• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

पैसा माणसाला राक्षस बनवतो…

इन्स्पेक्टर प्रधान पंचनामा

marmik by marmik
July 3, 2026
in पंचनामा
0
पैसा माणसाला राक्षस बनवतो…

चित्र-नचिकेत कामतेकर

वरकरणी दरोड्याचा प्रकार वाटत असलेल्या दुहेरी खुनाच्या प्रकरणात इन्स्पेक्टर काळे यांच्यापुढे वेगळाच पेच उभा राहिला. ज्यांनी दुहेरी खून केला, ते कोण होते, या प्रश्नाच्या सोडवणुकीपर्यंत जाण्याआधी जो मारला गेला, तो नेमका कोण होता, त्याचं नाव काय होतं, गाव कोणतं होतं, हाच प्रश्न सुटत नव्हता… त्यावर विचार करत असताना त्यांची नजर वर्तमानपत्रातल्या मिसिंग कॉलमवर पडली त्यातून त्यांच्या विचारचक्राने वेगळीच गती घेतली…

हरवलेल्या व्यक्तीची माहिती देणारा मजकूर पाहिल्यावर इन्स्पेक्टर काळे विचार करू लागले, अतुल घरातून पळून आलेला असेल आणि अस्तित्व लपवत असेल, तर नक्कीच त्याच्या घरच्यांनी ‘मिसिंग’ची तक्रार नोंदवली असणार. त्याच्यासोबत असलेली मुलगी देखील घरातून पळून आलेली असावी, त्यामुळे तिचाही मिसिंग रिपोर्ट असणार. अतुल सहा महिन्यांपूर्वी दिनेश शेठकडे कामाला होता, म्हणजे तो साधारण एक ते दोन वर्षांपूर्वी गावीहून पळाला असावा.

काळे यांनी लगेच सी.आय.डी. क्राइमच्या मिसिंग ब्युरोशी संपर्क साधून मृतांचे फोटो पाठवले. काही वेळातच त्यांना अपेक्षित माहिती मिळाली. दोन्ही मृतदेहांचे फोटो आणि अंगावरील खुणा मिसिंग ब्युरोमधील नोंदीशी तंतोतंत जुळत होत्या. मृताचे खरे नाव आकाश वाडेकर होते आणि तो अमरावती जिल्ह्यातील ‘कापडी’ या गावचा रहिवासी होता. दोन वर्षांपूर्वी त्याच्या पालकांनी तो हरवल्याची तक्रार स्थानिक पोलीस स्टेशनला दिली होती. ही माहिती मिळताच काळे यांनी अमरावती कंट्रोल रूमद्वारे त्याच्या पालकांशी संपर्क साधला आणि ओळख पटवण्यासाठी त्यांना तात्काळ पुण्याला बोलवून घेतले.

दुसर्‍या दिवशी सकाळी आकाशचे वडील आणि भाऊ ससून हॉस्पिटलमध्ये आले. शवगृहातील मृतदेह पाहून त्यांनी टाहो फोडला. तो मृतदेह आकाशचाच होता. त्यांनी सांगितले की सोबत असलेली मृत महिला गावातीलच शकुंतला माने आहे. काळे यांनी अधिक चौकशी केली असता वडिलांनी सांगितले, ‘आकाश आमचा दुसरा मुलगा होता, तो पदवीधर होता पण नोकरीच्या शोधात होता. हुशार होता, पण हुशारीचा चुकीच्या कामासाठी उपयोग करायचा. त्याचे गावातील दुसर्‍या जातीच्या शकुंतला माने हिच्याशी प्रेमसंबंध होते. त्यातच त्याला जुगाराचे व्यसन लागल्याने त्याने भरपूर कर्ज करून ठेवले होते. पैशांच्या वादातून त्याला एकदा मारहाणही झाली होती, त्यानंतर तो अचानक गायब झाला. दुसर्‍या दिवसापासून शकुंतला देखील घरातून निघून गेली होती. ते दोघे एकत्र असतील अशी शंका होती, आज ती खरी ठरली.’ आकाशच्या पालकांचा प्रामाणिकपणा पाहून काळे यांची खात्री झाली की त्यांना पुढील काहीच माहिती नाही. त्यांनी कायदेशीर कारवाई करून मृतदेह त्यांच्या ताब्यात दिले.

