
युरोपमधील काही देशांत ख्रिश्चन आणि ज्यू यांच्यातला संघर्ष नाझी विचारांच्या लोकांपायी शिगेला पोहोचला तेव्हाची ही गोष्ट. ही गोष्ट एका असामान्य स्त्रीची आहे जिने शब्दश: प्राणाची बाजी लावून तब्बल २५०० ज्यू मुलांची सुटका केली. ती स्वतः कॅथलिक ख्रिश्चन होती आणि त्या काळात अनेक ख्रिश्चन्स ज्यू लोकांना आपला परमशत्रू मानत होते तरीही तिने जीव धोक्यात घालून ही मुले वाचवली. ही कथा आहे एका विलक्षण मायाळू आणि प्रेमळ नर्सची आणि तिच्यातल्या वैश्विक मातृत्वाची! त्या जिगरबाज स्त्रीचे नाव इरेना सेंडलर! तिच्या आयुष्यावर टिलर मॅझिओ हिने ‘इरेना’ज चिल्ड्रेन’ हे विश्वविख्यात चरित्र लिहिलेय.
इरेना सेंडलर एका असामान्य व्यक्तिमत्त्वाची धनी होती, जिच्या धैर्य आणि मानवतेच्या कथा आजही प्रेरणा देतात. ती पोलंडमधील एक सामाजिक कार्यकर्ती आणि नर्स होती. तिने दुसर्या महायुद्धाच्या काळात वॉर्सा गेट्टोमधून सुमारे २५०० ज्यू मुलांना वाचवले. ‘झेगोटा’ या पोलिश भूमिगत संघटनेच्या बाल विभागाची ती प्रमुख होती. तिने बनावट कागदपत्रे तयार करून आणि मुलांना गुप्तपणे गेट्टोबाहेर काढून त्यांना ख्रिश्चन कुटुंबे, अनाथाश्रम तसेच कॉन्व्हेंटमध्ये आश्रय दिला. ती मुलांना रुग्णवाहिकेपासून ते बटाट्याच्या गोण्यांमध्ये लपवायची. त्यांची सुटका करताना ती कुठेही जाऊन धडकायची, अगदी गटारातून देखील मुले बाहेर काढायची!
इरेनाने सुटका केलेल्या प्रत्येक मुलाची मूळ ओळख आणि नवीन नावे यांची नोंद कोडेड स्वरूपात ठेवली. ही यादी तिने मातीच्या भांड्यांमध्ये लपवून जमिनीत पुरली, जेणेकरून युद्धानंतर मुलांना त्यांच्या कुटुंबीयांशी जोडता यावे आणि झाले देखील तसेच. १९४३मध्ये नाझींनी तिला पकडले आणि गेस्टापोने तिचा भयानक छळ केला. तिच्या हातापायाची हाडे मोडली. खरे तर ती अधू अपंग झाली असती, मात्र सुदैवाने तसे झाले नाही. तिचे अतोनात हाल केल्यानंतरही तिने एकाही सहकार्याचे नाव सांगितले नाही. तिला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली गेली, मात्र झेगोटाने लाच देऊन तिला सोडवले.

इरेनाला उदात्त मानवतावादी दृष्टिकोनाचा वारसा मातापित्यांकडून मिळाला होता. तिचे वडील एक दयाळू संवेदनशील डॉक्टर होते आणि विशेष म्हणजे ते गरीब ज्यू रुग्णांवर मोफत उपचार करत असत. एका प्रसंगात इरेना म्हणते– ‘लोक फक्त चांगले आणि वाईट असतात; धर्म, राष्ट्रीयत्व किंवा वंश या गोष्टीवरून माणसाचे चांगुलपण ठरवता येत नाही.’
जागतिक पातळीवर इरेनाच्या कर्तृत्वाची दखल फार उशिरा घेतली गेली. १९९९मध्ये काही अमेरिकन विद्यार्थ्यांनी ‘लाइफ इन अ जार’ या प्रकल्पाद्वारे तिची कहाणी जगासमोर आणली. तिला १९६५मध्ये इस्रायलच्या यद वाशेमने ‘राइटियस अमंग द नेशन्स’ हा सन्मान दिला आणि २००३मध्ये ‘ऑर्डर ऑफ द व्हाइट ईगल’ हा पोलंडचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला. इतके मोठे कार्य करूनही इरेना स्वतःला नायिका मानत नसे. ती म्हणायची, मी फक्त माझे कर्तव्य केले. सहकार्यांशिवाय हे शक्य झाले नसते, असे ती नेहमी सांगे.
