‘पुण्याची खाद्यसंस्कृती केवळ महाराष्ट्रातच प्रसिद्ध नाही, तर ती जगप्रसिद्ध आहे. आज पुण्यात शिक्षणाच्या, नोकरीधंद्याच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून लोक येऊन वसले आहेत. त्यामुळे शेवगावची कचोरी, मराठवाड्याचे लोणी धपाटे, निलंगा राईस, सोलापूरचे शिक कबाब आणि भाजकं मटण इथपासून ते कोल्हापूरचा तांबडा-पांढरा रस्सा आणि नागपूरच्या तर्री पोह्यांपर्यंत सगळ्या महाराष्ट्रातले नामांकित पदार्थ पुण्यात मिळतात आणि उत्तम चवीचे मिळतात. चव पसंतीला पडली नाही तर पुण्यात अमृत देखील विकलं जाणार नाही. फुकटही कोणी घेणार नाही.
पण, पुण्यात हे सगळे पदार्थ किंवा देशाच्या, जगाच्या कानाकोपर्यातले वेचक पदार्थ येऊन स्थिरावण्याच्या आधीपासून पुण्याची म्हणून एक खाद्यसंस्कृती विकसित झालेली आहे. आज चोरट्या भुकेला, संध्याकाळच्या भुकेला वडापाव, भजीपाव, शेवगाव कचोरी वगैरे पदार्थ लोकप्रिय आहेत, पुण्यात आधीपासून लोकप्रिय आहे ती भेळ आणि चिवडा. कागदाच्या पुडीत बांधून मिळणार्या चिवड्याने अनेक पिढ्यांचे बालपण, तरुणपण आणि मैत्रीचे क्षण रंगवले आहेत. पुण्याच्या खाद्यविश्वात भेळ आणि मिसळीइतकाच मान चिवड्यालाही होता एकेकाळी. तो पुण्याच्या संस्कृतीचा, जीवनशैलीचा आणि लोकांच्या भावविश्वाचा एक भाग आहे. कुरकुरीत पोहे, भाजलेले शेंगदाणे, डाळी, खास मसाले, ताजा कांदा, लिंबाचा रस आणि वरून पेरलेली मिरची यांचा संगम जिभेवर असा काही रेंगाळतो की त्या चवीची आठवण अनेक दिवस मनात राहते.
जुन्या पुण्यातील अप्पा बळवंत चौकातून पासोड्या विठोबा मंदिराकडे जाताना फरासखाना पोलीस स्टेशनजवळ एक छोटीशी गाडी अनेक वर्षे पुणेकरांच्या आकर्षणाचे केंद्र होती. त्या गाडीवर लिहिलेले नाव होते ‘रामचंद्र भगवंत चिवडेवाले.’ संध्याकाळ होताच या गाडीभोवती गर्दी उसळायची. विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, कलाकार, साहित्यिक आणि खाद्यप्रेमी अशा सर्व स्तरांतील लोक या चवीसाठी आवर्जून थांबत असत. या चिवड्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील प्रत्येक घटक घरगुती पद्धतीने तयार केला जात असे. कोणतीही कृत्रिम चव नव्हती, कोणताही दिखाऊपणा नव्हता. साधेपणात दडलेली अस्सल चव हेच या चिवड्याचे खरे बळ होते. त्यामुळेच एकदा चिवडा खाल्लेला ग्राहक पुन्हा पुन्हा या गाडीपर्यंत पोहोचत असे. २०१४ साली फरासखाना परिसरात झालेल्या दुर्दैवी स्फोटानंतर हा प्रसिद्ध खाद्यस्पॉट बंद झाला. अनेक पुणेकरांसाठी त्यांच्या आठवणींचा एक कोपराच हरवला. वर्षानुवर्षे त्या चिवड्याच्या चवीची आठवण जपणारे अनेक ग्राहक त्या जागेकडे पाहून हळहळ व्यक्त करत होते.

पण, खाण्याची खरी परंपरा कधी संपत नसते. काही वर्षांनंतर हा वारसा पुन्हा नव्या जोमाने उभा राहिला. आज जोगेश्वरी मंदिरासमोर, सामक अँड कंपनीच्या शेजारी ‘रामचंद्र भगवंत चिवडेवाले’ पुन्हा पुणेकरांच्या सेवेत उभे आहेत. विशेष म्हणजे पंधरा-वीस वर्षांपूर्वी जशी चव होती, तसाच खमंग स्वाद आजही कायम आहे. बदलत्या काळात अनेक गोष्टी बदलल्या, पण या चिवड्याचा आत्मा बदलला नाही.
१९०७ पासून पुणेकरांच्या सेवेत
या व्यवसायाची सुरुवात झाली ती १९०७ साली. रामचंद्र भगवंत घाटगे हे मूळचे कोल्हापूरजवळील कागलचे. रोजगाराच्या शोधात ते १९०० साली पुण्यात आले. त्यांच्यासोबत होत्या पत्नी राधाबाई. दोघांनी मिळून ६३१ बुधवार पेठ या पत्त्यावरच्या छोट्याशा जागेत चिवड्याचा व्यवसाय सुरू केला. त्या काळात ब्रिटिश राजवट होती. बाहेर खाण्याची संस्कृती आजइतकी विकसित नव्हती. तरीही रामचंद्ररावांनी तयार केलेल्या अनोख्या चिवड्याने लोकांची मने जिंकली. अवघ्या दोन पैशांत मिळणारा हा चिवडा तेव्हाच लोकप्रिय झाल्याची आठवण उल्हास घाटगे सांगतात.
शतक महोत्सवी रेसिपी
आजही या चिवड्याची रेसिपी शंभर वर्षांपूर्वी जशी होती तशीच आहे. साधा चिवडा, कांद्याचा चिवडा, नायलॉन पोहे, मक्याचा चिवडा, मसाला दाणे, कांदा, लिंबू आणि खास घरगुती तिखट यांच्या मिश्रणातून ही चव तयार होते. प्रत्येक घटकाचा समतोल इतका अचूक असतो की पहिल्या घासापासून शेवटच्या घासापर्यंत चव कायम राहते. या चिवड्याच्या लोकप्रियतेमागचे आणखी एक रहस्य म्हणजे ताजेपणा. इथे चिवडाही खाण्यासाठी येणारे ग्राहक ते चिवडे आवर्जून खरेदी करतात. उल्हास घाटगे सांगतात, आम्ही मुद्दाम या चिवड्याचे पॅकिंग करून ठेवत नाही. कारण आम्ही हे चिवडे रोजचे रोज तयार करत असतो. त्यामुळे त्यांचा फ्रेशनेस टिकून राहतो. ग्राहकांना प्रत्येक वेळी नव्याने बनवलेल्या ताज्या चिवड्याचा आनंद मिळतो. आजच्या यंत्रयुगातही ही परंपरा जपली गेली आहे, हेच या व्यवसायाचे वैशिष्ट्य आहे.

