गुजरातेत अगदी कोवळ्या वयातच मुलांना धंद्याचं बाळकडू पाजलं जातं. शाळकरी मुलांना या वयातच शे-पाचशे रुपये देऊन त्याला शेअर मार्केटच्या रिंगमधे ढकलून देतात. रिंगमधे सराईतपणे वावरणारे सगेसोयरे असतातच. मार्केट सातत्याने डाऊन असलं तरी मार्जिन ट्रेडिंग करून दिवसाचा मुनाफा काढणारे अट्टल ट्रेडर असतात. नाना प्रकारच्या क्लृप्त्या करून बाजाराच्या नियमात फटी शोधून किंवा नियम वाकवून आपली धन करणारेही असतात. माझे चुलते नामांकित शेअर दलाल होते. बाबांनाही धंद्याचा चांगला अनुभव होता. परंतु मला मात्र शेअर मार्वेâट किंवा धंद्यात बिलकुल गती नव्हती.
इतर लोक ट्रेडिंग करीत असले म्हणजे मी मजा पाहावयास जात असे. परंतु स्वतः मात्र कधी शेअर घेतला नाही. मला फार भीती वाटे. आमच्या शेजारची लहान लहान मुलेही धडाधड शेअर्स विकत घेत-विकून टाकत. परंतु मी मात्र भित्री भागुबाई! ‘घ्या रे गौत्याला मार्केटमध्ये!’ असे कोणी म्हटले की मी तिथून पोबारा करीत असे. माझे बाबा पुष्कळ वेळा म्हणत, ‘अरे गौत्या, कमवायला शिक. ती लहान लहान मुले पैसे कमवतात आणि तुला रे कसली भीती? तुला धंद्यात बुडू देतील का इतके सारे जण! उद्या चांगला चांगला दिवस आहे. डिमॅट अकाउंट उघड आणि ट्रेडिंग सुरु कर. तो मेहतांचा जिग्नेस, तो तुला शिकवील. नाहीतर बाऊजीबरोबर जा. अरे शेजारची हेतल व किंजल, त्यासुद्धा शिकल्या शेअर मार्केट. तू बांगड्या तरी भर. पण बांगड्या भरणार्या मुलींहून सुद्धा तू भित्रा!’
सोमवार उजाडला. आज बाबा मार्केटमधे पाठविल्याशिवाय राहणार नाहीत, हे मी नक्की ओळखले होते. मी माळ्यावर लपून बसलो. साधारण सकाळचे दहा वाजायची वेळ. शेजारचे हितेस, भावेश, निरव आले.
‘गौत्याचे बाबा, गौत्या येणार आहे ना आज मार्केटला?’.
‘हो येणार आहे. परंतु कोठे आहे तो? मला वाटले की तुमच्याकडेच आहे. गौत्या अरे गौत्या कुठे बाहेर गेला की काय!’ असे म्हणून बाबा मला शोधू लागले. मी वरून सारी बोलणी ऐकत होतो.
बाबा म्हणाले, ‘बघा बरे वर असला तर. त्याला उंदीर-घुशीसारखी लपण्याची सवयच आहे. मुले माळ्यावर येऊ लागली. आता मी सापडणार असे वाटू लागले. मी बारीक बारीक होऊ लागलो. परंतु बेडकीला जसे फुगून बैल होता येणार नाही, त्याप्रमाणे बैलाला बारीक बेडकीही होता येत नाही. मला वाटले की भक्तीविजयात ज्ञानेश्वर एकदम लहान माशी होऊन तळ्यातून पाणी पिऊन आले, तसे मला जर लहान होता आले असते तर! भाताच्या कणग्याआड मी मांजरासारखा लपून बसलो होतो. मी सापडत नाही म्हणून ते सगळे जाऊ लागले.
इतक्यात भावेश म्हणाला, ‘अरे तो बघ. त्या कणगीच्या पाठीमागे…’
‘गौत्या चल ना रे, असा काय लपून बसतोस रे…’ सगळे म्हणाले.
