गेल्या आठवड्यात मी झोपेत असतानाच सॅडणवीसांची आकाशवाणी झाली आणि मी उडालोच. टीव्हीवर ‘बीजेपी माझा’ चॅनेलवर बातम्या चालू होत्या. मी चादरीतून डोळे किलकिले करून पाहात होतो. सॅडणवीसांना कोणीतरी प्रश्न विचारत होते आणि ते कमळाच्या लांबचलांब देठासारखी त्याची उत्तरं देत होते. सकाळी सकाळी असं विनोदी काही ऐकायला मिळालं की दिवस चांगला जातो. म्हणूनच मी डोळ्यावर पांघरूण घेऊन सशासारखे कान टवकारून ऐकत होतो. गेले वर्षभर ‘मी पुन्हा येईन’चा घोषा लावणार्या सॅडणवीसांनी काही वेगळाच सूर लावल्याचे कानी येत होते. माझ्या कानाच्या कमळात भुंगा तर गेला नाही ना असे वाटून मी खात्री करून घेतली पण तिथे तर साधा मच्छरही शिरला नव्हता. असे काय होते ते मला आणि सार्या देशाला धक्का देणारे वाक्य?
सॅडणवीस आपल्या नेहमीच्या स्टाइलमध्ये त्रिवार बोलले, ‘मोदीच पुन्हा येतील, मोदीच पुन्हा येतील, मोदीच पुन्हा येतील.’
मग मी जेवताना सॅडणवीस यांच्या त्या विधानाचा गांभीर्याने विचार करू लागलो. जेवण त्वरेने आटोपून मी माझा मानलेला मित्र पोक्या याला त्वरित गाठले. त्याचा राजकारणाचाच नव्हे तर सगळ्याच गोष्टींचा अभ्यास माझ्यापेक्षा जास्त आणि टोकदार आहे. त्याच्यापुढे मी म्हणजे जॉनी वॉकरपुढे मोसंबी. मी त्याला मागच्या दाराने आमच्या नेहमीच्या बारमध्ये नेले. सॅडणवीसांच्या त्या आकाशवाणीबद्दल त्याला विचारले. तो म्हणाला, मी त्या पात्राचा, म्हणजे तुमच्या भाषेत व्यक्तिरेखेचा, म्हणजे आमच्या भाषेत कळसूत्री बाहुल्याचा पूर्ण अभ्यास केला आहे. त्यावरून त्यांनी ‘मी पुन्हा येईन’ या वाक्याचा कायमचा त्याग करून ‘मोदीच पुन्हा येतील’ या वाक्याचा घोष करण्याची नवी स्टाइल सुरू केली आहे, एवढाच त्याचा अर्थ दिसतो. कारण त्यांना स्वत:पेक्षा मोदी यांच्या नावाचा प्रभाव लोकांवर अधिक पडेल असा विश्वास वाटतो आणि एकच वाक्य तीन वेळा बोलल्याने त्याचा त्रिमितीय व्हॉइस इफेक्ट जास्त होतो, असे त्यांना बंबय्या बँकेचे प्रेसिडेंट पेंग्विन पॅरेकर यांनी सांगितले असावे. आपण त्यांच्याशीच डायरेक्ट बोललो असतो, पण ते सध्या जरा साफसफाईच्या कामात गुंतले आहेत. त्यामुळे आपण सॅडणवीसांशीच व्हिडियो कॉल करून बोलूया. त्यांना ते आवडतं. सध्या त्यांचा वेळ पण जात नाही ना. त्यामुळे ते मोकळेच असतात.
हा बघा लावला कॉल. किती राजबिंडे दिसतात नाही! टोच्या, तूच बोल.
– मिस्टर, सॅडणवीस, कॉल अशासाठी केला की, हल्ली तुम्ही खूप छान दिसता. म्हणून तुम्हाला काही प्रश्न विचारावेसे वाटतात. मला गोबर्या गोबर्या गालांची माणसं खूप आवडतात आणि तुमचं ते ‘मी पुन्हा येईन’ माझ्या कानात एवढं बसलंय ना की घरातून बाहेर जातानाही बायकोला ‘मी पुन्हा येईन’ सांगूनच जातो.
