नाझी विचारांचा प्रभाव जर्मनीत वाढू लागल्यावर पक्षप्रचाराचे प्रमुख माध्यम म्हणून चित्रपट आणि टीव्ही शोकडे लक्ष देण्यात आले.चित्रपटांमध्ये समाजात मोठा प्रभाव टाकण्याची क्षमता व समाजातील यांची लोकप्रियता ओळखून चित्रपट कलावंताच्या प्रसिद्धीच्या जोरावर नाझी नेत्यांनी जनतेत स्वत:ची स्वीकृती वाढविण्यास सुरूवात केली. १९२७ ते १९४५ या काळातील जर्मन सिनेमे नाझींच्या प्रचाराचे प्रमुख साधन बनले.
हिटलर सत्तेत आल्यावर चित्रपटाचे कथानक काय असावे, कोणत्या कलाकारांना चित्रपटात रोल दिला जावा, चित्रपटातून काय संदेश द्यावा याचे निर्देश नाझी पार्टीकडून दिले जायचे. काही सुमार दर्जाचे कलाकार हिटलरच्या जवळ जाऊन पैसा नि प्रसिद्धी मिळवू लागले तर नाझी पक्षास समर्थन न देणार्या कलावंतांचा विविध प्रकारे छळ सुरू झाला. जोसेफ गोबेल्सने त्यासाठी खास प्रचार मंत्रालयाची स्थापना केली व जर्मन संस्कृती, देशभक्ती यासाठी जर्मन सिनेमा असे धोरण जाहीर केले. या सर्व प्रयत्नाचा मूळ हेतू समाजात ज्यूवंशियाबद्दल द्वेष सतत वाढवत त्या द्वेषावर जर्मनीचा राष्ट्रवाद विकसित करणे हा होता. हिटलर स्वत: सिनेमाचा चाहता होता. सुरुवातीच्या काळात हिटलर स्वत:ला समाजात स्वीकृती मिळविण्यासाठी लोकप्रिय चित्रपट अभिनेत्यांना भेटत असे, त्यांच्यासोबतचे छायाचित्रे, मुलाखती प्रसिद्ध करत असे. जाज्वल्य जर्मन राष्ट्रवादाच्या दांभिक प्रचारावर आवरण म्हणून या सिनेजगताच्या झगमगटाचा वापर केला जाई. गोबेल्स स्वत: प्रत्येक फिल्म पाहून त्यात सुधारणा सांगत असे.
अनेक ज्यू अभिनेत्यांना परागंदा व्हावे लागले, एवढेच नव्हे तर ज्या कलाकारांची आई वा वडील यांच्यापैकी एकजण ज्यू होते अशांना विशेष लक्ष्य करण्यात आले. सुरवातीच्या काळात ज्यूवंशियांचा द्वेष हा प्रमुख अजेंडा होता. मात्र चित्रपटात हिटलरचे विचार हे देशाला एकसंघ करण्याचे आणि बलशाली जर्मनी बनविण्याचे आहेत, असे प्रदर्शित केले जात असत. ‘Triumph des Willens’ या चित्रपटात हिटलर समाजात सर्वांना समान अधिकाराचे आणि वर्गविहीन समाजरचनेचे समर्थन करत असल्याचे दर्शवले होते. हिटलर म्हणजे समाजात समता आणणारा नायक अशी प्रतिमा निर्माण केली जात असे. प्रत्यक्षात मात्र ज्यूद्वेष चालू असे. कृतीत तर ज्यूंच्या कत्तलीही केल्या जात असत. हिटलर जर्मन नागरिकांना एकतेचा नि समतेचा संदेश देई, तेव्हा तो ज्यूंच्या विरोधात सर्वांनी एक व्हावे आणि ज्यूंचा द्वेष करणार्यांनी समतेने वागावे, असा त्याचा संदेश होता. पण पुढे द्वेषाचा परीघ देशभक्ती व जर्मन राष्ट्रवाद यांच्या आवरणाखाली वाढवला जाऊन ज्यू बरोबर देशद्रोही, जर्मनीचे विरोधक, शत्रूचे हस्तक म्हणून जिप्सी, कम्युनिस्ट, स्लाववंशीय, समलिंगी, मानसिक रूग्ण यांचा समावेश झाला.