‘आहे ना वर. मला वाटलेच होते वरती लपला असेल म्हणून. घेऊन जा. त्याला नेल्याशिवाय राहू नका,’ बाबा म्हणाले.
ती मुले जवळ येऊन मला ओढू लागली. परंतु किती झाले तरी ती परक्यांची मुले. ती जोर थोडीच करणार! ती हळूहळू ओढत होती आणि मी सर्व ताकद लावीत होतो.
‘गौत्याचे बाबा, तो काही येत नाही व जागचा हलत नाही,’ मुले म्हणाली.
बाबांना राग आला व ते म्हणाले, ‘बघू दे कसा येत नाही तो! कोठे आहे? मीच येतो थांबा…’ बाबा माळ्यावर आले व रागाने माझा हात धरून त्यांनी ओढले. ते मला फरपटत ओढू लागले तरी मी हटून बसतच होतो. एका हाताने बाबा ओढीत होते व दुसर्या हाताने शिंपटीने मला मारू लागले. बाबा मुलांना म्हणाले, ‘तुम्ही हात धरा व ओढा. मी पाठीमागून हाकलतो व झोडपतो चांगला. बघू कसा येत नाही तो.’
मुले मला ओढू लागली व बाबा शिंपटीवर शिंपटी देऊ लागले. ‘नको रे मला मारू! आई गं मेलो…’ मी ओरडू लागलो.
‘काही मरत नाहीस. ऊठ तू. उठून चालू लाग. आज मी सोडणार नाही तुला. दोन-चार शेअर्स तरी घ्यायला-विकायला लावा ह्याला. पैसे येतात कसे, बुडतात कसे, सेन्सेक्स खाली-वर होताना जीव कसा खालीवर होतो, ते कळू द्या ह्याला. उठ, अजून उठत नाहीस? लाज नाही वाटत भिकार्या लपून बसायला! त्या मुली आल्या बघ फजिती बघायला,’ असे म्हणून बाबांनी जोराने मारणे चालविले. ‘जातो मी, नका मारू…’ मी म्हटले.
‘गौत्या, अरे एकदा मार्केटमधे उडी मारली म्हणजे तुझा धीर आपोआपच चेपेल. मग आम्ही नको म्हटले तरी तू आपणहून व्यवहार करशील. रडू नकोस,’ हितेश म्हणाला.
स्टॉक एक्स्चेंजमधे गेलो. तिथे पटेलांचा देवेन व इतरजण व्यवहार करीत होते. ‘काय आज आला का गौत्या! ये रे मी तुला टिप देतो हो…’ असे म्हणून देवेन पटेलने कमी मूल्याचे कोणते शेअर्स घेण्यासारखे आहेत ते सांगितले. मी थरथर कापत होतो. ‘हां, कर आता पहिला सौदा…’ देवेन म्हणाला.
हा शेअर घेऊ की तो? घेऊ की घेऊच नको? की पळून जाऊ? असे माझे चालले होते.
इतक्यात एकदम कुणीतरी माझ्या वतीने सौदा केला. मी ओरडलो, ‘अरेरे हे काय केलंत, पैशे गेले ना माझे…’
मग मी समोर स्क्रीन बघू लागलो. क्षणात सेन्सेक्सला खाली जाताना पाहून पैसे गेल्याच्या भीतीने माझे हातपाय गार पडू लागले. क्षणात शेअर वाढताना बघून मला उचंबळून येऊ लागलो. मला थांबण्याचा, धीर धरण्याचा सल्ला मिळू लागला.
‘घाबरू नकोस आणि उत्तेजितही होऊ नकोस. तशाने माणूस डेस्परेट बाईंग किंवा सेलिंग करतो. धीर धर. इतर लोक काय करताहेत ते बघ आणि मगच निर्णय घे. जिग्नेशभाई मला धंद्याचा वस्तुपाठ देत होता. मी थोडा वेळ बाजाराचा कल पाहून, घेतलेला शेअर विकला. पहिल्याच दिवशी मला वट्ट दहा रुपये फायदा झाला.