मृतदेहांची खरी ओळख पटली होती- आकाश वाडेकर (उर्फ अतुल वर्डेकर उर्फ राजेश माने) याचा खून झाला होता. पण हा खून कोणी केला? दिनेश शहाने की आणखी कोणी? व्यापारी संघटनेच्या भीतीपोटी पुराव्याशिवाय शहाला अटक करता येत नव्हती. तपास कसा पुढे न्यावा, या विचारात काळे घरी गेले.

दुसर्‍या दिवशी सकाळी पोलीस ठाण्यात दैनंदिन काम पाहत असताना ठाणे अंमलदाराने सांगितले की एक माणूस तुम्हाला भेटायला आला आहे. काळे म्हणाले, ‘मी बिझी आहे, त्याची काय तक्रार आहे ते पाहून घ्या.’ अंमलदार म्हणाला, ‘साहेब, मी विचारले, पण तो म्हणाला की मला फक्त काळे साहेबांनाच भेटायचे आहे.’ काळे यांनी त्याला आत पाठवण्यास सांगितले.
त्या इसमाने आपले नाव ‘लक्ष्मण’ असे सांगितले. तो आकाशचा (अतुलचा) मित्र होता. त्याने सांगितले, ‘साहेब, अतुल गावातून पळून गेल्यानंतर काही दिवसांनी त्याने मला फोन केला होता. तो आणि शकुंतला दोघे सोबतच होते. त्यांच्याकडे पैसे नव्हते आणि कुठे जावे हे समजत नव्हते. त्या वेळी माझे चुलत भाऊ नागपूरला कॅन्सरच्या उपचारासाठी अ‍ॅडमिट होते, मी त्यांना तिथे बोलावून घेतले. मी अतुलला समजावून सांगितले की घरी चल, तुमचे लग्न लावून देऊ; पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याला गावी मारले जाण्याची भीती होती. ते दोघे माझ्यासोबतच राहिले. दवाखान्यात राहत असताना, शासकीय योजनांच्या कामासाठी कागदपत्रे बनवण्याचे काम अतुल करू लागला. त्याच्याकडे अनेक रुग्णांची कागदपत्रे गोळा झाली होती. काही दिवसांतच माझ्या भावाचे निधन झाले आणि मी गावी परत आलो. ते दोघे नोकरी शोधण्यासाठी जात असल्याचे सांगून निघून गेले, त्यानंतर त्यांचा संपर्क झाला नाही. मी त्यांना मदत केली म्हणून त्यांचे नातेवाईक मला मारतील, या भीतीने मी ही माहिती कोणालाच सांगितली नव्हती. काल जेव्हा पेपरमध्ये अतुल आणि शकुंतला यांचा खून झाल्याचे वाचले आणि त्यांनी धारण केलेली नावे पाहिली, तेव्हा मला धक्का बसला! त्यांनी जी नावे घेतली होती, ती नागपूरच्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या आणि मरण पावलेल्या व्यक्तींची होती. ‘राजेश माने’ हे नाव माझ्याच मयत भावाचे होते! अतुलने विश्वासाने दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करून स्वतःची नवीन ओळख बनवली होती. उद्या पोलीस मलाच जबाबदार धरतील, म्हणून मी स्वतःहून ही माहिती द्याय्ाला आलो आहे.’

सगळी कहाणी ऐकल्यावर काळे यांना मृत व्यक्तींनी नावे कशी बदलली, हे समजले. परंतु, अतुलकडे हवालाचे पैसे होते ही गोष्ट फक्त दिनेश शहा आणि शकुंतला यांनाच माहीत होती. शकुंतला तर मरण पावली होती, मग राहिला फक्त दिनेश शहा. काळे यांनी लगेच लोंढे यांना फोन करून परिस्थिती विचारली. लोंढे म्हणाले, ‘साहेब, मी माहिती काढली आहे. शहा हा व्यापारी माणूस आहे, तो खूप भित्रा आहे. तो कोणाला मारण्याची सुपारी देऊ शकत नाही. त्याचे कोणतेही क्रिमिनल रेकॉर्ड नाही.’

