण विश्वास बसला. त्यांनी दुसराही ओटीपी सांगितला. तिसरा आणि मग चौथा अशा ओटीपी त्या सांगत चालल्या होत्या. समोरची महिला प्रत्येक वेळी अत्यंत नम्रपणे बोलत होती. थँक्यू, मॅडम, आप बहुत को-ऑपरेटिव्ह हो, बस दो मिनट और, विद्या मॅडमनाही वाटत होतं की आपण एक साधी प्रक्रिया पूर्ण करत आहोत. शेवटी ती महिला म्हणाली, मॅडम, तुमचे काम झाले. थँक्यू यू सो मच, असे म्हणून तो फोन कट झाला.
फोन ठेवताच विद्याच्या मोबाइलवर मेसेजचा पाऊस सुरू झाला होता. सुरुवातीला १ लाख, ५० हजार रुपये डेबिट, दुसरा मेसेज आला २ लाख रुपये डेबिट, तिसरा मेसेज १ लाख ५० हजार रुपये डेबिट… हे पाहून क्षणभर त्यांना काहीच समजलं नव्हते. त्या थिजल्यासारख्या उभ्या राहिल्या. पुढच्याच क्षणी त्यांच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. अरेच्या हे काय झाले, त्यांनी घाईघाईने मेसेज पुन्हा वाचले. त्यांच्या बँक खात्यातून तब्बल पाच लाख रुपये काढले गेले होते.
‘नाही…नाही… हे शक्य नाही, असे म्हणत त्यांच्या हातातून मोबाइल निसटला होता. त्या घाबरून जवळच्या बाकावर बसल्या.
क्षणभर त्यांनी स्वतःलाच प्रश्न केला. मी इतकी सावध… तरी माझ्याबरोबर हे कसं झालं? त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं.काही वेळाने त्यांनी थरथरत्या हाताने भावाला फोन लावला. ‘दादा…’ त्यांचा आवाज कापत होता. काय झालं विद्या? माझे… माझे पाच लाख रुपये गेले. काय? समोरून मोठ्याने आवाज आला. त्यांनी घडलेला सगळा प्रकार सांगितला. ते ऐकून भाऊ संतापला. तू ओटीपी सांगितलास? विद्या रडत म्हणाल्या, मला वाटलं खरंच बँकेतून फोन आहे. आपण ताबडतोब सायबर पोलिसांकडे जाऊयात. तिथे जाऊन त्यांनी तक्रार केली. पोलिसांनी त्यांना विचारले, तुम्ही ज्यांच्याबरोबर बोलत होतात, त्यांचा फोन नंबर सांगा. किती वेळ तुमचे बोलणे झाले? विद्या म्हणाल्या, पाच ते सहा मिनिटे…इतक्या वेळात त्यांनी तुमचं खातं रिकामं केलं.
पोलिसांनी तातडीने बँकेशी संपर्क साधला. ही रक्कम कुठल्या खात्यात गेली आहे ते ताबडतोब ट्रेस करा. त्याचा तपास सुरू झाला. त्यांना कळलं, दीड लाख रुपये उत्तर प्रदेशातील एका खात्यात ट्रान्सफर झाले होते. उरलेले साडेतीन लाख अजून दुसर्या खात्यातच होते. बँकेने तात्काळ ती रक्कम गोठवली. विद्या मॅडमनी काही पैसे तरी वाचले असे म्हणत सुटकेचा निःश्वास टाकला. तपास जसजसा पुढे गेला तसतसं धक्कादायक सत्य समोर येऊ लागलं. अलाहाबादजवळच्या एका छोट्या गावातून चार जणांचं टोळकं हा सगळा खेळ चालवत होतं. त्यांच्याकडे अनेक बँक खात्यांची संवेदनशील माहिती होती. कुणाचं क्रेडिट कार्ड, कुणाचा मोबाइल नंबर, कुणाचा पत्ता, याची माहिती ते गोळा करायचे आणि मग बँकेच्या अधिकार्यासारखं बोलून लोकांना जाळ्यात ओढायचे. हैदराबाद आणि आसपासच्या भागातून अशाच प्रकारच्या अनेक तक्रारी समोर येऊ लागल्या होत्या. कोणाचे दोन लाख, कोणाचे सात लाख… कोणाचं संपूर्ण सेव्हिंग्स अकाउंट रिकामं झाले होते.
सायबर चोरट्यांनी लोकांच्या विश्वासालाच शस्त्र बनवलं होतं.
- अशी घ्या काळजी
- अनोळखी नंबरवरून आलेल्या फोनवर वैयक्तिक माहिती देऊ नका.
- ओटीपी, सीव्हीव्ही, एटीएम पिन कोणालाही सांगू नका.
- भीती दाखवून निर्णय घ्यायला लावणार्या व्यक्तींपासून सावध राहा.
- सायबर जगात विश्वास ठेवण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा.
- तुमच्या कार्डवरील सुविधा बंद होणार असल्याचे सांगण्यात येत असेल तर त्या फोनवर कोणतीही माहिती देण्याच्या भानगडीत पडू नका.
- समोरील व्यक्ती जे सांगते आहे, त्याची बँकेत जाऊन शहानिशा करा.
- मोबाइलच्या माध्यमातून कोणताही व्यवहार करताना योग्य ती खबरदारी घ्या.
- सायबर फसवणुकीत चुकून अडकलात तर तातडीने त्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवा.

