(सुभेदार इकमाल सिद्दीकचा `बरखा महल’. दरबार हॉलमधील रिकामी आसनं जवळ ओढून एकावर बूड, दुसर्यावर पाय टाकून सुभेदार दाढीचं खुट खाजवत आढ्याला लागलेलं जाळं बघत उताणा पडलेला. जाळ्यात कोळ्यानं कीटक वगैरे कसे पकडले त्याचं साधर्म्य स्वत:शी लागताच चटकन उठून बसतो, दारातल्या शिपायाला खूण करतो…)
शिपाई : (वाकत कुर्निसात करत) जी हुजूर?
इकमाल : (चिडत) हे हुजूर म्हणणं सोड बरं आधी. तू हुजूर म्हणतोस पण टारगट मुलं मला दिल्लीचा मजूर म्हणून चिडवतात त्याची याद येते आणि म्हणून आमचा मूड खराब होतो.
शिपाई : (पटकन सावरत) जी सुभेदार! काय हुकूम…?
इकमाल : तो रेडिओ लाव. कुणी दफ्तरी बसलेलं असेल तर पाठव!
(शिपाई धुळीनं माखलेला एक जुना रेडिओ कपाटावरून खाली घेतो, काही वेळ थकल्यावर ५६ एफएम लागतं, त्यावर गाणं चालुय… `जो तुमको हो पसंद वही बात कहेंगे। तुम दिनको अगर रात कहो तो रात कहेंगे।’ सुभेदार पुन्हा डोकं टेकवत आडवा होतो. शिपाई बाहेर जातो. तर लगबगीनं सरदार मुराद नागवडे आत येतात. आधी कुर्निसात करतात, मागाहून मुजरा करतात, पुन्हा गोंधळून राम राम घालतात. सगळा गोंधळ कळल्यावर पुन्हा `या अल्लाह!’ म्हणत कान धरतात.)
इकमाल : (मुराद नागवडेंची फजिती बघत) राहू दे! मुरादजी! ह्या सगळ्याची काही गरज नाही!
मुराद : नाही कसं? बघा! मी ही जाळीदार टोपी शिवून घेतलीय, एक एक गोष्ट शिकतोय, झालंच तर जुम्मे की जुम्मे अंघोळ करतोय, डोळ्यात सुरमा घालतोय. त्यात दाढी आधीची आहेच!
इकमाल : (कपाळावर आठ्या आणत) हा दिसतंय ते!
मुराद : (खुश होत) तर तर दिसायला हवंच! तुम्ही फक्त तेवढं दिल्ली दरबारी आमच्या मनसबसाठी आणखी एक अर्जी द्यावी, त्यासाठी आम्ही एक पायावर सुंता करण्यास राजी आहोत हेही सोबत कळवावं.
इकमाल : (टाळू बघत) हो, मुरादशेठ तुम्ही अगदी नाव बदलून वावरताय, जाणतो आम्ही! पण तुमचं यावेळी इथं येण्याचं प्रयोजन?
मुराद : (डोळ्यातले नाचरे मोर लपवत) तुम्ही मागल्या महिन्यात बोललेला ना? ह्या महिन्यांत नवीन मनसबदार्या दिल्या जातील म्हणून? त्यासाठी सुंता करावी लागेल ना? त्या कार्यक्रमासाठी खास हा पठाणी पोशाख शिवून घेतलाय मी! तो दाखवायला आलोय! कसा दिसतो सांगता का? (पठाणी कुर्ता कम पायघोळ अंगरखा वा पोतेरं घातलेले मुराद लहान मुलाच्या नवलाईनं गोल फेर घेत कुर्ता दाखवू लागतात. ते अजागळ अवसान बघून चेहर्यावरलं हसू आडव्या हाताने सुभेदार लपवतात. तितक्यात शिपायासोबत करीम बावकर व नरुल म्हैसूरी प्रवेशतात. तिघे सुभेदारास कुर्निसात घालतात.)
नरुल : (मुरादकडे बघत) मुरादजी, काय आहे हे?
मुराद : (लाजत) सुंता करायची तयारी! सुभेदार इकमालजी मला मनसब मिळवून देणार आहेत.
करीम : (समजावणीच्या सुरात) मुरादजी, तुम्ही आताही मनसबदारापेक्षा कमी आहात का?
मुराद : (उसळून) हे बघा, मागल्या वेळीही कुणाच्या बायकोमुळे वा कुणाचा शत्रू वरचढ होऊ नये म्हणून मी नमतं घेत मनसबदारीची संधी सोडली, पण आता मात्र मला मनसबदारी हवीच आहे. हे बघा मी आता एक जिरेटोपसुद्धा बनवायला लावलाय, चहापन्हा नौरंगजेब यांच्यासारखा!
नरुल : पण त्याला जिरेटोप म्हणत नाहीत मुरादजी! (सुभेदारांकडे बघत) हुजूर आपण बोलावलंत?