हे ऐकून काळे काहीसे हताश झाले. ‘आपल्या तपासाची दिशा चुकते आहे का?’ असे त्यांना वाटू लागले. त्यांनी संपूर्ण घटनाक्रम डोळ्यांसमोरून दोन-तीन वेळा घालवला आणि बारकावे शोधू लागले. अचानक त्यांच्या लक्षात आले की, अतुलच्या संपर्कात आलेल्या मुख्य व्यक्ती कोण? एक घरमालक आणि दुसरी घरातील मोलकरीण!

त्यांनी सोसायटीच्या सेक्रेटरींना विचारले असता त्यांनी सांगितले, ‘सहा महिन्यांपूर्वी एका एजंटमार्फत अतुल माझ्याकडे आला होता. रेंट अ‍ॅग्रीमेंट करताना आम्ही अर्धा तास भेटलो होतो, त्याने कॅश डिपॉझिट दिले होते. ११ महिन्यांचे अ‍ॅग्रीमेंट असल्याने त्यानंतर माझा त्याच्याशी कधीच संपर्क झाला नाही.’ त्यामुळे घरमालकाकडून काहीच निष्पन्न झाले नाही.

आता उरली घरातील मोलकरीण. इन्स्पेक्टर काळे यांनी तिला पोलीस ठाण्यात बोलावून घेतले आणि चौकशी सुरू केली. तिने सांगितले, ‘माझे नाव रुक्मिणी गावडे असून मी पालकर वस्ती येथे राहते. माझा नवरा खूप दारू पितो, त्यामुळे घर चालवण्यासाठी मला कामे करावी लागतात. माझ्या आई-वडिलांचे गाव राजगुरुनगर असून तिथून पाच किमी अंतरावर वडिलांची शेती आणि जुने घर आहे. आता आई-वडील आणि भाऊ माझ्या जवळच झोपडपट्टीत राहतात, गावी कोणी नसते. मी या सोसायटीत मागील काही वर्षांपासून धुणी-भांड्याची कामे करते. साधारण दोन महिन्यांपूर्वी अतुलच्या बायकोने मला विचारले आणि मी दोन हजार रुपये महिना सांगून काम धरले. मी सकाळी ९ ते ११ या वेळेत काम करायचे. घटना घडण्याच्या आदल्या दिवशीही मी नेहमीप्रमाणे काम करून गेले होते. ते दोघे एकमेकांशी फार कमी बोलायचे आणि शांत राहायचे. मी गावाविषयी विचारले तर विषय टाळायचे.’ काळे यांनी तिला बरेच प्रश्न विचारले, पण तिने अतिशय शांतपणे आणि व्यवस्थित उत्तरे दिली. तिच्याकडून काही माहिती मिळेल असे वाटत नसल्याने काळे तिला ‘तू जा’ असे सांगणार होते, इतक्यात तिच्या फोनची रिंग वाजली. तिने पर्समधून मोबाईल काढला, ‘हो, येत आहे,’ असे सांगून फोन ठेवला. बाहेर पडताना तिने पर्समधून हेडफोन काढून कानाला लावले.

ते पाहून काळे यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली! मोलकरणीचे काम करणार्‍या महिलेचे मासिक उत्पन्न २०-२५ हजारांपेक्षा जास्त नसणार, तरीही ती ‘जेबीएल’ कंपनीचे महागडे हेडफोन आणि ‘सॅमसंग’चा महागडा मोबाईल वापरत होती. ‘इथे काहीतरी गौडबंगाल आहे!’ हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच दोन महिला पोलिसांना तिच्यावर पाळत ठेवण्यास सांगितले.

दुसर्‍या दिवशी महिला पोलिसांनी रिपोर्ट दिला, ‘साहेब, रुक्मिणी गावडे शॉपिंग करताना हजारो रुपये खर्च करत आहे. ती मुलांना घेऊन मोठ्या हॉटेल्समध्ये जेवायला जात आहे. तिच्या वागण्यात हा बदल ४-५ दिवसांपासूनच झाला आहे. तसेच तिचे काशिनाथ जावळे नावाच्या एका व्यक्तीशी अनैतिक संबंध आहेत.’

