गेले-गेले ते दिवस अदानी बिदानी सडाणी ददानीचे दिवस… संपत आलीय एबीसीडी ढोंगी हिंदुत्वाची. आता दिवस सुरू झालेत `बीबीसी’चे. भक्तानी तरी कुठं माहीत होतं, बीबीसी म्हणजे काय ते? त्यांना बिचार्यांना चायवाला सांगेल ते प्रमाण. वायवाला सांगेल ते विमान. म्हणजे आता बघा ना ते नोटाबंदीच्या वेळी काय काय सांगितलं होतं ह्यांनी… की अमुक कोटी की तमुक अब्ज काळा पैसा दहशतवादासाठी भारतात वापरला जातोय, तो नोटाबंदीमुळे बाहेर येणार, तर तुम्ही रांगेत उभे राहून नोटा बदलून घ्या वगैरे- तर बिचारे लाखो राष्ट्रभक्त राहिले उभे रांगेत… नी मग गेले चायवालाच्या टांगेत. थाळ्या वाजवून कोरोना जाईल, वाजवून तर बघा, असं महाशय म्हणाले, तेव्हा तर थाळ्या नि टाळ्या एकसाथ वाजत राहिल्या… पण थाळ्या फुटल्या तरी हजारोंच्या मसनवटीकडे जायच्या पाळ्या काही संपल्या नाहीत. पार्लमेंटात प्रश्न विचारले गेले, त्यावर उत्तरे दिली गेली नाहीत. अलीकडे चायवाल्याबरोबरचा अदानीचा फोटो राहुल गांधींनी संसदेत दाखवून २०१४ नंतर अदानीच्या संपत्तीत इतकी वाढ कशी झाली, असा प्रश्न विचारला तर ह्यांच्या दाढीवरून थंडच चाय तास-दीड तास ओघळत राहिली. आणि आता वायवाला तडीपार बाहेर चॅनेलवाल्यांना सांगतोय की अदानीचा आमच्या पक्षाशी काही संबंध नाही. अरे मग भल्या गृहस्था अदानी प्रकरणात जॉइंट पार्लमेंटरी कमिटी का नाही नेमत तुम्ही? पीएमकेअर फंडात कुणी किती पैसे जमा केलेत, हे का नाही जाहीर करत? बरं ते जाऊ द्या… `बीबीसी’ला चायनाकडून पैसा पुरवला जातो नि ते भारताविरोधी प्रचार करणार्या डॉक्युमेंटर्या काढतात, असं तुमचं म्हणणं आहे तर त्या चायनाच्या बीबीसीला अर्थपुरवठा करणार्या अदान्यांची नावं जाहीर करा ना.
`इंडिया द मोदी क्वेश्चन’ हा माहितीपट भारताविरोधी आहे?
अरे बाबांनो तुम्ही म्हणजे भारत नव्हे. तुम्ही म्हणजे खारट. तुम्ही म्हणजे सुरत. नाय नाय तुम्ही म्हणजे बदसुरत. तुम्ही गुजरातमध्ये जी काय पापं करून ठेवलीत ती आता हळूहळू बाहेर येतायत. मेलेले मुडदे भुतं होऊन तुमच्यासमोर उभे राहिल्यावर खरं तर बोबडी वळतेय तुमची. ठीक आहे… एक वेळ धरून चालू की बीबीसीने काढली तुमची पापं बाहेर. तर त्यांना उत्तर देणारी, तुमची बाजू मांडणारी दुसरी डॉक्युमेंटरी त्या `काश्मीर फाईल्स’वाल्यांकडून तयार करवून घ्या आणि दाखवा की जगभर. त्यासाठी एवढं घाबरायला कशाला हवं? अरे येड्यांनो, तुम्ही त्या `मोदी क्वेश्चनवर बंदी आणून उलट जगाच्या लक्षात आणून दिलंत की अशी काय तरी डॉक्युमेंटरी निघालीय. मग लोक शोधून शोधून ती डॉक्युमेंटरी बघू लागले. भारतीय मीडियावर तुम्ही आणि तुमचे प्रवक्ते सारखे पादत असतात, पण आपला मीडिया नाक-तोंड दाबून मुकाट्याने ते सहन करतो. `बीबीसी’ कशाला जुमानेल तुमच्या अरेरावीला? तुम्ही काय ते इन्कमटॅक्स सर्वेक्षण-बिर्व्हेशन करा, बीबीसीचं काही फरक पडत नाही त्यांना. तुमचीच टिमकी वाजवत राहणारे ऑल इंडिया रेडिओ किंवा दूरदर्शन नाही बीबीसी म्हणजे.