फ्रिट्झ नावाच्या सिनेनिर्मात्याकडून गोबेल्सने ‘Der Ewig Jude’ हा चित्रपट खास तयार करून घेतला, त्याचे इंग्लिश रूपांतर ‘Eternal Jews’ असे करून घेतले. यात ज्यूंची तुलना वेगाने लोकसंख्या वाढविणार्या उंदरांशी केली होती. जसा उंदीर हा घाणेरडा नि उपद्रवी तसेच ज्यू आहेत, हे जर्मन लोकांवर बिंबवण्यात आले. कॉकेशियन वंशाच्या जर्मन स्त्रीवर एक ज्यू पुरूष बलात्कार करतो, असे कथानक असणाऱ्या ‘Jude sus’ या जर्मन नाटकास गोबेल्सने आवर्जून प्रसिद्धी दिली. यातून गोबेल्सने जनमानसांत ज्यू-ख्रिस्ती असा आंतरधर्मीय विवाह करणार्या अनेक फिल्म अभिनेत्यांना आणि चित्रपट रसिकांनाही लक्ष्य केले आणि यातून जो संदेश द्यायचा तो दिला गेला!
चित्रपटातून या सर्वांबद्दल तिरस्कार वाढविण्यास सुरूवात झाली. शुद्ध कॉकेशियन नॉर्डिक वंशाचा आग्रह धरताना यांच्याशिवाय कोणीही जर्मन देशभक्त नाही, असा प्रचार केला गेला. वायमार रिपब्लिक काळातील जर्मन सिनेमे हे जर्मन राष्ट्रवादाच्या विरोधी आहेत. पूर्वीच्या सर्व चित्रपटांवर टीका सुरू केली गेली. त्याचा मुख्य हेतू हा की, अधिकाधिक प्रेक्षक नाझी पक्षात समाविष्ट होण्यास उद्युक्त होतील. महत्वाचे म्हणजे या सर्व प्रकारास फिल्मनिर्मितीस जर्मन राष्ट्रवादी बनविण्याचे प्रयत्न म्हणून गौरविले गेले.
ज्यूविरोधात फिल्म बनविणार्या निर्मात्यांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे आणि करातूनही सवलती देण्याचे धोरण ठरवले गेले. अनेक फिल्म कंपन्या नाझी पक्षाने स्वत: स्थापन केल्या आणि त्यांचे एकत्रिकरण करून इतर देशातील गुंतवणूकदारांनाही आमंत्रित करण्यात आले. याचा अनेक नफेखोर फिल्म निर्मात्यांनी लाभ घेतला. अनेक कलावंतावर पाळत ठेवली गेली, छळ सुरू झाला. त्यातून अनेकांनी जर्मनी सोडली तर अनेक फिल्म्सवर आणि फिल्म निर्मात्यांवर, दिग्दर्शकांवर, अभिनेत्यांवर बंदी आणून त्यांना देश सोडण्यास भाग पाडण्यात आले.
नाझी पक्षाच्या ध्येयधोरणांचा प्रचार करणार्या फिल्म्सना, दिग्दर्शकांना, कलाकारांना ‘अवार्ड’ दिले जाऊ लागले. ही अवार्ड्स मिळविण्यासाठी अनेकांनी नाझी पक्षाच्या बरहुकूम काम करण्यास सुरूवात केली. काहीजण कुठलीच भूमिकाच घेत नसत, त्यांचे काही काळ चालले. पण नाझी पक्षाचा प्रभाव वाढला तसे या तटस्थ लोकांचाही छळ सुरू झाला.
दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर फिल्म जगतातील अनेक दिग्दर्शक, कलावंत, फिल्म निर्माते यांना सैन्यात भरती करण्याची धमकी देत नाझी पक्षाने हेतू साध्य केला. टीव्ही, रेडिओ यापेक्षाही सिनेमा प्रभावी असल्यामुळे दुसर्या महायुद्धात बर्लिनमधे सिनेमागृहावर बॉम्बवर्षाव होऊ नये म्हणून, त्यांना वाचविण्यासाठी खास यंत्रणा उभी केली गेली होती. म्हणजे नागरिकांच्या संरक्षणापेक्षाही नाझींसाठी सिनेमागृहे महत्वाची होती.