इन्स्पेक्टर काळे यांचा संशय बळावला, पण पुरावा नव्हता. कारण सीसीटीव्ही फुटेजमध्ये खून करणारे पुरुष होते आणि घटना घडली तेव्हा ती घरात नव्हती. काळे यांनी तिच्या मोबाईल नंबरचे सीडीआर (कॉल डिटेल्स) काढले, तेव्हा धक्कादायक गोष्ट समोर आली; ही महिला एकाच नंबरवर वारंवार आणि ठराविक वेळी बोलत होती. घटना घडली त्या दिवशी सकाळी—घटनेच्या आधी आणि नंतर— तिने त्या नंबरवर ५-६ वेळा आणि संध्याकाळी जवळजवळ १६ वेळा कॉल केले होते आणि प्रत्येक वेळी ती १५-२० मिनिटे बोलली होती.
काळे यांनी त्या नंबरचे टॉवर लोकेशन काढायला सांगितले. सॉफ्टवेअरमध्ये लोकेशनचा ग्राफ पाहताच त्यांना धक्का बसला! घटनेच्या दिवशी सकाळी १० ते ११ दरम्यान त्या नंबरचे लोकेशन सोसायटीपासून १०० मीटर अंतरावर होते. ज्या वेळी खून झाला, त्या वेळी ते लोकेशन बिल्डिंगच्या आत दाखवत होते! घटना घडल्यानंतर एक तासाने ते वाकडेवाडी एरियामध्ये दाखवत होते, आणि विशेष म्हणजे त्याच वेळी रुक्मिणीचे टॉवर लोकेशन देखील वाकडेवाडीत त्याच ठिकाणी होते! त्यानंतर दोन तासांनी त्या संशयास्पद नंबरचे लोकेशन राजगुरुनगरजवळील एका शेतात दाखवू लागले आणि तेव्हापासून ते तिथेच स्थिर होते.

रुक्मिणीने आधीच सांगितले होते की तिचे गाव राजगुरुनगरजवळ आहे आणि तिथे तिचे जुने घर आहे. याचा अर्थ रुक्मिणी गावडे हिचा या गुन्ह्याशी थेट संबंध होता आणि मारेकरी तिच्या गावी लपलेले होते. काळे यांनी आधी संशयिताला ताब्यात घेण्याऐवजी, थेट मारेकर्‍यांना मुद्देमालासह पकडण्याचे ठरवले. त्यांनी दोन महिला पोलिसांना रुक्मिणीवर लक्ष ठेवण्यास सांगितले आणि स्वतः एका टीमसह तात्काळ राजगुरुनगरकडे रवाना झाले. तिथे स्थानिक पोलिसांची मदत घेऊन, चारी बाजूंनी ज्वारीचे पीक असलेल्या आणि मध्यभागी जुन्या दगडांच्या भिंती असलेल्या घराभोवती त्यांनी दबा धरला.

काही वेळाने त्या घरातून एक इसम बाहेर आला आणि इकडेतिकडे पाहत फोनवर बोलू लागला. त्याच वेळी काळे यांनी पुण्यात पाळत ठेवणार्‍या महिला पोलिसांना फोन करून विचारले, ‘रुक्मिणी काय करतेय?’ त्यांनी सांगितले, ‘साहेब, ती आताच कोणाशी तरी फोनवर बोलते आहे.’ काळे यांची खात्री झाली की हेच मारेकरी आहेत! त्यांनी मोबाईलमधील सीसीटीव्ही फुटेज पुन्हा पाहिले- फोनवर बोलणार्‍या व्यक्तीची चालण्याची पद्धत, शरीरयष्टी आणि फुटेजमधील व्यक्ती तंतोतंत एकच होती.