‘शाब्बास रे गौत्या! आता शिकलाच शेअर-व्यवहार. भीती गेली की सारे आले,’ जिग्नेशभाई म्हणाला. त्याने मला त्याचे काही सौदे दाखविले व शॉर्ट सेल करणे, फ्युचर अँड ऑप्शन ट्रेडिंग असे आणखी शिकविले.
मुले माझ्याबरोबर मला पोहोचवायला घरी आली. मयूर म्हणाला, ‘गौत्याचे बाबा, गौत्याने आपण होऊन एक व्यवहार केला. मुळीच डगमगला नाही आणि बोल्टवरील व्यवहार त्याला थोडे थोडे कळूही लागलेत. विरलभाई तर म्हणाले की, गौत्या हुशार आहे. शेअर मार्वेâटच काय, गौत्या भविष्यात परकीय भांडवलावर कंपन्या काढायला, कृत्रिमपणे शेअर्सचे भाव वाढवायला, राजकारणी खिशात घालायला आणि बँकांकडून मोठमोठी कर्जे घेऊन बँका बुडवायला आणि इतकं करून नामनिराळा राहायलाही शिकेल!
‘अरे धंद्यात पडल्याशिवाय आणि नाकातोंडात पाणी गेल्याशिवाय भीती जात नाही,’ बाबा म्हणाले.
मुले निघून गेली. मी घरात जरा रागावून बसलो होतो. बाबा जेवावयास बसले होते. मी ओसरीवर होतो. इतक्यात ‘गौत्या’ अशी बाबांनी गोड हाक मारली. मी बाबांजवळ गेलो व म्हटले, ‘काय बाबा?’
बाबा म्हणाले, ‘तो जिलेबी-फाफडा घे आणि संपवून टाक. तुला आवडते ना!’
‘मला नको जा. सकाळी मार मार मारिलेस आणि आता जिलेबी-फाफडा देतोस,’ मी रडवेला होऊन म्हटले, ‘हे बघ माझ्या अंगावर अजून वळ आहेत. अख्खा दिवस गेला तरी ते गेले नाहीत. ते वळ आहेत तोवर तरी जिलेबी-फाफडा देऊ नकोस. ते वळ मी इतक्या लवकर कसा विसरेन?’
बाबांचे डोळे भरून आले होते. ते तसेच उठले. त्यांच्याने खिचडी गिळवेना. ते हात धुऊन आले. बाबा तसेच जेवण पुरे न होता उठले हे पाहून मला खूप वाईट वाटले. माझे बोलणे बाबांना लागले का, असे मनात आले. बाबांनी तेलाची वाटी आणली व माझ्या वळांना ते लावू लागले. मी काही बोललो नाही. बाबा रडवेले होऊन म्हणाले, ‘गौत्या, गुजराती असूनही तू व्यवहारशून्य आहेस असे का जगाने तुला म्हणावे? माझ्या गौत्याला कोणी नावे ठेवू नयेत म्हणून मी त्याला मारिले. गौत्या, तुझ्या बापाला त्याची मुले कामधंद्यात ढ आहेत असे कोणी म्हटले तर ते तुला आवडेल का? ते तुला चालेल का? तुझ्या बापाचा अपमान तुला सहन होईल? माझ्या मुलांचा कोणी अपमान केला तर ते मी सहन करणार नाही व माझा कोणी अपमान केला तर माझ्या मुलांनी सहन करता कामा नये. असे असेल तरच मी त्यांचा खरा बाप व ते माझे खरे मुलगे. फार संवेदनशील राहू नकोस, मुर्दाड हो. हा मार्ग भला, तो मार्ग बुरा असं काही मानू नकोस. मार्गांचा विधिनिषेध बाळगशील तर आपल्या उद्दिष्टांना वाईट वाटेल. काहीही करून एक दिवस आपल्याला जगात एक नंबर व्हायचं आहे हे ध्यानात ठेव.’
गड्यांनो, माझ्या बापाला कुठल्याही मार्गाने जग जिंकणारा मुलगा हवा होता, कायद्याचं भय बाळगणारी ‘भित्री भागुबाई’ नको होती.