– काय थट्टा करता राव, पण आता ते विसरून जायचं. आता ‘मोदी पुन्हा येतील’ असं म्हणायचं.
– अहो पण आता हे मी माझ्या बायकोला पुन्हा पुन्हा का म्हणून सांगायचं?
– नका सांगू. इतरांना सांगा, पण मी जे त्रिवार सत्य आहे तेच सांगतो.
– पण ते खोटं ठरतं त्याचं काय!
– आता नाही खोटं ठरणार.
– का बरं?
– आता बघा. आता त्यांचा एकंदरच मेकओव्हर पाहिलात तुम्ही? एक मूर्तिमंत तपस्वी, अबोल, शांत अणि समाधी लावल्यासारखं ध्यान. फक्त पायघोळ झगा घातला असता आणि डोक्याला भगवा फेटा बांधला असता तर त्या पांढर्या, सोनेरी लांबलचक दाढीतल्या त्यांच्या पायावर नतमस्तक व्हावं असंच कुणालाही वाटेल.
– म्हणजे त्यांचा वाल्मिकी झाला म्हणा की.
– तसं म्हणायला ते काही वाल्या नव्हते. ज्यांना लोक चाहतात असे ते महापुरुष होते पूर्वी. त्यातून आज या स्थितीला आले.
– आणि या देशाला त्यांनी चहासारखे उकळवले.
– अहो, काहीतरीच काय बोलता? आज ते आहेत म्हणून देश आहे. देशासाठी केवढा त्याग केलाय त्यांनी. घरदार सोडून देशाला वाहून घेतलंय त्यांनी. देशात-परदेशात कुठेही सभेत गेले तर त्यांच्या नावाचा मोदी मोदी मोदी मोदी असा इतका घोष होतो की तो थांबण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागतो. असा महापुरुष देशाच्या सुदैवाने आपल्याला लाभला आहे, तर त्या विकास पुरुषाची टिंगलटवाळी करून कसे बरे चालेल. देशाला ‘अच्छे दिन’ त्यांनीच आणले ना?
– अच्छे दिन आणले? आम्ही नाही पाहिले बुवा कुठे.
– त्यासाठी डोळे उघडे ठेवावे लागतात.
– म्हणून मग पश्चिम बंगालमध्ये एवढा आटापिटा करून शंभरही जागा जिंकता आल्या नाहीत तुमच्या पक्षाला. आता तर देश पूर्ण अधोगतीला चाललाय. त्यात तो ‘कोरोना’ आलाय. तिथेही त्याला आळा घालायचे प्रयत्न सोडून लस घेतल्याच्या प्रशस्तीपत्रावर यांचा फोटो! शिक्षणसंस्थांना मोदींचे आभार मानायचे आदेश. काय गरज आहे का त्याची? फक्त स्वत:ची प्रतिमा उजळवण्यासाठी ही असली प्रसिद्धीची हाव. आणि तुम्ही म्हणता ते पुन्हा येतील. तुम्ही तरी कुठे पुन्हा आले? तुम्ही तर तेव्हा सारखे ‘मी पुन्हा येईन’ असेच म्हणत होतात. आता ‘मोदीच पुन्हा येतील’ असे म्हणताय.
हे मी म्हणत नाही. माझ्याकडून एक दैवी शक्ती हे म्हणवून घेतेय. ते आले तर मी येणार ना! त्यामुळे तसं म्हणण्याशिवाय गत्यंतरच नाही आम्हाला. कळले. नाही कळले? त्याला डोस्के लागते!
आम्ही विचार केला, मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन असा त्रिवार उच्चार करून ते पुन्हा येऊ शकले नाहीत. कदाचित मोदी पुन्हा येतील, याचा त्रिवार उच्चार केल्यावर मोदींपासूनही देशाची सुटका होईल… असते एकेकाच्या जिभेची ताकद!
आमच्या चेहर्यावरचा आनंद पाहून आणि तो का झाला हे माहिती नसल्याने त्यांच्याही चेहर्यावर अपरिमित आनंद पसरला.