तो इसम फोनवर बोलून आत गेला. थोडा अंधार पडताच पोलीस टीमने अचानक दरावर छापा टाकून आत प्रवेश केला. आत दोन व्यक्ती दारू पीत बसल्या होत्या आणि त्यांच्या शेजारी धारदार कोयते ठेवलेले होते. पोलिसांनी झडप घालून दोघांना पकडले आणि त्यांच्या मुसक्या आवळल्या. संपूर्ण घराची झडती घेतली, पण काही सापडले नाही. मात्र, जिथे ते दारू पीत होते, तिथे शेजारी कोरड्या कडब्याचा (चार्‍याचा) मोठा ढीग लावलेला होता. काळे यांनी विचार केला की, इथे कोणतीही जनावरे नाहीत, मग हा कडबा कशासाठी? त्यांनी कर्मचार्‍यांना कडबा बाजूला करण्यास सांगितले. हे ऐकताच दोन्ही आरोपींच्या चेहर्‍यावरील रंग उडाला आणि ते घाबरले.
कडबा बाजूला करताच काळे यांनी सुटकेचा श्वास सोडला; तिथे दोन मोठ्या ट्रॅव्हल बॅगा लपवल्या होत्या. त्या बॅगा उघडून पाहिल्या असता, त्यात हजार रुपयांच्या नोटांचे अनेक बंडल्स होते! त्या बंडल्सवर बँकेचे लेबल्स होते, ज्यावर ‘एसबीआय शिखरपूर’ असे लिहिलेले होते, जे दिनेश शहाच्या बँकेशी मॅच होत होते. तसेच सीसीटीव्ही फुटेजमधील बॅगांचा रंग आणि या बॅगांचा रंग एकच होता. अतुलच्या घरातून गायब झालेली हीच ती रक्कम होती.

इन्स्पेक्टर काळे यांनी लगेच पुण्यात फोन करून सांगितले, ‘रुक्मिणीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून बसवा.’ काळे यांना खात्री होती की, जेव्हा रुक्मिणी या दोघांना मुद्देमालासह पोलीस ठाण्यात पाहिल, तेव्हा ती स्वतःहून सगळी कबुली देईल. काही वेळातच काळे आणि त्यांची टीम आरोपींना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली. त्यांना पाहताच रुक्मिणीचा चेहरा पांढरा फटफटीत पडला आणि ती रडू लागली. आरोपींनी मान खाली घातली.

काळे यांनी रुक्मिणीला आपल्या केबिनमध्ये बोलावले आणि शांतपणे म्हणाले, ‘जर तुला स्वतःला वाचवायचे असेल, तर खरे काय ते सांग. नाहीतर मीही तुला मदत करू शकणार नाही.’ रुक्मिणी ढसाढसा रडू लागली. तिला पाणी देण्यात आले. शांत झाल्यावर तिने खरे सांगायला सुरुवात केली : ‘साहेब, मी दोन-तीन महिन्यांपासून त्यांच्याकडे काम करत होते. ते दोघेही नेहमी घरीच असायचे. मला त्यांनी सांगितले होते की ते आयटी कंपनीत काम करतात, पण मला त्यांचे लॅपटॉप कधी दिसले नाहीत. ते दूध किंवा भाजी आणण्यासाठी नेहमी हजार रुपयांची नोट द्यायचे आणि बेडरूममध्ये मला कधीच साफसफाई करू देत नसत. चार दिवसांपूर्वी मी किचनमध्ये काम करत असताना, अतुल बेडरूममध्ये होते. मी घरात आहे हे त्यांना माहीत नव्हते. ते त्यांच्या बायकोला म्हणत होते, ‘तू सारखे म्हणतेस आईला फोन करू दे, पण तू फोन केलास आणि आपण इथे आहोत हे कळले, तर आपण नावे बदलून राहत आहोत हे गुपित उघड होईल आणि माहिती दिनेश शेठपर्यंत जाईल. थोडे दिवस कंट्रोल कर, वातावरण शांत झाले की आपण आई-वडिलांना इकडेच बोलावू. एवढे पैसे घेऊन आपल्याला सारखे बाहेर फिरता येणार नाही.’ त्यानंतर मी घरात असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी बोलणे बंद केले. काही वेळाने भाजीचे पैसे देण्यासाठी अतुल बेडरूममध्ये गेले, तेव्हा आरशातून मला ते कपाट उघडताना दिसले. कपाटात पैशांचे प्रचंड बंडल्स रचलेले होते! माझ्या मनात लालसा निर्माण झाली.

त्याच संध्याकाळी मी माझा प्रियकर काशिनाथ जावळे याला बागेत भेटले आणि ही गोष्ट सांगितली. त्याने विचार केला आणि म्हणाला, ‘हे बघ, ते दोघेही नाव बदलून राहतात आणि त्यांनी आणलेले पैसेही चोरीचे आहेत. आपण ते पैसे चोरले, तर ते पोलिसांत तक्रार करू शकणार नाहीत. ही चांगली संधी आहे. तू मला मदत कर, मी आणि माझा मित्र हे काम करतो. तुझ्यावर काहीही संशय येणार नाही. जे पैसे मिळतील ते आपण तिघे वाटून घेऊ.’ माझी परिस्थिती नाजूक होती, नवरा दारुडा होता, मुलांचे शिक्षण होते, त्यामुळे मी त्याच्या गोड बोलण्याला बळी पडले आणि आम्ही प्लॅन केला.