इकमाल : (चिंताग्रस्त चेहर्याने) हो, दिवाण फुलचंद डबीर सध्या आहेत कुठे?
करीम : ते त्यांच्या सुन्नवारवाड्यातच असावेत. ते बाहेर कुठं गेल्याची खबर नाही.
इकमाल : सुभ्यात सगळी आलबेल आहे ना?
करीम : हो, अगदी अगदी! फक्त माहुतांनी कामं थांबवली होती, रस्ते अडवून धरली होती! बाकी काही अडथळा नाही.
इकमाल : (आनंदाने) व्वा! म्हणजे ह्या आठवड्यात केवळ एकच समस्या उद्भवली तर? त्याबाबत डबीरांना मानावं लागेल.
नरुल : अगदी तसं नाहीय काही! कालच पुण्यभूमीत भरदिवसा टोळीयुद्ध पेटलं म्हणे!
इकमाल : (अत्यानंदाने) व्वा! म्हणजे शत्रू आपापसात लढून मारण्याची नवी शक्कल शोधून काढली तर डबीरांनी!!!
नरुल : (मान हलवत) आपण बेशक तसं म्हणू शकतात.
मुराद : (शंकेनं शिरेटोप न्याहाळत) सुभेदार, तुमच्या शिरेटोपात हिरे, पाचू-माणकांऐवजी रंगीत खडे दिसताय, हिरे-मोती गेलेत कुठं?
इकमाल : (शिपायाकडेबघत) चॅनेल बदल रे! (रेडिओचं बटन फिरताच `विव्हळभरती’ चॅनेल लागतं, त्यावर गाणं सुरू आहे, `ये दुआ है मेरी रब से, तुम्हें गुलामों में सब से, मेरी गुलामी पसंद आये।’ गाण्याच्या चालीवर पायाची ताल धरत पुन्हा मुरादकडे बघत) त्याचं असं आहे, मागे चहापन्हा नौरंगजेबांना इथले हिरे उद्योग फार आवडले, त्यांनी खास मागील दिल्लीवारीत त्याचा जिक्र केलेला. म्हणून भेट म्हणून दिलेला त्यांना.
मुराद : पण डोक्यावरील शिरेटोपातील हिरे-माणकं गेलीत कुठे?
इकमाल : त्यांनी प्रेमाने आम्हाला कुरवाळलेलं, तेव्हा शिरेटोपातून हात फिरवलेला. तेव्हा पडली असतील काही माणकं. (तोच बाहेरून कसलासा आवाज येतो. सगळे त्या दिशेने नजरा वळवतात.) शिपाई, कसला आवाज आहे हा?
शिपाई : (संकोचून) हुजूर, काही टारगट मुलं आपल्या बरखामहलचं नाव विद्रूप करण्यास येतात, त्यातून हेपहारेकर्यांचे रोजचे हाकारे ऐकू येताय…
इकमाल : (विचारात पडत) विद्रूप करतात म्हणजे? नेमकं करतात काय ते?
शिपाई : (खालमानेनं) फार काही नाही, फक्त बरखा महलला बरखास्त महल बनवतात ते!
इकमाल : (दीर्घ श्वास घेत) त्याची तर फुलचंद डबीर आणि त्यांचे साथीदार देखील वाट बघून आहेत. असो. त्यासाठीच ब्यादश्यांना खुश करण्यासाठी आम्ही मोठमोठे तोहफ़े भेट देत असतो.
नरुल : (शंकेनं आजूबाजूला बघत) मला तर ज्याम शंका येते, तुमच्यावर काही `शुक्लका…’ आणण्यासाठी त्यांनी खास हेर नेमले असावेत म्हणून. पण सुभेदार आम्हाला दफ्तरातून विशेष बोलावणं का धाडलंत?
इकमाल : इसी बात का जिक्र करना था मुझे। आता मागल्या वेळी जडी-बुटी उद्योग इथून जामनगर सुभ्यात नेला, तेव्हाही चहापन्हांचा एक गुप्त खलिता आलेला.
करीम : हां, मैंने सुना था शायद। अय-रे-बस कहके उन्होंने दो कारखाने ऊंट पर लांधकर ले जानी की बात कही थी।
इकमाल : (शंकेनं करीमकडे बघत) ऐकलं? कसं? तेव्हा तर दिल्लीसे आया हेर और मीच होतो इथे?
करीम : (ओशाळा होत) त्याचं काय आहे, आपल्याकडे शिपायांची कमतरता आहेच. तेव्हा अधूनमधून पहार्यावर मीच असतो. तेव्हा एकदा रात्री कानी आलेलं.
इकमाल : बावकर इथून पुढं तुम्ही माझ्या कक्षाबाहेर पहार्याला थांबायचं नाही. हवं तर पुरे किलेको गस्त लगा लो!
करीम : (भिऊन) जी हुजूर!
नरुल : (मध्येच विषयावर येत) हिरवे दांतचा कारखाना असाच नेलेला ना?