जर्मनीमधे पूर्वी लोकप्रिय कलाकारांची अशी एक विशिष्ट ‘स्टार सिस्टम’ होती, त्यांचा एक ‘स्टारडम’ होता. या ‘स्टार सिस्टम’ आणि ‘स्टारडम’लाही ज्यूंनी विकसित केलेली पद्धती आहे, असा प्रचार करून तिला बदनाम केले गेले. अनेक उपेक्षित स्टार्सना ही कृती खूप आवडली, त्यांनी नाझींना स्वार्थासाठी पाठिंबा देण्यास सुरूवात केली. हेच जर्मनीतील खरे फिल्म स्टार्स आहेत, असा प्रचारही लगेच सुरू झाला. याचा परिणाम म्हणून मार्लीन डिट्रीच आणि ग्रेटा गार्बो यांनी हॉलीवूडचा रस्ता धरला.
झारा लिएँडर नावाची एक अभिनेत्री १९३७मधे जर्मनीत खास स्वीडनहून आमंत्रित करण्यात आली होती. तिचा आवर्जून अभिनेत्री नि गायिका असा प्रचार नाझी पक्षाकडून केला गेला. ती पूर्णत: नाझी पक्षाने दिलेल्या हुकूमानुसार कृती करत असे. नाझी नेते हिटलर, गोबेल्स, गोरिंग हे जनतेमधे वावरत असताना या अभिनेत्रीला सोबत ठेवत. हिटलर स्वत: त्याची डिनर पार्टी अथवा एखादा पब्लिक इव्हेंट ओल्गा त्शेकोवा आणि लिल डॅगोव्हर यांच्यासोबत साजरा करत असे. त्यांनाही ते हवेच होते!
सिनेजगताशी सख्य हे नाझी नेत्यांना लोकप्रिय होण्यासाठी आवश्यक होते. नाझी पक्षाशी सख्य या कलाकारांना प्रसिद्धी नि पैसा मिळविण्यासाठी उपयुक्त होते. म्हणून देशोदेशीच्या फिल्म कलाकरांनी यात पैसा नि प्रसिद्धी मिळवली. यात काही रशियन, पोलिश, हंगेरियन फिल्म कलाकारही होते.
गोबेल्सने १९४४ साली, कलावंतांची एक ‘Gottbegnadeten List’ तयार केली. ही लिस्ट म्हणजे या कलावंतांना चित्रपटात घ्यायलाच हवे, असे सांगणारी होती. कारण ते या लिस्टनुसार ‘irreplaceable artist’ बनले होते. जणू त्यांना वगळणे म्हणजे देशद्रोहच! या लिस्टमधे आपले नांव असावे म्हणून अनेकांनी धडपड केली. दुसर्या महायुद्धात देशभक्तीच्या नावाखाली अशा अनेक कलाकारांनी हिटलरच्या युद्धास स्वाभाविकपणे समर्थन दिले.
नाझींच्या अस्तानंतर या सर्व कलाकारांची जनतेने काय अवस्था केली, हा स्वतंत्र लेखनाचा विषय आहे. पण एखाद्या देशात फॅसिस्ट नि नाझी विचार प्रभावी होत असताना स्वत:ला निव्वळ तत्कालीन फायद्यानुसार अनुरूप बनवणे सिने कलाकार, लेखक, नाट्यकर्मी यांचा भविष्यकाळ कसा होऊ शकतो, याचे उदाहरण म्हणून याकडे पाहणे गरजेचे आहे. जगात जिथे कुठे फिल्म इंडस्ट्री आहे, तिथे अजून तरी हा असा प्रयोग पुरता यशस्वी झालेला नाही, पण भविष्याच्या उदरात नेमका कसला गर्भ पोसला जातो आहे, याची कल्पना अजिबातही करता येत नाही.