‘इरेना’ज चिल्ड्रेन या पुस्तकात वार्सा गेट्टोतील ज्यू समुदायाच्या दयनीय अवस्थेचे हृदयद्रावक वर्णन आहे. भूक, रोग आणि मृत्यूचे सततचे भय हे तिथले वास्तव होते. इरेनाने ज्यू पालकांशी केलेल्या संवेदनशील संभाषणांचा तपशीलही पुस्तकात आहे, जिथे ती मुलांना सोडण्यासाठी त्यांची मनधरणी करायची. ज्यू कुटुंबांच्या दु:खाची आणि हतबलतेची बाजू त्यातून समोर येते. इरेनाने मुलांची ज्यू ओळख जपण्यासाठी त्यांची मूळ नावे लपवून, त्यांना नवीन ख्रिश्चन नावे देऊन ती यादीत नोंदवून ठेवली. ज्यू समुदायाच्या युद्धोपरांत अनुभवांचा, विशेषत: पालकांशी मुलांना पुन्हा जोडण्याच्या प्रयत्नांचा उल्लेखही पुस्तकात आहे.
इरेना सेंडलर ही रोमन कॅथलिक धर्माची होती. ती पोलंडमधील एका कॅथलिक कुटुंबात वाढली होती. मानवतेच्या मूल्यांवरील विश्वासामुळे तिने ज्यू मुलांना वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला. तिची मानवता सर्व धर्मांच्या पलीकडे होती, त्यामुळेच ती सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली. इरेनाच्या कार्याला अनेक ख्रिश्चन व्यक्ती आणि संस्थांचा मोठा पाठिंबा मिळाला. कॅथलिक कॉन्व्हेंट्स, चर्च आणि अनाथाश्रमांनी तिने वाचवलेल्या ज्यू मुलांना आश्रय दिला. तिच्या ‘झेगोटा’ या पोलिश भूमिगत संघटनेत अनेक ख्रिश्चन सहकारी होते, ज्यांनी बनावट कागदपत्रे बनवण्याच्या कामात, मुलांना लपवण्यात मदत केली.
दुसर्या महायुद्धादरम्यान पोलंडमधील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीची होती. काही ख्रिश्चन व्यक्तींनी किंवा गटांनी, विशेषतः ज्यांना नाझींची भीती होती किंवा ज्यूंविरुद्ध ज्यांच्या मनात द्वेष होता, अशांनी इरेनाच्या कार्याला अप्रत्यक्षपणे अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, मात्र ते त्यात यशस्वी ठरले नाहीत. इरेना जेव्हा हे काम करत होती तेव्हा युरोपातली स्थिती किती अनागोंदीची होती हे लक्षात घेतले की तिचे कार्य अधिकच उठून दिसते. त्या भूभागात शतकानुशतके ख्रिश्चन आणि ज्यू यांच्यात धार्मिक, सांस्कृतिक तणाव होता. मध्ययुगापासूनच काही ख्रिश्चन समुदाय ज्यूंना ख्रिस्ताच्या मृत्यूसाठी जबाबदार मानत होते, ज्यामुळे ज्यूविरोधी भ्ाावना वाढली. पोलंडसारख्या देशांमध्ये, जिथे मोठ्या प्रमाणात ज्यू लोकसंख्या होती (सुमारे ३० लाख, म्हणजे एकूण लोकसंख्येच्या १०टक्के), काही ख्रिश्चनांमध्ये ज्यूंविरुद्ध आर्थिक आणि सामाजिक पूर्वग्रह होते. ज्यूंना बाहेरचे किंवा वेगळे मानले जायचे.

वॉर्साच्या-छळछावणीचे-दृश्य
जर्मनी हा प्रामुख्याने ख्रिश्चन देश होता, ज्यामध्ये कॅथलिक आणि प्रोटेस्टंट (ल्यूथरन) समुदायांचे वर्चस्व होते. नाझी पक्षाच्या अनेक नेत्यांचा आणि सामान्य अनुयायांचा ख्रिश्चन पार्श्वभूमीशी संबंध होता, आणि त्यांनी प्रचारासाठी ख्रिश्चन प्रतीकांचा आणि भाषेचा वापर केला. नाझींनी पॉझिटिव्ह ख्रिश्चनिटी नावाची एक विकृत ख्रिश्चन विचारसरणी प्रचारात आणली, जी पारंपरिक ख्रिश्चन धर्माशी सुसंगत नव्हती. यात येशूला ज्यू नसून ‘आर्यन’ योद्धा म्हणून चित्रित केले गेले, आणि ज्यू-विरोधी भावना ख्रिश्चन धर्माशी जोडल्या गेल्या. ही विचारसरणी १९२०च्या नाझी पक्षाच्या पंचवीस कलमी कार्यक्रमात नमूद आहे. पोलंडमध्ये ज्यू समुदाय व्यापार, हस्तकला आणि वाणिज्य क्षेत्रात सक्रिय होता, ज्यामुळे काही ख्रिश्चनांमध्ये आर्थिक स्पर्धेची भावना निर्माण झाली. यामुळे स्थानिक पातळीवर तणाव वाढला होता. १९३०च्या दशकात, नाझींच्या उदयापूर्वीच, पोलंडमधील काही राष्ट्रवादी ख्रिश्चन गटांनी ज्यूंना राष्ट्रीय एकात्मतेविरोधातला धोका मानले आणि त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले. त्यांनी स्थलांतर करावे, निघून जावे असे त्यांना सांगितले गेले.