त्यांच्या बाथरूममध्ये लिकेज होते आणि त्यांनी मला प्लंबर शोधायला सांगितले होते. आम्ही ठरवले की काशिनाथ आणि त्याचा मित्र प्लंबर म्हणून जातील. त्या दिवशी सकाळी मी कामावर गेले आणि अतुल यांना सांगितले की, लिकेज पाहण्यासाठी माझा नवरा आणि त्याचा मित्र येणार आहेत, त्यांना बाथरूम दाखवा, असे सांगून मी निघून आले. बाहेर येऊन मी काशिनाथला कॉल केला आणि घराची परिस्थिती सांगितली. मी निघून गेल्यावर ते दोघे प्लंबर म्हणून आत गेले. मी काशिनाथला आधीच बजावले होते की, फक्त धाक दाखवून पैसे घ्या, कोणाला मारू नका! त्यानेही मला होकार दिला होता.

पण आत गेल्यानंतर अतुलने त्यांना जोरदार विरोध केला आणि त्यांच्यात झटापट झाली. त्या भरात काशिनाथने अतुलवर कोयत्याने वार केले. त्याची बायको मध्ये आली, तर तिलाही त्यांनी मारून टाकले आणि पैसे घेऊन मला वाकडेवाडी येथे भेटले. जेव्हा त्यांनी सांगितले की त्यांनी दोघांचा खून केला आहे, तेव्हा माझे त्यांच्याशी प्रचंड भांडण झाले. पण त्यांनी मला ‘नाईलाज झाला’ असे सांगून समजावले आणि माझ्या हातात दोन लाख रुपये दिले. दोन खून झाल्यामुळे पोलीस शोधतील म्हणून मी त्यांना माझ्या आई-वडिलांच्या गावी असलेल्या रिकाम्या घरात लपवले होते. साहेब, मला त्यांना मारायचे नव्हते! जर मला माहीत असते की हे दोघे त्यांचा खून करणार आहेत, तर मी कधीच त्यांची साथ दिली नसती. माझे चुकले साहेब, लालच फार वाईट आहे…’ असे म्हणत ती ढसाढसा रडू लागली.

इन्स्पेक्टर काळे यांनी महिला अधिकार्‍यांमार्फत रुक्मिणीचा कबुली जबाब नोंदवून घेतला. त्यानंतर काशिनाथ जावळे, त्याचा साथीदार आणि रुक्मिणी गावडे या तिघांना तात्काळ अटक करून लॉकअपमध्ये रवाना केले. काळे यांनी ही माहिती वरिष्ठांना दिली. डीसीपी साहेबांचा सूर लगेच बदलला, ते म्हणाले, ‘काळे साहेब, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास होता! तुम्ही हा गुन्हा नक्कीच उघडकीस आणणार याची मला खात्री होती!’ साहेबांचे कौतुक ऐकून काळे मनातल्या मनात हसले आणि विचार करू लागले, ‘परिस्थिती बदलली की वरिष्ठांचे बोल कसे बदलतात!’

इन्स्पेक्टर काळे यांनी पी.एस.आय. लोंढे यांच्याकडे पाहिले आणि एक अत्यंत महत्त्वाचे वाक्य म्हटले : ‘लोंढे, पैसा जोपर्यंत समोर नसतो, तोपर्यंत माणूस हा ‘माणूस’ असतो. पण एकदा का पैसा डोळ्यांसमोर आला, की त्यातल्या माणसाचा ‘राक्षस’ व्हायला वेळ लागत नाही! हे अतुलने दिनेश शहाच्या दुकानात दाखवून दिले, आणि रुक्मिणीने अतुलच्या घरात!’

Previous Post

राशीभविष्य (४ ते १० जुलै २०२६)

Next Post

रामचंद्र भगवंत चिवडेवाले

Next Post
रामचंद्र भगवंत चिवडेवाले

रामचंद्र भगवंत चिवडेवाले

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.