१९२२ साली स्थापन झालेले ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कंपनी १९२७मध्ये सार्वजनिक बनली. जगातली सर्वात मोठी प्रसारण संस्था आहे बीबीसी. इंग्लंडमध्ये २८,५०० कर्मचारी आहेत त्यांचे. तुम्ही दिल्ली आणि मुंबईतल्या बीबीसीच्या कर्मचार्यांचे लॅपटॉप नि मोबाईल ताब्यात घ्या रे. सरड्याची धाव कुंपणापर्यंत. तिकडे इंग्लंडमध्ये पाठवा बघू तुमच्या इन्कमटॅक्स, सीबीआय, ईडीवाल्यांना. बीबीसीवाले त्यांच्या ढुंगणावर लाथा घालून आल्या पावली परत पाठवतील. खर्या अर्थाने स्वयत्त प्रसारण संस्था आहे ती. तुमच्या `प्रसार भारती’सारखी नाही सरकारने टाकलेले तुकडे चघळत बसणारी.
`नेशन शाल स्पीक पीस अनटू नेशन’ हे बोधवाक्य आहे `बीबीसी’चं पक्ष नि:पक्षपातीपणा, अचूकता आणि स्वातंत्र्य हे मूल्य प्राणपणाने जपून ठेवणारी प्रसारण संस्था, असा लौकिक आहे बीबीसीच्या जगभर. आणि ह्यात काही नेहरू गांधींचा हात बित नाही हां… आपला आपण वाढवत नेलाय लौकिक `बीबीसी’ने. जगभराच्या २०० देशांमध्ये ३०० दशलक्ष घरांमध्ये `बीबीसी’च्या बातम्या ऐकल्या आणि पाहिल्या जातात. फक्त सध्या रशिया आणि चायना या देशांनी `बीबीसी’ला बॅन केलंय. काय फरक पडलाय का `बीबीसी’ला? आता समजा उद्या तुम्ही भारतात त्यांच्यावर बॅन आणला, तर `बीबीसी’ तुमच्या कृष्णकृत्यांवर माहितीपट तयार करायचं थांबवेल का? उलट आता तर दुप्पट जोमानं तुमच्या मागे लागतील राव. अनेक विषय तुम्ही त्यांना देऊन ठेवलेत… जसे की मॉब लिचिंग, अदानी ब्लिचिंग, पेगॅसस, राफेल फाईल्स, खोका सरकार इत्यादी इत्यादी.
काय राव, तुमची चड्डी काढली… म्हणजे सोडली… की लगेच, बघा बघा आमच्या देशावर हल्ला करताहेत, अशा बोंबा मारायच्या? तुम्हाला काय वाटतं, ह्यामुळे बोंबा थांबतील? नाय वो… असं नाय होत. देश म्हणजे नाही फक्त भगवा वेश. देश म्हणजे नाही दाढीमधला केस. देश म्हणजे नाही ५६ इंची मेस. देश म्हणजे नाही भाषण साबणफेस. देश म्हणजे नाही धर्मांमधली रेस… देश म्हणजे…
`बहुजन हिताय… बहुजन सुखाय’ हे आकाशवाणीचं ब्रीदवाक्य `सत्यम शिवम सुंदरम’ हे दूरदर्शनचं बोधवाक्य. आपल्या या भारतीय प्रसारण संस्थांची सध्याची अवस्था पहा महाराज. मग `बीबीसी’च्या वाटेला जा.. चमच्यांच्या तैनाती फौजदार पदरी बाळगून कोंबडं फार दिवस झाकून नाही ठेवता येत. कधी ना कधी ते ओरडतंच… `इंडिया : द मोदी क्वेश्चन!