नाझींनी ज्यूंविरुद्ध तीव्र प्रचार करून ख्रिश्चन-ज्यू संबंध आणखी बिघडवले. त्यांनी ज्यूंना सर्व सामाजिक आणि आर्थिक समस्यांसाठी दोषी ठरवले. १९३९ सालचे पोलंडवर नाझींचे आक्रमण आणि घेट्टोची निर्मिती यामुळे ज्यू समुदाय पूर्णपणे वेगळा आणि संकटग्रस्त झाला. नाझींच्या ज्यूविरोधी धोरणांना काही ख्रिश्चनांनी, विशेषतः ज्यांना आर्थिक फायदा किंवा नाझींची भीती होती, त्यांनी अप्रत्यक्ष पाठिंबा दिला. याचीच एक कडी म्हणजे काही पोलिश ख्रिश्चनांनी ज्यूंची मालमत्ता हडपली किंवा नाझींना ज्यूंच्या लपण्याच्या ठिकाणांची माहिती दिली. पण हे लोक सकल ख्रिश्चन समुदायाचे प्रतिनिधित्व करत नव्हते. नाझींनी ज्यूंना मदत करणार्यांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली, ज्यामुळे अनेक ख्रिश्चनांनी, अगदी ज्यांना ज्यूंना मदत करायची इच्छा होती त्यांनीही, भीतीपोटी पाठ फिरवली. ही निष्क्रियता देखील दोन धर्मातील तणावाचे एक कारण होती.
एक कॅथलिक ख्रिश्चन असूनही इरेना सेंडलरचं नाझींच्या ज्यू-विरोधी धोरणांना थेट आव्हान देणं म्हणूनच भारी नि अभूतपूर्व धाडसाचं होतं. नाझींच्या विकृत धार्मिक प्रचाराचा आणि वंशवादी विचारसरणीचा तिने विरोध केला आणि तिच्या ख्रिश्चन विश्वासातील करुणा आणि मानवतेच्या मूल्यांवर आधारित ज्यू मुलांना वाचवले. जगभरात सर्वत्र यादवीसदृश स्थिती झालेली असताना इरेना सेंडलरच्या कार्याची महती अधिक ठळक होते! हे पुस्तक त्या अर्थानेही वाचनीय आहे.

लेखिका टिलर मॅझिओ या जन्माने अमेरिकन असून पेशाने इतिहासकार आणि प्राध्यापिका आहेत. सखोल संशोधनावर आधारित नॉन फिक्शन पुस्तकांसाठी त्या प्रसिद्ध आहेत. विशेषतः दुसर्या महायुद्धाशी संबंधित व्यक्ती आणि घटनांवरील मानवी कथांवरचे लेखन त्यांनी केलेय. २०१६ साली प्रकाशित झालेलं ‘इरेना’ज चिल्ड्रेन’ हे चरित्रपर पुस्तक प्रचंड गाजलं. टिलर मॅझिओंनी विलक्षण भावनाप्रधान आणि कारुण्यशील शैलीने लेखन केलेय. यातले तपशील वाचकांना खिळवून ठेवतात. जागतिक कीर्तीचे दैनिक न्यूयॉर्क टाइम्सच्या त्या बेस्टसेलर लेखिका आहेत. सध्या कॅनडातील मॉन्ट्रिअल युनिवर्सिटीमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
हे पुस्तक लिहिण्यामागचा टिलर मॅझिओ यांचा हेतू मला सर्वाधिक महत्वपूर्ण वाटतो. त्या म्हणतात की, ‘द्वेष, मत्सर आणि तिरस्कार यांनी ग्रासलेले कोट्यवधी पुरुष जगभरात आढळतात आणि त्यात फारशी नवलाची गोष्ट नाहीये. मात्र पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना निसर्गाने अधिक ममत्व दिले आहे कारण स्त्रिया मुलामुलींना जन्मास घालतात, त्या आई होतात! त्यांच्यातलं मातृत्व त्यांना महान बनवतं. एखाद्या स्त्रीला मूल जरी नसले तरी तिचे संततीव्याकुळ असणं माता असणार्या स्त्रीहून अधिक असतं! त्यामुळे हरएक स्त्री ही माताच आहे आणि जेव्हा स्त्रिया कुणा एकाच्या जिवावर उठतील, द्वेषाने भारल्या जातील, युद्धज्वराने ग्रासल्या जातील तेव्हा त्यांच्यातल्या सर्वोच्च गुणलक्षणांची त्यांनी निर्घृण हत्या केलेली असेल! त्या माता म्हणवून घेण्यास पात्र नसतील आणि मानवतावादी तर नक्कीच नसतील. त्यांनी एकदा जरी इरेना सेंडलरविषयी जाणून घेतलं तर त्यांना मानवता आणि करुणा यांचे मूल्य कळेल!’

