अशी आहे ग्रहस्थिती
राहू-बुध वृषभेत, रवि मिथुनेत, मंगळ-शुक्र कर्केत, केतू वृश्चिकेत, शनि आणि प्लूटो वक्री मकरेत, गुरू आणि नेपच्यून वक्री कुंभेत, चंद्र आठवड्याच्या सुरवातीला मीनेत, नंतर मेषेत आणि आठवड्याच्या अखेरीस वृषभेत.
मेष – किस्मत की हवा कभी नरम कभी गरम असे अनुभव या आठवड्यात येतील. त्यामुळे नाराज होऊ नका. कोणतेही कारण असो, त्यावर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. शांत राहण्यास पसंती द्या. लाभात असणार्या वक्री गुरूमुळे भाऊबंदकीमधील विषय मार्गी लागण्यास मदत होईल. प्रवासात काळजी घ्या.
वृषभ – येत्या आठवड्यात काही प्रमाणात आरोग्याच्या तक्रारी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्या. प्रवासात एखादी मौल्यवान वस्तू हरवण्याची शक्यता आहे. त्यामुळे योग्य सावधगिरी बाळगा. काही कारणांमुळे नात्यांत वादविवाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बोलताना नियंत्रण ठेवा.
मिथुन – अनेक दिवसांपासून पैशांची ओढाताण जाणवत असेल तर कुठून तरी मदतीचा हात पुढे येईल आणि अडचणीतून बाहेर याल. वक्री गुरूमुळे अनेक कामे मार्गी लागण्यास मदत होईल. आरोग्याची काळजी घ्या. किरकोळ तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका, ते नंतर महागात पडू शकते.
कर्क – आठवडा आनंदात जाईल. जुनी येणी वसूल होतील. नवीन व्यवसायाची एखादी कल्पना डोक्यात येईल. पण पुढे जाताना विचार करून निर्णय घ्या. एखाद्या कामातून चांगला लाभ मिळू शकतो. त्यामुळे खूष राहाल. कुटुंबासाठी वेळ द्याल.
सिंह – तुमच्या व्यवसायाची गाडी रूळावरून खाली आली असेल तर येत्या आठवड्यात ती पूर्वपदावर येईल. खासकरून कामाच्या निमित्ताने परदेशात जाण्याचे योग जमून येत आहेत. ते यशस्वी होतील. प्रवासात आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
कन्या – आरोग्याबाबत काही तक्रारी भेडसावत असतील तर त्यांचे तात्काळ निवारण करून घ्या. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. नाहीतर पोटदुखीसारखे आजार उद्भवू शकतात. वाहन चालवताना काळजी घेतलेली बरी, नाहीतर अपघाताला निमंत्रण मिळू शकते.
तूळ – पावसाळी हवामानामुळे बाहेर फिरायला जाण्याचा मोह होईल. मात्र, वक्री शनीमुळे घात होऊन एखाद्या छोट्या अपघाताला निमंत्रण मिळू शकते. आर्थिक बाजू सांभाळा, कुणाला पैसे देऊ नका आणि कुणाकडून घेऊ नका. चुकून गडबड होऊ शकते.
वृश्चिक – प्रवासाला जाणार असाल तर वाहन चालवताना घाई करू नका, अन्यथा नस्ती आफत ओढवू शकते. त्यामुळे स्वभाव चिडचिडा होऊ शकतो आणि एखाददुसरी चूक घडू शकते. बोलताना तोंडावर नियंत्रण ठेवा अन्यथा नव्या वादाला तोंड फुटू शकते.
धनू – अनेक दिवसांपासून वडिलोपार्जित मालमत्तेबाबत काही प्रश्न निर्माण झाले असतील तर ते मार्गी लागण्यास विलंब लागू शकतो. रवि आणि गुरू नवपंचम योगामुळे तुमची पतप्रतिष्ठा शाबूत राहील. जुनी येणी वसूल होतील, धारदार वस्तूंपासून जपा.
मकर – जुन्या मित्रांबरोबर अचानक गाठीभेटीचे योग आहेत. प्रेमी युगुलांसाठी आनंदाचा काळ आहे. लाभातला केतू आणि पंचमातील राहू यामुळे अनपेक्षित लाभ मिळू शकतात. कुठे नवीन गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर विचार करून निर्णय घ्या.
कुंभ – या आठवड्यात खर्चात भर पडू शकते, त्यामुळे चिडचिड होऊ शकते. पैशाची आवक चांगली राहील. नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी काम करताना खबरदारी घ्या. एखादी चूक पथ्यावर पडू शकते. प्रवासात वस्तू सांभाळा, चोरी होण्याची शक्यता आहे.
मीन – अनेक दिवसांपासून शेअरबाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असताल तर बिनधास्त आगे बढो, चांगले लाभ होऊ शकतात. एखादी लॉटरी लागण्याचे योग आहेत. आध्यात्मिक कार्यासाठी वेळ द्याल. एखादे मनासारखे काम होईल, त्यामुळे खूष राहाल.