वडिलांनी व्यवसाय चालवला….
उल्हास सांगतात, माझे वडील रंगनाथ घाटगे हे कुस्तीपटू होते. त्यांनी आजोबांचा हा व्यवसाय पुढे चालवला. १९४५मध्ये ते या व्यवसायात आले. तेव्हा ते सोन्या मारुती चौक, पासोड्या विठोबा मंदिर या भागात सकाळी साडे अकरा ते बारा आणि संध्याकाळी साडेतीन ते चार या वेळेमध्ये चिवड्याची गाडी फिरवत असत. गाडीवर चिवडा खाण्यासाठी भरपूर गर्दी होत असे. तेव्हा ब्रिटिश अधिकारी देखील हा चिवडा खाण्यासाठी नेत असत अशी आठवण वडील तेव्हा सांगत. सुरुवातीपासूनच चिवडा घ्ारातून तयार करूनच नेला जात असल्याने त्याच्या चवीमध्ये आजतागायत कोणताही बदल झालेला नसल्याचे उल्हास सांगतात.
ते म्हणतात, आपण १९७३-७४च्या सुमारास व्यवसायात आलो. आता मुलगा अभिजित या व्यवसायात आला आहे. पूर्वीपासूनच आम्ही घरातले लोकच या व्यवसायात आहोत त्यामुळेच चिवड्याची चव इतकी वर्षे कायम ठेवू शकलो आहोत. आजही जिन्नस तयार करण्यासाठी उत्तम प्रकारचा कच्चा माल खरेदी करण्यामध्ये कोणतीही तडजोड केली जात नाही. चिवडे तयार करण्यासाठी लागणारे तिखट देखील घरगुती पद्धतीचे असते. चार पिढ्यांनी जपलेला हा वारसा आजही त्याच निष्ठेने पुढे नेला जात आहे.
मान्यवरांचा लाडका चिवडा
‘रामचंद्र भगवंत चिवडेवाले’ही ज्येष्ठ साहित्यिक अनिल अवचट, माजी खासदार श्रीनिवास पाटील, दिवंगत खासदार गिरीश बापट, शिवाजीराव आढाव यांसारख्या अनेक मान्यवरांची आवडती जागा होती. अवचट पुण्यातील या भागात आले की चिवडा खाण्यासाठी येथे नक्की थांबत असत. गिरीश बापट यांनाही येथील चव विशेष प्रिय होती.
मुलांची इच्छा म्हणून पुन्हा सुरुवात…
२०१४मध्ये फरासखाना परिसरात स्फोटाची घटना घडल्यानंतर चिवड्याची गाडी बंद झाली. चिवडा खाण्यासाठी नेमाने येणारी मंडळी इथे येत. आजूबाजूला चिवड्याचा गाडीबद्दल चौकशी करत. पण गाडी बंदच झाली होती. त्यामुळे ते परत जात असत. उल्हास यांचा मुलगा एकदा म्हणाला, आपला चिवड्याचा व्यवसाय जुना आहे. ग्राहकांना आपला चिवडा इतका आवडतो, आपण हा व्यवसाय सुरू करायला हवा. सुदैवाने अप्पा बळवंत चौकामध्ये एक दुकान भाड्याने मिळाले आणि पुन्हा व्यवसाय सुरू केला. त्यामुळे पुणेकरांच्या नव्या पिढीलाही या अनोख्या चिवड्याची चव घेता येणार आहे.

२०१४नंतर काही काळ हा वारसा थांबला खरा; पण ग्राहकांच्या प्रेमामुळे आणि मुलांच्या आग्रहामुळे त्याची पुन्हा सुरुवात झाली. आज नव्या ठिकाणी, नव्या उत्साहाने आणि जुन्याच चवीने हा व्यवसाय सुरू आहे. काळ बदलतो, शहर बदलते, माणसे बदलतात; पण काही चवी अशा असतात की त्या पिढ्यान् पिढ्या लोकांच्या मनात घर करून राहतात. त्यामध्येच रामचंद्र भगवंत चिवडेवाले यांचा चिवडाही येतो…