इकमाल : हां, हम सबकी खैरियत और बरकत के लिए…
करीम : (वाक्य पूर्ण करत) और जो गौहत्ती से लेकर सुन्नत करने का जो खर्चा आया, उसका भी भुगतान करना ही था!
मुराद : (इतक्या वेळ शांत असलेला अचानक उसळून) बाकी सुभेदार, तुम्हाला मात्र `सौदा’ जमत नाहीच! चहापन्हाचा हुकूम सुटला की कंबरेचं सोडून त्यांना देऊ धावता. पण एखाद्या कारखान्याच्या बदली माझी साधी मनसबपदरी पाडून घेतली नाहीत आपण?
करीम : तुमचं मध्येच काय असतं हो? मनसब, मनसब? आता डबीरसारख्यांना बाजूला सारत सुभेदार बनवलं ना? इकमाल सिद्दीक ना? आधी होते काय ते? आता त्याचं भुगतान केलं थोडंफार तर त्यात वेगळा सौदा होईल कुठून?
नरुल : आणि हे बघा ना! सुभेदार जब तक कुर्सी पर है तब तक तुम्हें भी कुछ ना कुछ…
मुराद : अय, मी तुमच्यासारखा वाटलो का? २४ घंटे दार पकडून बसणारा? पडलं खरकटं उचल! भर पोट! रायरीचा किल्लेदार आहे मी! माझ्या जिवावर सिद्दीक सुभेदार झाले. त्यांनी माझ्यासारख्यांना सांभाळून घेतलं तर त्यांना ३३ मुलखात नवाब म्हणून मिरवू आम्ही! आता सगळीकडच्या फौजांची जमवाजमव होतेय, पुढील एकदोन महिन्यांत युद्धाला कधीही तोंड फुटेल.
इकमाल : (समजावू बघत) मुरादजी, इथं गैर आहे का कुणी? आपण सगळे एक काफील्याचे. गद्दारवंशीचे योध्ये! आज करीम मलई खात असेल नि नरुल वासावर जगत असेल तर उद्या तसंच असेल कश्यावरून? भाकरी फिरवावीच लागते. पण जोवर आपण एक आहोत. तोवर दिल्लीशी अनेक सौदे करूच शकतो की!
मुराद : (लाडीक हट्टाने) पण पुढल्या सौद्यात मला मनसबदारी हवीच आहे हं? (तितक्यात एक शिपाई आत येतो, सुभेदारांच्या कानात काही खबर देतो. सुभेदार खुणेने कुणाला तरी आत बोलावतात. एक हेर आत येतो, त्याच्या हाती दिल्लीचा खलिता आहे. तो शंकेने मुराद, करीम आणि नरूलकडे बघतो.)
इकमाल : (हेराला आश्वस्त करत) बोलिये, क्या संदेसा है दिल्ली से. डरने की कोई बात नही, ये सब लोग मेरी बिरादरी के हैं! लानत के हकदार! (हेर साशंक मनाने पुढे होत, खलिता सुभेदाराच्या हाती सोपवतो. सुभेदार वाचू लागतो.)
नरुल : (उत्सुकतेने) सुभेदार काय आहे त्यात?
इकमाल : (संतापत) पढने तो दो पूरा! आखिर क्या मसला है, देखने पढने के बाद पता चलेगा न? अगर इतनीही घाई है तो डूब मरो!
करीम : (उपहासाने) डुंबून मरणं सोपं असेल, पण डुंबून बघणं अशक्य केलंत तुम्ही! आता त्यासाठी पण बडोदा संस्थानात जावं लागेल.
नरुल : (करीमकडे दुर्लक्ष करत) सुभेदार कसला खलिता आहे हा?
इकमाल : त्यांना जातिवंत गायी हव्यात दुभत्या, शिवाय गोठ्यासह. अब्दानीची नजर एक गोठ्याच्या जमिनीवर आहे सध्या!
मुराद : बघता बघता कुबेरनगरी तुमच्या शिरेटोपासारखी करायचीय त्यांना! निदान आपल्या सौद्याचं…
इकमाल : हा आदेश आहे! चहापन्हा नौरंगजेब आणखी काही मागताय..!
नरुल : काय?
इकमाल : आपल्याला सुभा देण्याची पूर्ण किंमत! और हम नहीं तो और किसी को यहाँ बैठाकर वो ये सब लेकर रहेंगेही!
करीम : मग आपण उपाशी राहावं का? सगळं त्यांना देऊन?
इकमाल : (खलिता बाजूला ठेवत) एक अच्छी खबर है! इस शाम की दावत मेरी तरफ से!
मुराद : मतलब?
इकमाल : संदलपुर में कुछ गिद्ध गए थे कल, शायद ताजा गोश्त शाम तक आ जायेगा!
नरुल : बोकड?
इकमाल : नहीं! कुछ लावारिस लाशें…